दत्ता सामंत : गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाची घोषणा करणारे 'डॉक्टरसाहेब'

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची कामगार नेते डॉ. दत्ता सामतं यांच्या हत्या प्रकरणातून निर्दोष सुटका झालीय. अर्थात, इतर गुन्ह्यांप्रकरणी छोटा राजन तुरुंगातच राहील.

आजपासून 41 वर्षांपूर्वी डॉ. दत्ता सामंतांनी ऐतिहासिक गिरणी कामगार संपाची घोषणा केली होती. डॉ. दत्ता सामंत यांच्या हत्येला 26 वर्षे झाली.

डॉ. दत्ता सामंत यांच्या आयुष्यातील आणि वाटचालीतील काही पदर उलगडण्याचा हा प्रयत्न.

पंचवीस वर्षांपूर्वी, म्हणजे 16 जानेवारी 1997 ची सकाळ कामगार चळवळीसाठी भयाण घटना घेऊन उजाडली होती. मुंबईतील पवई भागात एका इसमाची एक-दोन नव्हे, तर 17 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्या इसमाचा जागच्या जागी जीव गेला.

मुंबईतलं गँगवार संपवण्याच्या आणाभाका एकीकडे राज्यातलं सेना-भाजप युती सरकार घेत असताना, दस्तुरखुद्द राजधानी मुंबईत ही हत्या आणि तीही भररस्त्यात झाली होती.

आणि ही हत्या साधीसुधी नव्हती. या हत्येनं मुंबईसह संपूर्ण देशातील कामगार हळहळले. या हत्येत जागच्या जागी जीव गेलेला इसम होता, मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाची हाक देणारे 'डॉक्टरसाहेब', अर्थात - डॉ. दत्ता सामंत.

डॉ. दत्ता सामंत यांच्याबद्दल अनेक भली-बुरी मतं आजही आहेत. 'संप कधी संपवायचा त्यांना कळलं नाही म्हणून कामगार देशोधडलीला लागले' वगैरे बोल आजही त्यांना लावले जातात. पण इतकंच त्यांच्या वाटचालीबद्दल नोंदवता येतं का? तर नाही.

गिरणी कामगारांची आर्थिक हेळसांड पाहून डॉक्टरी पेशातला हा माणूस पेटून उठला, लढायला लागला आणि कामगारांचा 'डॉक्टरसाहेब' झाला. एक डिस्पेन्सरी चालवणारा साधा डॉक्टर ते कामगारांचा लढवय्या नेता हा त्यांचा प्रवास एखाद्या सिनेमाच्या कथानकापेक्षाही कमी नाहीय.

कामगारांच्या हक्कांच्या लढायांना त्यांनी एकीचं बळ दिलं, आवाज दिला, त्या बुलंद केल्या.

1982 च्या संपावेळी त्यांची गणितं चुकली, असं आजही अनेकांना वाटत असलं, तरी त्या संपामागील हेतूवर शंका घेण्याचं धाडस कुणाचं होत नाही, हेही तितकंच खरं.

डॉ. दत्ता सामंत यांच्या वाटचालीतले काही टप्पे आपण या वृत्तलेखातून जाणून घेऊ.

देवबाग ते मुंबई

दत्ता सामंत मूळचे देवबागचे. कोकणातले. हे गाव तेव्हाच्या रत्नागिरीत आणि आताच्या सिंधुदुर्गात मोडतं. कर्ली नदी जिथं अरबी समुद्राला भेटते, त्या संगामावरंच हे निसर्गसंपन्न गाव.

21 नोव्हेंबर 1932 रोजी जन्मलेल्या दत्ता सामंतांचं पितृछत्र लहानपणीच हरपलं. आई आणि मावशीनं त्यांना सांभाळलं. सात किलोमीटर चालत जाऊन शालेय शिक्षण घेतलं. शिक्षणात हा हुशार मुलगा.

