Koo : ट्विटरला मागे टाकू शकेल का हे देशी अॅप?

फोटो स्रोत, koo app
- Author, निखिल इनामदार,
- Role, बीबीसी बिझनेस प्रतिनिधी
भारतात बनलेलं कू हे देशी अॅप ट्विटरला मागे टाकू शकेल का हा प्रश्न सध्या विचारला जातोय.
हे अॅप बनवणाऱ्या मयंक बिद्वकता यांचं हेच उदिष्ट आहे. त्यांचं म्हणणं आहे की या वर्ष कू चे युझर्स अडीच कोटींचा आकडा पार करतील. 2021 पर्यंत भारतात कू चे 2 कोटी यूझर्स होते.
बंगळुरूच्या मुख्यालयात बीबीसीशी बोलताना बिद्वकता यांनी सांगितलं की, कू आता इंग्लिशसह 10 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि या वर्षी देशातल्या आणखी 22 भाषांमध्ये हे उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
गेल्या वर्षी भारत सरकार आणि अमेरिकन मायक्रोब्लॉगिंग अॅप ट्विटरमध्ये चांगलेच खटके उडाले होते. त्यानंतर कू प्रकाशझोतात आलं.
ट्विटर आणि मोदी सरकारच्या भांडणाचा लाभ होणार?
मोदी सरकारने ट्विटरला काही असे अकाउंट बंद करायला सांगितले होते जे कथितरित्या भावना भडकणाऱ्या पोस्ट करत होते. आधी तर ट्विटरने सरकारचं म्हणणं मान्य केलं पण नंतर नकार दिला.
असं करण्याचं 'समाधानकारक' कारण ट्विटर देऊ शकलं नाही. सरकारने कंपनीच्या भारतात असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. यावरून भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात काही दिवस संघर्ष होत राहिला.

ट्विटरकडून सरकारने दिलेल्या आदेशाचं पालन न करणं आणि डिजिटल नियम मान्य करण्यास नकार दिल्यामुळे सरकार ट्विटरवर नाराज होतं. त्यामुळे सरकारचे अनेक मंत्री आणि भाजपचे काही खासदार अर्ध्या रात्रीतून कू वर शिफ्ट झाले. पण पंतप्रधान मोदींनी मात्र ट्विटर सोडलं नाही कारण त्यांना खूप फॉलोअर्स आहेत.
याआधी जेव्हा नायजेरियात ट्विटरवर बंदी आणली होती तेव्हा तिथेही कू लोकप्रिय झालं होतं. आता 2022 च्या अखेरीपर्यंत भारतात दहा कोटी यूझर्सपर्यंत पोहचण्याचा कूचा इरादा आहे.
'कू'ची सुरुवात
मार्च 2020 साली कू अॅप लाँच झालं. बंगळुरूच्या बॉम्बीनेट टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेडकडे याची मालकी आहे. अप्रमेय राधाकृष्णन आणि मयंक बिदवक्ता या दोन भारतीयांनीच हे अॅप डिझाईन केलं आहे. याला ट्विटरचं देशी व्हर्जनही म्हणता येईल.

