धर्म संसदेविरोधात तक्रार करणाऱ्या तरुणाला कशाची भीती वाटत आहे?

    • Author, शाहबाझ अन्वर
    • Role, हरिद्वारहून बीबीसी हिंदीसाठी

डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हरिद्वारमध्ये झालेल्या तथाकथित हेट स्पीचचा व्हायरल व्हीडिओ लाखो लोकांप्रमाणेच गुलबहार कुरेशी यांनीही पाहिला होता.

पण सोशल मीडियावर त्यावर प्रतिक्रिया देणं, किंवा वाद घालत बसण्याऐवजी कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या या 25 वर्षीय विद्यार्थ्यानं 'संविधानानं दाखवलेला मार्ग' अवलंबला.

गुलबहार कुरेशी यांच्या तक्रारीवरूनच 23 डिसेंबरला पोलिसांनी हरिद्वार याठिकाणी एफआयआर दाखल केला आहे.

या प्रकरणी शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी ज्यांचं नवं नाव जितेंद्र त्यागी आहे, त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

उत्तराखंड पोलिसांनी याबाबत 23 डिसेंबरला ट्विट केलं होतं. त्यात, "सोशल मीडियावर विशिष्ट धर्माच्या विरोधात चिथावणीखोर भाषण देत द्वेष पसरवण्यासंबंधी व्हायरल होत असलेल्या व्हीडिओची दखल घेत वसीम रिझवी उर्फ जितेंद्र नारायण त्यागी आणि इतरांच्या विरोधात हरिद्वार याठिकाणी आयपीसीच्या कलम 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे," असं म्हटलं होतं.

"हरिद्वारमधील व्हीडिओ पाहिल्यानंतर मला वाटलं की, यामुळं देशातच नव्हे तर विदेशातही भारताची प्रतिमा खराब होईल. व्हीडिओमध्ये जे काही म्हटलं गेलं आहे, ते संविधानाच्या विरोधी आहे. व्हीडिओमध्ये एका ठरावीक समुदायाच्या विरोधात नरसंहाराबाबत बोललं जात आहे. अशा विचारांना आपल्या देशात स्थान नाही. हे सर्व घटनेच्या विरोधी आहे," असं गुलबहार बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.

गुलबहार कुरेशी बोलताना वारंवार यावर जोर देत होते की, त्यांचा हा लढा एखाद्या धर्मासाठी नाही, तर संविधान आणि देशाच्या सुरक्षेसाठी आहे.

मात्र, त्यांनी पोलिसांत जी तक्रार दाखल केली आहे, त्यात इस्लामचे अखेरचे पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याबाबतच्या कथित वक्तव्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

"आपल्या संविधानानं याठिकाणी प्रत्येकाला राहण्याचा, खाण्याचा, करडे परिधान करण्याचा अधिकार दिला आहे. त्यांना धर्मानुसार पुजा करण्याचं स्वातंत्र्य आहे. अशावेळी एखाद्या धर्माच्या किंवा पैगंबरांच्या विषयी अशा भाषेचा वापर कसा सहन केला जाईल? हे सरळ संविधानाच्या विरोधी आहे," असं ते याबाबत बोलताना म्हणाले.

देशात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या विरोधात उभं राहून कायद्यानुसार लढा देणार असल्याचं, त्यांचं म्हणणं आहे.

हरिद्वारच्या ज्वालापूरमधील रहिवासी असलेले गुलबहार कुरेशी बीए एलएलबी अंतिम सेमिस्टरचे विद्यार्थी आहेत. सध्या एका वरिष्ठ वकिलांबरोबर ते वकिलीचे डावपेच शिकत आहेत.

या सर्वातून वेळ मिळाल्यास त्यांना क्रिकेट खेळायला आवडतं.

देवभूमी हरिद्वार

या 25 वर्षीय तरुणाचे मित्र त्यांच्या सुरक्षेबाबत चिंतीत आहेत. शहरात हरिद्वारमध्ये झालेल्या या हेट-स्पीचच्या मुद्द्यावरून अनेक लोकांमध्ये रोष आहे.

या परिसरात लोक कायम शांतता आणि बंधुभावानं राहत आलेले आहेत, असं लोकांचं म्हणणं आहे. आजपर्यंत याठिकाणी धार्मिक दंगल झालेली नाही. हे सर्वकाही निवडणुकीसाठी होत आहे.

ज्वालापूरमध्ये मिठाई आणि चॉकलेटच्या दुकानांवर सेल्समन म्हणून काम करणारे प्रमोद चौहान यांनीदेखील असंच म्हटलं. 'मुस्लिमांशी आमचं अनेक वर्षांचं व्यावसायाच्या निमित्ताने नातं आहे. आम्ही सर्व हिंदू-मुस्लिम इथं बंधुभावानं राहतो. पण बाहेरचे काही लोक येऊन वातावरण खराब करत आहेत,' असं ते म्हणाले.

साठ वर्षांचे प्रमोद चव्हाण यावेळी आमचं हरिद्वार वाचवा असंही म्हणाले.

मात्र, फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता कॅमेऱ्यासमोर हात जोडून त्यांनी नकार दिला.

'आम्ही अनेक वर्षांपासून याठिकाणी राहत आहोत. कधीही अशाप्रकारे वातावरण बिघडल्याचं पाहायला मिळालं नाही. मात्र, धर्म संसदेनंतर जे काही घडलं त्यानंतर अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. ज्यानं काही चूक केली असेल, त्याला शिक्षा मिळायला हवी,' असं शहरात हातगाडीवर व्यवसाय करणारे किशन सिंह म्हणाले.

'मी शिवसेनेचा जिल्हा कोषाध्यक्ष आहे. मी या हेट स्पीचनंतर सर्वात आधी, यति नरसिंहानंद यांचा पुतळा जाळला होता. देशाच्या अखंडतेच्या मुद्द्यावर आम्ही एक आहोत. देशासाठी प्राणही देऊ शकतो,' असं शिवसेना नेते असल्याचा दावा करणारे आणि गुलबहार यांच्या ओळखीचे आबाद कुरेशी म्हणाले.

पोलिस संरक्षण मिळावं

गुलबहार यांचे मित्र मोहम्मद अजमत अल्वी यांनी गुलबहार यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली.

'गुलबहार अशा लोकांच्या विरोधात लढत आहे, ज्यांच्याकडून त्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसं तर आम्ही दिवसभर त्याचं संरक्षण करत आहोत, मात्र, तरीही सरकारनं त्यांना संरक्षण द्यायला हवं,' असं बॉडी बिल्डर असलेले अजमत म्हणाले.

'कोणताही मुस्लीम भगवान राम किंवा सीता यांना काही म्हणत नाही. पण इस्लामबाबत अशाप्रकारची वक्तव्यं का केली जात आहेत. देशातील सरकारनं अशा लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे. आम्हाला शांतता हवी आहे,' असं जमीयत उलेमा उत्तराखंडचे अध्यक्ष मौलवी मोहम्मद आरीफ म्हणाले.

सुरक्षेबाबत गुलबहार यांनाही काळजी आहे. पण ही संविधान वाचवण्याची लढाई आहे, ती लढावीच लागेल असं ते म्हणतात.

सोबतच त्यांना हरिद्वारबाबतही काळजी वाटते.

'हरिद्वार तर देवभूमी आहे. शांतता प्रिय भूमि आहे. याची प्रतिमा जपणं आवश्यक आहे.'

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)