कर्नाटक हिजाब वाद : 'या' 15 देशांमध्ये बुरखा-हिजाबवर बंदी आहे

हिजाब

फोटो स्रोत, Getty Images

कर्नाटक हायकोर्टानं हिजाब हा मुस्लिमांचा मख्य पेहराव नाही, धार्मिक प्रथांप्रमाणे तो आवश्यक नाही असं म्हटलंय. कर्नाटकात सुरू झालेल्या हिजाब दावावर निर्णय देताना कोर्टानं हे मत नोंदवलं आहे.

काहींच्या दृष्टीनं हा घटनात्मक अधिकार आहे तर काहींच्या मते शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक प्रतिकं परिधान करणं हे योग्य नाही.

पण जगातील काही असे देश आहेत ज्याठिकाणी अनेक वर्षांपूर्वीपासूनच सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्याच्या किंवा इस्लामिक हिजाब-बुरखा परिधान करण्यावर बंदी लावली आहे. काही देशांमध्ये तर नियमांचं उल्लंघन झाल्यास मोठ्या प्रमाणावर दंड आकारण्याची तरतूदही केली आहे.

1. फ्रान्स

11 एप्रिल 2011 ला फ्रान्स हा सार्वजनिक ठिकाणांवर पूर्ण चेहरा झाकणाऱ्या इस्लामी बुरख्यावर बंदी लावणारा पहिला देश बनला होता.

या बंदी अंतर्गत कोणतीही महिला मग ती फ्रान्सची असो किंवा परदेशी त्या महिलेला घराबाहेर चेहरा पूर्णपणे झाकून जाता येत नव्हतं. नियमांच्या उल्लंघनावर दंडाची तरतूद करण्यात आली होती.

हिजाब पर रोक

फोटो स्रोत, Getty Images

त्या काळी निकोलस सार्कोझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते. परदा हा महिलांबरोबर होणाऱ्या अत्याचारासारखा प्रकार आहे आणि फ्रान्समध्ये त्याचं स्वागत केलं जाणार नाही, असं बंदी लावणाऱ्या सार्कोझी प्रशासनाचं मत होतं.

त्यानंतर पाच वर्षांनंतर म्हणजे 2016 मध्ये फ्रान्समध्ये एक वादग्रस्त कायदा आणण्यात आला. या वेळी बुर्किनी नावाने प्रसिद्ध असलेल्या महिलांच्या पूर्ण शरीर झाकणाऱ्या स्विम सूटवर बंदी घालण्यात आली. मात्र, नंतर फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयानं हा कायदा रद्द केला.

फ्रान्समध्ये सुमारे 50 लाख मुस्लीम महिला राहतात. पश्चिम युरोपमध्ये ही सर्वाधिक संख्या आहे, मात्र केवळ 2 हजार महिला बुरखा परिधान करतात.

तसं केल्यास 150 युरोचा दंड ठरवण्यात आला आहे. एखाद्यानं महिलेला चेहरा झाकण्यासाठी बळजबरी केली तर त्यावर 30 हजार युरो एवढ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

2. बेल्जियम

बेल्जियममध्येही पूर्ण चेहरा झाकण्यावर जुलै 2011 मध्ये बंदी लावण्यात आली होती. नव्या कायद्यात सार्वजनिक ठिकाणांवर ओळख स्पष्ट होणार नाही, अशा कोणत्याही पोषाखावर बंदी होती .

डिसेंबर 2012 मध्ये बेल्जियमच्या न्यायालयानं ही बंदी रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. यातून मानवाधिकारांचं उल्लंघन होत नसल्याचं कारण त्याला देण्यात आलं होतं.

बेल्जियम हिजाब विवाद

फोटो स्रोत, Getty Images

बेल्जियमचा कायदा युरोपातील मानवाधिकार न्यायालयानं 2017 मध्येही कायम ठेवला आहे.

3. नेदरलँड्स

नोव्हेंबर 2016 मध्ये नेदरलँड्स च्या खासदारांनी शाळा-रुग्णालयांसारख्या सार्वजनिक स्थळं आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत प्रवास करताना संपूर्ण चेहरा झाकणाऱ्या इस्लामिक बुरख्यांवर बंदीला पाठिंबा दर्शवला होता.

