नूपुर चौधरी : पोल डान्स शिकतीये म्हटल्यावर काहींनी 'तू स्ट्रीपर होणार तर' असे टोमणेही मारले

- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी पुण्याहून
"बॉलिवूडच्या गाण्यांमध्ये पोल डान्स बार डान्स प्रमाणे दाखवतात. त्यामुळे लोकांचा तसाच समज झालेला असतो."
"मी पोल डान्स शिकतीये कळल्यावर माझ्या मित्र-मैत्रिणींनी विशेषतः मित्रांनी म्हटलं की, म्हणजे आता तू स्ट्रीपर होणार तर..."
"पोल डान्स करताना आम्ही छोटे कपडे घालतो, कारण आम्हाला पोलला स्कीनने ग्रिप करायचं असतं. पण लोकांना ते माहीत नसतं. त्यांना वाटतं की, आम्ही अंग प्रदर्शन करतो."
पुण्यातल्या नुपूर चौधरी सांगतात. 35 वर्षांच्या नुपूर चौधरी पोल आर्टिस्ट आहेत.
आयटम साँग, झगमगीत क्लबमधला तोकड्या कपड्यांमधला डान्स...हीच आपली पोल डान्सबद्दलची कल्पना असते. आपलं पोल डान्सबद्दलचं ज्ञान एवढं तोकडं आणि अपुरं ठेवण्याचं सगळं क्रेडिट जातं हिंदी सिनेमाला. पण ही एक कला आहे, जी मोठ्या कष्टानं साध्य करावी लागते. म्हणूनच नुपूर चौधरी स्वतःची ओळख पोल आर्टिस्ट अशी करून देतात.
याला वेगवेगळी नावं आहेत. पोल डान्स, पोल आर्ट, पोल स्पोर्ट, पोल फिटनेस आणि एक्झॉटिक पोल डान्सही असतो. ही वेगवेगळी नावं आहेत, कारण या प्रत्येकासाठी वेगळी स्टाईल लागते, शैली असते, नुपूर सांगतात.
पोलवरची नुपूर यांची लवचिकता, त्यांचं लालित्य पाहिलं की पोल आणि नुपूर यांचं नातं किती जुनं आहे, असं वाटतं. नुपूर यांना पोलबद्दलचं आकर्षण टीन एजमध्येच निर्माण झालं होतं, पण त्यांनी पोल डान्स शिकायला सुरूवात केली वयाच्या 32व्या वर्षी.
पोल डान्सबद्दल कळण्यापासून तो शिकायला लागण्यापर्यंतचा नुपूर यांचा सगळा प्रवास होता तरी कसा?
"मी शाळेत असताना पहिल्यांदा एका इंग्रजी चित्रपटात पोल डान्स पाहिला होता. तेव्हा तो प्रकार खूप नवीन होता. तेव्हा मला खूप उत्सुकता वाटली की, या मुली कशा काय या एका खांबाला चिकटून राहू शकतात? स्वतःचा बॅलन्स सांभाळतात?"
नकळत्या वयात पोल डान्सबद्दल निर्माण झालेलं नुपूर यांचं आकर्षण पुढेही कायम राहिलं. नंतर पुढे त्या उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेल्या. तिथे एका क्लबमध्ये त्यांनी पुन्हा एकदा पोल डान्स पाहिला. भारतात परत आल्यावर त्यांनी पोल डान्सबद्दल माहिती घ्यायला सुरूवात केली.
पण पुण्यात कोणी पोल डान्स शिकवत नव्हतं. मुंबईला एक प्रशिक्षक होत्या, परंतु त्यांनी एक अट ठेवली...तुम्ही दहा विद्यार्थी जमवा, मी येते पुण्याला.
नुपूर तेव्हा नोकरी करत होत्या. पत्रकार म्हणून काम करत होत्या. त्यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांना विचारलं, मैत्रिणींना विचारलं. पण पोल डान्स का शिकायचं? आता कसं शिकणार? असे प्रश्न विचारत कोणी तयार झालं नाही. नुपूर यांचा पोल डान्स शिकण्याचा विचार पुन्हा एकदा मागे पडला.
काय होती घरच्यांची प्रतिक्रिया?
पुढे नुपूर यांनी नोकरी सोडून फूटवेअर डिझाईनचा व्यवसाय सुरु केला. तेव्हा त्यांना फावला वेळ मिळू लागला. त्यांनी पुन्हा पोल डान्सबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. मुंबईत त्यांना एक प्रशिक्षक मिळाल्या, मात्र त्यांना मुंबईला जावं लागणार होतं.
"माझे पती मला नेहमीच सपोर्ट करत होते. त्यांना माहित होतं की, मी किती वर्षांपासून पोल डान्स शिकण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे त्यांनी मला 'जा' असंच सांगितलं."
पण घरातल्या मोठ्या माणसांनी हा निर्णय कसा स्वीकारला? त्यांना पोल डान्सबद्दल काही माहीत होतं का?

फोटो स्रोत, Nupur/Instagram
या प्रश्नाचं उत्तर देताना नुपूर यांनी सांगितलं की, "आईला माझी पोल डान्सबद्दलची पॅशन माहीत होती. त्यामुळे तिनं मला पाठिंबाच दिला. पण वडिलांनी मात्र विरोध केला. हे काय आहे? आता हे शिकायची काय गरज आहे? असं त्यांचं म्हणणं होतं."
पण जेव्हा पोल डान्स केल्यानंतर नुपूरच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला तेव्हा त्यांचा सगळा विरोध मावळला.
नुपूरनं त्यांच्या सासूबाईंनाही पोल डान्सबद्दल सांगितलं. त्यांना पोल डान्सचे काही व्हीडिओ दाखवले.
"सुरुवातीला त्यांनी विचारलं तुला का शिकायचंय हे? तेव्हा मी त्यांना सांगितलं की, हे मला अनेक वर्षांपासून शिकण्याची इच्छा आहे आणि हा वेगळ्या प्रकारचा आर्ट फॉर्म सुद्धा आहे. त्यांनीही मला परवानगी दिली."

