U19 World Cup: भारत विश्वविजेता; पाचव्यांदा जेतेपदावर कब्जा, राज बावा-रवी कुमार चमकले

यश धूल

फोटो स्रोत, Getty Images

राज बावा आणि रवी कुमार या वेगवान गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडला नमवत U19 वर्ल्डकपच्या जेतेपदार नाव कोरलं.

इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी या निर्णयाचा फायदा उठवत अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. इंग्लंडचा डाव 189 धावात आटोपला. भारतीय संघाने विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठत जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.

भारताने याधी 2000, 2008, 2012, 2018 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. यश धूलच्या संघाने मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद, पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्वाखालील संघांनी केलेल्या कामगिरीवर कळस चढवला.

फायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. राज बावा आणि रवी कुमार यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडने सपशेल शरणागती पत्करली. स्पर्धेत फॉर्मात असलेला इंग्लंडचा कर्णधार टॉम प्रेस्ट भोपळाही फोडू शकला नाही. राजच्या उसळत्या चेंडूंनी इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकलं. इंग्लंडची अवस्था 4 बाद 47 आणि नंतर 6 बाद 61 अशी झाली. पण जेम्स रु याने एका बाजूने सहकारी माघारी परतत असतानाही खेळपट्टीवर ठाण मांडत सुरेख खेळी साकारली.

राज बावा, U19 वर्ल्डकप, भारत, इंग्लंड

फोटो स्रोत, Michael Steele-ICC

फोटो कॅप्शन, भारतीय संघ जेतेपदासह

जेम्सने 12 चौकारांसह 116 चेंडूत 95 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. जेम्सच्या खेळीमुळेच इंग्लंडच्या संघ सन्मानजनक धावसंख्या उभारू शकला. जेम्सने अॅलेक्स हॉर्टनसह सातव्या विकेटसाठी 30 धावांची तर जेम्स सेल्सह आठव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली.

जेम्स रू बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना मोठा प्रतिकार करता आला नाही आणि त्यांचा डाव 189 धावांतच आटोपला. भारतातर्फे राज बावाने 31 धावांत 5 विकेट्स पटकावण्याची किमया केली. रवी कुमारने 34 धावांत 4 विकेट्स घेत राजला तोलामोलाची साथ दिली. या दोघांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली.

U19 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पाच विकेट्स घेण्याची किमया करणारा राज बावा केवळ दुसरा गोलंदाज ठरला.

आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अंगक्रिश रघुवंशीला पहिल्या ओव्हरमध्येच गमावलं. हरनूर सिंग आणि शाईक रशीद यांनी दुसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. हरनून बाद झाल्यानंतर शाईक आणि कर्णधार यश धूल यांनी 46 धावांची भागीदारी रचली. 50 धावांची खेळी करून शाईक बाद झाला. पाठोपाठ कर्णधार यशही तंबूत परतल्याने भारतीय संघाच्या चिंता वाढल्या.

राज बावा, U19 वर्ल्डकप, भारत, इंग्लंड

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, राज बावा

पण निशांत सिंधू आणि राज बावा यांनी संयमी खेळी करत भारताला दिमाखदार विजय मिळवून दिला. राज बावाने 35 तर निशांतने नाबाद 50 धावांची खेळी केली.

5 विकेट्स आणि 35 धावा करणाऱ्या राज बावाला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रूव्हिसला मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

जेतेपदापर्यंतची वाटचाल

  • वि. दक्षिण आफ्रिका- 45 धावांनी विजयी
  • वि. आयर्लंड- 174 धावांनी विजयी
  • वि. युगांडा- 326 धावांनी विजयी
  • वि. बांगलादेश- 5 धावांनी विजयी
  • वि. ऑस्ट्रेलिया- 96 धावांनी विजयी
  • वि. इंग्लंड- 4 विकेट्सनी विजयी

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)