दत्ता सामंतांना पोहण्याची फार आवड होती. हे आवड-बिवड सांगण्याचं कारणही तसंच आहे.

भर दुपारी आणि तेही भरती-ओहोटीचा काळ-वेळ न पाहता ते कर्ली नदी अन् अरबी समुद्राच्या संगमात उतरून पोहायचे. थोडं काव्यात्मक संबंध जोडल्यासारखं होईल, पण असं मानायला हरकत नाही की, पुढे आयुष्यभर ते कामगार चळवळींदरम्यान कुणाचीही तमा न बाळगता प्रवाहाविरुद्ध पोहत राहिले. निश्चयाने आणि बिनधास्तपणे.

मुंबईत ते आले, ते काही कुठल्या चळवळी-बिळवळी करायला नव्हेत, तर शिक्षण आणि त्यातून नोकरी किंवा व्यवसाय या हेतूनं. सर्वसामान्य कुटुंबातल्या आणि त्यातही आई अन् मावशीची जबाबदारी असलेल्या या कोकणातल्या मुलाचं स्वप्नंही तेवढंच छोटं होतं. पण पुढे आयुष्यानं इतकी वळणं घेतली की, दत्ता सामंत या व्यक्तीचं आयुष्य तीनशे साठ अंशात बदललं.

मुक्काम पोस्ट - घाटकोपर

अभ्यासात हुशार असलेले दत्ता सामंत पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. अकरावी-बारावीत असतानाच ते गावी जात, तेव्हाही त्यांचा अभ्यास सुरूच असे. त्यासाठी ते मालवणात जात. मालवणात जिथं ते अभ्यास करत, तिथेच बाजूला एक मुलगी ट्युशन घेत असे. तिच्याशी त्यांची ओळख झाली आणि पुढे 1959 साली तिच्याशीच लग्नही झाले.

तर मुंबईत त्यांनी जीएस मेडिकल कॉलेजमधून MBBS चं शिक्षण घेतलं. त्यावेळी 300 रुपये फी होती आणि सामंतांच्या खिशात 30 रुपयेच होते. त्यावेळी अरविंद पै नावाच्या मित्राच्या आईनं त्यांची फी भरली आणि ते शिक्षण पूर्ण करू शकले.

मग 1959 ला पत्नी वनिता यांना घेऊन ते मुंबईत आले. वनिता या डीएड झाल्या होत्या, त्यामुळे त्या बीएमसीत शिक्षिका म्हणून काम करू लागल्या.

घाटकोपरच्या पंतनगरमध्ये बिल्डिंग नंबर चारमध्ये एक घर घेतलं आणि तिथेच दत्ता सामंतांनी डिस्पेन्सरी उघडली. 1960 पासून 1965 पर्यंत ते घाटकोपरमध्ये घर आणि डिस्पेन्सरी सुरू होती. मग असल्फामध्ये त्यांनी डिस्पेन्सरी सुरू केली.

डिस्पेन्सरी ते कामगार नेता

आतापर्यंत दत्ता सामंत हे मुंबईत इतरांसारखेच स्वप्न घेऊन आलेल्यांपैकी एक होते. मात्र, असल्फामधील डिस्पेन्सरी त्यांच्या आयुष्याला वळण देणारी ठरली.

इथे आजूबाजूला खाणी होत्या. तिथं दगडं फोडणारे कामगार दुखल्या-खुपल्याला दत्ता सामंतांच्या डिस्पेन्सरीत औषधं घ्यायला येत. चार आणे-दहा पैसेही या कामगारांकडे नसत. त्यावेळी डॉ. दत्ता सामंत त्यांना विचारत, त्या कामगारांची स्थिती जाणून घेत.

आम्हाला डीए मिळत नाही, सुट्टी मिळत नाही, पगारवाढ नाही वगैरे समस्या हे खाण कामगार दत्ता सामंतांना सांगू लागले. एकदा स्वत: दत्ता सामंत हे तिथे भेट देऊन आले आणि त्यांनी मालकांविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, तोच त्यांच्यावर हल्ला झाला.

