You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व असं खरंच भारतीय हिंदूंना का वाटतं?
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी
सच्चा भारतीय होण्यासाठी हिंदू असणं आवश्यक आहे का? निदान 64% भारतीयांना तरी असंच वाटतंय.
भारत एरवी धर्मनिरपेक्ष देश आहे पण भारतीय लोकांची मानसिकता धर्मनिरपेक्ष आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय.
कारण, एका नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून असं समोर आलंय की भारतातल्या 64% हिंदूंना वाटतं की सच्चा भारतीय असण्यासाठी हिंदू असणं आवश्यक आहे.
लोक हिंदुत्वाला राष्ट्रीयत्वाशी का जोडतायत, हा बदल आता झालाय की आधीपासून आहे जाणून घेऊया
प्यूचं सर्वेक्षण काय सांगतं?
दोन वर्षांपासून काही राज्यांमध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदे अस्तित्वात यायला लागले. म्हणजे आंतरधर्मीय विवाहांना रोखण्याचा मार्ग कायदेशीर झाला आणि त्यातून देशवासीयांचा आंतरधर्मीय विवाह आणि मूळात धार्मिकता याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे समजून घ्यायची गरज निर्माण झाली.
भले हे कायदे बळजबरीने होणाऱ्या आंतरधर्मीय लग्नांसाठी होते, पण काही अशाही तक्रारी पुढे आल्या की स्वेच्छेने होणारे लग्नही यामुळे थांबवले गेले.
प्यू रिसर्च सेंटर या अमेरिकन थिंक टँकने भारतात धर्म, राष्ट्रीयत्व आणि लग्न या विषयांवर सर्व्हे केला.
प्यू अशा प्रकारचे अनेक सर्व्हे जगभर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी 26 राज्यं आणि 3 केंद्रशासित प्रदेशांत मिळून 30,000 लोकांना धर्म आणि धार्मिकतेवर प्रश्न विचारले. त्यांचे निष्कर्ष असं सांगतात की,
64% म्हणजे दोन तृतीयांश हिंदूंना हिंदू असणं म्हणजेच खरा भारतीय असणं असं वाटतं.
म्हणजे त्यांची धार्मिकता आणि राष्ट्रीयत्व यांची ते सांगड घालतात.
तर 59% हिंदू हिंदी बोलण्याशी राष्ट्रीयत्वाचा संबंध असल्याचं मानतात.
इतकी वर्षं एकत्र नांदत असूनही 66% हिंदूंना वाटतं की, त्यांच्यात आणि इतर धर्मांत काहीच साम्य नाही. नेमकी हीच भावना 64% मुस्लिमांमध्येही आहे.
36% हिंदूंना मुस्लिमांचा शेजार नको असतो. तर हीच भावना 16% मुस्लिमांमध्ये हिंदूंविषयी आहे.
जवळ जवळ सगळ्याच धर्मियांना आंतरधर्मीय विवाह थांबवणं हे खूप महत्त्वाचं वाटतं. यात मुस्लीम 81%नी आघाडीवर आहेत. तर 67% हिंदूंनाही तसंच वाटतं.
पहिल्या मुद्यावर परत एकदा जाऊया. प्रश्न असा आहे की, हिंदू धर्म हीच राष्ट्रीयता असल्याचा समज हिंदू धर्मीयांमध्ये पूर्वीपासून होता की, अलीकडे वाढलाय? आणि मूळात असं त्यांना का वाटतं?
हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व
भारतातले राजकीय आणि सामाजिक बदल या अंगांनी या प्रश्नांचा विचार झाला पाहिजे. 2011च्या जनगणनेनुसार, देशात 81% 18 वर्षांवरची लोकसंख्या हिंदू आहे.
हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व असं समजण्याची भावना बहुसंख्यांक असल्याच्या वर्चस्वाच्या भावनेतून आली आहे की, त्यामागे आणखी काही कारणं आहेत?
पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रुती तांबे यांच्यामते याचा संबंध जागतिकीकरण आणि बदलत्या समाज रचनेशीही आहे. समाजाकडून लोकशाहीचा चुकीचा अर्थ लावला जातो, असं त्या म्हणतात.
"नागरी, स्थलांतरित, शिक्षित-अर्धशिक्षित असा तरुणांचा हा नवा भारत आहे. तसेच हा भारत जागतिकीकरणाच्या रेट्यातही ओढला गेला आहे. या जागतिकीकरणाचा 21व्या शतकात दिसणारा एक परिणाम म्हणून संकुचित मनोवृत्तीकडे पाहिलं पाहिजे," डॉ. तांबे यांनी आपला मुद्दा मांडायला सुरुवात केली.
पुढे तरुणांमध्ये हा संकुचितपणा कसा आणि काय येतो हे सांगताना त्या म्हणतात, "एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान यांच्या मदतीने जागतिक पातळीवर समाज एकत्र येतो. हा झाला जागतिकीकरणाचा एक चेहरा. दुसरा चेहरा असा की, बाहेरुन मुक्त दिसणारा हा समाज मनाच्या एका कोपऱ्यात मात्र सामाजिक संबंधांविषयी अतिशय पुराणमतवादी, मध्ययुगीन वाटावा असा संकुचित राहतो."
त्यांच्या मते, हिंदुत्व ही हिंदूंच्या राजकीय महत्त्वाकांक्षेची फलश्रुती आहे. पण, जगभरात प्रत्येक देशांत एक समूह असा असतो जो, धर्म आणि समाजाचा असा बंदिस्त विचार करतो, असं त्या म्हणतात.
हिंदुत्वाचा राजकीय वापर होतोय?
राजकीय दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर देशात सध्या उजव्या विचारसरणीचं भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेत आहे.
भाजप उघडपणे हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करतं. त्यांच्यावर मुस्लीमविरोधी असल्याचा आरोप झाला आहे.
प्यूचं सर्वेक्षण बघाल तर 60% हिंदू आपलं मत भारतीय जनता पार्टीला देतात असं स्पष्ट होतं. बहुसंख्यांक हिंदूंच्या मनातली राष्ट्रीयत्वाची भावना ही केवळ राजकीय आहे की त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो?
राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर याबद्दल म्हणतात, "या सर्वेक्षणाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे यातल्या निष्कर्षांवरून समाजमन थोडं फार कळायला नक्की मदत होते. यात 60% च्या वर हिंदू लोक हिंदू राष्ट्रवाद मानतात हा भारतीय जनता पार्टीसाठी आकर्षक आणि समाधानकारक निष्कर्ष असेल.
"कारण, पूर्वीपासूनच उजव्या पक्षांचा प्रयत्नच मुळी हिंदुत्व आणि राष्ट्रवाद यांची सांगड घालण्याचा होता. आणि मागच्या 25-30 वर्षांत तसं करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
"भाजपसाठी तो व्यापक राजकारणाचा भाग आहे. निवडणुका येत जात असतात, तिची गणितं वेगळी असतात. पण, हिंदू समाजाच्या स्वभावात बदल करण्यात ते यशस्वी झाले आहेत, असं हे सर्वेक्षण आपल्याला सांगतं. यापुढे जाऊन संविधानात तसे बदल लगेच होतील असं मात्र वाटत नाही."
धार्मिक मतं काहीही असली तरी याच सर्वेक्षणात सगळे धर्म एकत्र नांदले पाहिजेत ही भावना म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याच्या बाजूने सर्वधर्मीयांनी कौल दिला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)