You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हरिद्वार धर्म संसद: अखिलेश यादव, मौन सोडा आणि धर्म संसदेवर बोला-ओवैसी
- Author, वर्षा सिंह
- Role, डेहराडूनहून बीबीसी हिंदीसाठी
हरिद्वार इथे आयोजित धर्म संसदेत मुसलमानांविरुद्ध द्वेष आणि हिंसा भडकावणाऱ्या वक्तव्यांविरोधात मौन सोडा आणि बोला असं एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी अखिलेश यादव यांना म्हटलं आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)चे अध्यक्ष ओवैसी यांनी ट्वीटरवर हरिद्वार धर्म संसदेबाबत बोलण्याचं आवाहन उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना केलं आहे.
ओवैसी यांनी हे आवाहन करताना #हरिद्वार _नरसंहारी संमेलन असा हॅशटॅगही वापरला आहे.
हरिद्वारमध्ये 17 ते 19 डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या धर्म संसदेमध्ये हिंदुत्वाबाबत साधु-संतांनी केलेल्या वादग्रस्त भाषणांचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या व्हीडिओमध्ये धर्मरक्षणासाठी शस्त्र उचलणं, मुस्लीम पंतप्रधान बनू न देणं, मुस्लीम लोकसंख्या वाढू न देणं यासह धर्माचं रक्षण करण्याच्या नावावर साधू-संत वादग्रस्त भाषण देत असल्याचं दिसत आहे. महिला संतदेखील यात हातातलं पुस्तक खाली ठेवून हाती शस्त्र घ्या, असं सांगताना दिसत आहेत.
या कार्यक्रमातील व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक तासांपर्यंत पोलिस प्रशासनानं काहीही कारवाई केली नाही. त्यामुळं जिल्हा प्रशासनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते.
मात्र, गुरुवारी डेहराडूनच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात हरिद्वारचे एसएसपी डॉक्टर योगेंद्र सिंह रावतही सहभागी झाले होते.
हरिद्वारच्या एसएसपी यांना या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, त्यानंतर आयपीसीच्या कलम 153अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं या बैठकीनंतर राज्याचे पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितलं.
"हे प्रकरण दुपारी लक्षात आलं आणि त्यानंतर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली," असं उशिराने गुन्हा दाखल झाल्याचं कारण देताना त्यांनी सांगितलं.
"अशा प्रकारचे चिथावणी देणारे वक्तव्य चुकीचे आहेत. त्यासाठी आम्ही हे व्हीडिओ सोशल मीडियावर ब्लॉक करण्यासही सांगितलं आहे," असं उत्तराखंडचे पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितलं.
"सोशल मीडियावर एखाद्या धर्माच्या विरोधात चिथावणी देणारं भाषण देत द्वेष पसरवण्यासंबंधी व्हायरल होणाऱ्या व्हीडिओची दखल घेत, वसीम रिझवी ऊर्फ जितेंद्र नारायण त्यागी आणि इतरांच्या विरोधात कलम 153अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे," असं उत्तराखंड पोलिसांनी ट्विटरवर निवेदनात म्हटलं.
'भगवं संविधान'
धर्म संसदेत भाजप नेते अश्विनी उपाध्याय, जुना आखाड्याचे महामंडलेश्वर आणि गाझियाबादमधील साधू यति नरसिंहानंद सरस्वती, जुना अखाड्याचे महामंडलेश्वर आणि हिंदू रक्षा सेना संघटनेचे स्वामी प्रबोधानंद, निरंजनी अखाड्याच्या महामंडलेश्वर मां अन्नपूर्णा यांच्यासह धर्म संसदेचे आयोजक पंडित अधीर कौशिक यांच्यासह हजाराहून अधिक महामंडलेश्वर, महंत, साधु-संत एकत्र जमले होते. जुना, निरंजनी, महानिर्वाणी यासह हरिद्वारचे सर्व प्रमुख आखाडे यात सहभागी होते.
अखाडा परिषदेचे अध्यक्षही या धर्म संसदेमध्ये सहभागी झाले होते.
धर्म संसदेमध्ये भाजपा नेते अश्विनी उपाध्याय 'भगवं संविधान' घेऊन आले होते. "हिंदुस्तानात हिंदी भाषेत, भगव्या रंगाचं संविधान आपल्याला वेगळं तयार करून घ्यावं लागत आहे, ही लज्जास्पद बाब आहे," असं ते म्हणाले.
"अफगाणिस्तानावर तालिबाननं ताबा केला आहे. अशी अशांती भारतातही निर्माण होऊ शकते. जगात अशांती पसरू नये ही हिंदुंची जबाबदारी आहे. आज हिंदुंनी त्यांचं कर्तव्य बजावण्याची वेळ आली आहे," असं जुना अखाड्याचे महामंडलेश्वर आणि प्रबोधानंद गिरी यांनी बीबीसी हिंदीबरोबर बोलताना म्हटलं.
"हिंदुंवर होणारे हल्ले वाढत आहेत आणि हरिद्वारमध्ये मुस्लीम लोकसंख्येचा दबदबा वाढत आहे. हिंदुंवर जर हल्ला झाला तर आम्हीही स्वसंरक्षणार्थ शस्त्र हाती घेऊ शकतो," असा दावा प्रबोधानंद गिरी यांनी केला.
मात्र त्यांना यासाठी काही पुरावे सादर करता आले नाही. तसंच या दाव्यांची काहीही विश्वसनीयतादेखील नाही.
