You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
RRB NTPC: रेल्वे परीक्षांच्या निकालावर लवकरात लवकर तोडगा काढू - रेल्वेमंत्री
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पाटणा येथील 'भिखना पहाडी' परिसरात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. संतप्त विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या डब्याला आग लावली. यामुळे बिहारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सलग दुसऱ्या दिवशी रेल्वेची परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
परीक्षार्थींनी शांततेचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या आणि तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं.
याप्रकरणाशी निगडीत सर्व बाजू, मुद्दे लक्षात घेऊन लवकरात लवकर याप्रश्नी तोडगा काढला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं.
रेल्वेतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत कोणतीही गडबड झाल्याची तक्रार आलेली नाही असा दावा रेल्वेमंत्र्यांनी केला. परीक्षेचं आयोजन चांगल्या पद्धतीने करण्यात आलं असं ते म्हणाले.
पुढच्या टप्प्याच्या परीक्षेसाठी निवडीसंदर्भात रेल्वेमंत्री म्हणाले, अधिसूचनेप्रमाणे 20 पट उमेदवारांना उत्तीर्ण करण्यात आलं आहे. प्रत्येक पदाचे आकडे त्यांनी समर्थनार्थ पत्रकारांसमोर ठेवले.
"सगळ्या विभागातील रेल्वे भरती बोर्डाच्या चेअरमनना विद्यार्थ्यांच्या तक्रारी, सूचना काय आहेत ते समजून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हे सर्व एकत्र करून, समितीसमोर सादर करा. यामुद्यासंदर्भात तक्रार मांडण्यासाठी एक इमेल आयडीही जारी करण्यात आला आहे. ही समिती देशाच्या विविध भागात जाईल आणि परीक्षा देणाऱ्यांचं म्हणणं समजून घेईल,"असं रेल्वेमंत्री म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितलं, "विद्यार्थी पुढचे तीन आठवडे म्हणजे 16 फेब्रुवारीपर्यंत या समितीसमोर आपलं म्हणणं मांडू शकतात. यानंतर समिती सर्व मुद्यांचा परामर्श घेऊन शिफारशी 4 मार्च रोजी मंत्रालयाला सादर करेल."
तपास तसंच चौकशी प्रक्रियेला वेळ लागू शकतो यासंदर्भात विचारलं असता रेल्वे मंत्री म्हणाले, "4 मार्चच्या आधीही यासंदर्भात गोष्टी स्पष्ट होऊ शकतात."
विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या संपत्तीचं नुकसान करू नये असं आवाहन रेल्वेमंत्र्यांनी केलं. "रेल्वे ही आपली सर्वांची संपत्ती आहे. परीक्षा देणारे आपले भाऊबहीण आहेत. आम्ही लवकरात लवकर या मुद्यावर तोडगा काढू."
चौकशी समिती रेल्वे मंत्रालायाला 4 मार्च रोजी शिफारशी सादर करेल आणि तोपर्यंत पुढच्या टप्प्याच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याचं सरकारने म्हटलं होतं. हा प्रश्न सोडवण्यासाठी इतका वेळ घ्यायला नको असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या डब्याला लावली आग
मंगळवारी आणि बुधवारी नाराज विद्यार्थ्यांनी बिहारमध्ये अनेक ठिकाणी रेल्वे डब्यांना आग लावली होती आणि दगडफेकही केली होती.
पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला आणि पलटवार करत विद्यार्थ्यांनीही पोलिसांवर दगडफेक केली. यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचंही वृत्त आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे.
बिहारच्या इतर जिल्ह्यातही आंदोलक विद्यार्थ्यांनी रेल्वेचं नुकसान केल्याचं वृत्त समोर येत आहेत. तसंच काही फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
आरा येथे रेल्वेच्या डब्याला आग लावली. तसंच नवादा येथे आंदोलकांनी डायनेमिक टेम्पिंग एक्सप्रेस मशीनलाही आग लावल्याचं काही फोटोंमध्ये दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांचं हे आंदोलन बिहारनंतर आता शेजारील राज्य उत्तर प्रदेशपर्यंत पोहचलं आहे. प्रयागराज आणि इतर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी 'रेल्वे रोको' आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. या दरम्यान पोलिसांनी कारवाई केल्याचे फोटो आणि व्हिडिओ आता प्रसिद्ध होत आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
मंगळवारी (25 जानेवारी) बिहारमध्ये रेल्वेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डच्या माध्यमातून नॉन टेक्निकल पॉप्यूलर कॅटगरीतील (RRB NTPC Result) विविध पदांच्या भरती प्रक्रियेत घोळ आणि निष्काळजीपणा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
या विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन आता अधिक आक्रमक झालं आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे बिहारमध्ये अनेक ठिकाणी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली. तर काही ठिकाणी रेल्वेचे वेळापत्रक आणि मार्ग बदलावे लागले.