कामगार चिडले, आंदोलन वाढलं, तेव्हा खाणमालक दत्ता सामंतांना भेटले आणि कामगारांच्या मागण्यांवर चर्चा केली. मागण्या मान्यही केल्या.

डॉ. दत्ता सामंत यांची यावेळी कुठलीच संघटना नव्हती. पण त्यांचा हा पहिला विजय होता आणि कामगार चळवळीतलं हे त्यांचं पहिलं पाऊल होतं. पुढे सुरू झालेल्या वादळी प्रवासाची ही पहिली ठिणगी होती.

इथं एका गोष्टीचा उल्लेख करणं आवश्यक आहे की, हे वर्ष तेच आहे, ज्यावेळी शिवसेनेची स्थापना झाली.

मुंबई शहरानं देशाला मोठमोठे कामगार नेते दिले. स्वातंत्र्यापासूनचा विचार करायचा झाल्यास, अशोक मेहता, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नांडीस यांची नावं घेता येतील. मात्र, दत्ता सामंत या सगळ्यात उठून दिसत, कारण दीर्घकाळ संप, तडजोडी न स्वीकारणं आणि भरघोस पगारवाढ ही त्यांच्या आंदोलनाची पद्धत होती.

शिवसेनेशी संघर्ष

खाण कामगारांसाठी केलेल्या यशस्वी लढ्यानंतर दत्ता सामंतांचं नाव मुंबईच्या कामगार चळवळीत वायूवेगानं पसरलं. डिस्पेन्सरी चालवणाऱ्या 'डॉक्टर'चं 'डॉक्टरसाहेब' हे याच काळात झालं.

1960-70 चा हा काळ मुंबईच्या वेशीवरील ठाणे-बेलापूर पट्टा किंवा त्यापलिकडे औद्योगीकरण वाढण्याचा होता. अनेक कंपन्या स्थापन होत होत्या. दत्ता सामंतांच्या नेतृत्वात आंदोलनं, संप, कामगारांचे प्रश्न इत्यादी गोष्टी वाढू लागल्या. दत्ता सामंतांचं नेतृत्व वाढीस लागलं. विशेषत: इंजिनिअरिंग उद्योगात. 1970 चं साल उजाडेपर्यंत पन्नास-एक कंपन्यांमध्ये दत्ता सामंतांच्या नेतृत्वात यूनियन उभारली होती.

1970 च्या सांध्यावर शिवसेनेशी झालेला त्यांचा संघर्ष नोंदवणं आवश्यक आहे. त्यापूर्वी दत्ता सामंत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवासातला एक टप्पा इथं नोंदवला पाहिजे की, 1966 सालाच्या आसपासच दोघांचाही सक्रीय उदय झालाय. 1966 ला शिवसेनेची स्थापना आणि 1966 च्या दरम्यानच खाण कामगारांच्या निमित्तानं डॉ. दत्ता सामंतांचा कामगार नेता म्हणून उदय. पण एक मोठा फरक होता की, बाळासाहेब ठाकरेंना प्रबोधनकारांसारखा वारसा होता, दत्ता सामंतांच्या मागे तसा कुणीही नव्हता.

तर 1968 साली कामगार चळवळीत शिवसेनाही उतरली होती. भारतीय कामगार सेनेची स्थापना करून. यानंतरची एक घटना.

विक्रोळीच्या गोदरेज कंपनीत दत्ता सामंतांची आधीपासूनच यूनियन होती. इथं एकदा दत्ता सामंत कामगारांना भेटायला गेले होते. तेव्हा भारतीय कामगार सेनेचं नेतृत्व मनोहर जोशींकडे होते. इथं शिवसैनिक आणि दत्ता सामंतांचे कार्यकर्ते यांच्यात धुमश्चक्री झाली आणि त्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला.