मात्र, ही बंदी कायद्यात रुपांतरीत करण्याचं विधेयक संसदेत मंजूर होणं गरजेचं होतं. अखेर जून 2018 मध्ये नेदरलँड्सनं चेहरा झाकण्यावर बंदी लावली.

4. इटली

इटलीच्या काही शहरांमध्ये चेहरा झाकण्यावर बंदी आहे. त्यात नोवारा शहराचाही समावेश आहे. इटलीच्या लोंबार्डी भागात डिसेंबर 2015 मध्ये बुरख्यावर बंदी लावण्यावर एकमत झालं आणि 2016 मध्ये ते लागू झालं होतं. पण पूर्ण देशात हा नियम नाही.

इटली बुर्का कानून

फोटो स्रोत, Getty Images

5. जर्मनी

"देशात ज्याठिकाणी कायद्यानुसार शक्य असेल तिथं बुरख्यावर बंदी लावायला हवी," असं 6 डिसेंबर 2016 ला जर्मनीच्या माजी चान्सलर अँगेला मर्केल यांनी म्हटलं होतं.

मात्र, जर्मनीत अद्याप असा कोणताही कायदा नाही. पण गाडी चालवताना याठिकाणी पूर्ण चेहरा झाकणं बेकायदेशीर आहे.

जर्मनीच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहानं न्यायाधीश, सैनिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अंशतः अशा बंदीला मंजुरी दिली होती. याठिकाणी चेहरा झाकणाऱ्या महिलांसाठी गरज पडल्यास चेहरा दाखवणंही अनिवार्य करण्यात आलं आहे.

6. ऑस्ट्रिया

ऑक्टोबर 2017 मध्ये ऑस्ट्रियामध्ये शाळा आणि न्यायालयांसारख्या सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली.

7. नॉर्वे

नॉर्वेमध्ये जून 2018 मध्ये करण्यात आलेल्या एका कायद्याअंतर्गत शिक्षण संस्थांनी चेहरा झाकणारे कपडे परिधान करण्यावर बंदी घातली आहे.

8. स्पेन

स्पेनमध्ये राष्ट्रीय स्तरावर बंदी लावण्याची कोणतीही योजना नाही. पण 2010 मध्ये येथील बार्सिलोना शहरात नगरपालिका कार्यलयं, बाजार आणि पुस्तकालयं अशा काही सार्वजनिक ठिकाणांवर पूर्ण चेहरा झाकणाऱ्या इस्लामिक बुरख्यांवर बंदीची घोषणा करण्यात आली होती.

बार्सिलोना

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, लीडा शहरात लावलेल्या बंदीला स्पेनच्या सुप्रीम कोर्टानं फेब्रुवारी 2013 मध्ये रद्द केलं होतं. कोर्टानं म्हटलं होतं की, हा प्रकार धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे.

9. ब्रिटन

ब्रिटनमध्ये इस्लामिक पोषाखावर कोणतीही बंदी नाही. पण त्याठिकाणच्या शाळांना त्यांचा ड्रेस कोड ठरवण्यची परवानगी आहे. ऑगस्ट 2016 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात ब्रिटनच्या 57 टक्के जनतेनं युकेमध्ये बुरखा बंदीच्या बाजुनं मत दिलं होतं.

ब्रिटेन हिजाब नियम

फोटो स्रोत, Getty Images

10. आफ्रिका

2015 मध्ये बुरका परिधान केलेल्या अनेक महिलांनी अनेक मोठमोठ्या आत्मघातकी स्फोटांत सहभाग घेतला होता. त्यानंतर चाड, कॅमरूनच्या उत्तर भागातील नीजेरचा काही भाग आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये पूर्ण चेहरा झाकण्यावर बंदी लावण्यात आली.

11. तुर्कस्तान

85 वर्षांपेक्षाही अधिक काळापर्यंत तुर्कस्तान अधिकृतरित्या धर्मनिरपेक्ष देश होता. तुर्कस्तानचे संस्थापक मुस्तफा केमाल अतातुर्क यांनी हिजाब हा मागसलेल्या विचारसरणीचं प्रतिक असल्याचं सांगत तो नाकारला होता.

