मुंबई गिरणी कामगार संपाची काय कारणं होती?

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"गिरणी कामगार मुळातच लढवय्या होता. 1982 चा संप झाला तेव्हा कामगार मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले. त्यांनी आपल्या मागण्या लावून धरल्या. त्या पूर्ण होता होता त्यांची वाताहत झाली. तरीही तो संप आजही संपलेला नाही. माझ्या आसपासची अनेक कुटुंबं उद्धवस्त झाली. माझ्या कुटुंबाने मला तेव्हा साथ दिली. माझ्या मुलांनी मला पाठिंबा दिला म्हणून मी लढलो. संपात वाहात न जाता वेगळा उद्योग सुरू केला म्हणून मी सावरलो. तरीही स्वत:चाच विचार न करता मी गेली चाळीस वर्षं कामगारांसाठी लढतोय. त्यांचं थोडंबहुत कल्याण करू शकलो यातच मला समाधान आहे."

किसन साळुंके पोटतिडकीने बोलत होते. त्यांचं वय आता सत्तरीच्या पुढे गेलं आहे. आवाज किंचित कापरा झालेला, तरीही निश्चयी आणि समाधानी स्वरात ते आपली कथा मांडत होते.

मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या संपाला यावर्षी 40 वर्षं पूर्ण होताहेत. 18 जानेवारी 1982 ला सुरू झालेल्या या लढ्यात किसन साळुंकेसारख्या लाखो कर्मचाऱ्यांनी या लढ्यात सहभाग घेतला.

चाळीस वर्षानंतरही त्या आठवणी अगदी काल झालेल्या घटनेसारख्या ताज्या आहेत.

या संपाची कारणं, तेव्हाची मुंबईतली कापड गिरण्यांची परिस्थिती आणि परिणाम याचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

गिरणगावचा उदय आणि तत्कालीन अर्थव्यवस्था

19 व्या शतकाच्या सुमारास मुंबई हे भारतातील महत्त्वाचं व्यापारी केंद्र म्हणून उदयाला आलं होतं. एकूण विदेशी व्यापाराच्या दोन पंचमांश टक्के वाटा केवळ मुंबई शहराचा होता.

70 टक्के सागरी व्यापार मुंबईतून चालायचा. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचं विस्तारित रुप म्हणून मुंबई उदयाला येत होती. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यावर भारत कापडाचा आणि विशेषत: मिल किंवा गिरणीमधून तयार झालेल्या कापडाचा मोठा निर्यातदार झाला होता.

त्यामुळे मुंबईत अनेक कापड गिरण्या उभ्या राहिल्या. त्यासाठी कामगार म्हणून आजूबाजूच्या प्रदेशातून अनेक लोक मुंबईत आले. गिरणी किंवा मिल हेच त्यांचं आयुष्य झालं. या गिरण्यांभोवती एक समांतर समाजव्यवस्था उभी राहिली.

मिलमध्ये काम करणारा कामगार मुंबईत राहत असला तरी मूळ गावाशी त्याची नाळ घट्ट होती. त्यामुळे गिरण्यांमुळे शहराचीच नाही तर एक समांतर ग्रामीण अर्थव्यवस्था देखील उभी राहत होती. त्यामुळे 19 व्या दशकाच्या मध्यापासून एक मोठा कामगारवर्ग मुंबईत उभा राहिला आणि तिथूनच गिरणगाव म्हणजेच गिरण्याचं गाव अस्तित्वात आलं

1982 चा ऐतिहासिक संप झाला तेव्हा दहा लाख कामगार कामावर होते. हे सगळे संघटित कामगार होते. 1961 मध्ये मुंबईत फॅक्टऱ्यांची संख्या 8233 होती.

1981 मध्ये ही संख्या 16594 झाली. 80 च्या दशकात रासायनिक क्षेत्रातील कामगारांचं उत्पन्न वर्षाकाठी 14367 रुपये होतं. तर गिरणी कामगारांचं 7120 रुपये.

इथे गिरणी आणि गिरणी कामगारांची अशी स्थिती असतानाच एक नवीन भांडवलवाद उदयाला आला होता.

