दलाई लामा चीनला चकवा देऊन 13 दिवसांच्या प्रवासानंतर भारतात असे पोहेचले

ल्हासा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना दलाई लामा (12 जुलै 1956)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ल्हासा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना दलाई लामा (12 जुलै 1956)
    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

1959 सालचा मार्च येईपर्यंत ल्हासामध्ये अशी अफवा पसरली होती की, चिनी लोक दलाई लामांना कधीही नुकसान पोहचवू शकतात. दलाई लामांच्या जीवाला धोका आहे.

जेव्हा चिनी लोकांनी दलाई लामा यांना 10 मार्च रोजी ल्हासा येथील चीनच्या लष्करी मुख्यालयात सांस्कृतिक समारंभासाठी आमंत्रित केलं, तेव्हा तर या अफवेला आणखीचं खतपाणी मिळालं. ही अफवा ऐकून दलाई लामांचा राजवाडा नोरबुलिंगकाभोवती लोकांची गर्दी जमायला लागली.

हे निमंत्रण म्हणजे दलाई लामांना अडकवण्याचं चिनी कारस्थान असल्याचा या जमावाचा संशय होता. जमावाला असं वाटत होतं की, दलाई लामा त्या समारंभाला गेले तर त्यांना अटक होईल.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'द फ्रॅक्चर्ड हिमालय, इंडिया तिबेट, चायना 1949-1962' या पुस्तकाच्या लेखिका आणि भारताच्या माजी परराष्ट्र सचिव निरुपमा राव पुस्तकात नमूद करतात, "चिनींनी दलाई लामांना त्यांच्या अंगरक्षकांशिवाय समारंभाला उपस्थित राहण्यास सांगितलं होतं यावरून लोकांची चिंता वाढली होती.

"शेवटी दलाई लामा या समारंभाला उपस्थित राहणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला. लोकांची गर्दी पाहून त्यांना त्यांच्या राजवाड्यातून बाहेर पडणं फार कठीण जाईल, अशी सबब पुढं करण्यात आली.

ल्हासा येथे दलाई लामा यांच्या महालासमोर जमलेले लोक (10 मार्च 1959)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ल्हासा येथे दलाई लामा यांच्या महालासमोर जमलेले लोक (10 मार्च 1959)

त्या लिहितात की, "चिनी लोक दलाई लामांचा राजवाडा नोरबुलिंगका नष्ट करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या 16 मार्चपर्यंत यायला लागल्या होत्या. त्यांनी राजवाड्याभोवती तोफगोळे आणायला सुरुवात केली. अफवा तर अशी ही होती की, चिनी सैनिक विमानाने ल्हासाकडे यायला सुरुवात झाली आहे. राजवाड्याजवळचं फुटलेल्या दोन तोफगोळ्यांमुळे शेवट जवळ आला असून उशीर न करता काहीतरी मोठं करण्याची आवश्यकता असल्याचे संकेत मिळू लागले."

दलाई लामांनी राजवाडा सोडला

दलाई लामांच्या जवळच्या सल्लागारांनी ठरवलं की दलाई लामांनी ताबडतोब ल्हासा सोडायला हवं. 17 मार्चच्या रात्री, दलाई लामा त्यांची आई, लहान भाऊ, बहीण, वैयक्तिक सहाय्यक आणि अंगरक्षक यांनी वेषांतर करून त्यांचा राजवाडा सोडला.

दलाई लामा त्यांचं आत्मचरित्र 'माय लँड अँड माय पीपल, मेमॉएर्स ऑफ दलाई लामा' यात लिहितात, "आम्ही तीन जणांच्या गटांमध्ये विभागून राजवाडा सोडला. पहिल्यांदा दुपारी माझे शिक्षक आणि कशगचे चार सदस्य एका ट्रकच्या मागे ताडपत्रीखाली लपून बाहेर पडले. त्यानंतर माझी आई, माझा धाकटा भाऊ तेनजिन चोग्याल, बहीण सेरिंग डोलमा आणि माझे काका वेषांतर करून बाहेर पडले. माझी आई आणि बहिणीने पुरुषाचा वेष धारण केला होता.

