U19 World Cup: युवराज सिंग ते शुबमन गिल, U19 ते टीम इंडियाचे शिलेदार

आयसीसी ट्वेन्टी20 वर्ल्डकप, युवराज सिंग, शिखर धवन, विराट कोहली,

फोटो स्रोत, Simon Hofmann

फोटो कॅप्शन, युवराज सिंग

U19 वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंनी वरिष्ठ संघात आगेकूच केल्याची उदाहरणं खूप आहेत. भारतीय युवा संघ ते भारतीय राष्ट्रीय संघ हे संक्रमण यशस्वीरीत्या करणाऱ्या खेळाडूंचा घेतलेला आढावा.

य़ुवराज सिंग (2000)- मॅन ऑफ द टूर्नामेंट (203 धावा आणि 12 विकेट्स)

डावखुरा आक्रमक शैलीदार फलंदाज, उपयुक्त फिरकीपटू आणि अफलातून क्षेत्ररक्षक असलेल्या युवराज सिंगने U19 वर्ल्डकपच्या माध्यमातून क्रिकेटजगताला दखल घेण्यास भाग पाडलं.

भारताने 2000 मध्ये पहिल्यांदा U19 वर्ल्डकप जिंकला. या स्पर्धेत युवराज सिंगला 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' पुरस्काराने गौरवण्यात आलं. अल्पावधीतच युवराज सिंगने भारताच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केलं. भारताच्या वनडे संघाचा तो आधारस्तंभ झाला.

2007 मध्ये पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 स्पर्धेत युवराजने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर 6 चेंडूत 6 षटकार लगावण्याचा विश्वविक्रम केला. क्रिकेटविश्वात अतिशय दुर्मिळ असा हा विक्रम युवराजच्या नावावर आहे. 2011 वर्ल्डकप स्पर्धेत 362 धावा आणि 15 विकेट्स या अष्टपैलू कामगिरीसाठी युवराजला 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

वर्ल्डकपनंतर काही महिन्यात युवराजला कॅन्सर असल्याचं निदान झालं. युवराजने हार मानली नाही. युवराजने कॅन्सरशी लढत त्यावर मात केली. युवराजने आजारातून पूर्ण बरं झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसंच आयपीएलमध्ये पुनरागमन केलं.

आयपीएलमध्ये तब्बल 16 कोटींची बोली युवराजसाठी लागली होती. सातत्यपूर्ण प्रदर्शनासाठी युवराजला अर्जुन आणि पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. युवराजने 40 टेस्ट, 304 वनडे आणि 58 ट्वेन्टी20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं.

मोहम्मद कैफ- 2000 मध्ये U19 वर्ल्डकप संघाचा कर्णधार

भारताने पहिलावहिला U19 वर्ल्डकप मोहम्मद कैफच्याच नेतृत्वात जिंकला होता. हाणामारीच्या षटकांमध्ये फटकेबाजी, एकेरी-दुहेरी आणि मोठ्या फटकांचा सुरेख मिलाफ, जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि संघासाठी पडेल ती जबाबदारी उचलण्याची तयारी हे कैफच्या कारकीर्दीचं वैशिष्ट्य.

2003 नॅटवेस्ट ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये कैफने साकारलेली खेळी आजही क्रिकेटरसिकांच्या स्मरणात आहे. कैफ-युवराज या जोडीने भारताला असंख्य सामने जिंकून दिले. उत्तम क्षेत्ररक्षणाद्वारेही मॅच जिंकून देण्यात योगदान देता येतं याचा प्रत्यय कैफने घडवला.

13 टेस्ट, 125 वनडेत कैफने भारताचं प्रतिनिधित्व केलं. निवृत्तीनंतर कैफने आयपीएल स्पर्धेत गुजरात लायन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांसाठी सहयोगी प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे.

शिखर धवन (2004) मॅन ऑफ द टूर्नामेंट 505 धावा, 3 शतकं-1 अर्धशतक

गब्बर नाव आणि कॅच पकडल्यानंतर अनोख्या सेलिब्रेशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने 2004 U19 स्पर्धेत कर्तृत्वाची झलक सादर केली. आयसीसी स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा करणारा फलंदाज अशी शिखरची ओळख आहे.

टेस्ट पदार्पणात वेगवान शतकाचा विक्रम शिखरच्या नावावर आहे. 100व्या वनडेत शतक झळकावणारा शिखर पहिला भारतीय फलंदाज आहे.

