Telegram: 'सोशल मीडियावर माझे नग्न फोटो टाकून मी वेश्या असल्यासारखं भासवलं'

फोटो स्रोत, KLAWE RZECZY
- Author, ग्लोबल डिसइन्फर्मेशन टीम,
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस.
महिलांचा छळ करण्यासाठी त्यांना बदनाम करण्यासाठी किंवा त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी सोशल मीडिया अॅप टेलिग्रामवर त्यांचे आक्षेपार्ह फोटो हे मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत, असं बीबीसीच्या तपासात आढळून आलं आहे.
इशारा : या लेखात लैंगिक विषयाशी संबंधित मजूकूर आहे.
सारा या मुलीला तिचा एक न्यूड फोटो लीक झाला असून तो टेलिग्रामवर शेअर करण्यात आल्याचं समजलं आणि त्यामुळं एका क्षणात साराचं आयुष्य बदलून गेलं. त्यात त्यांच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक प्रोफाईल अॅड करण्यात आल्या होत्या आणि फोन क्रमांकही दिलेला होता. अचानक अनोळखी पुरुषांकडून त्यांना आणखी फोटो मागण्यासाठी संपर्क केला जाऊ लागला.
"मीच माझे आक्षेपार्ह फोटो शेअर केले (असं त्यांना वाटलं) त्यामुळं जणू मी वेश्याच आहे, त्यांनी मला असं भासवलं. म्हणजे महिला म्हणून माझं काहीही मूल्य शिल्लक राहिलं नाही," असं त्या म्हणाल्या.
सारा (बदललेलं नाव) यांनी एका व्यक्तीला फोटो शेअर केला होता पण तो 18 हजार फॉलोअर्स असलेल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर पोहोचला. त्यात हवाना आणि क्युबामधील माझ्या शेजाऱ्यांपैकीही अनेकजण होते. त्यां अशी भीती वाटायला लागली होती की, रस्त्यावरच्या अनोळखी व्यक्तीनंही त्यांना नग्नावस्थेत पाहिलेलं असेल. "मला कुठेही बाहेर जायची इच्छा नव्हती किंवा मित्र-मैत्रिणींशी संपर्क ठेवायचा नव्हता. मला खूप त्रास होत होता."
पण अशा त्या एकट्या नाही. टेलिग्रामबाबत काही महिने तपास केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की, ग्रुप आणि चॅनल्सवर जवळपास 20 देशांमधल्या महिलांचे चोरलेले किंवा नकळत शूट केलेले फोटो शेअर केले जात आहेत. या समस्येवर तोडगा शोधण्याचा या प्लॅटफॉर्मकडून प्रयत्न होत असल्याचंही दिसत नाही.
क्युबापासून हजारो मैल अंतरावर असलेल्या निगार या निर्वासित आहेत.

त्या अझरबैजानच्या आहेत पण त्यांना बळजबरीनं त्यांचा देश सोडावा लागला. 2021 मध्ये त्यांचा पतीबरोबर सेक्स करत असल्याचा फोटो त्यांच्या कुटुंबाला पाठवण्यात आला आणि नंतर तो टेलिग्राम ग्रुपवर पोस्ट करण्यात आला.
"माझी आई रडत मला सांगू लागली की त्यांना एक व्हीडिओ पाठवण्यात आला आहे. तिनं मला सांगितल्यानंतर मी उद्ध्वस्त झाले होते, सर्वकाही संपलं होतं," असं निगार म्हणाल्या.
40 हजार सदस्य असलेल्या ग्रुपमध्ये हा व्हीडिओ शेअर करण्यात आला होता. व्हीडिओ फुटेजमध्ये त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीचा चेहरा पुसट (ब्लर) करण्यात आला होता, पण त्यांचा स्पष्टपणे दिसत होता.
पतीनं हा व्हीडिओ त्यांच्या म्हणजे निगार यांच्या भावाला ब्लॅकमेल करण्यासाठी नकळपणे शूट केला असावा असं त्यांचं मत होतं.
निगार यांचे भाऊ हे अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांवर कायम टीका करायचे. त्यांच्या आईला असं सांगण्यात आलं की, त्यांच्या भाऊ हे थांबवत नाही तोपर्यंत हा व्हीडिओ तोपर्यंत टेलिग्रामवर शेअर केला जाईल.
"ते तुमच्याकडे अत्यंत अपमानास्पद भावनेनं पाहतात. तुमचं लग्न झालेलं असेल तरी त्यांना फरक पडत नाही,?" असं निगार म्हणाल्या.
निगार यांनी याबाबत त्यांच्या पतीला विचारणा केली पण त्यांनी तो व्हीडिओ तयार केला नसल्याचं म्हटलं. आम्हीही त्यांची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उत्तर दिलं नाही.

