You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वसीम रिझवी इस्लामचा त्याग करून बनले जितेंद्र त्यागी, धर्म बदलल्यानंतर काय म्हटलं?
- Author, शहबाझ अनवर
- Role, बीबीसी हिंदीसाठी
उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी सोमवारी (6 डिसेंबर) इस्लाम धर्माचा त्याग करून सनातन धर्मात प्रवेश केला. आता त्यांचं नवीन नाव हे जितेंद्र नारायण सिंह त्यागी असेल.
त्यांनी म्हटलं, "मला यती नरसिंहानंद गिरी यांनी जे नाव दिलं, त्या नावानं मला ऊर्जा मिळाली. आज मी या मंदिरात हे. या पवित्र स्थानातून मला ऊर्जा मिळत आहे."
वसीम रिझवी यांनी सोमवारी (6 डिसेंबर) सकाळी गाझियाबाद येथील डासना देवी मंदिरात सनातन धर्मात प्रवेश केला. त्यांनी मंदिरात शिवलिंगावर दुग्धाभिषेकही केला. सोबतच वैदिक मंत्रोच्चार आणि अनुष्ठानांनंतर त्यांनी विधीवत पद्धतीने सनातन धर्माचा स्वीकार केला.
'सनातन धर्माची निवड केली, कारण...'
जितेंद्र नारायण सिंह त्यागी बनलेल्या वसीम रिझवी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
त्यांनी म्हटलं, "इस्लाममधून आम्हाला सातत्याने दूर केलं जात होतं, प्रत्येक गोष्टीत बाहेर काढलं जात होतं. आता काढलंच आहे, तर आता आम्ही स्वतंत्र आहोत. जिथे प्रेम असेल, माणुसकी असेल तिथे जाऊ. सनातन धर्म हा जगातील सर्वांत प्राचीन धर्म आहे, म्हणूनच आम्ही निवडला.
"हिंदू समाजासोबत अन्याय होत आला आहे. मुस्लिम समाजातील लोकांनी केला आहे. आजही घरं जाळण्याची स्वप्नं पाहिली जातायत."
रिझवी यांनी पुढे म्हटलं, "ISIS सारख्या संघटना हिंदूचं शिरकाण करु इच्छित आहेत, मात्र तरीही हिंदू बेफिकिर आहेत. त्यांना त्यांच्या कामातूनच फुरसत नाहीये. मला त्यांना सांगायचं आहे की, तुम्ही कोणालाही घाबरू नका. तुम्ही कोणाशी संघर्ष करा असं मी सांगत नाहीये, पण स्वतःच्या रक्षणासाठी तयारही राहायला हवं.
"मी हिंदूंना जागरुक करेन. मला कोणताही वाद-विवाद निर्माण करायचा नाहीये किंवा कोणाशीही संघर्ष करायचा नाहीये; पण कोणी आम्हाला मारावं हेही सहन करणार नाही."
6 डिसेंबरचा दिवस का निवडला?
या प्रश्नाचं उत्तर देताना वसीम रिझवी सांगतात, "आजचा दिवस खास आहे. बाबरनं प्रभू श्रीरामांना अपमानित करत मशीद बनवली होती आणि आजच्याच दिवशी हिंदुत्वानं आपल्या शक्तिचा अगदी सौम्य प्रयोग करत अवैधरित्या घेतलेला ताबाच तिथून हटवला.
"हिंदुत्वासाठी हा अभिमानाचा दिवस आहे आणि आज मी सनातन धर्माचा स्वीकार केला कारण आमचीही गोष्ट प्रभू श्रीरामांसाठीच्या मंदिर संघर्षापासूनच सुरू झाली होती."
त्यांनी पुढे म्हटलं, "मला जेव्हा पहिल्यांदा इस्लाममधून काढून टाकण्यात आलं होतं, तेव्हा प्रत्येक शुक्रवारच्या नमाजनंतर माझं आणि यतीशजींचं मस्तक कलम करणाऱ्याला घोषित केलेली बक्षीसाची रक्कम वाढवली जायची. तुम्ही कोणाला तरी जिवंत जाळत आहात, कोणाचं तरी मस्तक कलम करण्यावर बक्षीस जाहीर करत आहात. तुम्ही माणूस आहात की लांडगे?"