फोटो स्रोत, Nupur Chowdhary/Instagram
पती अश्विन शेट्टी आणि सासूबाई यांनी कायमच नुपूरला पाठिंबा दिला. लोकांचे या डान्स प्रकाराबद्दल अनेक पूर्वग्रह असतात. त्यामुळेच जेव्हा नुपूर पोल डान्स शिकत आहेत हे कळल्यावर काही मित्रांनी कुत्सितपणे 'अच्छा, आता तू स्ट्रीपर होणार तर' अशाही कमेंट्स केल्या.
पण नवरा आणि सासूचा भक्कम पाठिंबा असल्यानं नुपूर यांनी या गोष्टींकडे फारसं लक्ष न देता आपल्या पोल डान्सच्या स्वप्नाचाच पाठपुरावा केला.
'...त्यानंतर मी डिप्रेशनमध्येच गेले'
सुरुवात केली तरी पुढचा प्रवास इतका सोपा नव्हता. कारण नुपूर यांनी वयाच्या 32 व्या वर्षी पोल डान्स शिकण्यास सुरुवात केली होती. वयाच्या तिशीनंतर शरीरात अनेक बदल होत असतात. शरीराची लवचिकता, हाडांची घनता कमी झालेली असते. अशावेळी दुखापत झाली तर ती भरून यायलाही वेळ लागतो.
पोल डान्स शिकताना नुपूर यांनाही दुखापत झाली. त्यांच्या हाताचं हाड सरकलं. त्यामुळे एक वर्ष त्यांना काही करता आलं नाही. या दरम्यान त्यांचा आत्मविश्वास देखील कमी होत गेला.
नुपूर सांगतात, ''मला दुखापत झाल्यानंतर खरंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मला आवडणारी गोष्ट मी शिकण्याचा प्रयत्न करत होते आणि ती शिकायला मिळाल्यानंतरच हे झालं. मी डॉक्टरांकडे गेल्यावर सुद्धा त्यांनी पोल डान्स करु नये असं सांगितलं. त्यामुळे मी आणखी खचत गेले.

"आमच्या घरातील पोल काढून टाकायला मी पतीला सांगितलं. पण त्यांनी त्याला नकार दिला. उलट त्यांनी म्हटलं की, तू रोज त्या पोलला पाहशील आणि मी परत हे करणार आहे, ही गोष्ट स्वतःला सांगशील. उपचार घेतल्यानंतर एक वर्षानंतर मी पुन्हा पोल डान्स करण्यास सुरुवात केली. पोल डान्सचं योग्य प्रशिक्षण घेण्यासाठी मी दुबईला गेले."
'लोकांचा विचार का करायचा?'
पोल डान्स शिकताना आणि नंतर शिकवत असतानाही त्यासंबंधीचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याबद्दल नुपूर फारशा उत्सुक नसायच्या. याचं एक कारण म्हणजे लोकांमध्ये पोल डान्सबद्दल असलेले पूर्वग्रह.
''भारतात पोल डान्सबाबत फारशी माहिती नव्हती. पोल डान्सबद्दल लोकांना जे काही माहिती होतं, ते चित्रपटांमधून त्यांनी पाहिलं होतं. चित्रपटांमध्ये याला बार डान्ससारखं दाखवलं जातं. त्यामुळे लोक तशाच अर्थाने तसं त्याकडे पाहत होते."
नुपूर यांचे पती आश्विन सांगतात, ''लोक काय म्हणतील याबाबत मी फार विचार नाही करत. काही करायच्या आधी आपण समाजाचा विचार करत राहिलो तर 90 टक्के गोष्टी आपण करुच शकणार नाही. मला वाटतं आपल्याला ज्यामध्ये रुची आहे ती गोष्ट करायला हवी.''

काही जण मात्र पोल डान्सकडे कलाप्रकारासोबतच फिटनेस किंवा थेरपी म्हणूनही पाहायला लागले आहेत. नुपूर यांच्याकडे पोल डान्स शिकणारी मधुरा देशमुख सांगते की, पोल माझ्यासाठी फिटनेसप्रमाणे आहे. माझी चिडचिड झाली किंवा मनात एखादा त्रासदायक विचार आला तर पोल करताना तो निघून जातो.
नुपूर यांच्यासाठी असा सकारात्मक विचार करणारे लोक अधिक महत्त्वाचे आहेत.
नुपूर या 'इंडियाज गॉट टॅलेन्ट' या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमातील एक परीक्षक असलेल्या किरण खेर यांनी नुपूर यांच्या कलेला दाद देताना म्हटलं होतं, "लोग क्लासिकल डान्स को भी वल्गर बना सकते है. तुमने इस डान्स को भी इतना ग्रेसफुली किया."
हीच गोष्ट लक्षात ठेवून नुपूर त्यांची वाटचाल करत आहेत. पोल डान्सबद्दलचे पूर्वग्रह दूर करून तो विविध भागांमधील तरुणांपर्यंत पोल घेऊन जायचं असल्याचं नुपूर सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









