You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर प्रदेश निवडणूक: केशव प्रसाद मौर्य धर्मसंसदेच्या प्रश्नावर भडकले, पत्रकाराचा मास्क खाली ओढला
धर्मसंसदेबाबत प्रश्न विचारल्याने नाराज झालेल्या उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी मुलाखत थांबवली. चित्रित झालेला भाग डिलिट करायला लावला.
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी निवडणुकीत लढण्याआधीच हार मानली आहे असं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे.
बीबीसी हिंदीसाठी अनंत झणाणे यांना दिलेल्या मुलाखतीत केशव प्रसाद मौर्य यांनी आगामी निवडणुकांच्या निमित्ताने अनेक मुद्यांवर मतं मांडली.
हरिद्वार येथे झालेल्या धर्मसंसदेबाबत मुस्लिमांविरोधात करण्यात आलेल्या वक्तव्यांबाबत विचारण्यात आल्यानंतर केशव प्रसाद मौर्य नाराज झाले आणि त्यांनी मुलाखत थांबवली.
व्हीडिओचा तो भाग त्यांनी डिलिट करायला लावला यासंदर्भात तुम्ही सविस्तर वाचू शकाल.
व्हर्च्युअली निवडणुका लढवण्यासाठी बाकी पक्षांकडे भाजपसारखा पैसा नाही. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगाकडे पैसे देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मौर्य यांना विचारलं असता ते म्हणाले, "2017प्रमाणे 2022मध्येही समाजवादी पक्षाचा पराभव अटळ आहे. गुंडगिरी, दंगल, माफियाराज, भ्रष्टाचार करणारे जनतेला नको आहेत. तेव्हाही त्यांचा पराभव पक्का होता. निवडणुकांची घोषणा होताच त्यांनी हे मान्य केलं आहे. त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो."
भाजपने माफियांविरोधात कारवाईचा उल्लेख केला त्यावेळी अतीक अहमद, मुख्तार अन्सारी, आजम खान यांचंच नाव का घेतलं जातं? विकास दुबेचं नाव का घेतलं जात नाही?
यावर मौर्य म्हणाले, "सर्वसामान्य माणसं ज्या नावाला घाबरतात ती व्यक्ती कोण आहे? राजकारणाचं गुन्हेगारीकरण याचं प्रतीक म्हणजे तुम्ही ज्याचं नाव घेतलं तो. पोलिसांशी झालेल्या चकमकीत विकास दुबे मारला गेला. त्या प्रसंगाबाबत पोलिसांनी उत्तर दिलं आहे."
योगी आदित्यनाथ मथुरेतून निवडणूक लढणार अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्याबाबत मौर्य म्हणाले, "आदरणीय योगी आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही शानदार काम केलं आहे. विकासाच्या मुद्यावर विरोधी पक्षाने बोलावं. त्याबाबत बोलता येत नसल्याने ते पळ काढतात. ते जनतेसमोर येऊ शकत नाहीत. जनतेला सगळं काही माहिती आहे. ते त्यांना काही विसरून देणार नाही."
धर्मसंसदेबाबत प्रश्न
हरिद्वार येथे झालेल्या धर्मसंसदेत प्रक्षोभक वक्तव्यं केल्यानंतरही मुख्यमंत्री मौन बाळगतात. यामुळे चिथावणीकारक बोलणाऱ्यांना प्रोत्साहनच मिळतं. त्यांना पुन्हा असं वागायला खतपाणीच घातलं जातं. कोणत्याही धर्माच्या आम्ही विरोधात नाही असं तुम्ही सांगायला नको का?
असा प्रश्न प्रतिनिधीने विचारल्यावर, मौर्य म्हणाले, "भाजपला प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांचा विकास करण्यावर आमचा भर आहे. धर्माचार्यांना मंचावरून त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही फक्त हिंदू धर्माचार्यांचीच वक्तव्यांबद्दल का सांगता? बाकी धर्मीयातील धर्मगुरू काय काय बोलले आहेत. त्यांच्याविषयी तुम्ही का बोलत नाही?"
"जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा मिळवून देणारं कलम 370 रद्द होण्यापूर्वी किती लोकांना काश्मीर सोडावं लागलं याविषयी तुम्ही का बोलत नाही? तुम्ही प्रश्न विचारताय तर ते एकांगी असू नयेत. धर्मसंसद भाजपची नाही. ती संतांची आहे. संत त्यांच्या बैठकीत काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे."
