You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जितेंद्र आव्हाड म्हणतात, आता माझ्या मुलीला मी महाराष्ट्रात ठेवणार नाही...#5मोठ्याबातम्या
विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. जितेंद्र आव्हाड म्हणतात, आता माझ्या मुलीला मी महाराष्ट्रात ठेवणार नाही...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे असलेले श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी (22 मार्च) दुपारी ईडीकडून कारवाई करण्यात आली. पाटणकर यांची अंदाजे साडेसहा कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यात ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 फ्लॅट्स जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे.
या कारवाईनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळींनी प्रतिक्रिया दिल्या.
"श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे बंधू असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे मी आता माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही," असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
ते म्हणाले, "राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. राज्य सरकारने काही नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, पण कोणाला तुरूंगात डांबलेलं नाही. चौकशी सुरू असणं आणि घरात धाडी टाकणं यात फरक आहे. विरोधकांनी सरकार अस्थिर करायचा प्रयत्न करायला हरकत नाही. पण ते अशा माध्यमातून करावं हे चुकीचं आहे.
तपास यंत्रणेचा गैरवापर करुन जर राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असतील तर ते महाराष्ट्रातील जनता बघतेय. तुम्ही आम्हाला कितीही डिवचलंत, तरी आम्ही कोसळणार नसल्याचं आव्हाड यांनी म्हटलं.
लोकमत या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
2. पाच-दहा वर्षापूर्वी लोकांना ईडी नावाची संस्था माहिती नव्हती, आता गावागावामध्ये गेली आहे - शरद पवार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी (22 मार्च) दुपारी ईडीकडून कारवाई करण्यात आली. पाटणकर यांची अंदाजे साडेसहा कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. ईडीच्या या कारवाईनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये केंद्रीय यंत्रणांचा होत असलेल्या वापराबाबत वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"या सगळ्या साधनांचा गैरवापर हा देशाच्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आकडेवारी स्पष्ट सांगते राजकीय किंवा अन्य हेतूने कुणाला तरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. पाच दहा वर्षापूर्वी इथल्या लोकांना ईडी नावाची संस्था माहिती नव्हती. आता ईडी गावागावामध्ये गेली आहे."
या सगळ्या गोष्टींचा गैरवापर सध्या दुर्देवाने सध्या चालू असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
लोकसत्ता या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
3. 'राष्ट्रवादीकडून शिवसेनेसोबत दुजाभाव केला जातोय'
राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला डिवचण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेसोबत दूजाभाव केला जातोय. सध्या राज्यातील सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी काँग्रेसच घेतेय. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत आहे, असा गंभीर आरोप श्रीरंग बारणे यांनी केलाय.
मावळ लोकसभा मतदारसंघ पार्थ पवार यांना सोडावा या चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी हा आरोप केला आहे.
पार्थ पवार यांचा वाढदिवस 21 मार्चला पार पडला. पार्थ यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी पार्थ पवार यांच्यासाठी शिवसेनेनं मावळ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावा, अशी मागणी केली. यावर रोहित पवार यांना विचारण्यात आला असता, त्यांनी म्हटलं, "पार्थ पवार यांनी जर स्वत: मावळ मतदारसंघाची मागणी केली तर शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यापासून ते त्यांच्या मतदारसंघात प्रचाराला सर्वात आधी मी असेन"
रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाली.
पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून लॉबिंग सुरु करण्यात आल्याचं पाहायला मिळाल्यावर खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला डिवचण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेसोबत दुजाभाव केला जातोय. निधी वाटपातही दुजाभाव होतोय. मावळ लोकसभेची जागा सोडण्याची मागणी केली की ती करायला लावली हे शोधलं पाहिजे. ज्यांनी ही मागणी केली ते कोण आहेत, त्यांना मी ओळखत नाही. सध्या राज्यातील सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी काँग्रेसच घेतेय. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत आहे" असे गंभीर आरोप बारणे यांनी केलेत.
TV9 मराठी या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
4. भाजप अनेक पाकिस्तान बनवू इच्छित आहे- मेहबूबा मुफ्ती
काँग्रेसने हिंदू आणि मुसलमानांना सांभाळून ठेवले. देशाला तोडले नाही. हे लोक देश तोडू इच्छित आहेत. जिन्ना यांनी एक पाकिस्तान बनवला, तर हे अनेक पाकिस्तान बनवू इच्छित असल्याचे आरोप पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपवर केलेत.
त्या जम्मू-काश्मीरमधील सांबा येथे मंगळवारी (22 मार्च) बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "त्यांना वाटतं की आमचं भांडण पाकिस्तानबरोबर चालू राहावं. हिंदू-मुस्लिम, हिंदू-मुस्लिम करत राहावं, जिन्ना-जिन्ना करत राहावं. आता तर जिन्नांना सोडून ते बाबरची आठवण काढतात. औरंगजेबचीही आठवण काढत आहेत. अरे, औरंगजेब 500 ते 600 वर्षांपूर्वी होऊन गेला. आमचा त्यांच्याबरोबर काय संबंध?"
"तुम्ही त्यांची आठवण का काढता? तुमच्याकडे लोकांना देण्यासाठी रस्ते नाहीत का? पाणी नाही का? वीज नाही का? आम्ही पूर्ण देशाला वीज पुरवतो. मात्र आमच्या शेतात पाणी देण्यासाठी वीज नसते. आमच्या कॅनॉलमध्ये पाणी नसते," या शब्दांमध्ये मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
काँग्रेसविषयी त्या म्हणाल्या, " आता निवडणुका नाहीत. मी तुमच्याकडे मतदान मागण्यासाठी आलेली नाही. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आले आहे, की काँग्रेस पक्षाने पन्नास वर्षे भले चुकीचे कामे केले असतील. मी म्हणत नाही की त्यांनी सर्व बरोबर केले. पण त्यांनी या देशाला सुरक्षित ठेवले. हिंदू, मुसलमानांना सांभाळून ठेवले. देशाला तोडले नाही. हे लोक देश तोडू इच्छित आहेत. जिना यांनी एक पाकिस्तान बनवला, तर हे अनेक पाकिस्तान बनवू इच्छित आहेत" असा आरोप त्यांनी मोदी सरकारवर यावेळी केला.
सकाळ या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
5. 60 किमी अंतराच्या आतले टोल येत्या तीन महिन्यांमध्ये बंद करणार- नितीन गडकरी
"देशातील अनेक ठिकाणी 60 किमी अंतराच्या आत टोल आहे. हे चुकीचं आहे. पण पैसे मिळतात त्यामुळे आपल्या खात्याकडून यासाठी परवानगी दिली जातेय. आता मी या सभागृहाला आश्वासन देतो की, देशात असे जे 60 किमी अंतराच्या आतील टोल असतील ते येत्या तीन महिन्यांमध्ये बंद केले जातील," अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली आहे.
गडकरी पुढे म्हणाले की, "टोलनाक्याजवळ राहणाऱ्या स्थानिकांसाठी टोलमध्ये सूट देण्यात येणार आहे. फक्त आधार कार्ड दाखवून स्थानिकांना पास देण्यात येणार आहे. हा पास दाखवून स्थानिकांना टोलमधून सूट मिळणार आहे. येत्या तीन महिन्यात ही योजना लागू करण्यात येणार आहे."
ABP माझा या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)