हिजाब घालणाऱ्या मुलींची संख्या कोकणात वाढतेय का?

हिजाब

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मुश्ताक खान
    • Role, बीबीसी मराठीसाठी, रत्नागिरीहून

महाविद्यालयात हिजाब वापरावा की वापरू नये, यावर सध्या कर्नाटकामध्ये रणकंदन माजलं आहे. त्याचं लोण संपूर्ण देशात पोहोचण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

अलीकडच्या काळात कोकणामध्ये हिजाब किंवा बुरखा वापरणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली आहे. या निमित्तानं गेल्या 25 वर्षांत कोकणातील बदललेल्या परिस्थितीचा आम्ही आढावा घेतला आहे.

हिजाब आणि बुरखा यामध्ये काय फरक आहे, हे समजून घेणं महत्वाचं आहे.

या विषयावर कुराणमध्ये नेमकं काय म्हणटलं गेलं आहे. मुस्लिम समाजातील महिलांची यावर काय प्रतिक्रिया आहे. पुरुषांची भूमिका काय आहे? इस्लामचे अभ्यासक या विषयावर काय म्हणतात हे आम्ही समजून घेतलं आहे.

कोकणामध्ये हिजाब वापरणाऱ्या मुस्लिम महिलाची संख्या लक्षणीय आहे.

हिजाब म्हणजे स्काफसदृश कापड जो डोकं, केस, खांद्यांवरून छातीपर्यंत परिधान केला जातो. हिजाब वापरणे म्हणजे एक प्रकारे पडदा वापरणे होय.

इस्लाममध्ये महिला आणि पुरूषांना सोबर कपडे वापरण्याची ताकीद आहे. या प्रकारामध्ये हिजाब मोडतो.

नकाब आणि बुरखा हा हिजाबपेक्षा वेगळा प्रकार आहे. बुरखा म्हणजे अंगभर वापरला जाणारा ढगळ कापड. त्याच्यासोबतच नकाब असतो. नकाबच्या सहाय्यानं चेहरा डोकं आणि केस झाकले जातात. काही नकाबमध्ये डोळे दिसता, तर काहींमध्ये डोळेही दिसत नाहीत. त्यावर अतिशय पातळ कपडा घेतला जातो.

कुरआनमध्ये काय म्हटलंय?

मुफ्ती हुसैन मुकादम यांच्याशी याविषयावर आम्ही बातचीत केली. त्यांचं असं म्हणणं आहे की, कुराणमध्ये हिजाब, बुरखा, नकाब असे शब्द आढळत नाहीत. कुराणमध्ये खिमार शब्द वापरण्यात आला आहे. त्याचा अर्थ झाकणे असा होतो. महिलांनी आपल्या अंगावर चादरसदृश कापड पांघरावी असं सांगण्यात आलं आहे. महिला आणि पुरूषांनी टाईट कपडे वापरू नये असंही म्हटलं गेलं आहे. कुराणमध्ये चेहरा झाकण्याबाबत उल्लेख नसला तरी हदीसमध्ये चेहरा आणि हात झाकण्याची नोंद आहे.

हिजाब

फोटो स्रोत, Getty Images

पुरूषांकडून महिलांवर बुरख्यासाठी सक्ती केली जाते, हा समज खोटा आहे. कुराणमध्ये पर्दा करण्याबाबत म्हटलं गेलं आहे. महिलांना वाईट नजरांपासून सुरक्षित ठेवण्याच्या हेतू पर्दा हा विषय अभिप्रेत आहे. हिजाब वापरूनही महिलांनी अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती केल्याचं आपण पाहिलं आहे. त्यामुळे पर्दा करणाऱ्या महिलांना धाकात ठेवलं जातं, त्यांना प्रगतीपासून रोखलं जातं हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.

कोणावरही कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती किंवा सक्ती करण्यात येऊ नये, असं कुराणमध्ये सांगितलं गेलं आहे. पण इस्लाममध्ये सांगितलेल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत हे मात्र नक्की. जर एखादी व्यक्ती तसं करत नसेल तर त्याच्यावर जबरदस्ती मात्र करता येऊ शकत नाही. इस्लाममध्ये निवडीला महत्त्व आहे.