परिणामी दत्ता सामंतांना तुरुंगात जावं लागलं. आणि दीड-दोन वर्षे ते तुरुंगात राहिले. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते कामगारांमध्ये आणखीच लोकप्रिय ठरत गेले.

काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसबाहेर

यानंतर ते इंटकशी जोडले गेले. इंटक म्हणजे इंडियन नॅशनल ट्रेड यूनियन काँग्रेस. ही काँग्रेसची कामगार विंग. यामुळेच मग 1972 ला यशवंतराव चव्हाणांच्या सांगण्यावरून दत्ता सामंत काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा लढले आणि मुलुंडमधून आमदार झाले.

तीनच वर्षात इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. दत्ता सामंत काँग्रेसमधले होते, मात्र कामगारांसाठी ते मागे सरत नसत. पर्यायानं त्यांनाही तुरुंगात जावं लागलं. तिथून बाहेर निघाल्यानंतर मात्र त्यांचं विधानसभेच्या तिकिटावरूनच संजय गांधींशी फिस्कटलं आणि त्यांनी काँग्रेसला राम राम केला.

हे वर्ष होतं 1979. राज्यात शरद पवारांचं पुलोदचं सरकार आलं होतं. 1980 साली पुलोद सरकार बरखास्त केल्यानंतर निवडणुका लागल्या आणि त्यावेळी दत्ता सामंत 1980 साली कुर्ल्यातून अपक्ष उभे राहिले आणि विधानसभेत पोहोचले.

दरम्यान 1980 साल उजाडेपर्यंत त्यांनी मुंबईतल्या कामगार चळवळीतला सर्वात मोठा नेता म्हणून नावही मिळवलं होतं.

संपापूर्वीच्या ठिणग्या

अनेक आंदोलनं, संप एकीकडे सुरूच होते. ते फक्त दत्ता सामंतच करत होते, अशातलाही भाग नाही. कॉ. डांगेंच्या नेतृत्वात डावे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनाही छोटेमोठे संप करत होती.

मात्र कॉ. श्रीपाद अमृत डांगेंच्या नेतृत्वातील डाव्यांच्या संघटना प्रभावहीन होत चालल्या होत्या, जॉर्ज फर्नांडीस दिल्लीच्या राजकारण गुंतले होते. शिवसेनेची कामगार सेना मात्र पाय पसरू लागली होती. मात्र त्यातही कुठलीही पार्श्वभूमी नसलेले दत्ता सामंत एकांड्या शिलेदारासारखे या कामगार चळवळीत उठून दिसत होते.

त्यात 1982 च्या ऐतिहासिक संपाचे संकेत मिळण्यास सुरुवात झाली. त्या संपाआधी त्यापूर्वी झालेल्या दोन संपांच्या घटनांचा उल्लेख आवश्यक आहे. कारण त्यातच 1982 च्या संपाची बिजं दडली होती.

1949 साली अमलात आलेलं पगाराचं स्टॅण्डर्ड 1980-82 पर्यंत बदललं नव्हतं. त्याचवेळी इतर उद्योगात पगारवाढीसह इतर सोयीसुविधांमध्ये कामगार पुढे निघून गेले होते. मात्र, गिरणी कामगारांची पगारवाढ तीन नि चार रुपयांतच होत होती.

1974 साली कॉ. श्रीपाद अमृत डांगेंच्या नेतृत्वात 42 दिवसांचा संप झाला होता. मात्र, 4 रुपये पगारवाढीवर तो संप डांगेंनी मागे घेतला. पुढे शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये समाजवादीही होते. त्यामुळे आशा वाढल्या होत्या. मात्र, तेव्हाही 42 रुपयांची पगारवाढ झाली.

त्यात राष्ट्रीय मिल मजदूर संघ ही संघटनाही गिरणी मालकांच्या बाजूनं झुकत होती. त्यामुळे कामगार अस्वस्थ होते. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरेंनी एक आशा दाखवली.