भारताच्या माजी सचिव निरुपमा राव यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं 'द फ्रॅकचर्ड हिमालय, इंडिया, तिबेट, चायना 1949-1962' नावाचं पुस्तक.

फोटो स्रोत, PENGUIN

फोटो कॅप्शन, भारताच्या माजी सचिव निरुपमा राव यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं 'द फ्रॅकचर्ड हिमालय, इंडिया, तिबेट, चायना 1949-1962' नावाचं पुस्तक.

ते लिहितात, "रात्री 10 वाजता मी ही माझा चष्मा काढून एका सामान्य तिबेटी सैनिकासारखे चूबा आणि पायघोळ असे कपडे घालून बाहेर पडलो. माझ्या डाव्या खांद्यावर रायफल लटकत होती. माझ्यासोबत माझे चीफ ऑफ स्टाफ गदरंग आणि माझे मुख्य अंगरक्षक आणि मेहुणे फुंसतोंग ताशी ताकला होते."

त्या खडतर प्रवासाच्या आठवणीत दलाई लामा लिहितात, "जेव्हा आम्ही गर्दी ओलांडून बाहेर पडलो, त्यावेळी आम्हाला कोणीही ओळखलं नाही. आपण ओळखले जाऊ या भीतीने मी माझा चष्मा तर काढला पण मला समोरचं काहीच दिसत नव्हतं. जेव्हा आम्ही राजवाडा सोडला तेव्हा आम्ही दुसरा दिवस पाहू याचीही शक्यता नव्हती. जेव्हा आम्ही चे-लाच्या माथ्यावर पोहोचलो तेव्हा आम्हाला पहिल्यांदाच धोका संपल्याचे जाणवले. स्थानिक लोकांनी आमच्यासाठी घोडे आणले होते. आम्ही घोड्यांवर बसलो आणि मी वळून शेवटचं ल्हासाकडे पाहिलं."

घोड्यावर भारताच्या सीमेकडे आगेकूच करताना दलाई लामा आणि इतर जण (1959)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, घोड्यावर भारताच्या सीमेकडे आगेकूच करताना दलाई लामा आणि इतर जण (1959)

त्या भागात हजारो चिनी सैनिक तैनात होते. त्यामुळे ओळखलं जाण्याची किंवा पकडलं जाण्याची भीती खूप होती. दलाई लामा आणि त्यांच्या साथीदारांनी केचू नदी पार केली. नदीच्या पलीकडे दोन गट त्यांची वाट पाहत होते.

इथं दलाई लामांनी आपला पुन्हा चष्मा डोळ्यांवर चढवला आणि त्यांना स्पष्ट दिसायला लागलं. दलाई लामांची टीम रात्रभर प्रवास करतंच होती. चे-ला इथं काही काळ मुक्काम करून ब्रह्मपुत्रा नदी पार करून ते तिबेटच्या दक्षिणेकडे निघाले.

तिबेटहून सुटका झाल्यानंतर दलाई लामा

फोटो स्रोत, ROLI BOOKS

फोटो कॅप्शन, तिबेटहून सुटका झाल्यानंतर दलाई लामा

तेनजिन तीथौंग हे दलाई लामा : एन इलस्ट्रेटेड बायोग्राफी, या दलाई लामांच्या जीवनचरित्रात लिहितात, "25 मार्च रोजी त्यांनी एका विशेष कोडद्वारे अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएला संदेश पाठवला की दलाई लामा सुरक्षित आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवर यांना दर 24 तासांनी दलाई लामांच्या टीमची माहिती कळवली जात होती. दरम्यान दलाई लामा यांच्या पलायनाची बातमी जगभर पसरली होती. जगभरातील वर्तमानपत्रांत ही त्या दिवशीची मुख्य बातमी होती.