कोकणामध्ये बुरखा परिधान करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे, हे ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनाही वाटतं. यासंदर्भात ते म्हणाले, "कोकणाच्या दृष्टीनं तरी मला याबद्दल चिंता वाटत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये देशामध्ये धार्मिक धुव्रीकरण वाढलं आहे. माझं मत स्पष्ट आहे की, मोदी- शहांच्या राजकीय धोरणांवर प्रतिक्रिया म्हणून ही परिस्थिती आली आहे. मात्र आपल्याकडे दोन समाजामधील सलोखा कायम आहे. पेहरावात बदल झाला असला तरी सलोखा कायम आहे. इथल्या दोन्ही बाजूंच्या लोकांच्या वर्तनात तो कडवटपणा दिसत नाही कारण, आर्थिक - सामाजिकदृष्ट्या परस्परपूरक आणि परस्परावलंबी समाज इथे पिढ्यानपिढ्या नांदत आले आहेत".

मुंबई येथील रूईया कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या आणि मूळच्या कोकणातल्या मोहसीना मुकादम यांनी मात्र या विषयावर आपलं परखड मत व्यक्त केलं आहे.

मोहसीना मुकादम म्हणतात की, "प्रत्येकाचा हा वैयक्तिक निर्णय असू द्यावा आणि फक्त मुस्लिम मुली हिजाब घालतात हा मुद्दा नाहीये. पंजाबी मुलीही डोक्यावरून वेगळ्या पद्धतीनं पदर घेतात, ख्रिश्चन धर्मियांमध्येही नन जेव्हा कॉलेजेसमध्ये जातात, तेव्हा त्यांना पेहरावही वेगळा असतो. पण हिजाबला जेवढा विरोध आहे, तेवढा त्यांच्या बाबतीत दिसत नाही. त्यामुळे आता जो मुद्दा आलेला आहे तो राजकीय स्वरूपाचा आहे. एखाद्या समाजाच्या वेशभूषेपेक्षा राजकीय फायदा कसा होईल या दृष्टीने तो विषय वाढवलेला दिसतो.

"जो मुलभूत गणवेश आहे तो असावा, पण एखाद्या समाजाचा काही विशेष पेहराव असेल तर तोही राहू द्यावा. यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर मुलींना शिक्षण मिळणं. पण सध्या आपल्याकडे नॉन इश्यूजचा इश्यू जास्त केला जातो आहे.

हिजाब

फोटो स्रोत, Getty Images

"होय, कोकणामध्ये पूर्वी बुरखा संस्कृती एवढ्या प्रमाणावर दिसत नव्हती. कोकणामध्ये 1993 नंतर बाबरी मशिदीचा विषय आणि मुस्लिम समाजामध्ये निर्माण झालेला आयडेंटीटी क्रायसिसचा (ओळख) जो प्रश्न निर्माण झाला, त्यानंतर हे बुरखा परिधान करण्याऱ्या महिलांची संख्या वाढली. त्याचबरोबर लोक जेव्हा सौदीमध्ये मोठ्या प्रमाणात जाऊ लागली, तेव्हा तिथेही त्यांना आयडेंटीटी क्रायसीसचा सामना करावा लागला. मग तिथे अधिकाधिक इस्लामिक बनण्याचा आणि दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. मग ते सगळं वेशभूषेमध्ये दिसतं.

हिजाब घालण्यासाठी खरंच सक्ती केली जाते का? या प्रश्नवर मोहसीना मुकादम म्हणतात, "नाही नाही खरं सांगायचं तर हिजाब घालणं आता फॅशन पण झाली आहे. ते म्हणतात ना 'तरबुजे तो देखकर खरबुजा भी रंग बदला है' असं झालं आहे सध्या. आमच्या लहानपणी आम्हाला कोणीच सांगितलं नाही की बुरखा घाला किंवा घालू नका. मी तर नाहीच घालत माझ्या आजीने पण बुरखा घालणं सोडून दिलं होतं. कोकणातल्या स्त्रिया या बाबतीत खूपच पुढारलेल्या होत्या. पण आता सगळ्याच धर्मामध्ये धार्मिक आयडेंटीचं उघडपणे प्रदर्शन करण्याची जणून स्पर्धाच लागली आहे.

