विक्रम सोळंकी : इंग्लंड क्रिकेटसाठी आयुष्य वेचलं, पण भारतातल्या ऑफरसाठी सगळं सोडलं

फोटो स्रोत, Charlie Crowhurst
काही दिवसांपूर्वी झालेल्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या लिलावात 'गुजरात टायटन्स' या नव्या संघाच्या टेबलवर एक भारतीय वाटणारा चेहरा होता. त्या माणसाचं नावही भारतीय वळणाचं आहे. पण हा माणूस क्रिकेट खेळलाय इंग्लंडसाठी. त्याचं नाव आहे विक्रम सोळंकी.
गुजरात टायटन्स संघाच्या क्रिकेट डायरेक्टरच्या भूमिकेत असणाऱ्या सोळंकी यांनी आयपीएलच्या कामासाठी इंग्लंडमधल्या सरे काऊंटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएल लिलावावेळी गुजरात टायटन्स संघाच्या टेबलवर आशिष नेहरा आणि गॅरी कर्स्टन यांच्या बरोबरीने दिसणारा हा भारतीय चेहरा कोण अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.
सोळंकी यांचा जन्म राजस्थानातल्या उदयपूरचा. सोळंकी लहान असतानाच त्यांच्या घरच्यांनी इंग्लंडला स्थलांतर केलं. विक्रम यांचं लहानपण इंग्लंडमधल्या वॉल्व्हरहॅम्पटन भागात गेलं.
शैलीदार आक्रमक फलंदाज असणाऱ्या विक्रम यांनी 51 वनडे आणि 3 ट्वेन्टी20 सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. फलंदाजीच्या बरोबरीने चपळ क्षेत्ररक्षणासाठी विक्रम ओळखले जायचे.
इंग्लंडसाठी खेळताना त्यांनी वनडेत शतकंही झळकावली. मार्कस ट्रेस्कॉथिक आणि विक्रम जोडीने इंग्लंडला त्या काळात भक्कम सलामी मिळवून दिली.
आयसीसीने 2005 मध्ये 'सुपरसब' नावाचा नियम अमलात आणला होता. अंतिम अकरातील एका खेळाडूच्या ऐवजी दुसऱ्या खेळाडूला निवडण्याची मुभा संघांना देण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा सुपरसबचा प्रयोग इंग्लंडने केला. विक्रम सोळंकी पहिले सुपरसब खेळाडू होते.
इंग्लंडसाठी खेळणं होत असताना वूस्टशायर काऊंटी संघाने विक्रम यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही विक्रम यांनी काम केलं.

फोटो स्रोत, Luke Walker
बीसीसीआयने काही वर्षांपूर्वी रणजी संघांना रणजी करंडक स्पर्धेदरम्यान विदेशी खेळाडूंना अंतिम अकरात खेळवण्याची परवानगी दिली होती. याअंतर्गत राजस्थानने विक्रम यांना संघात समाविष्ट केलं होतं.
2012 मध्ये वूस्टरशायरची साथ सोडून विक्रम यांनी सरे काऊंटीशी करार केला. वय वाढत असतानाही विक्रम यांनी सरेसाठी धावांची टांकसाळ उघडली. निवृत्ती स्वीकारेपर्यंत विक्रम सरे संघांचा आधारस्तंभ झाले होते.
सरे संघाचे सहाय्यक प्रशिक्षकपद सांभाळल्यानंतर त्यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली. पण आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाने दिलेल्या मोठ्या जबाबदारीसाठी विक्रम यांनी सरेचं मुख्य प्रशिक्षकपद सोडलं आहे.
विक्रम यांनी याआधी आयपीएल स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासाठी काम केलं आहे. आशिष नेहरा, विक्रम आणि गॅरी कर्स्टन या तिघांनी एकत्र बंगळुरू संघासाठी काम केलं आहे. तोच अनुभव आता गुजरात टायटन्स संघाच्या कामी येणार आहे.
सीव्हीसी कॅपिटल कंपनीने गेल्या वर्षी 5665 कोटी रुपये खर्च करत गुजरात टायटन्स संघाची मालकी मिळवली. गुजरात टायटन्स संघाने मुंबई संघाचा अविभाज्य भाग असलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला कर्णधार म्हणून नियुक्त करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हार्दिकच्या बरोबरीने त्यांनी शुबमन गिल आणि रशीद खान यांना ताफ्यात समाविष्ट केलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








