You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ICC Women's World Cup : भारत-पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंनी पुरुषांच्या वाटेवर का चालावं?
- Author, शारदा उगरा
- Role, क्रीडा लेखिका
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषक अभियानाची सुरुवात होत आहे. आज (6 मार्च) भारत-पाकिस्तानच्या महिला संघांचा सामना असले.
न्यूझीलंडमधील माऊंट माऊंगानुई येथे विश्वचषकाच्या या 12 व्या पर्वात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर क्रीडा लेखिका शारदा उगरा यांनी उभय देशांमधील महिला क्रिकेटचा मागील काही वर्षांतील आढावा घेतला आहे.
आता क्रिकेट म्हटलं की गाजावाजा हा येतोच. त्यात पाकिस्तान आणि भारताचा सामना असेल तर मग बात काही औरच असते. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, या विश्वचषक स्पर्धेची कुठे जाहिरात आहे ना, ना माध्यमांच्या वृत्तांकनात कुठे हाय वोल्टेज ड्रामा दिसतो आहे. कारण एकच आहे की, हा विश्वचषक सामना महिलांचा आहे.
आता काही बातम्यांना माध्यमांनी स्थान दिलं होतं. मग त्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात स्मृती मंधानाच्या डोक्यावर चेंडू आदळला होता. मात्र, तिची प्रकृती स्थिर असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आल्याची ही बातमी होती. दुसरी बातमी अशी होती की, स्पर्धेदरम्यान पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली वापरली जाणार आहे.
आता पुरुषांप्रमाणेच, महिला संघ ही आयसीसी किंवा खंडीय स्पर्धांमध्ये खेळतात. 2005 मध्ये मात्र आशिया कप स्पर्धेवेळी भारत आणि पाकिस्तान असा पहिलाच सामना रंगला होता. या दोन्ही देशांदरम्यान कायमचा राजकीय तणाव असल्याने क्वचितच हे संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात.
त्यात ही विशेष म्हणजे भारताने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत झालेले सर्व दहाच्या दहा महिला एकदिवसीय सामने जिंकले आहेत आणि 11 महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी फक्त एक गमावला आहे. साहजिकच त्यांना अजून ही एक कसोटी खेळायची आहे.
आजवर तरी महिला संघांची कामगिरी पाहता कोणताही दोष नसताना, त्यांना राजकीय आस्थापनांमुळे नेहमीच डावलण्यात आले आहे.
मग आता तुम्ही असा युक्तिवाद कराल की यात पुरुषांची चूक देखील नाही. म्हणूनच महिला क्रिकेटच्या बाबतीत काही जाणून घ्यावं लागतं तेव्हा काळानुरूप अनेक दशकं मागे जावं लागतं. पण आजही जेव्हा भारत पाकिस्तान क्रिकेटचा विषय निघतो तेव्हा फक्त पुरुष संघाच्या खेळीच क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात राहतात आणि आनंदही देतात. याउलट, महिला संघांना मात्र भारत-पाक क्रिकेट स्पर्धेच्या स्वतःचा वेगळा इतिहास रचण्याची संधीच दिली जात नाही.
आता तसं पाहायला गेलं तर दोन्ही देशांतील महिला क्रिकेटचा सामान्य भूतकाळाशी कोणताही संबंध नाही. मात्र तो दोन असंबंधित प्रकारांशी संबंधित आहे.
भारतात औपचारिक महिला क्रिकेटची सुरुवात 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला झाली. तर पाकिस्तानच्या महिला संघाने दोन दशकांनंतर म्हणजे 1997 मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
जेव्हा पाकिस्तानी महिलांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा त्यांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागलं. पाकिस्तानी महिला संघाच्या प्रवासाचा इतिहास मांडणाऱ्या लेखिका कमिला शम्सी लिहितात, "जेव्हा शैजा आणि शर्मीन या दोन खान बहिणींनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. तरीही शून्य प्रेक्षकांसह आणि 8,000 पोलिसांसह पाहिला गेलेला पहिला महिला सामना खेळला गेलाच."