दलाई लामांनी नेहरूंना संदेश पाठवला

लुटसे जोग इथं पोहोचल्यानंतर दलाई लामा यांनी तिबेटच्या नव्या सरकार स्थापनेचे विधी पार पाडले. या सोहळ्याला सुमारे एक हजार लोक उपस्थित होते, मात्र तोपर्यंत दलाई लामा यांच्या जीवाला तिबेटमध्ये मोठा धोका असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे दलाई लामा यांना सीमा ओलांडून भारतात आश्रय घ्यायचा आहे, असा संदेश भारत आणि अमेरिकेला पाठवण्यात आला.

सीआयएचे वरिष्ठ अधिकारी जॉन ग्रीन यांना हा संदेश 28 मार्चला मिळाला होता. त्यांनी तात्काळ दिल्लीला माहिती पाठवून दलाई लामांचा हेतू कळवला.

यापूर्वी 26 मार्च रोजी दलाई लामा यांनी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना संदेश पाठवला होता त्याप्रमाणे, "मानवी मूल्यांचं समर्थन करणारे लोक म्हणून भारतीयांची जगभर ओळख आहे. आम्ही सोना परिसरातून भारतात प्रवेश करत आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्ही भारतीय भूमीवर आमच्या राहण्याची व्यवस्था कराल. आम्हाला तुमच्या दयाळूपणावर पूर्ण विश्वास आहे."

दलाई लामांचे भाऊ ग्यालो थौनडुप यांचं आत्मचरित्र 'द नूडल मेकर ऑफ कलिंमपौंग'

फोटो स्रोत, RANDOM HOUSE INDIA

फोटो कॅप्शन, दलाई लामांचे भाऊ ग्यालो थौनडुप यांचं आत्मचरित्र 'द नूडल मेकर ऑफ कलिंमपौंग'

याच दरम्यान दार्जिलिंगमध्ये राहणारे दलाई लामा यांचे भाऊ ग्यालो थौनडुप यांनी पंतप्रधान नेहरूंची भेट घेतली होती.

थौनडुप त्यांचं आत्मचरित्र 'द नूडल मेकर ऑफ कलिंमपौंग' मध्ये लिहितात, "मी जवाहरलाल नेहरूंना त्यांच्या संसद भवन कार्यालयात भेटलो. इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख बी.एन. मलिक यांच्या मदतीने ही भेट शक्य झाली. नेहरूंनी मला पहिला प्रश्न विचारला तो दलाई लामा सुरक्षित आहेत का. मी जेव्हा त्यांना दलाई लामांना भारतात आश्रय देण्याची विनंती केली तेव्हा नेहरू लगेच 'हो' म्हटले."

दुसऱ्या दिवशी दलाई लामा झोरा गावातून कार्पो-ला खिंडीत पोहोचले. दरम्यान, एक विमान दलाई लामांच्या दलावरून घिरट्या घालत गेले. त्यामुळ चिनी लोकांना त्यांचा सुगावा लागला या भीतीने संपूर्ण दलात दहशत पसरली.

भारताच्या अरुणाचल प्रदेशात दलाई लामा आणि त्यांचे सहकारी

फोटो स्रोत, ROLI BOOKS

फोटो कॅप्शन, भारताच्या अरुणाचल प्रदेशात दलाई लामा आणि त्यांचे सहकारी

दलाई लामांचे बंधू तेनजिंग चोग्याल लिहितात, "आम्ही दोन गटात विभागलो आणि दोन दिवस सतत चालतच राहिलो. दरम्यान, आम्ही भारतीय सीमेवर पाठवलेले संदेशवाहक आले. त्यांनी आम्हाला माहिती दिली की, दलाई लामांना भारतात येण्याची परवानगी मिळाली आहे. आणि नेमके त्याचवेळी, दलाई लामा आजारी पडले. त्यांना ताप आला आणि पोटही खराब झाले."

