Under-19 World Cup : कोव्हिडची साथ आणि परिस्थितीशी संघर्ष करत युवा भारतीय शिलेदार यशाच्या मार्गावर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद व पृथ्वी शॉ यांना अनुसरत यश धुल व त्याच्या नेतृत्वाखालील संघालाही 'अंडर-19' विश्वचषकावर नाव कोरण्याची संधी मिळाली आहे.
शनिवारी अँटिग्वामधील सर व्हिव्हिअन रिचर्ड्स स्टेडियमवर अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना होणार असून भारतीय संघ इंग्लंडच्या संघाला सामोरा जाणार आहे.
आत्तापर्यंत अंडर-19 भारतीय संघाने चार वेळा (2000, 2008, 2012, 2018) विश्वविजेतेपद मिळवलं आहे, आणि शनिवारचा सामना हा त्यांचा विश्वचषक स्पर्धांमधील सलग चौथा अंतिम सामना असणार आहे. भारतीय संघातील खेळाडूंनी या स्पर्धेत उत्तुंग वैयक्तिक कामगिरी केलीच, शिवाय त्यांनी उत्कृष्ट सांघिकतेचंही प्रदर्शन केलं.
अंतिम सामन्यापर्यंत मजल मारताना भारतीय संघाने कोव्हिडच्या आव्हानावरही मात केली. भारतीय संघाचा पहिला सामना गयानामध्ये झाला. त्यानंतर आयर्लंडविरोधातील सामन्यासाठी ते त्रिनिदादला गेले. या प्रवासादरम्यान कर्णधार यश धुल याच्यासह भारतीय संघातील सहा खेळाडूंना कोरोना विषाणूची लागण झाली. नियमांनुसार त्यांचं विलगीकरण करण्यात आलं.
या विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने सर्व संघांना 17 खेळाडू सोबत न्यायची परवानगी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय संघातील सहा खेळाडू कोरोना संसर्गामुळे बाहेर पडल्यामुळे उर्वरित 11 खेळाडूंना आयर्लंडविरोधातील सामन्यासाठी मैदानात उतरणं भाग होतं. परिस्थिती नाजूक होती. वैद्यकीय चमू सतत संघातील खेळाडूंच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून होता. नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे संचालक व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर व साईराज बहुतुले यांनी परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली.
या आव्हानाला त्यांनी सकारात्मकतेने प्रतिसाद दिला आणि आयर्लंडविरोधात जोरदार विजय मिळवून दाखवला. कोव्हिड संसर्गाचा मनस्थितीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते. शिवाय, आजारी नसलेल्यांवरचा दबावही अशा स्थितीत वाढतो.
युगांडाविरोधातील सामन्यातही भारतीय संघाला सर्वोत्तम अकरा खेळाडू निवडीसाठी उपलब्ध नव्हते. तरीसुद्धा संघाने उत्तम कामगिरी केली. दरम्यान, एका आठवड्याची विश्रांती मिळाल्यामुळे परिस्थिती पूर्ववत झाली, पण कोव्हिडचा प्रादुर्भाव संघाची मानसिक कसोटी पाहणारा होता.
या अंडर-19 भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार, पश्चिम दिल्लीतून आलेला यश धुल विराट कोहलीची आठवण करून देतो. विराटच्या नेतृत्वाखालील अंडर-19 संघाने भारताला विश्वचषक मिळवून दिला होता, त्याचीही आठवण या निमित्ताने होणं अनिवार्य आहे. कोरोनासंसर्गातून परतल्यावर यशने उपांत्य सामन्यात शतक फटकावलं. त्याचे अंगभूत नेतृत्वगुण भारतीय संघाच्या प्रवासामध्ये अधिक उजळून निघाले.

फोटो स्रोत, Getty Images
संघाचा उप-कर्णधार शैक रशीद याचं शतक होता होता राहिलं. मूळचा गुंटूरचा असणारा शैद क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी 50 किलोमीटर दूर असलेल्या मंगलगिरीपर्यंत ट्रेनचा प्रवास करून जातो. त्याची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी त्याचे वडील व प्रशिक्षक यांनी त्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं आहे. मध्य फळीत फलंदाजीसाठी येणाऱ्या रशीदला आधी कोव्हिडची गंभीर लक्षणं दिसली होती, पण त्यावर मात करत तो पुन्हा मैदानावर आला आणि त्याने उपांत्य सामन्यात अत्यंत महत्त्वाची 94 धावांची खेळी केली.
अंगकृष रघुवंशी याचीही कहाणी अशीच रोचक आहे. दिल्लीत जन्मलेला अंगकृश आता मुंबईत अभिषेक नायर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवतो. अंगकृशचे वडील भारतासाठी टेनिस खेळले आहेत, तर त्याची आई देशाच्या बास्केटबॉल संघाची सदस्य राहिली आहे. रघुवंशीचे काका साहिल कुकरेजा यांनी त्याला नायर यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवलं. आता मुंबई हेच अंगकृशचं घर झालं आहे. दिल्लीतील घरापासून दूर हाण्याचा निर्णय सोपा नव्हता, पण या निर्णयाचा सकारात्मक परिणाम आता अंगकृशच्या खेळावर दिसू लागला आहे.
