लैंगिक आरोग्य: पॉर्न व्हीडिओ सलग दोन तास पाहिल्यास काय धोका आहे?

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी तामिळ

सेक्स आणि गर्भधारणा यात अडचण येत असल्यानं राकेश आणि माला या दोघांनीही सेक्सॉलॉजिस्टकडे जाण्याचा निर्णय घेतला.

(राकेश आणि माला ही नावं खरी नाहीत, त्यांच्या खासगीपणाचा आदर करत नावं बदलली आहेत.)

तपासाअंती डॉक्टरांना लक्षात आलं की, या जोडप्याला कुठलाही वैद्यकीय किंवा शारीरिक आजार नाहीय. मग डॉक्टरांनी दोघांशीही स्वतंत्रपणे चर्चा केली. तेव्हा मालानं त्यांना सांगितलं की, 'राकेश रोज पहाटे दोन वाजेपर्यंत पॉर्न व्हीडिओ पाहत असतो.'

राकेशचं सार्वजनिक क्षेत्रात चांगलं नाव आहे, त्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं. हे पाहून मालानं राकेशच्या पॉर्न व्हीडिओ पाहण्याच्या सवयीबद्दल कुठेच वाच्यता केली नाही.

प्रसूतीतज्ज्ञ आणि सेक्सॉलॉजिस्ट जयराणी कामराज यांनी बीबीसीला सांगितलं की, मालानं दिलेल्या माहितीच्या आधारे राकेशवर उपचार सुरू करण्यात आले.

पॉर्न पाहणाऱ्या प्रत्येकाला डॉक्टरांच्या मदतीची गरज आहे का, तसंच पॉर्नोग्राफीचं लैंगिक शिक्षणाशी नातं काय, या सगळ्यांवर जयराणी कामराज यांनी बीबीसीशी बातचीत केली.

त्यांच्यासोबतचा संवाद प्रश्न-उत्तराच्या स्वरूपात खालीलप्रमाणे:

प्रश्न:पॉर्न पाहणं आरोग्यासाठी चांगलं असतं का?

उत्तर:कोव्हिड लॉकडाऊनच्या काळात पॉर्न व्हीडिओ पाहण्याचं प्रमाण कित्येक पटींनी वाढलंय. पॉर्न पाहणं हे अनेकांसाठी 'स्ट्रेसबस्टर' म्हणून काम करत असल्याचंही दिसून आलंय. लैंगिक उपचार म्हणूनही काहीजण पॉर्नोग्राफीकडे पाहत आहेत.

कधीकधी याचा उपयोग लैंगिक समस्या असलेल्या लोकांमध्ये उत्तेजना निर्माण करण्यासाठीही केला जातो. एखाद्या जोडप्यानं सहमतीने पॉर्नोग्राफी पाहिल्यास हरकत नसावी.

पण 18 वर्षांखालील मुलांनी पॉर्नोग्राफी पाहणं धोकादायक आहे. पॉर्नोग्राफीला लैंगिक शिक्षणाशी जोडलं जाऊ शकत नाही.

प्रश्न: पॉर्नोग्राफी पाहण्याचे वाईट परिणाम काय आहेत?

उत्तर:ज्या लोकांना एकटं वाटतं, अशांनी पॉर्न व्हीडिओ पाहिल्यास, त्यांची गोंधळाची स्थिती कमी होते आणि ताणही कमी होतो, असं अभ्यासातून समोर आलंय.

मात्र, कुणी जर सातत्यानं पोर्नोग्राफी पाहत असेल, तर त्याचे नकारात्मक परिणामही होऊ शकतात. गोंधळ आणि ताण अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

वारंवार किंवा प्रमाणाबाहेर पॉर्नोग्राफी पाहणं हे लैंगिक नातेसंबंधांमध्ये सुद्धा बाधा आणू शकतात.

प्रचंड प्रमाणात पॉर्नोग्राफी पाहणाऱ्यांच्या लैंगिक संबंधांदरम्यानच्या अपेक्षा कमालीच्या वाढतात, लैंगिक संबंधांदरम्यान अशक्य असणारे प्रकार करू पाहतात, अशामुळे निराशा पदरी पडण्याची शक्यता वाढते.

प्रश्न: पॉर्नोग्राफीचं व्यसन लागल्याचं कसं शोधायचं?

उत्तर:पॉर्न व्हीडिओ पाहणारे तीन प्रकारात मोडतात.

काही लोक आठवड्याला केवळ 17 ते 24 मिनिटं पॉर्न पाहतात. हे फारसं धोकायदायक मानलं जात नाही. 75 टक्क्यांहून अधिक लोक या प्रकारात मोडतात. या लोकांना पॉर्नमुळे कौटुंबिक किंवा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत नाही.

दुसऱ्या प्रकारात असे लोक मोडतात, जे कमी वेळ पाहतात, मात्र त्यांना पॉर्नोग्राफी लागतेच. पॉर्नोग्राफी पाहण्यासाठी ते आतुर असतात आणि ते वारंवार पाहत राहतात. या प्रकारात 13 टक्के लोक मोडतात.

तिसऱ्या प्रकारात 14 टक्के लोक मोडतात. या प्रकारातील लोक आठवड्याला 110 मिनिटं पॉर्नोग्राफी पाहतात.

चिंताग्रस्त, संताप, चिडखोरपणा आणि एकटेपणा अशा समस्यांना या प्रकारातील लोकांना तोंड द्यावं लागतं. या प्रकारातील पुरुषांचे लिंग सकाळी ताठर होत नाहीत.

प्रश्न: पॉर्नोग्राफीचं व्यसन लागलेल्यांसाठी वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज आहे का?

उत्तर: नक्कीच. मोठ्या प्रमाणात पॉर्नोग्राफी पाहतात, अशांना मग ते स्त्री असो किंवा पुरुष, त्यांच्या मेंदूत समस्या असते.

स्मरणशक्ती, झोप, आकलनशक्ती आणि एकाग्रता यांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे त्यांना उपचाराची नक्कीच आवश्यकता असते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)