दोन दिवसांनंतर म्हणजे 31 मार्चला, हे दल भारतीय सीमेजवळ पोहोचले. पुढे तिबेटमध्ये राहू इच्छिणाऱ्यांना दलाई लामांनी निरोप दिला. अतहर आणि लोत्से या दोन रेडिओ ऑपरेटर्सचे त्यांनी विशेष आभार मानले आणि त्यांना आशीर्वाद दिले.

31 मार्च 1959 रोजी दुपारी 2 वाजता, दलाई लामा यांनी सध्याच्या अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यातील छुताँगमू येथून याकवर बसून भारतीय हद्दीत प्रवेश केला.

दलाई लामा

फोटो स्रोत, ROLI BOOKS

सीमेवर त्यांची वाट पाहत असलेले सहाय्यक राजकीय अधिकारी टी.एस.मूर्ती यांनी दलाई लामांचे स्वागत करून त्यांना पंतप्रधान नेहरूंचा संदेश दिला. दलाई लामांसोबत सामान घेऊन आलेल्या कामगारांना तिबेटला परत पाठवले जाईल आणि त्यांच सामान आता भारतीय कामगार उचलतील, असा निर्णय तिथे घेण्यात आला.

दलाई लामा आणि त्यांचे कुटुंब वगळता त्यांच्या दलातील सर्व सदस्यांची शस्त्र भारतीय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली.

विमानांनी रसद पुरवली

दलाई लामा यांच्या टीमची तवांगमधील घरांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली.

तीथौंग दलाई लामांच्या चरित्रात लिहितात, "ज्या दिवशी दलाई लामा भारतात पोहोचले, त्या दिवशी लामांच्या टीम सदस्यांसाठी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पीठ, जोडे आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंनी भरलेल्या गोणी टाकल्या."

ते लिहितात की 6 एप्रिलला तवांगचे जिल्हा आयुक्त हरमंदर सिंग यांनी पंतप्रधान नेहरूंचा संदेश दलाई लामांपर्यंत पोहोचवला, "माझे सहकारी आणि मी तुमचं स्वागत करतो. भारतात तुमच्या सुरक्षित आगमनाबद्दल तुमचं अभिनंदन करतो. तुमच्या कुटुंबियांना भारतात राहण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आम्हाला आनंद होईल. भारतीय जनतेला तुमच्याप्रती आदर आहे. तुमचं स्वागत करताना त्यांना ही खूप आनंद होईल."

दलाई लामा तिबेटमध्ये (1956)

फोटो स्रोत, ULLSTEIN BILD DTL.

फोटो कॅप्शन, दलाई लामा तिबेटमध्ये (1956)

दलाई लामा आणि त्यांच्या टीमला तवांगपासून 185 किमी अंतरावर असलेल्या बोमडिला या भागात काही दिवस विश्रांती घ्यायची होती. आसाम रायफल्सच्या सैनिकांनी दलाई लामांना अरुणाचल प्रदेशच्या जंगलातून बोमडिला येथे नेले. तिथे त्यांना भारतीय जवानांनी गार्ड ऑफ ऑनर प्रदान केला.

बोमडिलामध्ये काही दिवस राहिल्यानंतर, दलाई लामा 18 एप्रिलला तेजपूरला पोहोचले. भारतीय भूमीवरून त्यांनी पहिल्यांदाच आपलं निवेदन जारी केलं.

त्या निवेदनात म्हंटल होत की, "तिबेटच्या लोकांची स्वातंत्र्याविषयीची भावना नेहमीच तीव्र राहिली आहे. तिबेटचे लोक चिनी लोकांपेक्षा वेगळे आहेत. आम्हाला चीनने 17 कलमी करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले होते. ल्हासा इथे दलाई लामांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे त्यांनी ल्हासा सोडण्याचा निर्णय घेतला. दलाई लामा भारतीय लोक आणि सरकारचे ऋणी आहेत. भारतीयांनी केवळ आमचे स्वागतच केले नाही तर आम्हाला आणि आमच्या अनुयायांना आश्रय दिल्याबद्दल दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत."