आयसीसी ट्वेन्टी20 वर्ल्डकप, युवराज सिंग, शिखर धवन, विराट कोहली,

फोटो स्रोत, FARJANA K. GODHULY

फोटो कॅप्शन, शिखर धवन

टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी20 अशा तिन्ही प्रकारात सलामीवीराची कठीण भूमिका शिखर सांभाळतो. आयपीएल स्पर्धेत दिल्ली, मुंबई, हैदराबाद अशा तीन संघांचं प्रतिनिधित्व करताना शिखरने धावांची टांकसाळ उघडली आहे.

आयपीएल 2020 हंगामात शिखरने सलग दोन सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला.

विराट कोहली-2008 वर्ल्डकप विजेता कर्णधार

आधुनिक क्रिकेटच्या दिग्गजांमध्ये गणना होणाऱ्या विराट कोहलीने भारताला U19 विश्वविजेतेपद जिंकून देत गुणकौशल्याची चुणूक दाखवली होती. टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी20 तसंच आयपीएल अशा सगळ्या आघाड्यांवर विराट कोहलीने आपल्या बॅटने अधिराज्य गाजवलं.

आयसीसी ट्वेन्टी20 वर्ल्डकप, युवराज सिंग, शिखर धवन, विराट कोहली,

फोटो स्रोत, Stanley Chou

फोटो कॅप्शन, 2008 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने U19 विश्वविजेतेपदावर कब्जा केला होता.

2010 ते 2020 या दशकभरात कोहलीच्या बॅटचा तडाखा जगभरातल्या गोलंदाजांनी झेलला. धावांचे अगणित विक्रम विराटच्या नावावर आहे. कारकीर्दीत योग्य वेळी फिटनेसचं महत्त्व ओळखणाऱ्या विराटच्या कामगिरीतील सातत्य अद्भुत सदरात मोडणारं आहे.

फलंदाजीच्या बरोबरीने भारतीय संघाचं कर्णधारपदही कोहलीने प्रदीर्घ काळ सांभाळलं. भारताला विदेशात टेस्ट सीरिज जिंकून देण्यात कोहलीच्या नेतृत्वगुणांचा मोठा वाटा आहे. आयपीएल स्पर्धेत कोहली, सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

99 टेस्टमध्ये 50.39च्या सरासरीने 7962 धावा, 257 वनडेत 58.78च्या सरासरीने 12285 धावा आणि 95 ट्वेन्टी20 सामन्यांमध्ये 3327 धावा हे आकडे पुरेसे बोलके आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर 70 शतकं आणि 121 अर्धशतकं आहेत.

पुजारा (2006) मॅन ऑफ द टूर्नामेंट- 349 धावा, 1 शतकं-2 अर्धशतक

अभेद्य बचावासह तंत्रकौशल्य हा राहुल द्रविडचा वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने U19 स्पर्धेतूनच आपल्या नैपुण्याची झलक सादर केली होती.

आयसीसी ट्वेन्टी20 वर्ल्डकप, युवराज सिंग, शिखर धवन, विराट कोहली,

फोटो स्रोत, Gareth Copley

फोटो कॅप्शन, चेतेश्वर पुजारा

ऑस्ट्रेलियात भारताला टेस्ट सीरिज जिंकून देण्यात पुजाराचा वाटा सिंहाचा आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत पुजाराने त्यांना जेरीस आणलं. प्रदीर्घ काळ खेळपट्टीवर ठाण मांडून धावांची फॅक्टरी उघडणं हे पुजाराचं वैशिष्ट्य.

टेस्ट मॅचच्या सर्व दिवशी फलंदाजी करण्याचा अनोखा विक्रम पुजाराच्या नावावर आहे. 95 कसोटीत 43.88च्या सरासरीने 6713 धावा पुजाराच्या नावावर आहेत. फलंदाजीच्या बरोबरीने स्लिपमध्ये तसंच क्लोज इन फिल्डर म्हणून झेल टिपण्यात पुजारा वाकबगार आहे.

या खेळाडूंच्या बरोबरीने रवींद्र जडेजा, पीयुष चावला, रोहित शर्मा, के.एल. राहुल, हनुमा विहारी, रीतिंदर सोधी, हनुमा विहारी, पार्थिव पटेल, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, मयांक अगरवाल, हर्षल पटेल, संदीप शर्मा, कुलदीप यादव या खेळाडूंनी U19 वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी केली. काही वर्षात यापैकी बहुतेकजण भारताच्या राष्ट्रीय संघाचा अविभाज्य भाग झाले.