निगार यांना अजूनही यातून बाहेर पडणं कठीण वाटत आहे. "मी अजूनही यातून बाहेर पडलेले नाही. आठवड्यातून दोन वेळा मी समुपदेशकाकडे जाते. अद्याप काहीही प्रगती नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ते मला म्हणतात की मी हे विसरायला हवं पण मी विसरू शकत नाही," असं निगार सांगतात.
निगार आणि सारा यांच्या दोघींच्या फोटो-व्हीडिओबाबत टेलिग्रामला माहिती देण्यात आली होती, पण काहीही प्रतिसादही मिळाला नाही. त्यांचा अनुभवदेखील अत्यंत वेगळा असा आहे.
बीबीसीनं रशियापासून ते ब्राझिलपर्यंत आणि केनियापासून मलेशियापर्यंतच्या विविध देशांमधील 18 टेलिग्राम चॅनल्स आणि 24 ग्रुप यांचं निरीक्षण केलं. त्यांच्या एकूण सबस्क्रायबर्सची संख्या 20 लाखांच्या आसपास होती.
यावर आक्षेपार्ह फोटोसह पत्ता, आई-वडिलांचे फोन नंबर अशा प्रकारची खासगी माहितीही पोस्ट केली जात असल्याचं पाहायला मिळालं.
ग्रुपचे अॅडमिनिस्ट्रेटर हे सदस्यांना त्यांचे एक्स पार्टनर, सहकारी, सोबतचे विद्यार्थी यांचे आक्षेपार्ह फोटो ऑटोमेटेड अकाऊंट पाठवयला सांगत असल्याचं आमच्या लक्षात आलं. तसं केल्यामुळं पाठवणाऱ्याची ओळख जाहीर न करता ते फोटो त्यांना प्रसिद्ध करता येतात.

टेलिग्रामचं असं म्हणणं आहे की, त्यांचे टेलिग्रामवर 50 कोटींपेक्षा जास्त यूझर्स असून ते ट्विटरपेक्षा अधिक आहेत. यापैकी अनेक यूझर्स हे गोपनीयतेकडं आकर्षित झाले असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
जानेवारी 2021 मध्ये व्हाट्सअपने गोपनीयतेबाबतचे नियम बदलल्यानं लाखो यूझर्स हे टेलिग्रामकडे वळले होते.
टेलिग्राम हे माध्यमांवर निर्बंध असलेल्या देशांमध्ये लोकशाहीचे समर्थन करणाऱ्या आंदोलकांमध्ये दीर्घकाळापासून प्रसिद्ध आहे. याठिकाणी यूझर्सला त्याचं नाव किंवा फोन क्रमांक जाहीर न करता पोस्ट करता येतात. तसंच 2 लाख मेंबर्सपर्यंतचे खासगी किंवा सार्वजनिक ग्रुप ते तयार करू शकतात. किंवा अगणित मेंबर किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल्सही तयार करू शकतात.
गोपनीयतेबाबत टेलिग्रामची प्रतिष्ठा असूनही केवळ सिक्रेट चॅट या पर्यायामुळं एंड टू एंड इन्क्रिप्शन मिळतं. म्हणजे त्यामुळं दोन व्यक्तींमधील मेसेज हे त्यांच्यापुरतेच मर्यादीत राहतात. पण सिग्नल किंवा व्हाट्सअॅपसारख्या अॅपमध्ये ही डिफॉल्ट सेटिंग असते.
तसंच इतर प्लॅटफॉर्मवर ज्यांना बंदी घालण्यात आली आहे किंवा ज्यांना कमी नियंत्रण असलेलं प्लॅटफॉर्म हवं असेल तेही टेलिग्रामकडे आकर्षित होतात.
"टेलिग्राम आणि त्यांच्या मालकांच्या मते, त्यांना यूझर्सला सेन्सॉर करायचं नाही," असं डिजिटल राइट्स ग्रुप अॅक्सेस धील तांत्रिक कायदेशीर सल्लागार नटालिया क्रॅपिव्हा म्हणाल्या.

