टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर झालेल्या हिंसाचारात 8 जण ठार, ममता बॅनर्जींनी म्हटलं...

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेस नेत्याच्या हत्येनंतर परिसरात हिंसाचार झाला आणि कथित संतप्त जमावाने घरं पेटवून दिली. या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये महिला आणि बालकांचा ही समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आता या हिंसेनंतर पश्चिम बंगालमधील राजकारण ही चांगलंच तापलं आहे. इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बीरभूममधील हिंसेवर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल पुन्हा एकदा आमनेसामने आलेत.

ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल धनखड यांना या प्रकरणी 'चुकीची वक्तव्य' करू नये असं सुनावलं आहे.

राज्यपालांनी राज्यात झालेल्या हिंसेला 'जाळपोळ आणि तांडव' म्हटलं आहे. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालयाचा कार्यभार सांभाळणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांना पत्र लिहून 'प्रशासनाला निष्पक्ष चौकशी करू द्यावी' असं म्हटलं आहे.

राज्याचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी बीरभूममधील हिंसाचारावर तीव्र निषेध व्यक्त करत, इथे मानवी हक्क संपविण्यात आले असून आणि कायद्याच्या राज्याला तिलांजली दिल्याचं म्हटलं आहे.

राज्यपालांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या एका व्हीडिओत त्यांनी या घटनेचं वर्णन 'भयानक हिंसाचार आणि जाळपोळ' असं केलंय. त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडून या घटनेबद्दल त्वरित अपडेट मिळावेत, अशी मागणी केली आहे.

त्यांनी म्हटलं की, राज्याला हिंसाचार आणि अराजकतेच्या संस्कृतीचा पर्याय बनवता येणार नाही.

या वक्तव्यानंतर लगेचच राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात ममता बॅनर्जींनी म्हटलं की, घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारची वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी आणि अशोभनीय आहे.

त्या पत्रात लिहितात, "21 मार्च रोजी रामपूरहाटच्या घटनेत ज्या अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेला तुम्ही राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर अनावश्यक भाष्य करण्यासाठी निवडलं याबद्दल अतिशय खेद वाटतो.

तुमच्या वक्तव्यांमधून इतर राजकीय पक्षांना पाठिंबा असल्याचा राजकीय सूर निघतो आणि यातून बंगाल सरकारला धमकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा अंदाज बांधता येतो."

हिंसाचारामागील कारण काय?

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बडसाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख टीएमसी नेता भादू शेख यांची काही अज्ञातांनी गोळी झाडून हत्या केली. भादू यांच्या मृत्यूनंतर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले. यानंतर त्यांच्या समर्थकांनी संशयितांच्या घरांना आग लावली. या आगीत 8 जण जळाले असून मृतांमध्ये महिला आणि बालकांचा ही समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी (21 मार्च) रात्री घडली आहे. यामध्ये 10-12 घरे जळाली आहेत. हे राजकीय शत्रुत्वातून झालेले प्रकरण आहे. मात्र आजूबाजूच्या परिसरातील तणावपूर्ण वातावरण पाहता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली असून, या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे.

यामुळे सध्या परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे. पोलीसही याला राजकीय शत्रुत्वातून झालेले प्रकरण असल्याचं म्हणत आहेत. मात्र आजूबाजूच्या परिसरातील तणावपूर्ण वातावरण पाहता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे. भाजपने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे, तर तृणमूलने ही घटना राज्य सरकारला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)