तुर्की

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तय्यप अर्दोआन यांच्या पत्नी एमीनसुद्धा हिजाब घालतात.

अधिकृत इमारती आणि काही सार्वजनिक ठिकाणांवर हिजाबवर बंदी घालण्यात आली, पण या मुद्द्यावर देशाच्या मुस्लीमबहुल लोकसंख्येची वेगवेगळी मतं पाहायला मिळतात.

पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या पत्नी आणि मुलींसह तुर्कस्तानातील सर्व महिलांपैकी दोन तृतीयांश महिला डोकं झाकणारा पोषाख परिधान करतात.

2008 मध्ये तुर्कस्तानच्या संविधानात बदल करून महाविद्यालयांमध्ये कठोर निर्बंधांमध्ये थोडी सूट देण्यात आली होती. त्यानंतर ढिल्या बांधलेल्या हिजाबला मंजुरी मिळाली. मात्र, मान आणि संपूर्ण चेहरा पूर्ण झाकणाऱ्या बुरख्यांवर बंदी कायम राहिली.

2013 मध्ये तुर्कस्ताननं राष्ट्रीय संस्थांमध्ये महिलांवर हिजाब परिधान करण्यावरची बंदी मागं घेतली. मात्र, न्यायालय, लष्कर आणि पोलीस अशा सेवांसाठी ही बंदी कायम राहिली.

2016 मध्ये तुर्कस्तानात महिला पोलिसांनाही हिजाब परिधान करण्याची परवानगी मिळाली.

12. डेन्मार्क

डेन्मार्कच्या संसदेनं 2018 मध्ये पूर्ण चेहरा झाकणाऱ्यांवर दंडाची तरतूद असलेल्या विधेयकाला मंजुरी दिली. या कायद्यानुसार जर एखादा व्यक्ती दुसऱ्यांदा नियमांचं उल्लंघन करताना आढळला तर त्यावर आधीच्या तुलनेत दहापट अधिक दंड लावला जाईल किंवा सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाईल.

तर एखाद्याला बुरखा परिधान करण्यासाठी बळजबरी केल्यास असं करणाऱ्याला दंड किंवा दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

डेनमार्क

फोटो स्रोत, Reuters

त्याच्या दहावर्षापूर्वी सरकारनं न्यायालयात हेडस्कार्फ आणि त्याप्रकारचे राजकीय प्रतिकं किंवा टोपी, पगडी परिधान करण्याची बंदी असल्याची घोषणा केली होती.

13. रशिया

रशियाच्या स्वातारोपोल परिसरात हिजाब परिधान करण्यावर बंदी आहे. रशियामध्ये अशाप्रकारची ही पहिलीच बंदी आहे. जुलै 2013 मध्ये रशियाच्या सुप्रीम कोर्टानं हा निर्णय कायम ठेवला होता.

14. स्वित्झरलँड

2009 मध्ये स्वित्झरलँडचे न्यायमंत्री राहिलेले विडमर म्हणाले होते की, जर बहुतांश महिलांनी नकाब परिधान केल्याचं आढळून आलं तर त्यावर बंदीबाबत विचार करायला हवा.

रूस

फोटो स्रोत, Getty Images

सप्टेंबर 2013 मध्ये स्वित्झरलँडच्या तिसिनोमध्ये 65 टक्के लोकांनी कोणत्याही समुदायातर्फे सार्वजनिक स्थळांवर चेहरा झाकण्यावर बंदीच्या बाजुनं मतदान केलं होतं. हा परिसर इटालियन भाषकांचा आहे.

स्वित्झरलँडच्या 26 प्रांतांपैकी एखाद्या ठिकाणी अशाप्रकारे बंदी लावण्याचा हा पहिलाच प्रकार होता.

स्वित्झरलँडच्या 80 लाखांच्या लोकसंख्येपैकी सुमारे 3 लाख 50 हजार मुस्लीम आहेत.

15. बल्गेरिया

ऑक्टोबर 2016 मध्ये बल्गेरियाच्या संसदेनं एक विधेयक मंजूर केलं होतं. त्यानुसार ज्या महिला सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकतात त्यांच्यावर दंड लावला जावा किंवा त्यांना मिळणाऱ्या सुविधा कमी करायला हव्यात.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)