फोटो स्रोत, EPA
पण अशा प्रकारच्या भूमिकेमुळं टेलिग्राम हे आक्षेपार्ह फोटो लीक आणि शेअर करणाऱ्यांसाठी स्वर्ग बनत असल्याचं आमच्या संशोधनात आढळून आलं आहे.
सहमतीशिवाय आक्षेपार्ह फोटो शेअर करण्याच्या समस्येचा सामना करण्यासाठी टेलिग्रामकडे तशाप्रकारचं धोरण नाही. मात्र, "बेकायदेशीर पॉर्नोग्राफिक मजकूर सार्वजनिकरित्या उपलब्ध होईल अशाप्रकारे पोस्ट करू नये," हा नियम मान्य करणं हे यूझर्सला अनिवार्य असतं.
त्याशिवाय यामध्ये सार्वजनिक आणि खासगी ग्रुपसाठी तसंच चॅनल्ससाठी पॉर्नोग्राफी संदर्भात तक्रार करण्यासाठी अॅपमध्येच सुविधाही आहे.
टेलिग्राम त्यांच्या धोरणांची किती काटेकोरपणे अंमलबजावणी करतं हे पाहण्यासाठी आम्ही 100 फोटोची अॅपच्या माध्यमातून पॉर्नोग्राफी असल्याची तक्रार केली. पण एका महिन्यानंतरही त्यापैकी 96 हे तसेचं होते. इतर चार आम्हाला मिळू शकल्या नाहीत कारण त्या ज्या ग्रुपमध्ये होत्या, त्यात आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला होता.
त्यातही हादरा देणारी बाब म्हणून आम्ही या ग्रुपची माहिती मिळवत असताना रशियातील एका खात्याद्वारे आम्हाला लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित व्हीडिओचं एक फोल्डर एक कप कॉफीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीत विकण्याचा प्रयत्न केला होता.
आम्ही याबाबत टेलिग्राम आणि मेट्रोपॉलिटन पोलिसांत तक्रार केली. पण दोन महिन्यांनंतरही ती पोस्ट आणि चॅनल तसंच होतं. आम्ही टेलिग्रामच्या मीडिया टीमशी संपर्क साधल्यानंतर हे अकाऊंट काढून टाकण्यात आलं.

