U19 World Cup: हृषिकेश कानिटकर आणि साईराज बहुतुलेंनी घडवले 'अंडर-19' चे विश्वविजेते

U19 वर्ल्डकप, हृषिकेश कानिटकर, साईराज बहुतुले

फोटो स्रोत, Matthew Lewis-ICC

फोटो कॅप्शन, हृषिकेश कानिटकर कर्णधार यश धूल आणि वर्ल्डकप ट्रॉफीसह

भारताने इंग्लंडला नमवत U19 वर्ल्डकपच्या जेतेपदावर कब्जा केला. भारताचं या स्पर्धेचं हे पाचवं जेतेपद आहे.

जेतेपदाच्या वाटचालीत खेळाडूंच्या मेहनतीच्या बरोबरीने प्रशिक्षकांचं योगदानही मोलाचं आहे. हृषिकेश कानिटकर आणि साईराज बहुतुले या दोन मराठमोळ्या प्रशिक्षकांकडे संघाची जबाबदारी होती.

स्पर्धेदरम्यान भारतीय संघातले 6 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी 11 फिट खेळाडू उपलब्ध होतील ना याविषयी साशंकता होती. युगांडाविरुद्धही हीच समस्या होती. या काळात संघाचं मनोधैर्य खच्ची होऊ न देता उपलब्ध खेळाडूंना हाताशी घेऊन रणनीती आखणं कठीण होतं. कानिटकर-बहुतुले जोडीने संघ मानसिकदृष्ट्या कणखर असेल याची सर्वतोपरी काळजी घेतली.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा करणारे कानिटकर

हृषिकेश यांचं नाव क्रिकेटरसिकांना नवीन नाही. 1998 साली ढाका इथे रंगलेल्या इंडिपेंडन्स कपच्या फायलनमध्ये कानिटकर यांनी अनुभवी फिरकीपटू साकलेन मुश्ताकला चौकार खेचत भारतीय संघाला थरारक विजय मिळवून दिला होता. त्या काळात 300 धावांचा पाठलाग करणं खूपच दुर्मीळ होतं.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 314धावांचा डोंगर उभारला. सईद अन्वरने 140 तर इजाज अहमदने 117 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना सौरव गांगुलीने 124 तर रॉबिन सिंगने 82 धावांची खेळीकेली होती. हे दोघे बाद झाल्यानंतर भारतीय संघाची घसरगुंडी उडाली. कानिटकर यांनी नाबाद 11 धावांची खेळी करत भारतीय संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

डावखुरे फलंदाज, फिरकीपटू आणि दर्जेदार क्षेत्ररक्षक असलेल्या कानिटकर यांनी 2 टेस्ट, 34 वनडेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 10,000 पेक्षा जास्त धावा कानिटकर यांच्या नावावर आहेत. 33 शतकं आणि 46 अर्धशतकं कानिटकर यांनी झळकावली आहेत.

कानिटकर यांनी प्रदीर्घ काळ महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यानंतर मध्य प्रदेश आणि राजस्थानतर्फेही खेळले. 2010-11 हंगामात कानिटकर यांच्या नेतृत्वात राजस्थानने रणजी ट्रॉफी करंडकावर कब्जा केला. इंग्लंडमध्ये इसेक्स काऊंटीतील ब्रेंटवूड क्रिकेट क्लबसाठी खेळण्याचा अनुभव कानिटकर यांच्याकडे आहे.

U19 वर्ल्डकप, हृषिकेश कानिटकर, साईराज बहुतुले

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, हृषिकेश कानिटकर (मध्यभागी) झहीर खान आणि अजित आगरकर यांच्याबरोबर

कानिटकर यांनी गोवा संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं आहे. 2016 ते 2019 या कालावधीत कानिटकर यांनी तामिळनाडू संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं. तामिळनाडू संघाच्या कामगिरीत अमूलाग्र बदल घडवून आणण्याचं श्रेय कानिटकर यांना जातं.

राहुल द्रविड नॅशनल क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी असताना हृषिकेश त्यांच्या टीममध्ये बॅटिंग कोच म्हणून कार्यरत होते. 2020 U19 वर्ल्डकपवेळी कानिटकर भारतीय संघाचे बॅटिंग कोच होते. कानिटकर यांच्या अनुभवाचा फायदा युवा भारतीय खेळाडूंना झाला आहे.

हृषिकश यांचे वडील हेमंत कानिटकर यांनी 2 टेस्टमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

जादुई फिरकीने फलंदाजांना जाळ्यात अडकावणारे साईराज बहुतुले

2000च्या दशकात आपल्या जादुई फिरकीने भल्याभल्या फलंदाजांना जाळ्यात अडकावणारे साईराज बहुतुले भारतीय संघाचे बॉलिंग कोच आहेत. साईराज यांना भारतासाठी 2 टेस्ट आणि 8 वनडेत खेळण्याची संधी मिळाली पण डोमेस्टिक क्रिकेटमधला त्यांचा अनुभव दांडगा आहे.

U19 वर्ल्डकप, हृषिकेश कानिटकर, साईराज बहुतुले

फोटो स्रोत, ROB ELLIOTT

फोटो कॅप्शन, साईराज बहुतुले

188 सामन्यांमध्ये त्यांनी तब्बल 630 विकेट्स घेतल्या आहेत. डावात 5 विकेट्स घेण्याची किमया त्यांनी 27 वेळा तर सामन्यात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम 4 वेळा केला आहे. विकेट्सच्या बरोबरीने साईराज यांनी 6176 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. मुंबईला रणजी करंडक स्पर्धेचं जेतेपद मिळवून देण्यात साईराज यांची मोलाची भूमिका आहे.

इंग्लंडमध्ये सरे काऊंटीत पाच हंगाम क्रिकेट खेळण्याचा अनुभव साईराज यांच्याकडे आहे. निवृत्तीनंतर साईराज यांनी केरळ तसंच बंगाल संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं आहे. आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे स्पिन बॉलिंग कोच म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

या दोघांच्या बरोबरीने मुनीश बाली यांनी फिल्डिंग कोच या नात्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आधुनिक क्रिकेटमध्ये फिल्डिंगचं महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. जेवढ्या धावा वाचवू त्या तसंच कॅच, रनआऊट विजयात निर्णायक ठरू शकतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)