उत्तराखंडमध्ये पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. काही तज्ज्ञांच्या मते हे सर्व निवडणुकीच्या पूर्वीचं राजकारण आहे.
मात्र प्रबोधानंद यांनी ते फेटाळून लावलं. "निवडणुकांशी आमचा काही संबंध नाही. 2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही हिंदुंच्या संरक्षणाचं अभियान सुरू केलं आहे. हरिद्वारमधील सर्व महात्मा आम्हाला पाठिंबा देत आहेत," असं ते म्हणाले.
"गेल्या सात वर्षांपासून अशा प्रकारे धर्म संसदेचं आयोजन केलं जात आहे. यापूर्वी दिल्ली, गाझियाबादमध्येही अशा धर्म संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे. याचा उद्देश हिंदुराष्ट्र बनवण्याची तयारी करणं हे आहे. त्यासाठी शस्त्र हाती घ्यावं लागलं तर तेही घेऊ," असं हरिद्वारमध्ये धर्म संसदचे स्थानिक आयोजक आणि परशुराम आखाड्याचे अध्यक्ष पंडित अधीर कौशिक म्हणाले.
"जे हिंदू चुकीच्या धोरणांमुळं अडकवले जातात त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या जामीनासाठी शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रस्ताव धर्म संसदेत ठेवण्यात आला आहे. आम्हाला दोनंच अपत्य जन्माला घाला असं सांगितलं जातं आणि त्यांचे 12-20-40 मुलंही होतात. त्यामुळं लोकसंख्या नियंत्रण कायदा सक्तीनं लागू करावा," असं ते म्हणाले.
पुढच्या धर्मसंसदेची तयारी
पंडित अधीर यांच्या मते, एप्रिल मे महिन्यात मथुरेतील वृंदावनमध्ये पुढील धर्म संसदेसाठी तयारी सुरू आहे.
"आता प्रत्येक हिंदुचं लक्ष्य हे केवळ सनातन वैदिक राष्ट्राची स्थापना हे असायला हवं. आज ख्रिश्चनांचे जवळपास 100 देश आहेत. मुस्लिमांचे 57 आहेत. बौद्धांचेही 8 देश आहेत. अगदी नव्वद लाख ज्यूंचाही इस्रायल हा देश आहे. मात्र शंभर कोटी हिंदुंचं दुर्दैव म्हणजे, त्यांच्याकडे स्वतःचा देश म्हणण्यासाठी एक इंचही जागा नाही.
"आता हिंदुंना त्यांच्या देशासाठी संपूर्ण ताकद लावावी लागेल," असं धर्म संसदेच्या संकल्पाची घोषणा करताना महामंडलेश्वर यती नरसिंहानंद गिरी महाराज म्हणाले.
अशा प्रकारचे कार्यक्रम दर सहा-आठ महिन्यांनी होत असतात आणि त्यात अशा गोष्टी होतच असतात. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांचं याकडे लक्ष वेधलं जात आहे, असं हरिद्वारचे स्थानिक पत्रकार धर्मेंद्र चौधरी म्हणाले.
"जुना आखाड्याचे प्रबोधानंद गिरी चर्चेत येण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करतात. मात्र, नरसिंहानंद आणि अधीर कौशिक मिशन म्हणून यासाठी काम करत आहेत," असंही त्यांनी सांगितलं.
कारवाईची मागणी
काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांना ट्विट करून ही सभा आणि याठिकाणी करण्यात आलेल्या वक्तव्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
"मुनव्वर फारुकी यांना त्यांच्या विनोदांसाठी शिक्षा देण्यात आली, मात्र 'धर्म संसद' च्या सदस्यांविरोधात काहीही कारवाई झाली नाही," असं ट्विट त्यांनी केलं.
"तरुणांसाठी रोजगाराची मागणी करण्याऐवजी, तसंच महागाईच्या मुद्द्यावर धर्म संसद करण्याऐवजी हे मूठभर लोक जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. बरोबर निवडणुकीच्या आधी हिंदुस्तान, पाकिस्तान, मुस्लीम असा यांचा अजेंडा समोर येतो. कोव्हिड संकटामध्ये गंगेत मृतदेह तरंगत होते, त्यावेळी त्यात हिंदु-मुस्लिम सगळेच होते.
"त्यावेळी हिंदु धर्माचा झेंडा मिरवणारे अंत्यसंस्काराला का आले नाही. अशाप्रकारची मानसिकता असलेल्यांना देश कुठे न्यायचा आहे," असं धर्म संसदेतील वक्तव्यांवर काँग्रेसच्या राज्यातील प्रवक्त्या गरिमा मेहरा दसौनी म्हणाल्या.
याठिकाणी केलेली वक्तव्य चिथावणी देणारी होती आणि न्यायालयानं तसंच पोलिसांनी याची दखल घ्यायला हवी, असं दसौनी म्हणाल्या.
त्यादिवशी नड्डा आणि धामी हरिद्वारमध्ये होते. ही धर्म संसद 17 ते 19 डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आली होती.
18 डिसेंबरला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हरिद्वारमध्ये विजय संकल्प यात्रा सुरू करण्यासाठी गेलेले होते.
त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिकही कार्यक्रमात उपस्थित होते.
कौशिक हरिद्वारचे आमदारही आहेत. मात्र याबाबत काहीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.
"मला माहितीच नाही. अशी कोणती धर्म संसद झाली याची मी माहिती घेतो. मला सकाळीही याबाबत फोन आले. 18 डिसेंबरला तर जेपी नड्डा यांच्या कार्यक्रमात आम्ही सगळे हरिद्वारमध्येच होतो," असं ते म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)