1981 सालच्या दिवाळीतली गोष्ट. दिवाळी बोनसच्या निमित्तानं संपाची एक ठिणगी बाळासाहेबांनी पेटवली होती. मात्र, ती तात्काळ विझली.

झालं असं की, याच मुद्द्यावर बाळासाहेबांनी एक नोव्हेंबरला एक दिवसीय बंद यशस्वी करून आपण संप करू शकतो असं दाखवलं होतं. कामगारांना 200 रुपये पगारवाढ द्या नाहीतर 15 नोव्हेंबरपासून गिरण्या बंद होतील, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, नंतर तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अंतुलेंशी त्यांची चर्चा झाली आणि संप करणार नसल्याची त्यांनी घोषणा केली.

त्यात गिरणी कामगारांची अधिकृत यूनियन म्हणजे राष्ट्रीय मिल मजदूर संघ आरएमएमएसने कामगारांना 20 टक्के बोनस द्यायला लावण्याचं आश्वासन दिलं आणि आयत्या वेळी 8.33 ते 17.33 टक्के बोनसर मालकांशी तडजोड केली. त्यामुळे कामगार संतापले.

'मी आग आहे, माझ्याशी खेळू नका'

आता त्यांच्याकडे एकच मार्ग होता, डॉ. दत्ता सामंत. खरंतर दत्ता सामंत यांनी त्यापूर्वी एम्पायर डाईंग वगळता गिरणी कामगारांचा मुद्दा उचलला नव्हता. एम्पायर डाईंगच्या कामगारांना त्यांच्या यूनियनला मान्यता नसताना 200 रुपयांची वाढ मिळवून दिली होती.

त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी लढण्यास नकार दिल्यानंतर शेकडोंच्या संख्येत कामगार घाटकोपरच्या पंतनगरमध्ये धडकले. अर्थात, डॉ. दत्ता सामंत यांच्या ऑफिसबाहेर.

त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियात लेबर बीट असा स्वंतत्र कक्ष होता. कामगार चळवळी मुंबईत इतक्या होत्या की, त्यासाठी खास पत्रकार नेमला गेला होता. लिना मथियास या टाइम्सच्या लेबर करस्पाँडन्ट होत्या.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या सांगतात की, त्यावेळी खरंतर दत्ता सामंतांनी सांगितलं होतं की, 'मी आग आहे, माझ्याशी खेळू नका.'

कारण दत्ता सामंत हे मालकांचं ऐकून घेत नसत, कामगारांच्या मागणीला सर्वोच्च मानून, चर्चेदरम्यान एक पाऊलही मागे येण्याची त्यांची भूमिका नव्हती. त्यात गिरणी कामगारांचं तसं प्रत्यक्ष नेतृत्व त्यांच्या यूनियननं केलं नव्हतं.

ऐतिहासिक संपाची घोषणा

अखेर दत्ता सामंत नेतृत्व करण्यास तयार झाले आणि जानेवारी महिना उजाडला.

18 जानेवारी 1982 रोजी डॉ. दत्ता सामंत यांनी 150 ते 200 रुपयांच्या पगारवाढीसह इतर सुविधा आणि मान्यताप्राप्त यूनियनशीच वाटाघाटी करण्यास सांगणारा बॉम्बे इंडस्ट्रियल रेग्युलेशन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी ऐतिहासिक संपाची घोषणा केली.

जगाच्या इतिहास अभूतपूर्व संप म्हणून पुढे नोंद झाली, त्या संपाला सुरुवातीलाच भरघोस प्रतिसाद मिळाला. दत्ता इस्वलकरांनी 'प्रहार'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की, 58 पैकी 50 गिरण्यांमधील सुमारे अडीच लाख कामगार संपावर गेले होते. या सगळ्यांचं नेतृत्व करण्यासाठी दत्ता सामंतांनी महाराष्ट्र गिरणी कामगार संघटनेची स्थापना केली.

