You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे : भाजपच्या आरोपांना उत्तरे देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी भावनिक भाषणाचा आधार का घेतला?
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (25 मार्च) साधारपणपणे तासभर विधानसभेत भाषण केलं. मात्र यामध्ये राज्य सरकारवर करण्यात आलेल्या आरोपांना उत्तरे देण्याऐवजी केवळ भावनिक भाषण केल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना गेला महिनाभर भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारवर विविध प्रकारचे आरोप करून रान उठवलं होतं. मात्र या आरोपांना मुख्यमंत्र्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, अधिवेशन संपेपर्यंत भाजपचे आरोप उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांपर्यंत येऊन पोहोचले.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या विधानसभेतील भाषणात या सर्व आरोपांना उत्तरे देतात का आणि दिली तर कोणते तथ्य समोर मांडतात, हा प्रश्न होता. पण इथेही उद्धव ठाकरे यांनी अलगद निसटण्याचा प्रयत्न केल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे.
तत्पूर्वी, एक दिवस आधी गुरुवारीही (24 मार्च) उद्धव ठाकरे विधानसभेत बोलण्यास उभे राहिले होते. त्यावेळीही त्यांनी फक्त महाविकास आघाडीच्या विकासकामांचा उल्लेख करून आटोपतं घेतलं होतं.
शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "जे मुद्दे आम्ही मांडले होते, त्यावर एकही उत्तर दिलं नाही. पुराव्यानिशी आम्ही मुद्दे मांडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. भाषण विधानसभेत, पण शिवाजी पार्कचं भाषण झालं."
याच मुद्द्यावर भाजपने विधानसभा अधिवेशनातून सभात्यागही केला.
आपल्या विशेष ठाकरी शैलीमुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची चर्चा नेहमीच होत असते. पण त्यांचं शुक्रवारचं भाषण वेगळं होतं. या भाषणाचे अनेक छुपे अर्थ आहेत.
या निमित्ताने मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांना उत्तरे देण्याऐवजी भावनिक भाषणाचा आधार का घेतला, हा प्रश्न यामुळे उपस्थित होतो.
याबाबत तज्ज्ञांचं मत काय आहे, हे आपण जाणून घेऊ. पण तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले, यावर एक नजर टाकूया.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
"उगीचच आमच्या कुटुंबाची बदनामी करू नका. तुम्हाला सत्ता पाहिजे असल्यास सांगा, मी तुमच्यासोबत येतो, मला तुरुंगात टाका, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष भाजपवर टीका केली. शासन बेवड्यांचं आहे, असा आरोप झाला. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र तुम्ही म्हटलं.
"ओबामाने कधी ओसामाच्या नावाने मते मागितली का? दाऊदच्या घरात घुसून त्याला मारा, याला हिंमत म्हणतात. आम्ही देशद्रोह्यांच्या विरोधातच आहोत. नवाब मलिकांचा राजीनामा मागताना तुम्ही काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींसोबत सत्तेत होता, हे लक्षात ठेवा. मुदस्सर लांबे फडणवीसांना हार घालतानाचे फोटो आहेत. त्यामुळे नुसतं आरोप करून राज्य चालत नाही. सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावू बसले असते की नाही," असंही मुख्यमंत्र्यांनी भाषणात म्हटलं.
शिवसेना हा भावनांवर चालणारा पक्ष
शिवसेना हा भावनांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे त्यांना हे संपूर्ण प्रकरण भावनिक दिशेने न्यायचं आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केलं.
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "सध्या शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यांना ही निवडणूक भावनिक आधारावर न्यायची आहे. भारतीय जनता पक्ष आमच्यावर कसा अन्याय करत आहे, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे."
"मला अटक करा, पण आमच्या शिवसैनिकांना नको, असंच दाखवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न या माध्यमातून दिसून आला. शिवसेना हा भावनिकतेवर चालणारा पक्ष असल्यामुळे ठाकरेंवर हल्लाबोल करणं किंवा त्यांना लक्ष्य करणं हा म्हणजे संपूर्ण शिवसेनेवर हल्ला आहे, हे सगळ्या शिवसैनिकांवर बिंबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत," असं मृणालिनी नानिवडेकर यांनी म्हटलं.