फोटो स्रोत, Getty Images
हे अॅप मुखतः इंग्लिश यूझर्सला सर्व्हिस देतं.
अप्रमेय एक गुंतवणूकदार आणि आंत्रप्रिनर आहेत. त्यांनी राईड शेअरिंग टॅक्सी फॉर सर्व्हिस सुरू केली होती जी 2015 साली ओलाने 1500 कोटी रुपयांना विकत घेतली.
अप्रमेय आणि मयंक मिळून भारतीय भाषांमध्ये नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म वोकल पण चालवतात.
गेल्या वर्षभरात अनेक क्रिकटेर्स आणि बॉलिवूड स्टार्स कू वर आले. कू ला आशा आहे की हे वर्षं संपेपर्यंत या प्लॅटफॉर्मवरच्या सेलिब्रिटी अकाउंटची संख्या तिप्पट होईल. सध्या असे 5 हजार अकाउंट कू वर आहेत.
कू 'हेट-स्पीच' थांबवू शकेल?
कू वर सरकारचा प्रपोगंडा पुढे नेण्याचे आणि मुस्लिमांच्या विरोधात व्देष पसरवणाऱ्या पोस्टला लगाम घालण्यात अपयशी ठरण्याचे आरोप होत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
कू च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट लिहिलंय की ते हेट-स्पीच, भेदभाव करणाऱ्या, व्देष पसरवणाऱ्या आणि हिंसक स्वरूपाच्या पोस्ट ताबडतोब थांबवतात पण दर मिनिटाला इतके 'कू' (जसे ट्वीट तसे कू) येत असतात की त्यांना निवडून थांबवणं कठीण आहे. हीच परिस्थिती ट्विटरची पण आहे.
बिद्वतका म्हणतात की कोणी मॉडरेटर हा प्रश्न सोडवू शकत नाही. याला उपाय एकच आहे, तो म्हणजे तंत्रज्ञान. दुसरं म्हणजे अशा युझर्सला सहभागी करून घेणं जे भावना भडकावणाऱ्या पोस्टबदद्ल सांगू शकतील.
ते म्हणतात, कू वर 'भाजपच्या लोकांचं' अकाउंट आहे याचा अर्थ हा प्लॅटफॉर्म उजव्या विचारसरणीचा ठरत नाही. त्यांचं म्हणणं आहे की कू वर 19 विरोधी पक्षांचे नेतेही आहेत त्यात काँग्रेसच्या अनेक मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
पण डिजिटल अधिकार कार्यकर्ते निखिल पाहवा म्हणतात की कू ला स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग अॅप म्हणून प्रोत्साहन देण्यामागचा मोदी सरकारचा हेतू स्पष्ट लक्षात येतोय. याला ट्विटरचा 'राष्ट्रवादी' पर्याय म्हणून पुढे केलं जाऊ शकतं म्हणजे जर भविष्यात ट्विटरवर बंदी घालण्याची वेळ आली तर कू चा वापर करता येईल.
पाहवा म्हणतात, "चीनच्या स्प्लिंटरनेटचं उदाहरण समोर आहे. यात सरकार सगळ्या सायबर स्पेसवर नियंत्रण ठेवते. भारत सरकारही गेल्या काही वर्षांपासून डिजिटल स्वायत्तता आणि इंटरनेटचं नियंत्रण करण्यावर जोर देतं आहे. यामुळे कू सारख्या स्वदेशी प्लॅटफॉर्मला चालना मिळू शकते."
मोठ्या आंतरराष्ट्रीय टेक कंपन्या ज्या डेटा संरक्षण आणि सुरक्षिततेच्या नियमांवर चालतात त्यांना 'भारतात काम करणं अवघड होत जाईल' याकडेही ते लक्ष वेधतात.
'कू'ला आपले यूझर्स वाढवण्यासाठी काय करावं लागेल?
जर कू ने आपलं कंटेंट मॉडरेट केलं आणि यूझर्सला तिथे सुरक्षित वाटलं तर कू साठी चांगली संधी आहे. यूझर्सला सुरक्षिततेची भावना देण्यासाठी ट्विटरला बरंच झगडावं लागलं होतं.
कू चे वापरकर्ते आणखी वाढू शकतात पण त्यांना वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीच्या लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील.

सध्यातरी उदारमतवादी किंवा सत्तेच्या विरोधात असणारे आवाज ट्विटर सोडतील अशी शक्यता नाहीये. ते या दोन्ही प्लॅटफॉर्मचा वापर करतील ही अपेक्षा करणं पण गैर ठरेल.
पाहवा म्हणतात की कू साठी मोबाईल नंबर ऑथेंटिकेशनची गरज असते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही एक अडचण होऊ शकते कारण यामुळे कंटेंट मॉडरेशन तर होऊ शकतं पण यूझर्सला अनामिक राहायचं असेल तर ती सुविधा मिळू शकत नाही.
असं असतानाही कू आपलं पूर्ण लक्ष बिगर-इंग्लिश युझर्ससाठी प्रोडक्ट बनवण्यावर केंद्रित करत आहे. गेल्या काही महिन्यात कंपनीने अनेक प्रयोग केले आहेत. उदाहरणार्थ यूझर्स एकाच स्क्रीनवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पोस्ट करू शकतात.
बिद्वकता म्हणतात, "बॉलिवूड सेलेब्रिटी याचा चांगला उपयोग करतात. सहसा ते इंग्लिशमध्ये संवाद साधत असतात पण कू मुळे ते वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतात."
व्यवसाय वाढीचं उदिष्ट
भारतात सध्या कू ची स्पर्धा शेअरचॅटशी आहे. शेअरचॅटचे यूझर्स जास्त आहेत. येत्या काळात कू आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून दुप्पट करण्याच्या बेतात आहे. असं झालं तर त्यांची कर्मचारी संख्या 500 पर्यंत पोहचेल.
बिद्वतका नायजेरियात आपल्या प्लॅटफॉर्मला मिळालेल्या यशानंतर फारच उत्साही आहेत. त्यांना आता आपलं अॅप अशा देशांमध्ये न्यायचं आहे जिथे इंग्लिश मुख्य भाषा नाही.
ते म्हणतात, "आमच्यासाठी दक्षिण पूर्व आशियायी देश आकर्षक बाजार आहेत. तिथे लोकसंख्या जास्त आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही जास्त नाहीत. ही नक्कीच आमची पुढची योजना आहे. जगात फक्त 20 टक्के लोक इंग्लिश बोलतात आणि 80 टक्के लोक इंग्लिश बोलत नाहीत. हे संपूर्ण मार्केट आमच्यासाठी खुलं आहे."

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