शुमन गिल (2018) मॅन ऑफ द टूर्नामेंट- 418 विकेट्स, 104.50, 2 शतकं, 2 अर्धशतकं

नेत्रसुखद अशा फलंदाजीसाठी प्रसिद्ध शुबमन गिलने 2018 U19 स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. 19व्या वर्षी शुबमनने भारत अ संघाकडून खेळताना द्विशतकी खेळी केली.

आयसीसी ट्वेन्टी20 वर्ल्डकप, युवराज सिंग, शिखर धवन, विराट कोहली,

फोटो स्रोत, Kai Schwoerer-ICC

फोटो कॅप्शन, पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पंजाबसाठी रनमशीन ठरलेल्या शुबमन गिलने छोट्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 10 टेस्ट आणि 3 वनडेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएल स्पर्धेत शुबमनने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी चांगला खेळ केला. आयपीएलच्या 15व्या हंगामापूर्वी अहमदाबाद संघाने शुबमनला .. कोटी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं.

पृथ्वी शॉ (2018)- वर्ल्डकपविजयी संघाचा कर्णधार

पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वात भारताने 2018 मध्ये U19 वर्ल्डकप जिंकला होता. पृथ्वी शॉने कसोटी पदार्पण, मुंबईसाठी पदार्पण तसंच दुलीप ट्रॉफी पदार्पणात शतकाचा अनोखा विक्रम केला आहे.

मुंबईतल्या हॅरिस शिल्ड स्पर्धेत 546 धावांची विक्रमी मॅरेथॉन खेळी करत पृथ्वीने जगभरातल्या क्रिकेटरसिकांना दखल घ्यायला भाग पाडलं होतं.

आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने पृथ्वीवर विश्वास ठेवत त्याला संघात कायम केलं आहे.

याव्यतिरिक्त U19 वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करणारे काही खेळाडू भारतीय संघाच्या उंबरठ्यावर आहेत.

अवेश खान (2016) 12 विकेट्स

काही दिवसात सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी अवेश खानला भारतीय संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशसाठी खेळताना अवेशने आपल्या गुणकौशल्यांची झलक सादर केली आहे.

आयसीसी ट्वेन्टी20 वर्ल्डकप, युवराज सिंग, शिखर धवन, विराट कोहली,

फोटो स्रोत, Pal Pillai

फोटो कॅप्शन, अवेश खान

उत्तम वेगासह अचूक टप्प्यावर गोलंदाजी ही अवेशच्या गोलंदाजीतली खास गोष्ट. 2021 आयपीएल हंगामात अवेशने दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळताना सर्वाधिक विकेट्स मिळवल्या होत्या.

यशस्वी जैस्वाल (2020) 400 रन्स, 133.33, 1 शतकं, 4 अर्धशतकं

प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत क्रिकेटची आवड जोपासणाऱ्या यशस्वीने अल्पावधीतच नाव कमावलं आहे.

आयसीसी ट्वेन्टी20 वर्ल्डकप, युवराज सिंग, शिखर धवन, विराट कोहली,

फोटो स्रोत, Jan Kruger-ICC

फोटो कॅप्शन, यशस्वी जैस्वाल

2015 मध्ये मुंबईत जाईल्स स्पर्धेत यशस्वीने 319 धावांची मॅरेथॉन खेळी करत क्रिकेटजगताला दखल घ्यायला भाग पाडलं. राजस्थान रॉयल्सने यशस्वीला 4 कोटी रुपये देऊन संघात रिटेन केलं आहे.

रवी बिश्नोई (2020)- 17 विकेट्स

शेवटच्या म्हणजे 2020 U19 वर्ल्डकप स्पर्धेत रवी बिश्नोईच्या फिरकीसमोर प्रतिस्पर्धी फलंदाजांची तारांबळ उडाली. स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान रवीने पटकावला.

आयसीसी ट्वेन्टी20 वर्ल्डकप, युवराज सिंग, शिखर धवन, विराट कोहली,

फोटो स्रोत, Matthew Lewis-ICC

फोटो कॅप्शन, फिरकीपटू रवी बिश्नोई

आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबने रवीला संघात समाविष्ट केलं. मोठ्या खेळाडूंना फिरकीच्या जाळ्यात फसवत रवीने उपयुक्तता सिद्ध केली. आयपीएलच्या 15व्या हंगामापूर्वी लखनौ संघाने बिश्नोईसाठी 4 कोटी रुपये खर्च करत त्याला ताफ्यात समाविष्ट केलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)