इम्तियाज जलील म्हणतात, 'उद्धव ठाकरेंनी कमीत कमी आमच्याशी चर्चा तर करावी'

इम्तियाज जलील
फोटो कॅप्शन, इम्तियाज जलील

भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करत एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत हातमिळवणीची तयारी दर्शवलीय.

जलील यांच्या या ऑफरनंतर महाविकास आघाडीतल्या तिन्ही प्रमुख पक्षांमधून प्रतिक्रिया उमटू लागल्यात.

एमआयमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत जलील यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या ऑफरबाबत सविस्तर चर्चा केली.

प्रश्न - महाविकास आघाडीला ऑफर देण्याचा तुमचा नेमका उद्देश काय?

इम्तियाज जलील - आरोग्यमंत्री राजेश टोपे घरी आले असताना, अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसंदर्भात बोललो होतो. पण त्यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया न येता, दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे आमदार, खासदार, मंत्रीच बोलू लागले. मी म्हटलं, तुम्हाला काही विचारलं, तुम्हाला काही बोललो का? मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विचारलं. शिवसेनेला वाटलं असेल की, नव्या ऑफरनं आपली सत्ता जाते की काय, खुर्ची जाते की काय.

माझ्या बोलण्याचं कारण असं होतं की, आज देशातली भाजपची सत्ता घातक आहे. हे मलाच नाही, अनेक लोक या देशावर प्रेम करतात, त्यांनाही वाटतं की, जाती-धर्मात तेढ निर्माण करणं येत्या काळात देशाला घातक ठरेल. म्हणून मला वाटतं की, भाजपला पराभूत करण्यासाठी विचारधारा बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. तसंही, बाळासाहेबांची विचारधारा बाजूला ठेवून, तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहातच ना.

प्रश्न - तुम्ही म्हणताय की, भाजप देशासाठी घातक आहे, पण हाच आरोप एमआयएमवरही होतो.

इम्तियाज जलील - एमआयएमला पक्ष म्हणून पाहिलंत तर लहान आहोत, हैदराबाद, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आमदार-खासदार आहेत. सत्तेत कुठेच नाही. सत्तेत आम्हाला कुठे जायचेही नाही. इम्तियाज जलीलने प्रस्ताव दिला म्हणजे आम्हाला सत्तेत जायचं आहे, असं कुठेही नाही. देशासाठी भाजपला पराभूत करायचंय आहे, म्हणून हा प्रस्ताव दिलेला आहे.

इम्तियाज जलील
फोटो कॅप्शन, इम्तियाज जलील

प्रश्न - महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं राजकारण सध्या महाराष्ट्रात आहे. तुम्ही कुठल्या बाजूला आहात आणि महाविकास आघाडीला प्रस्ताव देत असाल तर सत्तेत जायचं आहे का?

इम्तियाज जलील - Choice is between the devil and deep sea… म्हणजे दोघेही असे नाहीत की, हे खूप चांगले आहेत आणि हे खूप वाईट आहेत. तसं काही नाहीये. आज मी भाजपला एका बाजूला पाहतो, तेव्हा उत्तर प्रदेशच्या निकालानंतर मला वाटतं की, हे महाराष्ट्रात व्हायला नको.

प्रश्न - महाराष्ट्रात एमआयएमचा मतदार प्रामुख्यानं मुस्लिम आहे. महाविकास आघाडीच्या बाजूनं जाण्याचं तुम्ही म्हणता, तेव्हा तुम्हाला वाटतं का, तुमचे मतदार तुमच्या बाजूने राहतील?

इम्तियाज जलील - एक गोष्ट खरी आहे की, मुस्लिम समाजाने कधीच भाजपला मतदान केलं नाही आणि करणार नाही. तीच परिस्थिती शिवसेनेच्या बाबतीत आहे. महाराष्ट्रात इतकी वर्षे एमआयएम नव्हती. 2014 मध्ये आम्ही महाराष्ट्रात आलो. त्याआधी मुस्लिम कुणाला मत द्यायची, भाजप-शिवसेनेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीला मतं द्यायचे. मग मुस्लिम समाजाला आता वाटतं की, इतके वर्षे सत्तेत बसवले यांना, मग शरद पवार किंवा काँग्रेसची जबाबदारी नाही का?

प्रश्न - म्हणून तुमची ऑफर शिवसेनेपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीला होती का?

इम्तियाज जलील - पण सर्वाधिक प्रतिक्रिया शिवसेनेकडून आली. उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण ऐकलं, तर तिथं एकानं म्हटलं की, मरू पण एमआयएमसोबत जाणार नाही. तुम्ही शंभर वर्ष जगा, मरण्याची गोष्ट कशाला करता. आमचं म्हणणं आहे की, किमान चर्चा तर करा ना.

इम्तियाज जलील

फोटो स्रोत, Facebook/Imtiaz jaleel

प्रश्न - तुमच्या आरोपामुळे भाजपला महाविकास आघाडीवर टीकेसाठी आयतं कोलित मिळालंय असं नाही का वाटत?

इम्तियाज जलील - भाजपकडे सत्ता आहे, डिमॉनेटायझेशनचा पैसे आहे, ईडीसारख्या संस्था आहेत, आणि दुर्दैवानं अनेक माध्यमं आहेत. या चार गोष्टी भाजपकडेच आहेत. त्यांचे विरोधक इतके अशक्त आहेत की, ते पाहूनच त्यांना बळ देण्याची आवश्यकता आहे. आम्ही काही मोठा पक्ष नाही. पण सगळ्यांना सोबत घेऊन ताकदवान बनता येईल.

प्रश्न - औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं तुमचं हे राजकारण सुरू आहे का?

इम्तियाज जलील - आमची युती होऊद्या किंवा नको होऊद्या, मी तुम्हाला शब्द देतो की औरंगाबादमध्ये एमआयएमचा पहिला महापौर बसेल.

प्रश्न - औरंगाबादमध्ये सर्व जाती-धर्मातील माणसांना तिकिटं देणार का?

इम्तियाज जलील - शंभर टक्के. किंबहुना, माझं हेच म्हणणं आहे. यूपीत आम्ही यादव, पंडित, ठाकूर, एससी-एसटी समाजातील लोकांनाही तिकीट दिलं होतं. शिवसेना-काँग्रेसचंही यूपीमध्ये डिपॉझिट जप्त झालेच ना. त्यांना कुणीही विचारत नाही. मात्र, पराभव झाल्यावर एमआयएममुळे झाल्याचं तुम्ही म्हणता.

आम्हाला तुम्ही का सोबत घेत नाही? तुम्हाला अब्दुल सत्तार तुम्हाला चालतो ना?

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)