हा संप दीर्घकाळ चालेल, याची कल्पना दत्ता सामंतांनी कामगारांना आधीच देऊन ठेवली होती. मात्र, निर्णय होत नसल्यानं संप चिघळत गेला. त्यात संप फोडण्साठी अनेक प्रयत्न केले गेले.

जयप्रकाश भिलारे हे दत्ता सामंत यांचे साथीदार. 1982 च्या संपावेळीही ते सामंतांच्या सोबत होते. ते त्यावेळची एक आठवण सांगतात, "संपादरम्यान दत्ता सामंत यांना इंदिरा गांधींनी दिल्लीत चर्चेसाठी बोलावलं होतं. सामंत दिल्लीत गेले. मात्र, इंदिरांनी ऐनवेळी भेट टाळली.

"त्यावेळी गावाकडे निघून गेलेले कामगार आकाशवाणीवरून बातम्या ऐकत. पुणे केंद्रातून या बातम्या दिल्या जात. त्यावेळी सरकारनं खोटारडेपणा करत, काही कामगार कामावर रुजू होत असल्याचं सांगण्यास सुरुवात झाली. परिणामी कामगारांमध्ये गोंधळ होण्यास सुरुवात झाली."

या संपाचं नेतृत्व एकहाती दत्ता सामंतांकडे होतं. मात्र, बीआयआर कायदा असा होता की, मान्यताप्राप्त संघटनेशी म्हणजे राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच चर्चा करे. त्यामुळे सामंतांच्या मागण्या मालकही मान्य करत नसत.

त्याचवेळी गिरणी मालकांनी कामगारांची काळी यादी बनवण्यास सुरुवात केली.

दत्ता इस्वलकरांनी याबाबत मुलाखतीत सांगितलं होतं, "सहा महिन्यांनंतर फक्त दीड लाख कामगारांनाच परत कामावर घेण्यात आलं. उर्वरित कामगारांवर नोकरी गमावण्याची पाळी आली. एवढया मोठया प्रमाणावर एकाच वेळी नोकरी गमवावी लागण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी."

हा संप वाढतच गेला. नंतर संपाची सरकारनं गंभीर दखल घ्यावी म्हणूनही बरीच आंदोलनं झाली.

जयंत पवार यांनी या संपाच्या पंचविशीनिमित्त लिहिलेल्या लेखात अशा आंदोलनांची यादीच दिलीय.

गिरण्यांच्या गेटवर आंदोलनं केली जात, अटक करवून घेतली जाई, कामगारांच्या मुलांनीही मंत्रालयावर मोर्चा काढला होता, कामाठीपुऱ्यात 700 कामगारांनी घंटानाद केला होता, इंदिरा काँग्रेसच्या आमदारांच्या घरावर मोच्रा, जेलभरोआंदोलन, 16 सप्टेंबरचा मंत्रालयावर दत्ता सामंतांनी दीड लाख कामगारांचा नेलेला प्रचंड मोर्चा... असं काही ना काही या काळात सुरू होतं.

मात्र, ज्येष्ठ पत्रकार लिना मथियास सांगतात, "त्यावेळी गिरणी संपाचं वृत्तांकन करताना जे पाहिलं, त्यावरून एक निरीक्षण मला नोंदवावासं वाटतं की, दत्ता सामंत यांच्यासमोर झुकण्यास राज्य आणि केंद्र सरकार तयार नव्हतं. कारण दत्ता सामंत यांच्यामागे असलेली ताकद पाहता, त्यांना मोठं होऊ देणं सगळ्यांच्याच राजकीय स्थानाला धोकादायक होतं."

या काळात दत्ता सामंतांनी अनेक गिरणी कामगारांच्या खाण्यापासून, मुलांच्या शिक्षणाचाही खर्च उचलला. कामगारांमधूनच वर्गणीतून हा खर्च उचलला होता, असं जयप्रकाश भिलारे सांगतात.