सोमवारी (24 जानेवारी) विद्यार्थ्यांनी पाटणाच्या 'राजेंद्र नगर टर्मिनल' येथे कित्येक तास 'रेल रोको' आंदोलन केले.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, "विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर रेल्वे प्रशासनाने एनटीपीसी आणि लेवल वन परीक्षा रद्द केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोपांनंतर रेल्वेने तपास करण्यासाठी चौकशी समिती नेमली आहे."
विद्यार्थी आंदोलन का करत आहेत?
2019 मध्ये ऐन लोकसभा निवडणुकीवेळी रेल्वेने एनटीपीसीच्या माध्यमातून 35 हजार 308 पदांसाठी आणि गट 'ड' पदांसाठी अशा एकूण जवळपास एक लाख तीन हजार पदांसाठी अर्ज मागवले होते.
फेब्रुवारी-मार्च दरम्यान विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. एप्रिल-मे महिन्यात नवीन सरकार आले. जुलैपर्यंत परीक्षा घेण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलं. परंतु वर्षभरात म्हणजेच वर्ष 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या नाहीत.
पाटणा येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अमरजीत या विद्यार्थ्याने सहभाग नोंदवला होता. ते म्हणाले, "2021 मध्ये परीक्षा पार पडली. 2022 मध्ये CBT-1 (NTPC) निकाल जाहीर केला."
"त्यावेळी नोटिफिकेशनमध्ये रेल्वे बोर्डने CBT-1 (NTPC) मध्ये 20 पट निकाल दिला जाईल असं सांगितलं होतं. परंतु त्यांनी एका विद्यार्थ्याची पाच ठिकाणी नोंद ग्राह्य धरली. यामुळे प्रत्यक्षात रेल्वे बोर्डाने केवळ 10-11 पट निकाल दिल्याचं स्पष्ट झालं."
आणखी एका विद्यार्थ्याने सांगितलं की, "एनटीपीसीने जाहीर केलेल्या निकालात पाच लेवल जनरेट केल्या आहेत. यानुसार काही विद्यार्थ्यांचा निकाल पाचही लेवलमध्ये आहे तर काहींचा केवळ चार किंवा तीन लेवलमध्ये. तर काहींना चांगले गुण असूनही एकाही लेवलमध्ये निकाल नाही."
रेल्वे बोर्डाने 'एक विद्यार्थी-एक निकाल' यानुसार निकाल जाहीर करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. रेल्वेच्या आताच्या निकाल प्रणालीनुसार काही पात्र विद्यार्थ्यांना प्रक्रियेतून बाहेर पडावं लागत आहे. यामुळे परीक्षार्थी गुड्स गार्ड आणि स्टेशन मास्ट अशा पदांसाठी पात्र ठरू शकणार नाही असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
अमित या विद्यार्थ्याचा दावा आहे की, रेल्वेने एकाच विद्यार्थ्याचं नाव चार ते पाच पोस्टसाठी रिपीट केलं आहे. "एखाद्या विद्यार्थ्याची निवड पाच पदांसाठी झाली आणि त्याने मेन्स परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी सुद्धा पास केली तर रेल्वे त्या विद्यार्थ्याला कुठे नोकरी देणार?" असाही प्रश्न अमित यांनी उपस्थित केला.
एका विद्यार्थ्याला एकावेळी एकाच पदावर नोकरी मिळू शकते. मग अनेक पदांसाठी त्याची निवड करून इतर पदं नंतर रिक्त का ठेवायची? असंही त्यांचं म्हणणं आहे.
रेल्वे मंत्रालयाचा इशारा
आंदोलन विद्यार्थ्यांना रेल्वे मंत्रालयाने इशारा दिला आहे. यासंदर्भात रेल्वेने नोटीस जारी केली आहे.
"रेल्वेच्या पदांसाठी इच्छुक उमेदवार रेल्वे रुळांवर आणि इतर ठिकाणी आंदोलन करत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. रेल्वेचं नुकसान करणं कायदाबाह्य आहे. अशा घटनांवर कारवाई केली जाईल. यामुळे सरकारी नोकरीची संधीही धोक्यात येऊ शकते." असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
विशेष एजन्सीच्या मदतीने अशा घटनांचे व्हिडिओ पाहून चौकशी केली जाईल. कायदाबाह्य कृती केलेल्या उमेदवारांवर पोलीस कारवाईसोबत त्यांची रेल्वेची नोकरी मिळवण्याच्या संधीवर कायमस्वरूपी प्रतिबंध आणला जाऊ शकतो असंही रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.