पॉवरलूममुळे कापड उद्योग कामगारांपासून दुरावला होता. तसंच तंत्रज्ञानातही कापड गिरण्या मागास होत होत्या. यात कोणतीही सुधारणा मालकांना करायची नव्हती. कारण त्या काळात त्यांना गुंतवणुकीचे इतर क्षेत्रं खुणावत होती.

निवृत्ती देसाई हे राष्ट्रीय मिल मजदूर महासंघाशी निगडीत आहे. बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. त्यांच्या मते 1982 च्या सुमारास कापडाची आयात सुरू झाली. त्यामुळे कामगार आणि त्यांच्या मागण्या याकडे मालकांचं फारसं लक्ष नव्हतं. त्यातच कामगारांच्या असंतोषाची बीजं दडली होती.

गिरणी कामगारांच्या संपाचा इतिहास

भारतात कामगार संघटनेचा इतिहास पाहाता पहिली कामगार संघटना ही गिरणी कामगारांची होती.

1923 मध्ये गिरणी कामगारांनी गिरणी कामगार महामंडळ नावाची संस्था स्थापन केली. असं असलं तरी प्रत्यक्ष काम करताना कामगारांची एखादी संघटना असायचीच. त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी ते सातत्याने आंदोलन करत.

तेव्हा मिल ओनर असोसिएशन ने संप न करण्याची कामगारांना ताकीद दिली होती तरीही कामगार आपल्या मागण्या रेटून लावत असत.

Strikes in India या पुस्तकात व्ही. बी. कर्णिक लिहितात, "दुष्परिणामांची कल्पना असताना देखील कामगार संपावर जात असत. यावरून तेव्हाची परिस्थिती किती भीषण असेल याचा अंदाज घेता येईल"

गिरणी कामगारांनी कितीदा संप केला याची अगदी खडान्‌खडा माहिती जरी नसली तरी 1928 साली झालेला एक संप सहा महिने टिकला होता.

या संपाचं नेतृत्व कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी केलं होतं. हा विक्रम 1982 पर्यंत अबाधित होता. त्याआधी 1924 मध्ये एक संप करण्यात आला तो दोन महिने टिकला मात्र तेव्हा मागण्या मान्य झाल्या नाहीत.

1926 मध्ये ना.म. जोशी यांनी बॉम्बे टेक्स्टाइल युनियनची स्थापना केली. ही संस्था बऱ्यापैकी मवाळ होती. कम्युनिस्ट नेत्यांनीही संघटना स्थापन केली मात्र कामगारांची एकीला संघटनेची गरज नव्हती. "आम्ही संप घडवून आणला नाही तर संपामुळे आमची संस्था घडून आली." असं श्रीपाद अमृत डांगे यांनी मीरत खटल्यात कोर्टाला सांगितलं होतं.

पुढच्या काळात हीच गिरणी कामगार युनियन शक्तिशाली होऊ लागली. या संघटनेला शह देण्याचे अनेक प्रयत्न मिल मालकांकडून झाले. त्यामुळे मालक आणि कामगार यांच्यातील दरी पुढचे 50 वर्षं वाढू लागली होती.

सुरुवातीच्या काळात डाव्या पक्षांचा कामगार चळवळीवर मोठा प्रभाव होता. 1942 च्या लढ्यानंतर काँग्रेसचा प्रभाव वाढू लागला आणि कम्युनिस्टांचा प्रभाव कमी झाला. काँग्रेसप्रणित संघटनांना सरकारचाही पाठिंबा मिळू लागला आणि त्यातून राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्थापना झाली.

1950 साली हिंद मजूर सभा आणि मिल मजूर सभा या संघटनांची स्थापना झाली. बोनस मिळण्याच्या प्रश्नावर दोन महिने संप पुकारण्यात आला पोलिसांनी कामगारांवर गोळीबार केला आणि त्यात 12 कामगारांचा मृत्यू झाला.

पुढे 1974 साली श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली 42 दिवसांचा संप पुकारण्यात आला. हा संप अचानकपणे मागे घेण्यात आला. 42 दिवस संप करून फक्त 4 रुपये पगारवाढ देण्यात आली. ही फसवणूक असल्याची कामगारांची भावना होती.

1982 च्या संपाची कारणं

1982 च्या काळात मुंबईत औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढत होतं. एकीकडे उंचच उंच इमारती आणि त्याच्या सावलीत दडलेल्या चाळी असं चित्र सर्रास पहायला मिळत होतं.