"बुरखा घालून सुरक्षित वाटतं अशी प्रतिक्रिया एका मुलीची होती. खरं तर सुरक्षित असणं हे बुरखा परिधान करण्यावर नाही तर समाजावर अवलंबून असतं, असं मला वाटतं. समाज किती प्रगल्भ आहे यावर स्त्री आणि पुरूषाची सुरक्षितता ठरते. आपण सगळ्यांना समाज म्हणून त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मुलींना आत्मविश्वास दिला पाहिजे. वेगळ्या प्रकारे मुलांना वाढवलं पाहिजे. आपण मुळ विषयांकडे दुर्लक्ष करतो आहे.

"वाईट एवढंच वाटत की, इथं फक्त मुस्लिम मुलींच्या हिजाबवर आक्षेप घेतला जातो आहे. इथं शीख मुली असत्या तर तुम्ही काय केलं असतं. जर नन मुली शिक्षणासाठी आल्या असल्या तर तुम्ही काय करणार होतात.

"मला वाटतं महाविद्यालयांमध्ये शिक्षणावर फोकस करणं आवश्यक आहे. हिजाबमुळे इतरांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे का तर नाही, मग हा विषय का? सध्या होत असलेल्या निवडणुकांमुळे या विषयाची जास्त चर्चा झालीये असं म्हणायला जागा आहे.

"मुस्लिम समाजानं पण आता जरासा वेगळा विचार केला पाहिजे. या अशा वादामध्ये आपण खेचले जायतोय का? आपल्या समाजाचं आणि आपलं नुसकान करून घ्यायचं का? आता मुस्लिम समाजानं चांगलं शिक्षण घेऊन, चांगल्या नोकऱ्या मिळवून पुढे गेलं पाहिजे. कोणत्याही ट्रॅपमध्ये न अडकता उन्नती साधणं जास्त आवश्यक आहे."

हिजाब घालणं, बुरखा वापरणं हा प्रत्येकाच्या आवडी निवडीचा विषय आहे. बुरखा वापरण्याच्या बाबतीत अनेक घरांमध्ये खुलं वातावरण आहे.

दापोलीच्या माजी नगराध्यक्षा परवीन शेख बुरखा परिधान करत नाहीत. त्यांच्यावर बुरखा घालण्यासाठी कुणी सक्तीही केली नाही. शिवाय त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीवरही तशी जबरदस्ती केली नाही. या विषयावर त्यांनी दोन वाक्यामध्ये उत्तर दिलं, "हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा विषय आहे. प्रत्येकाला तो ठरवण्याचा अधिकार आहे."

हिजाब

फोटो स्रोत, Getty Images

रत्नागिरीतील गृहीणी रूही खान सांगतात की, "हिजाब दूर करून मुस्लिम समाज पुढारेल या गैरसमजातून बाहेर येणं गरजेचं आहे. मुलींना शिक्षणापासून रोखणाऱ्या काही मूठभर लोकांच्या मनामधून खरं तर द्वेषाचा पडदा दूर झाला पाहिजे. हिजाब वापरणाऱ्या आणि न वापरणाऱ्या मुलींच्या गुणवत्तेची मोजमाप करता येऊ शकत नाही हे मात्र खरं."

रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटणकर यांच्याशीही आम्ही या विषयावर बोललो. ते म्हणतात, "हिजाबवर होणारा वाद हा मुर्खपणा आहे. मुर्खपणा यासाठी आहे की, शाळेचा किंवा महाविद्यालयाचा जर गणवेश असेल तर दरवाज्याच्या बाहेर तुम्ही काहीही घालू शकता गेटच्या आत गेल्यावर तुम्हाला गणवेश घातलाच पाहिजे. मी जेव्हा जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो तेव्हा कोकणात महिला बुरखा कमी वापरत. आता शिक्षण वाढलं आहे, म्हणून त्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बुरखा वापरणे किंवा न वापरणे हा विषय फार मोठा नाहीये असं मला वाटतं."