तेनजिंग तिथौंग लिखित दलाई लामांचं आत्मचरित्र 'दलाई लामा: एन इलस्ट्रेटेड बायोग्राफी.'

फोटो स्रोत, ROLI BOOKS

फोटो कॅप्शन, तेनजिंग तिथौंग लिखित दलाई लामांचं आत्मचरित्र 'दलाई लामा: एन इलस्ट्रेटेड बायोग्राफी.'

दरम्यान, दलाई लामांना आश्रय देण्याच्या भारताच्या निर्णयावर चीनने तिखट प्रतिक्रिया देत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

तेनजिन तीथौंग लिहितात, "चीनने तेजपूरच्या वक्तव्याचा निषेध केला. तिबेटच्या स्वातंत्र्याबद्दल बोलणं म्हणजे चीन सरकारवर एकप्रकारे हल्लाच असल्याचं म्हंटलं गेलं. ते म्हणाले की, तिबेट हा चीनचा भाग असल्याचे पंचशील कराराअंतर्गत भारताने मान्य केले होते. चीनच्या अंतर्गत विषयात भारताने हस्तक्षेप केल्याचा आरोपही चीनने केला.

चीनचा राग आणि नेहरूंची भेट

जवाहरलाल नेहरूंनी ठरवले की दलाई लामा आणि त्यांच्या गटाला मसुरीमध्ये ठेवले जाईल.

18 एप्रिल रोजी दलाई लामा विशेष ट्रेनने मसुरीला रवाना झाले. यापूर्वी अमेरिकेने दलाई लामा यांना स्वित्झर्लंड किंवा थायलंडमध्ये आश्रय घ्यावा अशी ऑफर दिली होती. पण नंतर असं ठरलं की त्यांच्या आश्रयासाठी भारत हे एक आदर्श ठिकाण असू शकते, कारण येथून ते तिबेटमध्ये राहणाऱ्या आपल्या लोकांशी संपर्क ठेवू शकतील.

मसुरीला पोहोचताच दलाई लामांना बिर्ला हाऊसमध्ये नेण्यात आले. जिथे ते पुढील एक वर्षांसाठी राहिले. 24 एप्रिल रोजी नेहरू दलाई लामांना भेटण्यासाठी मसुरीला आले. चार तास तणावपूर्ण वातावरणात त्यांच्यात चर्चा झाली.

दलाई लामा आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यातील भेट (1959)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दलाई लामा आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यातील भेट (1959)

दलाई लामा त्यांच्या 'माय कंट्री, माय पीपल' या आत्मचरित्रात लिहितात, "जेव्हा-जेव्हा मी ल्हासा बाहेर तिबेटचं सरकार स्थापन करण्याची इच्छा नेहरूंकडे व्यक्त केली, तेव्हा मला असं जाणवलं की ते नाराज झाले. जेव्हा मी तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्याबद्दल बोललो तेव्हा त्यांनी मुठी आवळून आपले हात टेबलावर मारले. काही क्षणासाठी त्यांचा खालचा ओठ रागाने थरथरत होता.

या सर्व शक्यता फेटाळून लावत तिबेटच्या बाजूने लढणं शक्य होणार नाही, असे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं.

ते म्हणाले की, "अशा प्रस्तावामुळे आमच्या प्रयत्नांना धक्का बसेल. सध्या तिबेटबद्दलची आमची सहानुभूती आहे पण याचा अर्थ असा नाही की आम्ही चीनविरोधात तिबेटला मदत करू."

दुसरीकडे, चीनला दलाई लामांच्या पलायनाची बातमी मिळताच त्यांनी तिबेटी लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली.

