उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची कारवाई, नेमकं प्रकरण काय आहे?

रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईत पाटणकर यांचे 11 फ्लॅट्स जप्त झाले आहेत. या फ्लॅट्सची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये इतकी आहे असं ईडीने सांगितले आहे.

शिवसेनेनी या कारवाईचा निषेध केला आहे. ही कारवाई केवळ राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईत पाटणकर यांचे 11 फ्लॅट्स जप्त झाले आहेत. या फ्लॅट्सची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये इतकी आहे असं ईडीने सांगितले आहे.

शिवसेनेनी या कारवाईचा निषेध केला आहे. ही कारवाई केवळ राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

6 मार्च 2017 रोजी PMLA कायद्याअंतर्गत पुष्पक ग्रुपविरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला होता.

अंमलबजावणी संचलनालया (ED) ने श्रीधर माधव पाटणकरांवरील कारवाईबाबत पत्रक काढून माहिती दिलीय.

ईडीच्या माहितीनुसार, पुष्पक ग्रुपची 6.45 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यात ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील 11 रहिवासी फ्लॅट्सचा समावेश आहे.

निलांबरी प्रकल्प श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे असून, याचे मालक श्रीधर माधव पाटणकर हे आहेत.

व्यवहार कसे झाले?

ईडीने म्हटले आहे की आज, अंमलबजावणी संचालनालयाने पुष्पक बुलियन या कंपनीची 6.45 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. ही कंपनी पुष्पक समूहांच्या कंपन्यांपैकी एक आहे. या कारवाई अंतर्गत एकूण 11 फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. हे फ्लॅट्स निलांबरी प्रकल्प, ठाणेच्या अंतर्गत येतात. हा प्रकल्प श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लिमिटेड यांचा आहे. ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे.

6 मार्च 2017 रोजी ईडीने पुष्पक बुलियन आणि ग्रुप ऑफ कंपनीज विरोधात PML Act 2002 मध्ये केस दाखल करण्यात आली होती. आणि याआधीच महेश पटेल, चंद्रकांत पटेल संचलित पुष्पक बुलियनची 21 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे.

त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात हे समजले आहे की महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदींनी पुष्पक समूहातील पुष्पक रिअॅलिटी या कंपनीचा निधी वळवला. पुष्पक रिअलिटीने एका व्यवहारासाठी विविध स्तरांचा वापर करून 20.02 कोटी रुपयांचा निधी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याकडे वळवला.

नंदकिशोर चतुर्वेदी हे अनेक शेल कंपन्या चालवतात. त्यांच्या कंपन्यांपैकी एक कंपनी हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड मार्फत व्यवहार करण्यात आले. यामार्फत श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडला 30 कोटींचे कर्ज कुठलेही तारण न ठेवता देण्यात आले. म्हणजेच महेश पटेलयांचे पैसे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मार्फत श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवण्यात आले.

बीबीसी मराठीचे संपादक आशिक्ष दीक्षित यांचे विश्लेषण

श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेली जप्तीची कारवाई ही साधीसुधी घटना नाही. श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. या कारवाईचे राजकीय पडसाद उमटणार याची ईडीला आणि केंद्रातल्या भाजपला पूर्ण कल्पना असणार. किंबहुना ईडीचा वापर हा राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी होत आहे का, अशी शंका घ्यायला पूर्ण वाव आहे. कारण आघाडीचं सरकार अस्तित्वात आल्यापासून केंद्रीय तपास संस्था महाराष्ट्रात निवडक पद्धतीने सक्रिय झाल्याचं दिसत आहे.

मुख्यतः शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांवर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागांच्या कारवाया होत आहेत. यात अडकलेले नेते गुन्हेगार आहेत की नाहीत, हे न्यायालय ठरवेल. पण दोनच पक्षाच्या नेत्यांवर एकामागून एक होत जाणाऱ्या कारवाया संशय निर्माण करतात. त्यामुळे केंद्रीय तपास संस्था किती स्वायत्तपणे काम करत आहेत, याबद्दल शंका उपस्थित होते. सीबीआय हा पिंजऱ्यात अडकलेला पोपट आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानेही केली होतीच की!

दुसरीकडे मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या नियंत्रणात असलेलं पोलीस खातंही निवडक पद्धतीने भाजपच्या अनेक नेत्यांवर कारवाई करताना दिसत आहे. कारवाईला कारवाईने उत्तर देण्याची जणू स्पर्धाच केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये सुरू आहे.

आतापर्यंत राज्य सरकारमधल्या अनिल देशमुख, नवाब मलिक आणि इतर नेत्यांवर कारवाई झाली. ठाकरे आणि पवार कुटुंबीयांवर भाजपने आरोप केले, पण कारवाई झाली नव्हती. थेट ठाकरेंवर कारवाई झाली नसली, तरी घरातल्या व्यक्तीवर झाली आहे.

अनेक दिवस आजारी आणि शांत असलेल्या उद्धव ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी आक्रमक शब्दांचा वापर केला. आता मेव्हण्यावर कारवाई झाल्यानंतर मात्र त्यांनी विधिमंडळात बोलण्याचं टाळलं. दुसरीकडे सेना नेते मात्र आक्रमकपणे प्रत्युत्तराची भाषा करत आहेत. उन्हाळ्यामुळे तापलेल्या मुंबईतलं राजकीय वातावरण आता आणखी तापणार अशीच चिन्हं आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)