You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिंदू, हिंदुत्व आणि हिंदूवाद- RSS आणि गांधीवादींची या शब्दांची व्याख्या काय आहे?
हिंदू, हिंदुत्व आणि हिंदूवाद...काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच हिंदू हे हिंदुत्वापासून वेगळं असल्याचं म्हटलं होतं.
या शब्दांमध्ये, संकल्पनांमध्ये काय साधर्म्य आहे, काय फरक आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राकेश सिन्हा आणि गांधीवादी विचारांचे तुषार गांधी यांनी आपापली भूमिका मांडली.
राकेश सिन्हा
हिंदू अस्तित्व म्हणजे तुमची श्रद्धा, जन्म आणि मनाने हिंदू असणं. हिंदू या ओळखीप्रति सजग असणं आणि त्या चैतन्याप्रति विचारांचा विकास होणं म्हणजे हिंदुत्व
हिंदू असण्याचं तात्पर्य म्हणजे क्षमाभाव, प्रेम, आचरणातील शुद्धता. अहिंसेच्या मार्गाने वाटचाल करणं. वैविध्यतेचा आदर करणं.
हिंदू हा शब्द भाववाचक आहे. याला आम्ही संकल्पना मानत नाही. हिंदू चा अर्थ वैविध्यतेला महत्त्व देणं. ही विविधता कृत्रिम नाही. हिंदूच्या अंर्तमनात ते वसलं आहे. विविधतेविना हिंदू हा शब्द अर्थहीन आहे.
हिंदू होणं म्हणजे या कार्यकारणभावांविषयी सजग असणं, त्याला शरण न जाणं हे हिंदुत्व आहे. हिंदुत्व शब्द विनायक दामोदर सावरकर यांच्या पुस्तकामधून आला आहे मात्र सावरकर हिंदुत्वाचे पहिले किंवा शेवटचे पाईक नाहीत. विचारांच्या श्रृंखलेत एका कालखंडातले ते विचारवंत होते.
हिंदुत्वाचा दुसरा अर्थ, अंतर्गत आणि बाह्य आव्हानांना सामोरं जाणं. जातपात, स्पृश्य-अस्पृश्य या समाजातील समस्या आहेत. बालविवाह, सती हेही बाह्य आव्हानं आहेत. त्याचं निराकरण करणं म्हणजे हिंदुत्व. धर्म परिवर्तन, बाहेरून होणारी आक्रमणं याचाही हिंदुत्वाने वेळोवेळी सामना केला आहे. या आव्हानांवर हिंदुत्वाने मात केली आहे.
हिंदुत्वाची ठोस अशी व्याख्या नाही. वेळ, परिस्थिती आणि आव्हानांनुसार हिंदुत्वाचा संदर्भ बदलतो. समर्थ रामदास हिंदुत्ववादी होते. त्यांनी धर्म आणि अध्यात्माच्या माध्यमातून तत्कालीन आव्हानांचा सामना केला. लोकांमध्ये हिंदुत्वाप्रति चैतन्य जागृत करण्याचं काम केलं. तुम्ही हिंदू आहात हे त्यांनी लोकांना सांगितलं. हिंदू राहिला नाहीत तर तुमच्या अस्तित्वाला अर्थ नाही.
रविदास यांनी हिंदूंना त्यांच्यातील अंतर्गत आव्हानांचा सामना करायला सांगितलं. बिपिन चंद्र पाल, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय हे समाजसुधारक होते. या सगळ्यांना हिंदुत्वाला पुढे नेलं.
बिपिनचंद्र पाल यांनी 'सोल ऑफ इंडिया' नावाचं पुस्तक लिहिलं. हिंदूंना जागृत करणं हे त्यामागचं उद्दिष्ट होतं. भारत हिंदू राष्ट्र आहे हे ते म्हणाले होते. भारत आपल्या अस्तित्वाने, कृतीने हिंदू आहे, घटनात्मकदृष्ट्या हिंदू नाही.
याचधर्तीवर सावरकर यांनी कठीण परिस्थितीत हिंदुत्व हे भौगोलिक-सांस्कृतिक राष्ट्रवाद या परिप्रेक्ष्यातून मांडलं. डॉ. हेडगेवारांनी हिंदुत्वाची सर्वसमावेशक मांडणी केली. पूजापद्धती आणि श्रद्धेच्या पल्याड नेलं.
त्यामुळे हिंदुत्वासंदर्भात त्यांचं योगदान मोलाचं आहे. भारताप्रति श्रद्धेय, विविधतेवर विश्वास, संस्कृतीशी जोडलेलं असणं, आचारविचाराच्या-पूजेच्या विभिन्न पद्धती या सगळ्यांची जपणूक करणारा हिंदूच आहे.
हिंदूवाद, हिंदुइज्म असं काहीच नसतं. हे शब्द, विचार ... देणगी आहेत. जसं इस्लामवाद, ख्रिश्नचवाद नाही तसंच आहे. इस्लामिज्म, ख्रिश्च्नानिझ्म नाहीये तसंच हिंदुइज्म नाहीये.
