You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्समुळे आरोग्य सुधारतं का? जाणून घ्या 10 सोप्या मुद्द्यात
स्त्रीरोग तज्ज्ञ आणि सेक्सोलॉजिस्ट जयाराणी कामराज यांनी बीबीसीशी सेक्स आणि त्याचा मानवी आरोग्याशी संबंध याबद्दल चर्चा केली.
सेक्सचा झोप, वाढतं वय, व्याधी आणि महिला-पुरुषांच्या मानसिक तसंच शारिरीक आरोग्यावर होणारा परिणाम अशा वेगवेगळ्या पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांच्या मुलाखातीता संपादित अंश...
1. सेक्समुळे स्ट्रेस कमी होतो
"नियमित लैंगिक संबधांमुळे स्ट्रेस कमी होतो," त्या म्हणतात.
त्यांच्या मते सेक्समुळे स्ट्रेस कमी होतो, शरीरातलं रक्ताभिसरण वाढतं. नियमित सेक्स करणाऱ्या जोडप्यांना स्ट्रेस कमी असतो, असं अभ्यासातून समोर आलं आहे.
उदाहरणार्थ- तुम्हाला ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन करायचं आहे. त्या दिवशी सकाळी केलेला सेक्स फायदेशीर ठरतो. यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि तुम्ही ऑफिसचं प्रेझेंटेशन चांगल्या प्रकारे करू शकतं.
2. आयुर्मान वाढतं
जी जोडपी नियमितपणे सेक्स करतात त्यांचं आयुष्य वाढतं. अशा जोडप्यांचं आयुष्य 8 वर्षांपर्यंत वाढू शकतं. नियमित सेक्स केल्यास शारिरीक व्याधी कमी होतात तसंच शरीरातली ताकद वाढते.
3. हृदयविकाराचा धोका कमी होतो
याचं मुख्य कारण म्हणजे सेक्समुळे हृदयाला फायदा होतो. हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो आणि ब्लड प्रेशरही कमी होतं.
सेक्सदरम्यान जे हार्मोन्स स्रवतात त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि हृदयाचं कार्य सुरळीत होतं. यामुळे हृदयविकारचा झटका यायची शक्यता कमी होते.
4. सेक्समुळे व्यक्ती तरूण राहाते
सेक्समुळे जे हार्मोन्स स्रवतात त्यामुळे शरीराच्या पेशी ताज्यातवान्या होतात. त्यामुळे माणसं दीर्घकाळ तरूण राहू शकतात. सेक्समुळे DHA नावाचं संप्रेरक स्रवतं, यामुळे वृदध होण्याची प्रक्रिया मंदावते.
सेक्स हा एका प्रकारचा व्यायामच असतो. 20 मिनिटं जर ही क्रिया केली तर जवळपास 300 कॅलरीज जळतात. यामुळे आरोग्याला फायदाच होतो.
5. निद्रानाशावर उपचार
मेनोपॉजच्या काळात अनेक महिलांना निद्रानाशाचा त्रास होतो कारण त्यांच्या शरीरात हार्मोन्स संतुलन बिघडलेलं असतं. अशा महिला जेव्हा डॉक्टरकडे जातात तेव्हा त्यांना विचारला जाणारा पहिला प्रश्न त्यांच्या लैंगिक आयुष्याविषयी असतो.
जर लैंगिक आयुष्यात नियमितता नसेल तर त्याने निद्रानाशाचा विकार जडू शकतो.
सेक्स दरम्यान ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन स्रवतं. या हार्मोनमुळे मन शांत होतं आणि झोप लवकर येते. सेक्समुळे जी झोप येते ती एरवीच्या झोपेपेक्षा शरीरासाठी जास्त चांगली असते. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं.
6. मूत्राशयाच्या विकारांवर प्रभावी
पन्नाशी उलटलेल्या महिलांना मूत्राशयाचे विकार होण्याची शक्यता असते. अशा महिलांनी नियमित सेक्स केला तर त्यांची इस्ट्रोजनची पातळी वढते आणि त्यामुळे त्यांच्या गुप्तांगातली त्वचा कोरडी पडत नाही.
परिणामी मुत्राशयाचे विकार होण्याची शक्यता कमी होते.
7. प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी
अभ्यासातून समोर आलंय की नियमितपणे सेक्स केला तर पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो.
8. रोगप्रतिकारक शक्ती वाढते
नियमित सेक्स केला तर व्यक्तीचं आयुष्य 8 वर्षांनी वाढू शकतं. याचं कारण म्हणजे सेक्समुळे व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती वाढते. महिला-पुरुष दोघांनाही याचा फायदा होतो.
सेक्समुळे इम्युनोग्लोबिन अँटीबॉडीजचं प्रमाण वाढतं. या अँटीबॉडीज म्हणजे शरीरातली रोगप्रतिकाराची पहिली फळी असते. या अँटीबॉडीज ताप, खोकला आणि सर्दी होऊ देत नाहीत त्यामुळे पुढचे आजार व्हायची शक्यता कमी होते.
9. हाडांची ताकद वाढते
जसंजसं महिलांचं वय वाढतं त्यांच्या शरीरातल्या इस्ट्रोजेन या संप्रेरकाचं प्रमाण कमी होत जातं. यामुळे हाडांमधल्या कॅल्शियमचं प्रमाणही कमी होतं. हाडं कमजोर होतात. नियमित सेक्स केल्यामुळे इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढतं आणि हाडांमधलं कॅल्शियम कमी होत नाही. त्यामुळे हाड मजबूत होतात.
10. वेदनाशमनाचं काम
सेक्स एक उत्तम पेनकिलर आहे. पन्नाशी ओलांडलेल्या अनेक महिलांना अंगदुखीचा त्रास असतो. यातल्या अनेक महिलांचं लैंगिक आयुष्य तंदुरुस्त नसतं.
सेक्सदरम्यान न्युरोट्रान्समीटर्स तयार होतात ज्यामुळे स्नायूंना आराम मिळतो. यामुळे दुखणं कमी होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)