विरोधी पक्षांचा परीक्षार्थींना पाठिंबा
परीक्षार्थींच्या या आंदोलनाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजप्रताप यादव यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर सोडण्यात आलेल्या अश्रूधुराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
त्यांनी लिहिलं, "हे चित्र काश्मीरचं नव्हे तर बिहारची राजधानी पाटण्याचं आहे. हे परीक्षार्थी दहशतवादी नाहीत. RRB NTPC परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अशी क्रूर वागणूक मिळते आहे. बिहारमध्ये डबल इंजिन सरकार आहे. बिहारचे मुख्यमंत्री स्वत:ला सुशासन बाबू म्हणवून घेत फिरत असतात."
भिखना पहाडी इथे सुरू असलेल्या परीक्षार्थींच्या आंदोलनाइथे भाकपा नेते संदीप सौरभ यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "आरआरबी या पदांसंदर्भात काढलेल्या जाहिरातीत असं म्हटलं होतं की आरआरबीने या जागांसाठी दिलेल्या जाहिरातींमध्ये म्हटले होते की एकूण पदांच्या संख्येच्या 20 पट उमेदवारांना उत्तीर्ण केले जाईल.
"आरआरबीने फक्त साडेतीन लाख लोकांचेच निकाल जाहीर केले. एकाचा सहा लेव्हल निकाल दिला आहे. याचा अर्थ जाहिरातीत जे आरआरबीने म्हटलं तसं केलेलं नाही. परीक्षार्थींवर हा सरसकट अन्याय आहे. आम्ही याच्या विरोधात परीक्षार्थींच्या वतीने उतरत आहोत," सौरभ म्हणाले.
"परीक्षार्थींनी आंदोलनाआधी सरकार तसंच रेल्वेला अल्टीमेटम दिला होता. देशभरातील विद्यार्थ्यांनी ट्विटरवर याबाबत ट्रेंड चालवला. ट्विटरवर एक नंबरचा ट्रेंड होता. पण सरकारने परीक्षार्थींचं म्हणणं ऐकलंच नाही."
सौरभ पुढे सांगतात, "शेवटचा पर्याय म्हणून परीक्षार्थी रस्त्यावर उतरले आहेत. सरकार परीक्षार्थींचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने आपला हट्ट सोडला तर परीक्षार्थींना न्याय मिळू शकेल."
कायद्याचं राज्य चालेल-प्रशासन
भिखना पहाडी या ठिकाणी दिवसभर परीक्षार्थींचं आंदोलन चाललं.
पोलीस आणि परीक्षार्थी यांच्यात झालेल्या चकमकीबाबत मॅजिस्ट्रेट रँकचे प्रशासकीय अधिकारी एमएस खान म्हणाले, "एनटीपीसीने आयोजित केलेल्या परीक्षेत गडबड झाली आहे असं परीक्षार्थींचं म्हणणं आहे. परीक्षार्थींच्या म्हणण्यात किती तथ्य आहे की नाही याबाबत मी बोलणार नाही.
"पण त्यांनी अशा पद्धतीने आंदोलन करणं अवैध आणि बेकायदेशीर आहे. सोमवारी त्यांनी रेल्वे मार्ग अडवला. दुसऱ्या दिवशी रास्ता रोको करून जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला," खान म्हणाले.
एमएस खान पुढे म्हणाले, "आम्ही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला की आरआरबी महेंन्द्रू मध्ये पाचजणांचं शिष्टमंडळ घेऊन या. तुमचं म्हणणं मांडा. चर्चा होईल. पण त्यांनी ऐकलं नाही. विद्यार्थ्यांकडे नेतृत्वाचा अभाव दिसला. ते हिंसकही झाले. अनेक पोलीस यामध्ये जखमी झाले."
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी बुधवारी आंदोलन नियंत्रित केलं आहे. पण परीक्षार्थींनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, 28 जानेवारीपासून देशभरात व्यापक आंदोलन करण्याची योजना आहे.
परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची बुधवारी बैठक आहे. अनेक विद्यार्थ्यांनी 28 तारखेला भारत बंदची घोषणा केली आहे. डाव्या संघटनांनी ड गटाच्या परीक्षेसंदर्भातील फर्मानाविरुद्ध बिहार बंदचा नारा दिला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)