हिंदूंना एका विचारप्रवाहात बांधलं जाऊ शकत नाही. धर्म आणि अध्यात्म यात मूलभूत फरक असतो. धर्म ही एक ठोस संकल्पना आहे. त्याची विशिष्ट रचना आहे. धर्मात अंतर्गत धागे असतात. त्या धर्माचं होण्यासाठी त्या विशिष्ट आचारविचारांचं पालन करणं आवश्यक असतं.
हे पुस्तकाच्या रुपात असो, पैगंबरांच्या रुपात किंवा कर्मकांड स्वरुपात. … म्हणून हिंदू धर्माचं रुप देण्यात आलं. प्रत्यक्षात हा एक अध्यात्मिक प्रवास आहे. हिंदूंची तुलना इस्लाम, ख्रिश्चन अन्य कुठल्याही धर्माशी करणं चूक आहे. हा त्या दोन्ही धर्मांवर अन्याय केल्यासारखं आहे.
हिंदुत्व प्रयोगशील आहे. प्रयोगशीलतेमुळे भारत ही अध्यात्मिक प्रयोगशाळा आहे. संपूर्ण जगात राजकीय लोकशाही आहे. सामाजिक लोकशाही आहे. अध्यात्मिक लोकशाही हिंदूंमध्ये आहे.
अध्यात्मिक वैविध्यता आहे. आम्ही शंकराचार्यांनाही आव्हान देऊ शकतो. आम्ही कुणाचाच अंतिम शब्द किंवा अमुक एकाला अंतिम व्यक्ती मानत नाही. अध्यात्मिक वैविध्य फक्त हिंदूंमध्ये आहे. बाकी धर्मांमध्ये हे पाहायला मिळत नाही.
हिंदूंची तुलना एकेश्वरवादाशी केल्याने हिंदूवादात त्याला परिवर्तित करण्याचा प्रयत्न केला गेला. हिंदूवाद असं काहीच नाही असं आम्ही मानतो. मेघालयातील खासी किंवा झारखंडमधील मुंडा आदिवासी आपापली संस्कृती जपतात. आपापल्या आचारविचारांसह हे सगळे जण हिंदू आहेत. या सगळ्यांच्या प्रथा, परंपरा, रीतीभाती वेगवेगळ्या आहेत पण तरीही हे सगळे हिंदू आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गांधीवाद यांचा विचार केला तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गांधीवादात समानता खूप आहेत, फरक कमी आहे. गांधींनीच रामराज्याची मांडणी केली होती. भारताकडे असलेलं ज्ञान, संसाधनं या सगळ्यासह त्यांनी स्वातंत्र्याच्य़ा आंदोलनाला प्रेरणा दिली. आधुनिक जगात पाश्चिमात्य आणि पूर्वेकडचे यांच्यात जो संवाद होतो तो होण्याचं कारण महात्मा गांधी आहेत.
गांधीजींची स्वराज्याशी असलेली बांधिलकी यामुळे ते संघाच्या विचारधारणेशी संलग्न होतात. हिंदुत्व या शब्दाचा उच्चार त्यांनी केला असेल किंवा नसेल पण त्यांचे भाव तसेच होते. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 13 दिवस शाखा बंद ठेवल्या होत्या. संघाने हे असं कधीच केलं नाही.
स्वदेशी, स्वराज्य आणि सत्याग्रह हा गांधीजींचा मंत्र होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही तोच मंत्र आहे. संघाने 1925 पासून स्वदेशी आणि स्वराज्य यांचा पुरस्कार केला आहे. आपल्या मुळाशी जोडलेलं असणं याला संघाने आपलं मानलं आहे.
तुषार गांधी
हिंदू ही ओळख आपल्याला देण्यात आली. हिंदूवाद समाजाचं, धर्माचं प्रतीक आहे. समाज आणि धर्माचं राजकीयीकरण करण्याचं हिंदूत्व हे एक साधन आहे.
हा हिंदूवाद आहे. जी माणसं हिंदू धर्माचे रुढी, प्रथा-परंपरांचं पालन करतात, त्यांचं समर्थन करतात त्यांना हिंदूवादी म्हटलं जातं. यामध्ये लिखित स्वरुपात काही नाही. इथे सगळं पारंपरिक आहे. जी माणसं वर्षानुवर्षे सुरू असलेल्या प्रथा परंपरा पाळतात त्यांना हिंदूवादी म्हटलं जाऊ शकतं.
हिंदू आणि हिंदुत्वात फरक काय तर गांधी हिंदू होते तर नथुराम गोडसे हिंदुत्ववादी होते. हिंदू आणि हिंदुत्व यातला फरक समजून घेण्याचं यापेक्षा चांगलं उदाहरण काय?
हिंदू, हिंदुत्व आणि हिंदूवाद एकदुसऱ्याचा भाग आहेत. पण मला असं वाटतं की हिंदुत्वाचं हिंदू किंवा हिंदूवादाशी काही देणंघेणं नाही. कारण ते राजकीय हत्यार आहे. सत्ता मिळवण्याचं साधन आहे.