चीनचे नेते माओत्से तुंग यांना बीजिंग इथं स्कार्फ भेट देताना दलाई लामा (1954)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीनचे नेते माओत्से तुंग यांना बीजिंग इथं स्कार्फ भेट देताना दलाई लामा (1954)

19 मार्चला हजारो महिला दलाई लामांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या आणि चीनविरोधात घोषणाबाजी केली. त्याच रात्री चिनी सैनिकांनी नौरबुलिंगका राजवाड्यावर तोफगोळ्यांचा वर्षाव केला. यातले काही तोफगोळे दलाई लामा यांच्या खाजगी निवासस्थानावरही पडले.

अनेक ठिकाणी दलाई लामांना पाठिंबा देणाऱ्या लोकांवर गोळीबार करण्यात आला. डोंगराच्या माथ्यावर 15 व्या शतकात बांधलेले तिबेटी मेडिकल कॉलेज चिनी हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

23 मार्च रोजी पोटाला पॅलेसवर चिनी सैनिकांनी चीनचा ध्वज फडकावला. 24 मार्चपर्यंत तिबेटी लोकांचे बंड पूर्णपणे चिरडले गेले. 28 मार्चला, तिबेटचे स्थानिक सरकार बरखास्त करण्यात आले आणि चीनला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्यात आले.

दलाई लामा यांच्या बेपत्ता होण्यावर चीन म्हंटल की, प्रतिगामी शक्तींनी त्यांचे बळजबरीने अपहरण करून त्यांना भारतात नेल. सप्टेंबर 1959 मध्ये, दलाई लामा यांनी दिल्लीत नेहरूंची भेट घेतली आणि तिबेटचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये उचलण्याची मागणी केली. पण नेहरूंनी ही मागणी फेटाळून लावली.

दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतल्यानंतर सुमारे 80 हजार तिबेटी लोक त्यांच्या मागोमाग भारतात आले. त्यांना तेजपूरजवळील मिसमारी आणि भूतान सीमेजवळील बक्सादुआर येथे निर्वासित छावण्यांमध्ये ठेवण्यात आले.

नंतर भारत सरकारने दलाई लामा आणि त्यांच्या साथीदारांना धर्मशाला येथे वसवण्याचा निर्णय घेतला.

दलाई लामांना भारतात आश्रय देण्याचे दूरगामी परिणाम

दलाई लामा यांना भारतात आश्रय दिल्यानंतर भारत-चीन संबंधात दुरावा निर्माण झाला. भारतातील सामान्य जनतेची सहानुभूतीही दलाई लामांसोबत होती.

तिबेटमधील घटनांचा निषेध म्हणून मुंबईतील चिनी वाणिज्य दूतावासाच्या इमारतीच्या भिंतीवरील माओ त्से तुंग यांच्या चित्रावर टोमॅटो आणि कुजलेली अंडी फेकून मारली. यावर दिल्लीतील चीनच्या दूतावासाने परराष्ट्र मंत्रालयाला दिलेल्या लेखी नोटमध्ये हा चिनी नेत्याचा मोठा अपमान असल्याचं म्हटलं.

चिनी लष्करासमोर शस्त्रं खाली ठेवताना तिबेटचे विद्रोही

फोटो स्रोत, ROLI BOOKS

फोटो कॅप्शन, चिनी लष्करासमोर शस्त्रं खाली ठेवताना तिबेटचे विद्रोही

दुसऱ्या दिवशी, चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जी पेंग फी यांनी बीजिंगमधील भारतीय राजदूत जी. पार्थसारथी यांना बोलावून घेऊन चीनच्या लाडक्या नेत्याचा आणि राष्ट्राध्यक्षाचा अपमान केल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला.

यानंतर भारत-चीन संबंध बिघडतचं गेले. आणि याची परिणती 1962 च्या भारत-चीन युद्धात झाली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)