ठाकरेंचा उद्वेग बाहेर
गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे कुटुंबीयांची कोंडी करण्याचा विरोधी पक्ष भाजपचा प्रयत्न सुरू होता. त्या सर्वांची प्रतिक्रिया म्हणून उद्धव ठाकरेंचा उद्वेग बाहेर पडला आहे, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांना वाटतं.
ते म्हणतात, "उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या खात्यांचा कोणताही विषय तसा चर्चेत आला नव्हता. इतर खात्यांवरील आरोपांची उत्तरे त्या-त्या खात्यांच्या मंत्र्यांनी दिली होती. पूर्ण अधिवेशनात आपण नव्हतो. त्यामुळे अखेरच्या दिवशी तरी बोलणं आवश्यक आहे, म्हणून त्यांनी आपला संपूर्ण उद्वेग बाहेर काढला.
उद्धव ठाकरे यांचं भाषण विधानसभेतील भाषण वाटत नसून शिवाजी पार्कवरील भाषण वाटल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते काही चुकीचं नाही, असंही देशपांडे म्हणाले.
दोन्ही बाजूंनी व्हीक्टिम कार्ड
शिवसेनेने या भाषणाच्या माध्यमातून व्हीक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. तसाच प्रयत्न दुसऱ्या बाजूने भाजपकडूनही सुरू आहे, याचा उल्लेख देशपांडे आवर्जून करतात.
ते सांगतात, "केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा म्हणून महाविकास आघाडीतील नेते व्हीक्टिम कार्ड खेळत आहेत. त्याच प्रकारे पोलीस हे दरेकरांना तसंच आम्हाला त्रास देत आहेत, म्हणत व्हीक्टिम कार्ड खेळत आहेत. लोकांसमोर आपण स्वतः पीडित असल्याचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे."
'ठाकरेंना राजकीय संदेश द्यायचा होता'
उद्धव ठाकरे यांना विधानसभेतील भाषणातून राजकीय संदेश द्यायचा होता. त्यांना आरोपांच्या तपशीलांमध्ये फारसा रस नाही, असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई याबाबत नोंदवतात.
त्यांच्या मते, "उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला आता जवळपास अडीच वर्ष पूर्ण होत आली आहेत. अशा स्थितीत विरोधकांच्या सर्वच आरोपांना उत्तर देणं त्यांना महत्त्वाचं वाटत नसावं. दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे राजकीय संदेश देणं त्यांना जास्त महत्त्वाचं वाटत असावं."
अधिवेशनाचा शेवटच्या दिवसाचा उपयोग
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचा उपयोग योग्य रितीने करून घेतला आहे, असं हेमंत देसाई म्हणाले.
आरोपांवरील तपशीलांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतील. आरोपांना भावनिक उत्तरे आपण देऊन अशी त्यांनी वाटणी केलेली असू शकते, असं त्यांना वाटतं.
देसाई यांच्या मते, "महिनाभर भाजपने आरोप केले. शेवटच्या दिवशी त्यांना उत्तर देऊ, अशा अर्थाने त्यांचं भाषण झालं. आरोपांना मुद्देसूद उत्तरे देण्याचा उद्धव ठाकरे यांचा स्वभावही नाही. त्याची अनेक कारणे असू शकतात. युक्तिवाद पलटवण्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस त्यांना भारी पडतात. अशा स्थितीत आपला संदेश द्यायचा असेल, विरोधकांवर कुरघोडी करायची असेल, तर त्यांना भावनिक संदेश देणं भाग होतं."
"गेल्या दोन वर्षांत सचिन वाझे, परमबीर अशा प्रकारची काही प्रकरणे समोर आली. त्यामध्ये महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेलं होतं. पण बॅकफूटवर असलो तरी आता बाजी पलटवत आहे, असं दर्शवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे," असं देसाई म्हणतात.
याविषयी अभय देशपांडे सांगतात, "उद्धव ठाकरेंच्या भाषणाला निष्प्रभावी करण्यासाठी तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे, तुम्ही म्हणजे मुंबई नव्हे अशा स्वरुपाची वक्तव्ये नंतर फडणवीसांनी केली. म्हणजेच भाजपसुद्धा त्यांचे नॅरेटिव्ह सेट करण्याचे प्रयत्नात नक्कीच आहे. पुढेही दोन्ही बाजूंनी राजकीय डावपेच, कुरघोडी यापुढेही सुरू राहतील. कुणाचं नॅरेटिव्ह लोकांना पटतं, यावर महापालिका निवडणुकांचं चित्र अवलंबून आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)