रत्नागिरीतील नवनिर्माण महाविद्यालयाचे संस्थाचालक अभिजीत हेगशेट्ये यांची भूमिकाही आम्ही समजून घेतली.

"आमच्या वरीष्ठ महाविद्यालयामध्ये गणवेश नाही. परंतु कनिष्ठ महाविद्यालयासाठी गणवेश आहे. आमच्या विद्यार्थिनी गणवेशावर हिजाब वापरतात आणि त्याने काहीही अडचण येत नाही. आमचे मुस्लिम शिक्षकही हिजाब वापरतात. या गोष्टीमुळे शिक्षणावर परिणाम झाल्याचं कधी जाणवलं नाही."

धार्मिक प्रतिकं वापरून ओळख प्रस्थापित होऊ नये - मुक्ता दाभोलकर

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या/सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांच्याशीही आम्ही बुरखा या विषयावर बोललो.

त्या म्हणाल्या, "कोणत्याही समाजाच्या व्यक्तींनी धार्मिक प्रतिकं वापरून लोकशाहीमध्ये आपली ओळख प्रस्थापित करू नये, असं मला वैयक्तिकरित्या वाटतं.

पूर्वी पोषाखाबाबत कोकणी मुस्लिमांची परंपरा इतर कोकणी माणसाप्रमाणेच होती. पोषाख हा हवामान, आपण ज्या भागात राहतो, तिथल्या चालीरीती या सगळ्या गोष्टींशी जोडलेला असतो.

अलीकडे कोकणामध्ये धार्मिक पद्धत म्हणून बुरखा वापरण्याचा कल वाढू लागला आहे. पण हिजाब किंवा बुरखा वापरणं ही आपली परंपरा नव्हती, याबाबतचा संवाद मुस्लिम समाजामध्ये सतत चालु राहणं आवश्यक, असं वाटतं. ही एक बाजू झाली.

दुसरी गोष्ट अशी की, माणसांना स्वतःची धार्मिक ओळख जास्त जवळची करावीशी का वाटते याचाही बाकीच्या समाजानं गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे," असं त्या म्हणतात.

दाभोलकर पुढे म्हणतात, "समाजामध्ये वावरताना मुस्लिम व्यक्तीनं आपलं मुस्लिम असणं अधोरेखित करू नये असं जेव्हा एखाद्याला वाटतं, तेव्हा त्या मुस्लिम व्यक्तीला समाजामध्ये वावरताना ती मुस्लिम आहे म्हणून भेदभाव सोसावा लागतो असे अनुभव न येऊ देणं, ही बहुसंख्यांक समाजाची जबाबदारी आहे.

कोणी आपली धार्मिक किंवा जातीय ओळख तीव्र बनवू नये असं जर बहुसंख्यांक समाजाला वाटत असेल तर आपण धर्माच्या किंवा जातीच्या नावावर ओखळले जात आहोत असे अनुभव सामाजिक जीवनात येता कामा नयेत. दोन्ही समाजाची ही संयुक्तिक जबाबदारी आहे असं मला वाटतं."

"मुस्लिम समाजही, 30 /40 वर्षांपूर्वी न वापरला जाणारा हा पोषाख आपण का स्विकारतो आहे याच्या आत्मपरीक्षणाची जबाबदारी टाळू शकत नाही. बहुसंख्यांक समाज सुध्दा आत्मपरिक्षणाची जबाबदारी टाळू शकत नाही. आज मुस्लिमांना हे जास्त आपलंसं करावासं का वाटतं आहे? त्यांचं मुस्लिमपण अधोरेखित होईल असं आपण समाज म्हणून वागत चाललो आहोत का," असं त्या विचारतात.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)