अशाप्रकारे फारसे कठोर निर्बंध नसतानाही, टेलिग्राम काही मजकुरावर मात्र, कठोर कारवाई करत असतं.
अॅपलनं त्यांच्या अॅप स्टोरमधून हटवल्यानंतर टेलिग्रामनं लहान मुलांच्या शोषणाशी संबधित फोटोंच्या बाबतीमध्ये अधिक सक्रिय भूमिका घेतली होती. त्याचबरोबर युरोपियन संघातील संस्था युरोपोललाही त्यांनी 2019 मध्ये याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या इस्लामिक स्टेटशी संबंधित माहिती हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत केली होती.
"टेलिग्रामनं दहशतवादाशी संबंधित किंवा कट्टर राजकीय भूमिकेशी संबंधित मजकूर हटवला असल्याचं आणि हटवत असल्याचं आम्हाला माहिती आहे," असं ऑक्सफर्ड इंटरनेट इन्स्टिट्यूटमधील संशोधक अलियास्कंदर हेरासिमेन्का यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Reuters
आम्ही नाव न छापण्याच्या अटीवर पाच टेलिग्राम कंटेंट मॉडरेटर्सशीही चर्चा केली. त्यांना वापरकर्त्यांकडून आक्षेप प्राप्त होतात. त्यांची विभागणी स्पॅम अथवा नॉट स्पॅममध्ये केली जाते, अशी माहिती या मॉडरेटर्सनी दिली.
पण अशा मादक फोटोंचा शोध आपण स्वतः घेत नाही. टेलिग्रामवर अशा प्रकारचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरात नाही. त्यामुळे काही महिलांना स्वतःच ते पाऊल उचलावं लागतं, असं ते म्हणाले.
जोआन्ना यांना त्यांचा एक नग्न फोटो असाच मलेशियन टेलिग्राम ग्रुपवर आढळून आला होता. त्यावेळी त्या केवळ 13 वर्षांच्या होत्या.
हा ग्रुप जॉईन करण्यासाठी जोआन्ना यांनी स्वतःचं एक फेक प्रोफाईल तयार केलं. तिथं त्यांनी तसे आणखी नग्न फोटो शोधून काढले. यानंतर त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली. (रिपोर्ट)

शिवाय, ही माहिती त्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींनाही कळवली. यानंतर मीडियाच्या प्रचंड दबावामुळे अखेर हा ग्रुप बंद करण्यात आला.
पण यादरम्यान तपास करत असताना अशाच प्रकारचे आणखी दोन ग्रुप कार्यरत असल्याचं आम्हाला आढळून आलं. यामध्येही समान स्वरुपाचाच मजकूर शेअर करण्यात येतो.
"कधी कधी तुम्हाला खूपच असहाय वाटू लागतं. तुम्ही इतके प्रयत्न करता, पण तरीही तो मजकूर तुम्ही हटवू शकत नाही. याचा शेवट नेमका कसा आहे, याबद्दल संभ्रम होतो," असं जोआन्ना म्हणतात.
यासंदर्भात टेलिग्रामची भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही मुलाखतीसाठीही विचारणा केली होती. पण त्यांनी त्यास नकार दिला.
मात्र, एका प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलं की त्यांच्यामार्फत सार्वजनिक ग्रुपवर निगराणी ठेवली जाते. वापरकर्त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन नियमांचं उल्लंघन करणारा मजकूर वेळोवेळी हटवण्यात येतो, असं त्यांनी सांगितलं.
मात्र, लोकांच्या परवानगीशिवाय त्यांचे खासगी फोटो शेअर करणं मान्य आहे की ते नंतर हटवले जातात, याबाबत स्पष्ट माहिती टेलिग्रामने दिली नाही.
आगामी काळात टेलिग्रामवर जाहिराती दाखवण्यासही सुरुवात केली जाणार आहे, असे संकेत संस्थापक पावेल डुराव यांनी दिले आहेत. त्यामुळे एकंदर या परिस्थितीमुळे टेलिग्रामवर दबाव वाढणार हे नक्की.
दुसरीकडे, टेलिग्रामचा प्रतिस्पर्धी असलेल्या व्हॉट्सअॅपने अशा मजकूराविरोधात नवं धोरण आणलं आहे. अशा स्थितीत महसूल धोरण लागू करत असताना टेलिग्रामसमोरील आव्हानं मोठी असणार आहेत.
शिवाय, ज्या महिलांच्या प्रतिमा आणि आयुष्य यामुळे उद्ध्वस्त झाल्या, त्याची भरपाई लवकर होणारी नाही, ते नुकसान कसं भरून काढायचं?
बीबीसी वर्ल्ड सर्व्हीसच्या डिसइन्फर्मेशन टीमचा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)