या चाळीत राहणाऱ्या कामगाराची परिस्थिती हलाखीची होती. तेव्हा गिरण्यांमध्ये मिळणारा पगार अपुरा होता. कमावणारा एक आणि खाणारी तोंडं अनेक अशी परिस्थिती होती. त्यामुळे पगारवाढ हा संपाचा पाया होता. याशिवाय कामगारांच्या अनेक मागण्या होत्या,

गिरणी कामगार अतिशय धोकादायक अवस्थेत काम करायचा. त्यामुळे मिळणारा पगार हा त्या मेहनतीला न्याय देणारा असावा अशी कामगारांची पहिली मागणी होती.

दुसरी मागणी अशी होती की कामगारांना मिळणारा पगार इतर क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कामगारांइतका असावा. तसंच मिळणारा पगार हे कामगारांचं जीवनमान उंचावणारा असावा.

तसंच कामाच्या अनुभवानुसार पगारवाढ मागण्यात आली होती. सर्व कामगारांना 75 रुपये, पाच ते दहा वर्षं अनुभव असणाऱ्यांना 100 रुपये, 10 ते 15 वर्षं अनुभव असणाऱ्यांना 125 तर 10 ते 15 वर्षं अनुभव असणाऱ्या लोकांना 150 रुपये पगारवाढ मिळावी अशी मागणी कामगारांनी केली होती.

याशिवाय आजारपणाच्या सुट्टयांची संख्या वाढवणं, दर वर्षाला 10 ते 15 रुपये पगारवाढ मिळणं या त्यांच्या अन्य मागण्या होत्या.

या मागण्या घेऊन अडीच लाख कामगारांनी डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात संप सुरू केला. मात्र या कामगारांपेक्षाही बदली कामगार या संपाच्या केंद्रस्थानी होते.

बदली कामगार हे नावाप्रमाणेच 'बदली' होते. त्यांची नोकरी तात्पुरती असायची. ते सगळे तरुण होते. त्यांना या संपातून खूप अपेक्षा होती. त्यांना महिन्यातून 5 ते 10 दिवस काम मिळायचं आणि त्याबदल्यात त्यांना 150 ते 300 रुपये मिळायचे. कायमस्वरुपी नोकरी मिळावी यासाठी त्यांनी बरीच खटपट केली. त्यात भ्रष्टाचारही झाला असं रजनी बक्षी त्यांच्या The long haul या पुस्तकात लिहितात.

डॉ.दत्ता सामंत आणि संप

1977 नंतर शिवसेना राजकीय पटलावर आपलं अस्तित्व जमवू पाहत होती. कामगार वर्गाला आपलंसं करण्याचेही प्रयत्न त्यांनी या काळात केले. राष्ट्रीय मिल मजदूर संघ या काँग्रेसप्रणित कामगार संघटनेला कामगार कंटाळले होते. ते नव्या नेतृत्वाच्या शोधात होते. ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या रुपात दिसत होतं.

1 नोव्हेंबर 1981 ला त्यांनी एक दिवसाचा संप पुकारला होता. कामगारांना 200 रुपये पगारवाढ दिली नाही तर पंधरा नोव्हेंबरपासून गिरण्या बंद होतील अशी घोषणा बाळासाहेबांनी केली. मात्र ऐन वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्याशी बाळासाहेब ठाकरेंनी चर्चा करून हा संप करत नसल्याची घोषणा परळच्या कामगार मैदानावर केली.

कामगार निराश झाले आणि त्यांनी दत्ता सामंतांना संपाचे नेतृत्व करण्याची गळ घातली.

डॉ. दत्ता सामंत हे कामगार नेते होते. त्यांची एक संघटना देखील होती. इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपन्यांत त्यांनी कामगारांना घसघसशीत पगारवाढ मिळवून दिली होती.

आता गिरणी कामगारही तीच आशा लावून बसले होते. मात्र दत्ता सामंतांना कापड क्षेत्रातली काहीच माहिती नव्हती.म्हणून त्यांनी या संपांचं नेतृत्व करायला नकार दिला. मात्र कामगारांनी गळ घातली, घेराव घातला आणि अखेरीस दत्ता सामंत या संपांचं नेतृत्व करायला तयार झाले.