पण भारतीय महिला संघाच्या अडचणी काही वेगळ्या होत्या. जसं की भारतीय महिलांच्या खेळाला निधीची कमतरता कायमच भासली. 2006 पर्यंत तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) मध्ये विलीन होईपर्यंत भारतीय महिला संघ दुर्लक्षिलाच गेला होता.
मग भारत-पाकिस्तानच्या महिला क्रिकेटर्सनी पुरुषांच्या वाटेवर का चालावं ?
बाहेरील दोन संघांमधील कोणत्याही प्रतिबद्धतेची वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणे कठीण काम आहे. क्रिकेट मधील युक्तिवाद असे सुचवू शकतो की, दोन संघांमध्ये अंतर आहे आणि त्यामुळे जास्त स्पर्धा होणार नाहीत. हे संघ दोन वर्षांतून एकदाच भेटतात. मग कोव्हिड असो वा नसो.
2017 मध्ये महिला विश्वचषकात भारताने अंतिम फेरी गाठली. मात्र लॉर्ड्सवर इंग्लंडकडून सहज पराभूत झाले. या एका गोष्टीने भारतातील महिलांच्या खेळाची प्रतिमा बदलली. या स्पर्धेत पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही. तेव्हा आणि आताच्या पाच वर्षांत भारताने 40 एकदिवसीय सामने खेळले. त्यातील 19 जिंकले आणि 21 गमावले. पाकिस्तानने 34 सामने खेळले, 11 जिंकले आणि 21 गमावले.
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत भारत चौथ्या आणि पाकिस्तान आठव्या क्रमांकावर आहे. पण तुलनेने नवखा असणाऱ्या बांगलादेशच्या नावावर फक्त पाच सामने असून ही क्रमवारीत हा देश सहाव्या क्रमांकावर आहे.
विश्वचषकांदरम्यान, पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध पहिला विजय मिळवला. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना पाकिस्तानी संघात स्पर्धात्मकता दिसत होती. विश्वचषकाच्या दावेदार संघांमध्ये न्यूझीलंडच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे सराव सामन्यात यजमान न्यूझीलंडला पाकिस्तानी संघाने आपल्या कामगिरीने पुन्हा चकित केलं आहे.
भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजवर विजय मिळवण्यापूर्वी सुरुवातीच्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 244 धावांचे आव्हान उभे केले.
या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या आणि अधिक सामर्थ्यवान असलेल्या भारतीय संघाकडून पाकिस्तानविरुद्ध विजयाची अपेक्षा आहे. पण पाकिस्तानी संघाच्या कामगिरीमुळे ही स्पर्धा कशी ठरू शकते याची कल्पना येईल.
बीसीसीआयमध्ये पाकिस्तानप्रमाणे महिला विंग नाही. आठवड्याच्या सुरुवातीला, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी पुढील वर्षी होणाऱ्या महिला पाकिस्तान सुपर लीगच्या उद्घाटन हंगामासाठी परवानगी दिली आहे.
बीसीसीआयने मात्र महिला आयपीएलबद्दल आश्वासने दिली आहेत. यात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी फक्त ते 'लवकरच सुरू होईल' असे म्हटले आहेत.
रविवारचा खेळ दोन्ही देशांसाठी महत्वपूर्ण आहे. सध्या भारत विरुद्ध श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया असे पुरुष संघांचे कसोटी सामने सुरु आहेत. त्यात आता भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार असल्यामुळे थोड्या प्रमाणात उत्साह क्रिकेटप्रेमींमध्ये दिसत आहे.
पाकिस्तान महिला संघाची कर्णधार बिस्माह मारूफने यावेळी सर्वोत्तम प्रकारची खेळी साकारली आहे. मारूफ नुकतीच प्रसूतीच्या रजेनंतर मैदानावर दिसली आहे आणि ते ही तिची सहा महिन्यांची मुलगी फातिमासह. यावेळी मारूफ म्हणते, रविवारचा सामना पाकिस्तान आणि भारतातील लाखो मुलींना क्रिकेट हा खेळ व्यवसाय म्हणून स्वीकारण्यासाठी प्रेरित करेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)