You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिला विश्वचषकः वेस्ट इंडीजवर भारताचा 155 धावांनी मोठा विजय
न्यूझीलंडच्या हॅमिल्टनमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषकात आजचा सामना भारत विरुद्ध वेस्ट इंडीज असा आहे. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत करत वेस्ट इंडीजला 318 धावांचं लक्ष्य दिलं होतं. यामध्ये भारताने वेस्ट इंडीजला 155 धावांनी पराभूत केलं आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाची कर्णधार मिताली राजनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
या सामन्यात भारताची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत या दोघींनी शतकी खेळी केली.
स्मृती मंधानाने 119 चेंडूत 123 धावा बनवल्या. यात 13 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. सलामीला मैदानात उतरलेली स्मृती 43 व्या ओव्हरमध्ये झेलबाद झाली.
भारताकडून स्मृती मंधाना आणि यास्तिका भाटिया सलामीची जोडी म्हणून मैदानात उतरल्या होत्या. सहाव्या ओव्हरमध्ये यास्तिका बाद झाली आणि भारताला पहिला धक्का बसला. यास्तिका केवळ 31 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.
त्यानंतर मिताली राज मैदानात उतरली. मात्र, तीही जास्त वेळ टिकू शकली नाही. नवव्या ओव्हरमध्ये केवळ 5 धावांसह मिताली झेलबाद होत परतली. दहाव्या ओव्हरपर्यंत भारताची धावसंख्या 2 बाद 62 एवढीच होती.
त्यानंतर दीप्ती शर्माने मंधानाला काही वेळ सोबत दिली. मात्र, तेराव्या ओव्हरमध्ये दीप्तीही झेलबाद झाली. दीप्तीनं केवळ 15 धावा केल्या. भारतीय संघ यावेळी थोडा अडचणीत दिसला. मात्र, स्मृती मंधाना मैदानात टिकून होती.
दीप्ती बाद झाल्यानंतर स्मृतीला साथ देण्यासाठी हरमनप्रीत कौर आली आ या दोघींनी 20 व्या ओव्हरपर्यंत भारताची धावसंख्या 100 पर्यंत पोहोचवली. त्यानंतर दोघींनी धावसंख्येच्या फलकाला वेग धरायला लावला. 39 व्या ओव्हरपर्यंत दोघींची भागीदारी 150 धावांपर्यंत पोहोचली.
स्मृती मंधानानं 40 व्या ओव्हरमध्ये मॅथ्यूजच्या दुसऱ्या चेंडूवर चौका लगावला आणि शतकी खेळी पूर्ण केली. त्यानंतर धडाकेबाज फलंदाजी करत 41 व्या ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूत सलग 3 चौकार लगावले.
मात्र, 43 व्या ओव्हरमध्ये मंधाना 123 धावांसह पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 262 होती. मात्र, स्मृती परतल्यानंतर हरमनप्रीत कौरने भारताची बाजू सांभाळली. मनगटाला दुखापत झालेली असतानाही हरमनप्रीतनं 47 व्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूत एक धाव घेऊन आपल्या करिअरमधील चौथं शतक पूर्ण केलं.
हरमनप्रीत कौरचं हे विश्वचषकातील दुसरं शतक आहे. तिने आज 100 चेंडूत शतक ठोकलं.
दरम्यान, ऋचा घोष बाद झाल्यानं भारताला पाचवा धक्का बसला आणि अवघ्या 5 धावा करून ऋचा पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर पूजा वस्राकरनं चांगल्या धावा केल्या आणि अशाप्रकारे 300 धावा पूर्ण केल्या.
48 व्या ओव्हरमध्ये पूजा, तर 49 व्या ओव्हरमध्ये हरमनप्रीत पॅव्हेलियनमध्ये परतील. हरमनप्रीतनं 109 धावा बनवत शतकी खेळी नोंदवली. त्यानंतर आलेली झूलन गोस्वामी लगेच बाद झाल्यानंतर भारताला आठवा धक्का बसला.
भारतानं 50 ओव्हरमध्ये 8 विकेट देत 317 धावांची नोंद केली आणि वेस्ट इंडीजसमोर 318 धावांचं लक्ष्य ठेवलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)