सहा महिने किंवा वर्षभरानंतर काही कामगार कामावर परतले, मात्र त्या कामगारांचा दत्ता सामंत यांच्यावर राग नव्हता, उलट त्यांचं नेतृत्व त्यांना मान्यच होतं. पण आर्थिक स्थिती बिकट झालेल्यांकडे पर्याय नव्हता, असं जयप्रकाश भिलारे सांगतात.

या संपानंतरच दत्ता सामंतांनी कामगार आघाडीची स्थापना केली. 'रिपिंग द फॅब्रिक' पुस्तकातील दाव्यानुसार, दत्ता सामंत यांच्या कामगार आघाडीकडे अडीच लाखांहून अधिक कामगार सदस्य आणि जवळपास 300 कंपन्यांमध्ये यूनियन होत्या. एकट्या माणसाच्या संघटनेकडे देशभरात इतकी ताकद कुणाकडेच नव्हती.

हा संप सुरूच राहिला. वर्षे सरत गेली, काही गिरण्या बंद झाल्या. गिरण्यांच्या जागांवर कामगारांच्या हक्कासाठी लढाया सुरू होण्यापर्यंत हे सर्व येऊन ठेपलं.

आणि शेवट...

हे सुरू असतानाच, पुढे दत्ता सामंत यांनी कामगार आघाडीमार्फत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलं. कामगार आघाडी अधिकृत पक्ष नसल्यानं ते अपक्ष लढले.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर 1984 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी यांच्या बाजूने लाट होती. मात्र, त्यातही दक्षिण मध्य मुंबईतून दत्ता सामंत जिंकले आणि खासदार झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पत्नी वनिता सामंतांसह एकूण तीन आमदार जिंकले.

त्यानंतरही दत्ता सामंत लोकसभा निवडणूक लढत राहिले, मात्र त्यांचा विजय झाला नाही. मात्र, कामगारांच्या मागण्यांवर ते कायम सक्रीय राहिले. अगदी शेवटपर्यंत.

एखाद्या सिनेमातील नायकाप्रमाणे दत्ता सामंत यांचं जगणं होतं. 1997 सालच्या जानेवारीत त्यांचा अंतही तसाच झाला. 16 जानेवारीला मुंबईतील पवईतल्या राहत्या घरातून घाटकोपरमधील संघटनेच्या ऑफिसकडे जाण्यासाठी ते निघाले होते. टाटा सुमो त्यांची गाडी होती. गाडीत बसल्यावर त्यांच्यावर अज्ञातांनी येऊन डोक्यात, छातीत आणि पोटवर 17 गोळ्या झाडल्या.

कुठलीही पार्श्वभूमी नसताना कोकणातून मुंबईत आलेल्या या माणसानं मुंबईचं कामगारविश्व आपल्या पाठीमागं उभं केलं.

शेवटी एक गोष्ट नमूद करायला हवी, ती म्हणजे, 18 जानेवारी 1982 रोजी घोषित झालेला गिरणी कामगारांचा तो ऐतिहासिक संप अजूनही अधिकृतरित्या मागे घेण्याची घोषणा झालेली नाही.

संदर्भ :-

  • जयप्रकाश भिलारे (डॉ. दत्ता सामंत यांचे साथीदार आणि कामगार चळवळीतील नेते)
  • भूषण सामंत (डॉ. दत्ता सामंत यांचे पुत्र आणि कामगार आघाडीचे विद्यमान अध्यक्ष)
  • लिना मथाई (ज्येष्ठ पत्रकार)
  • Bombay Textile Strike - Hub Van Wersch (पुस्तक)
  • Bal Thackeray & The rise of the rise of the Shiv Sena - Vaibhav Purandare (पुस्तक)
  • जयंत पवार यांचा महाराष्ट्र टाइम्समधील संपाच्या पंचविशीचा लेख
  • दिवंगत गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांची दीर्घ मुलाखत

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी'हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)