बांग्लादेशाविरोधातील सामन्यात मिळालेल्या विजयामध्ये रवी कुमारची कामगिरी मोलाची ठरली. त्याचे वडील सीआरपीएफमध्ये काम करतात. रवी कुमारचं कुटुंब उत्तर प्रदेशातील आहे. त्याला संधींच्या शोधात पश्चिम बंगालला जावं लागलं. या प्रवासात वडिलांनी दाखवलेला विश्वास रवीने सार्थ करून दाखवला. या भारतीय संघातील आणखी एक महत्त्वाचा खेळाडू, आराध्य यादव याचे वडील दिल्ली पोलिसात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
चिक्की, घाटमाथे, थंड हवामान, इत्यादींसाठी ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यातून प्रवास सुरू केलेला विकी ओत्सवाल मुंबईला गेला, पण तिथे क्रिकेट खेळत असताना तो मुंबई क्रिकेटच्या कार्यक्षेत्रात येत नाही या कारणावरून त्याला मज्जाव करण्यात आला होता. मग तो पुण्याला गेला. लोणावळा ते पुणे हा प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबाने पुण्यात स्थायिक व्हावं, असा सल्ला विकीच्या प्रशिक्षकांनी दिला. मुलाच्या भवितव्यासाठी त्याच्या आईवडिलांनी हे पाऊल उचललं. आता विकीचा खेळ बघून त्यांना स्वतःच्या निर्णयाचं समाधन वाटत असेल.
विलक्षण वेगवान गोलंदाची आणि तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखला जाणारा राजवर्धन हंगारगेकर मराठवाड्यातील तुळजापूरचा आहे. प्रशिक्षक तेजस मतापूरकर यांनी राजवर्धनचे गुण हेरले आणि त्याचं शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. तेजस यांच्या प्रयत्नातून राजवर्धनला प्रशिक्षक मिळाले. फलंदाजी करू शकणारा वेगवान गोलंदाज हा भारतीय संघाच्या दृष्टीने खराखुरा बोनस आहे. आता आयपीएल स्पर्धेसाठीचा लिलावर आठवड्याभराने होणार आहे, त्यात राजवर्धनला आपल्या संघात घेण्यासाठी अनेकांची चढाओढ असणार आहे.
युवराज सिंगला आदर्श मनणारा राज बावा याच्या कुटुंबातच खेळाची प्रेरणा आहे. त्याचे आजोबा तार्लोचन बावा हे 1948 च्या ऑलम्पिक स्पर्धेत पदक जिंकलेल्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य होते. डावखुरा फलंदाज असणारा राज गोलंदाजी मात्र उजव्या हाताने करतो.

फोटो स्रोत, Getty Images
अंडर-19 भारतीय संघातील प्रत्येकच खेळाडूची काहीएक कहाणी आहे. त्यांनी विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ महत्त्वाचा होताच आणि संभाव्य विश्वविजेता म्हणूनही या संघाकडे पाहिलं जात आहे.
अंडर-19 विश्वचषक आता क्रिकेटपटूंसाठी एक मैलाचा दगड ठरतो, कारण या पातळीवर चांगला खेळ करणाऱ्यांना मुख्य भारतीय संघात खेळायची संधी मिळते. असा प्रवास करून भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलेल्यांमध्ये मोहम्मद कैफ, युवराज सिंग, शिखर धवन, विराट कोहली, रविंद्र जडेजा, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, अशा अनेकांचा समावेश होतो. बीसीसीआयने या संघाला उत्तम पाठबळ दिलं आहे. या प्रवासात बंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकॅडमीची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची राहिली आहे.
पुढील आठवड्यात आयपीएलसाठीचा लिलाव होणार आहे, त्यामुळे या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीने काहींचं भाग्य पालटू शकतं. कोरोनामुळे दोन वर्षं रणजी ट्रॉफीसाठीची स्पर्धा झालेली नाही, पण आता लवकरच ही स्पर्धाही होणआर आहे. या चार दिवसीय सामन्यांच्या पद्धतीमध्ये स्वतःच्या खेळाची कसोटी पाहण्याची संधी अंडर-19 संघातील खेळाडूंना मिळणार आहे.
अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास
- ऑस्ट्रेलियाविरुद्धचा उपांत्य सामना- 96 धावांनी विजय
- सुपर लींग उप-उपांत्य सामन्यात बांग्लादेशविरोधात- 5 गडी राखून विजय
- युगांडाविरोधात प्राथमिक फेरीत- 326 धावांनी विजय
- आयर्लंडविरोधात प्राथमिक फेरीत- 174 धावांनी विजय
- दक्षिण आफ्रिकेविरोधात प्राथमिक फेरीत 45 धावांनी विजय
'मालिकावीर'
- 2000 - युवराज सिंग
- 2004 - शिखर धवन
- 2006 - चेतेश्वर पुजारा
- 2018 - शुभमन गिल
- 2020 - यशस्वी जैसवाल
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








