बप्पी लाहिरींचं निधन, मराठी सिनेमात गायला त्यांना 43 वर्षं लागली कारण…

फोटो स्रोत, Getty Images
गायक - संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन झालंय. ते 69 वर्षांचे होते.
PTI वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. मुंबईतल्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आलोकेश लाहिरी असं त्यांचं नाव असून त्यांना सगळे बप्पी लहरी या नावानं ओळखत होते. बप्पीदा नावानं प्रसिद्ध असलेल्या लाहिरी यांना ते परिधान करत असलेल्या प्रचंड सोन्यामुळंही वेगळी ओळख मिळाली होती.
गेला महिनाभर ते आजारी असल्याने रुग्णालयात होते. 15 फेब्रुवारीलाच त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं, पण त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. गेल्यावर्षी त्यांना कोव्हिड झाला होता. 'ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियाने' त्यांचं काल रात्री निधन झाल्याची माहिती डॉ. दीपक नामजोशी यांनी दिली आहे.
बॉलिवुड आणि बप्पीदा
वयाच्या चौथ्या वर्षी लता मंगेशकर यांच्या एका गाण्यात तबला वाजवून बप्पीदा प्रसिद्ध झाले होते. 80 च्या दशकात बप्पी लाहिरी यांच्या डिस्कोच्या तालावर संपूर्ण देश थिरकत होता. त्यामुळं त्यांना डिस्को किंग असं म्हटलं जात होतं. बॉलीवूडमध्ये संगीत डिजीटल बनवण्यात बप्पीदा यांचं मोठं योगदान होतं. बप्पी लाहिरी यांनी जवळपास पाच दशकांपेक्षा अधिक काळ संगीत क्षेत्रात काम केलं.
1970 आणि 80च्या दशकातल्या अनेक चित्रपटांना बप्पी लाहिरींनी संगीत दिलं होतं. चलते - चलते, डिस्को डान्सर, शराबी, नमकहलाल या सिनेमांमधली त्यांची गाणी गाजली.

फोटो स्रोत, Bappi Lahiri
शराबी चित्रपटासाठी बप्पी लहरी यांनी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. तसंच त्यांना फिल्मफेअरतर्फे जीवनगौरव पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.
2020 साली आलेल्या बागी 3 सिनेमामधलं 'भंकस' हे त्यांचं शेवटचं गाणं ठरलं.
डिस्को बीट्सवरची उडत्या चालींची गाणी हे बप्पीदांचं वैशिष्ट्य होतं.
डिस्को डान्सर सिनेमातलं 'आय अॅम अ डिस्को डान्सर' थानेदार सिनेमातलं 'तम्मा - तम्मा', द डर्टी पिक्चरमधलं 'ऊलाला ऊलाला', साहेब मधलं 'यार बिना चैन कहाँ रे' ही गाणी गाजली.

फोटो स्रोत, Getty Images
मराठी सिनेमाला संगीत
1990मध्ये बप्पी लाहिरींनी 'डोक्याला ताप नाही' नावाच्या मराठी सिनेमाला संगीत दिलं होतं. तर 2018 साली ते एका मराठी सिनेमासाठी गायले.
बॉलिवुड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत बप्पी लाहिरींनी सांगितलं होतं, "बॉलिवुडमधल्या करियरमध्ये मी इतका बिझी झालो की मला मराठी सिनेमात योगदान देण्याची संधी मिळाली नाही. पण आता संजय जाधव यांच्या लकी अँड आय या सिनेमाद्वारे मी मराठीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण करतोय. आणि यासाठी मी खूप उत्साहात आहे."
"मराठी चित्रपटसृष्टी आणि येथील कलावंत यांच्याशी माझं विशेष नातं आहे. मी 70 च्या दशकात करिअर सुरू केलं. पण मला सुनील दत्त आणि आशा पारेख यांच्या भूमिका असलेल्या राजा ठाकूर यांच्या जख्मी चित्रपटानं नावलौकिक मिळाला. तो राजा ठाकूर यांचा चित्रपट होता आणि ते महाराष्ट्रातील होते. तेव्हापासूनच मला मराठी चित्रपटासाठी काम करण्याची इच्छा होता. पण मला मराठी सिनेमासाठी संगीत द्यायला 1990 उजाडावं लागलं. डोक्याला ताप नाही, या चित्रपटासाठी मी संगीत दिलं होतं," असं बप्पीदांनी चित्रपटाच्या निमित्तानं बोलतानं सांगितलं होतं.