आपण हिंदूधर्मीयांबद्दल विचार केलं तर हिंदुवादी माणसांबद्दल बघितलं तर त्यांचंही हिंदुत्वाशी काही देणंघेणं नाही. राजकीय गट-पक्षांचा सत्ता मिळवण्यासाठीचं हिंदुत्व साधन आहे.
कटू सत्य हे की हिंदुत्व सगळ्यात मजूबत गोष्ट आहे. आजही हिंदू धर्म मजबूत नाही. हिंदुवाद त्याहून नाही. सध्या हिंदुत्वाने जोर पकडला आहे. हिंदुत्व अशा पद्धतीने बळकट होत गेलं तर भारताचं भविष्य अंधकारमय आहे.
धर्माचं पुनप्रतिष्ठा मिळवून देत आहोत असा दावा हिंदुत्ववादी करतात. हिंदू धर्माचा गौरव वाढवत असल्याचंही सांगतात. हिंदू धर्मातली उदारता हेच त्याचं वैशिष्ट्य आहे.
हिंदू धर्म इतका प्रदीर्घ आहे आणि तळपतो आहे. हिंदू धर्माच्या पुनर्निमार्णाच्या गोष्टी जे करत आहेत ते स्वत:ला धर्मापेक्षा मोठं समजत आहेत.
या लोकांना वृथा घमेंड आहे. ही घमेंड पाप आहे. माणसामध्ये जेव्हा ही भावना जागृत होते तेव्हा मी धर्मापेक्षा मोठा आहे तेव्हा ही घमेंड विनाशाला कारणीभूत ठरते.
गांधीवादाचं मोठेपण हे जी माणसं गांधींच्या विचारांना मानतात ते सगळ्या विचारप्रवाहांचा आदर करतात. भलेही त्या विचारांना विरोध असेल तरीही त्या विचारांचं आदर केला जातो. खऱ्या हिंदूंची ओळख हीच असते जो सर्व विचारधारांना महत्त्व देतो. विभिन्न विचारांचा सन्मान करणं म्हणजे हिंदू होणं.
46719642
आम्ही एखाद्या विचारांचा विरोध केला तरी सन्मानपूर्वक करतो. कोणालाही कमी लेखत नाही. सत्य आणि असत्य अशी मांडणी करतो. खोटेपणाला आकड्यांची आवश्यकता असते, सत्याला संख्याबळ लागत नाही. एखादा माणूसही खरं बोलला तरी पुरेसं असतं. सत्य हे सत्यच असतं. खोटं गळी उतरवण्यासाठी हजारो लोकांना सांगावं लागतं. हिंदू सत्याचं प्रतीक आहे आणि तोच सत्याग्रह करतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गांधीवादी यांचा हिंदुत्वाप्रति दृष्टिकोन वेगळा आणि भिन्न स्वरुपाचा आहे. संघाचं हिंदुत्व संकुचित स्वरुपाचं आहे आणि ते ठराविक लोकांपुरतं आहे. ते आणखी कोणाला यामध्ये सहभागी करू इच्छित नाहीत. बापूंचं हिंदूवाद वैश्विक होतं. त्यांच्या मनात सगळ्यांना समान स्थान होतं. ते विविध जीवनशैलींना सन्मानाने वागवत असत. एकप्रकारे सगळ्यांना सामावून घेण्याची शक्ती त्यांच्याकडे होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा लोकांनाच आपलंसं करतात जे त्यांच्या हिंदुत्वाची कास धरतात. जी माणसं त्यांच्या हिंदुत्वाची कास धरतात संघ त्यांच्यातही वर्गीकरण करतात. उच्चनीचतेला खतपाणी घालणाऱ्या परंपरेला ते सुरू ठेवतात. गांधींचा हिंदूवाद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदुत्व यात कोणतंही साधर्म्य नाही.
संघ जी विचारधारा प्रमाण मानतात त्यासाठी त्यांना प्रमाणपत्र धुंडाळावी लागतात. गांधींपेक्षा मोठं प्रमाणपत्र असू शकत नाही. ते लोकांचा वापर करून आपली तत्वं योग्य आहेत असा प्रयत्न करतात. गांधींचा उपयोगही ते अशाच कारणासाठी करतात.
गांधींच्या हिंदुवादात कोणालाही वेगळं काढलं जात नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचं हिंदुत्व कोणालाही सहभागी करून न घेण्यावर आधारलेलं आहे.
मला असं वाटतं की आजच्या घडीला आपल्याला हिंदू, हिंदुत्व आणि हिंदूवाद कसलीच आवश्यकता नाही. आपण एकमेकांना समजून घेणं ही काळाची गरज आहे. धर्मनिरपेक्ष विचारसरणीची आवश्यकता आहे. आज आपल्याला धार्मिक ओळखीची गरज नाही.
भारताच्या नावावर घृणास्पद आणि हिंसक घटनांच्या जखमा भळभळत आहेत. त्या जखमांचे घाव भरून येण्यासाठी सर्वधर्मसमभाव आवश्यक आहे. ही आपली विचारधारा नेहमीच होती, पण आता त्याचं खऱ्या अर्थाने पालन करण्याची वेळ आली आहे. समाजातून धार्मिक ओळखीचं लेबल बाजूला काढायला हवं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)