नरसिंहानंद गाजियाबादचे आहेत, अन्नपूर्णा अलीगढच्या आहेत. ही मंडळी ज्या पद्धतीचं वातावरण तयार करत आहेत. त्यांच्यावर कारवाई का होत नाही?
यावर मौर्य म्हणाले, "कोणी काही वातावरण करत नाही. जे योग्य असतं, जे उचित असतं, जे त्यांच्या व्यासपीठाला योग्य वाटतं ते बोलतात. राजकारणाशी संबंध नसलेल्या गोष्टी तुम्ही विचारत आहात. तुम्ही ज्या गोष्टींबद्दल बोलत आहात त्या मी पाहिलेल्या नाहीत.
"धर्मगुरू केवळ हिंदूधर्मीय नसतात. मुस्लीमधर्मीय धर्मगुरू असतात. ख्रिश्चनधर्मीयही असतात. बाकी धर्मगुरू काय काय बोलत आहेत ते ऐकून प्रश्न विचारा. मी प्रत्येकाचं उत्तर देईन. तुम्ही याबद्दल विचारणार, हे आधी सांगितलं असतं तर मी तयारी करून आलो असतो," असं मौर्य म्हणाले.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना राष्ट्रद्रोह लावण्यात आल्याची आठवण त्यांना करून दिल्यावर ते म्हणाले, "राष्ट्रद्रोह वेगळा विषय आहे. लोकांना दिलेले मूलभूत अधिकार आणि राष्ट्रद्रोह यांची गल्लत करू नका.
"भारतात राहून कोणी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत असेल तर ते सहन करून घेतलं जाणार नाही. त्याला देशद्रोहीच म्हणायला हवं. त्याच्यावर कारवाईही व्हावी. धर्मसंसद प्रत्येक धर्माची होते. त्यांना जे म्हणायचं आहे ते म्हणू शकतात," मौर्य म्हणाले.
साधारण 10 मिनिटं या प्रश्नावर बोलल्यानंतर मौर्य म्हणाले की तुम्ही निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारा.
हे प्रश्न निवडणुकीसंदर्भातच आहेत असं सांगितल्यावर मौर्य भडकले आणि बीबीसीचे प्रतिनिधी अनंत झणाणे यांना म्हणाले की, "तुम्ही पत्रकार म्हणून नाही तर एजंट म्हणून बोलत आहात."
त्यानंतर त्यांनी मुलाखतीसाठी जॅकेटवर लावलेला माईक काढून टाकला. मुलाखत तिथेच थांबवली. कॅमेरा बंद करायला सांगितलं. त्यानंतर त्यांनी बीबीसी प्रतिनिधीचा मास्क चेहऱ्यावरून खाली खेचला. सुरक्षारक्षकांना बोलावून मुलाखतीचा व्हीडिओ डिलिट करायला लावलं.
कॅमेरामनला सक्तीने डिलिट करावं लागलेले व्हीडिओ आम्ही पुन्हा मिळवले आहेत. दोन्ही कॅमेऱ्यातून व्हीडिओ डिलिट झाला आहे याची खात्री मौर्य यांच्या सुरक्षारक्षकांनी घेतली. पण कॅमेऱ्याच्या चिपमधून व्हीडिओ रिकव्हर करता येतो.
बीबीसीने केशव प्रसाद मौर्य यांच्या मुलाखतीचा व्हीडिओ एडिट न करता प्रसिद्ध केला आहे. व्हीडिओतून काहीही काढलेलं नाही, काही नव्याने वाढवलेलं नाही.
वर उल्लेखलेला घटनाक्रम कॅमेरा बंद करायला लावल्यानंतर घडला आहे त्यामुळे तो कॅमेऱ्यात कैद होऊ शकलेला नाही. उपमुख्यमंत्री जॅकेटवरचा माईक काढताना तुम्हाला दिसतात. त्यानंतर कॅमेरा बंद करावा लागला.
बीबीसीने याप्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप राष्ट्रीय अध्यक्ष, उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तूर्तास यापैकी कोणीही उत्तर दिलेलं नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)