दत्ता सामंतांचे भाऊ दादा सामंत कापड उद्योगात होते. त्यांनीही अनेक गिरण्यांमध्ये कामगारांचं नेतृत्व केलं होतं. हा संप करू नये असा काकुळतीने सल्ला त्यांनी दिला होता. मात्र कामगारांच्या भावनेपुढे त्यांचं काहीही चाललं नाही.

अखेर 17 जानेवारी 1982 ला महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन या सामंतांच्या संघटनेने संपाची घोषणा केली. तेव्हा दत्ता सामंत म्हणाले, "तुमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शांततेने लढा द्या. उद्या मला अटक झाली तर कामावर परत येण्याच्या धमक्या तुम्हाला येतील. त्याला भीक घालू नका. तसंच पोलिसांनाही दडपशाही न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. असं झाल्यास कामगारांनी काही तीव्र प्रतिक्रिया दिली तर त्याला सामंत जबाबदार राहणार नाही असं त्यांनी सांगितलं.

या दिवसापासून गिरणी कामगार ही लढाई शिस्तबद्ध पद्धतीने लढले असं किसन साळुंके यांना वाटतं. दोन लाखांचा मोर्चा निघाला तर रस्त्यावरच्या एकाही चणेवाल्याकडून फुकटात काही खायचं नाही अशी तंबी सामंतांनी कामगारांना दिली होती. ती कामगारांनी तंतोतंत पाळली. काही कामगार देशोधडीला लागले मात्र त्यांनी लढवय्या बाणा सोडला नाही. कामगारांच्या परिस्थितीचं काही चित्रपटांतून अतिरंजित चित्रण करण्यात आलं आहे असं त्यांना प्रकर्षाने वाटतं.

निवृत्ती देसाई हे खरं तर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे प्रतिनिधी होते. त्यांचा संपाला विरोध होता. संपाच्या काळातही ते त्यांच्या मिलमध्ये जात राहिले. पण संपाचे दिवस आठवले की आजही त्यांच्या अंगावर काटा येतो असं ते सांगतात.

या संपाचा काहीही तोडगा निघाला नाही. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, त्यात राजकारण मध्ये आलं. आजही हा संप अधिकृतपणे संपलेला नाही. अठरा महिन्यानंतर संप विखुरला गेला. लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक कामगार गावाकडे निघून गेले, ते परत आलेच नाहीत.

अनेकांनी वेगवेगळे व्यवसाय स्वीकारले. निवृत्ती देसाईंसारख्या व्यक्तींनी गिरणीत जाणं चालूच ठेवलं. आता सत्तरीच्या घरात असलेली ही मंडळी संपाच्या दिवसांबद्दल भरभरून बोलतात. निवृत्ती देसाईंच्या मते मिल मालकांमुळे ही वेळ शहरावर आली.

साधारणत: या संपात सर्वच गिरणी कामगार होरपळले गेले असं चित्र उभं केलं जातं. मात्र किसन साळुंकेंसारख्या कामगारांनी काळाची पावलं ओळखत आधीच एक समांतर व्यवसाय चालू केला होता. त्यामुळे संपाचा फटका त्यांना बसला नाही. मात्र त्याची झळ बसलेल्या कुटुंबीयांची आठवण ते आजही काढतात. समांतर व्यवसाय स्वीकारला म्हणून गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठीही ते आजतागायत लढत आहेत.

ज्येष्ठ लेखिका नीरा अडारकर यांनी one hundred years one hundred voices या पुस्तकात या लढ्याबद्दल विस्ताराने लिहिलं आहे. त्यांच्या मते हा लढा कामगारांच्या आशेचा होता. त्यात कोण यशस्वी झालं, कोण जबाबदार आहे हा खूप गुंतागुतींचा मुद्दा आहे. मात्र इतक्या मोठ्या संख्येने कामगार इतका मोठा काळ लढले हेही जगाच्या इतिहासात महत्त्वाचं उदाहरण आहे.

संदर्भ

  • The Long haul- Rajani Bakshi
  • Understanding the Bombay Textile strike of 1982-83- Ravi Ghadge
  • Writings of SA Dange.
  • ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर आणि लेखिका नीरा अडारकर यांच्याशी झालेली चर्चा

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी'हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)