फोटो स्रोत, BBC/ Madhu Pal
राजकारणात प्रवेश
बप्पी लाहिरी यांनी मे 2014 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. देशात नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचं ते त्यावेळी म्हणाले होते. 2004 मध्ये लाहिरी यांनी काँग्रेसचाही प्रचार केला होता. भाजपमध्ये प्रवेश करताना ते म्हटले होते की, 10 वर्षांपूर्वी काँग्रेसची लाट होती. त्यावेळी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह होते. बप्पी लहरी पश्चिम बंगालमध्ये पक्ष मजबूत करतील असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बप्पी लाहिरी यांनी हुगळी जिल्ह्याच्या श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला होता.
बप्पीदांना सोनं का आवडायचं?
बप्पीदांच्या गळ्यामध्ये सोन्याच्या साखळ्या, हातात अंगठ्या असं मोठ्या प्रमाणावर सोनं त्यांनी नेहमी परिधान केलेलं असे. 'सोनं माझ्यासाठी लकी आहे असं मला वाटतं', असं यामागचं कारण सांगताना बप्पीदा म्हणाले होते. बीबीसीबरोबर बोलताना बप्पीदा यांनी सोनं परिधान करण्यामागचं कारण सांगितलं होतं. "सुरुवातीला माझ्या गळ्यात दोन चेन होत्या. त्यानंतर सोनं माझ्यासाठी लकी आहे, असं मला जाणवू लागलं होतं. हिरे मात्र मला लकी नाहीत, सोनं माझ्यासाठी लकी आहे, हे मला माहिती होतं." तसंच बप्पीदांच्या हातात एक कडंही आहे. तेही लकी असल्याचं बप्पीदांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. जख्मी हा पहिला चित्रपट हिट झाला तेव्हा, त्यांच्या आई वडिलांनी सुवर्ण मंदिर इथून घेऊन बप्पीदांना ते कडं घातलं होतं, असं त्यांनी एका शोमध्ये सांगितलं होतं.

फोटो स्रोत, STR
'चलते-चलते..' सर्वात आवडतं गाणं
बप्पी लाहिरी यांची शेकडो गाणी हिट झालेली आहेत. त्यांनी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटांची सिलव्हर ज्युबिली झाली आहे. एवढ्या गाण्यांत बप्पीदांचं सर्वात आवडचं गाणं म्हणजे, 'चलते, चलते मेरे ये गीत याद रखना' हे होतं.एका मुलाखतीमध्ये बप्पीदांनी त्यांच्या सर्व गाण्यांपैकी हे सर्वात आवडतं गाणं असल्याचं सांगितलं होतं. जगभरात कुठंही म्युझिक कॉन्सर्ट किंवा कार्यक्रम झाला तरी त्याचा शेवट याच गाण्याने करत असल्याचं बप्पीदांनी म्हटलं होतं. किशोर कुमार यांना बप्पीदा हे किशोर मामा म्हणायचे. त्याचं कारण म्हणजे किशोर कुमार नात्यानं त्यांचे मामा लागत होते. 'चलते-चलते हे गाणं गाताना किशोर मामांना अश्रू अनावर झाले होते अशी आठवण बप्पी दा यांनी सांगितली होती. त्यामुळं आपल्या जीवनात हे गाणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं बप्पीदा यांनी सांगितलं होतं.
बाळासाहेबांनी करून दिली मायकल जॅक्सनशी ओळख
मायकल जॅक्सन भारतात आला तेव्हा बप्पी लाहिरी यांची त्यांच्याशी भेट झाली होती. त्या भेटीचा किस्साही बप्पी लहरी यांनी अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.

फोटो स्रोत, Getty Images
"मायकल जॅक्सन बाळासाहेब ठाकरेंच्या घरी आला त्यावेळी मी तिथं होतो. बाळासाहेबांनी स्वतः येऊन माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. हे बप्पी लाहिरी आहेत आणि ते संगीतकार आहेत अशी ओळख बाळासाहेंबानी करून दिली." त्यावेळी मायकल जॅक्सनं म्हटलं की, हो मी त्यांचं गाणं ऐकले आहे. डिस्को डान्सरच्या जिमी जिमी गाण्याबाबत मायकल जॅक्सन बोलत होता असं बप्पीदांनी सांगितलं होतं.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