कुटुंब आणि राजकारणावर काय म्हटलं?
कुटुंबाविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी म्हटलं की, कुटुंबातील ज्या व्यक्ती माझ्यासोबत आहेत, त्या माझ्याबरोबर येतील आणि हा धर्म स्वीकारतील. नातेवाईक, मित्र परिवारातील जे कोणी माझ्यासोबत नसतील, त्यांचा धार्मिकदृष्ट्या आम्ही त्याग करू.
राजकारणाबद्दल बोलताना वसीम रिझवींनी म्हटलं, "जे मुसलमानांच्या मतांचं राजकारण करत आहेत, ते या गोष्टीकडे त्यांच्या दृष्टिकोनातून पाहात आहेत. पण मला स्वतःला आणि भगवान शंकरांनाही माहितीये की, राजकारण बाजूला ठेवून मी हे कर्म केलं आहे. राजकारणाचा बुरखा पांघरुन जेव्हा एखादं कार्य करायचं तेव्हा तेही करू, राजकारणातही एक ताकद असते."
इस्लामसंबंधी वादग्रस्त विधानं
वसीम रिझवी यांनी गेल्या काही वर्षांत इस्लाम धर्माबद्दल वादग्रस्त विधानं केली होती. त्यांच्याविरोधात त्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलनंही झाली होती आणि मुस्लिम समाजातील लोकांनी त्यांच्याविरोधात वारंवार आपला रागही व्यक्त केला होता.
वसीम रिझवी हे कधी मदरसे बंद करण्याची मागणी करून चर्चेत आले होते, तर कधी मदरशांमध्ये दहशतवादी तयार केले जातात यांसारखी विधानं करून त्यांनी वाद निर्माण केला होता.
मोहम्मद पैगंबरांच्या जीवनावरील पुस्तकावरूनही ते वादात अडकले होते. कुराणामधून 26 आयत हटविण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर त्यांच्याविरोधात प्रचंड नाराजीचा सूर उमटला होता.
जपान आणि अमेरिकेत केली होती नोकरी
माध्यमांमधील माहितीनुसार, वसीम रिझवी हे एका सामान्य कुटुंबातून येतात. त्यांनी 12 वी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.
त्यांच्या बहीण-भावंडांमध्ये ते सर्वांत मोठे आहेत. त्यांचे वडील रेल्वे कर्मचारी होते. वसीम रिझवी सहावीत असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं.
माध्यमांमधील वृत्तांनुसार, वसीम रिझवी यांनी सौदी अरेबियामध्ये एका हॉटेलात काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी जपान आणि अमेरिकेतही नोकरी केली होती. भारतात परत आल्यावर ते वक्फ बोर्डाचे सदस्य बनले आणि त्यानंतर उत्तर प्रदेशमधील शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले.
'भावनांसोबत खेळ केला तर...'
वसीम रिझमी यांनी इस्लाम धर्मातून सनातन धर्मात प्रवेश केल्यानंतर ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाचे जनरल सेक्रेटरी यासूब अब्बास यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अब्बास यांनी म्हटलं, "वसीम रिझमी आता हिंदू झाले आहेत, मात्र हिंदू झालो म्हणून कुराणावर किंवा इस्लाम धर्मावर टीका करण्याचा अधिकार त्यांना नाहीये. त्यांनी कोणत्याही धर्मात जावं, हा त्यांचा प्रश्न आहे.
ते पुढे म्हणतात, "स्वातंत्र्याचा अर्थ त्यांनी आमच्या धार्मिक भावनांशी छेडछाड करावी असा होत नाही. त्यांनी असं काही केलं, तर आम्हीही त्यांच्याविरोधातली लढाई सुरू ठेवू."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)