आशिया कप विजेतेपदावर भारताने नाव कोरलं, श्रीलंकेवर 9 गडी राखून दणदणीत विजय

फोटो स्रोत, Asian Cricket Council
भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाने आशिया कपचं विजेतेपद पटकावलं आहे. आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला भारताने 9 गड्यांनी पराभूत केलं.
दुबईमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पावसाचाही व्यत्यय आला होता.
या सामन्यात भारतीय संघाला 38 षटकांमध्ये 99 धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं. नंतर डकवर्थ लुईस नियमांनुसार ते 102 इतकं करण्यात आलं.
भारतीय संघाने केवळ 1 गडी गमावून अत्यंत सहजपणे हे लक्ष्य गाठलं.
भारताकडून अंगक्रिश रघुवंशीने अर्धशतकी खेळी केली. तर सेमीफायनलमध्ये 90 धावांची खेळी करणाऱ्या शेख रशीदने या सामन्यात 31 धावा बनवल्या.
तत्पूर्वी, श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संपूर्ण मॅचदरम्यान भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं.
श्रीलंकेची धावसंख्या 7 बाद 71 इतकी असताना सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे नंतर सामना 38 षटकांचा करण्यात आला.

फोटो स्रोत, Asian Cricket Council
38 षटकांमध्ये श्रीलंकेने 9 बाद 106 धावा बनवल्या. तर डकवर्थ लुईस नियमांनुसार भारताला सुरुवातीला 99 तर नंतर 102 धावांचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं.
श्रीलंकेकडून यासिरो रोड्रिगोने सर्वाधिक 19 धावा केल्या. तर राविन डीसिल्वाने 15 धावांचं योगदान दिलं.
भारताकडून विकी ओस्टवालने 3 बळी घेतले. तर कौशल तांबेने 2 बळी घेतले.
भारताने सेमीफायनलमध्ये बांग्लादेशला आणि श्रीलंकेने पाकिस्तानला मात दिली होती.
---------------------------------------------
आज दिवसभरात विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी इतर मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
सुधीर मुनगंटीवारांबाबत सोनम कपूरची पोस्ट व्हायरल
बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूर हिनं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर ते अशिक्षित, निरक्षर आणि दुर्लक्ष करणारे (Ignorant, Illiterate and Hateful) असल्याचं म्हटलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिनं ही टीका केली. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, facebook
आज सकाळी मात्र सोनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही स्टोरी दिसत नाहीये.
अभिनेत्री रिचा चड्डानेही सुधीर मुनगंटीवारांचा विधिमंडळातील व्हीडिओ ट्विट करत लिहिलंय, "असभ्य, अज्ञानी आणि तिरस्करणीय अशी टिप्पणी. इतर अनेक गोष्टींप्रमाणे आपल्या 'नेत्यांना' लैंगिक शिक्षणाची गरज आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2021 अधिनियमातील सुधारणांना विरोध दर्शवताना LGBTQIA समुदायातील सदस्यांबाबत काही वक्तव्यं केली होती. त्यावर टीका करताना सोनमनं ही स्टोरी शेअर केली.
मविआ सरकारनं मंजूर केलेल्या सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम विधेयक 2021 मधील एका तरतुदीनुसार प्रत्येक विद्यापीठाला समान संधी मंडळ स्थापन करावं लागेल. या मंडळाच्या माध्यमातून दुर्बल, महिला, लैंगिक अल्पसंख्यांक (LGBTQA), विकलांग यांना समान संधी आणि सुरक्षा मिळेल.
मात्र याला विरोध करतान मुनगंटीवार म्हणाले होते. "समलैंगिकांना तुम्ही सदस्य नियुक्त करता, काही गांभीर्य आहे का? हे विधेयक आहे. अद्याप अनैसर्गिक संबंधांची व्याख्या नाही, आपण काय कायदे करत आहोत."
राहुल गांधी अचानक परदेश दौऱ्यावर रवाना
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावरून पुन्हा एकदा चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. राहुल गांधी अचानक परदेश दौऱ्याला गेल्यामुळं या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पंजाबमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोगा याठिकाणी राहुल गांधी यांची 3 जानेवारी रोजी सभा होणार होती. मात्र, ती सभा अचानक रद्द करण्यात आली आहे. लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
राहुल गांधी खासगी कामासाठी इटलीला गेले असून ते 5 जानेवारीला परतणार असल्याचं, प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सांगितलं आहे. दरम्यान ते पक्षातील नेत्यांच्या संपर्कात असल्याचंही ते म्हणाले.
सार्वजनिक ठिकाणी नमाज चुकीचेच, ते शक्तीप्रदर्शनाचे साधन नाही-खट्टर
नमाज हे शक्तीप्रदर्शन करण्याचं साधन बनता कामा नये, असं मत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी व्यक्त केलं आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण चुकीचंच असल्याचंही ते म्हणाले. एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पतौडीमध्ये ख्रिसमसच्या सोहळ्यात अडथळा आणणं चुकीचं असल्याचंही ते म्हणाले. काही हिंदू समुहांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर खट्टर यांनी हे वक्तव्य केलं आहे.
प्रत्येक जण ईश्वराची प्रार्थना करण्यास स्वतंत्र आहे, मात्र ते ठरावीक ठिकाणीच व्हायला हवं. याबाबत काही मतभेद असतील तर विविध धर्माच्या लोकांनी स्थानिक प्रशासनाकडे संपर्क करून मध्यस्थी करण्याची विनंती करावी, असं ते म्हणाले.
कोव्हॅक्सिन 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित - भारत बायोटेक
ओमिक्रॉनच्या संकटाची टांगती तलवार असतानाच लहान मुलांच्या लसीबाबत मात्र एक चांगली बातमी समोर आली आहे. 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनची लस सुरक्षित असल्याचं चाचणीत स्पष्ट झाल्याचं भारत बायोटेकनं म्हटलं आहे. एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कोव्हॅक्सिन(Covaxin)लशीच्या लहान मुलांवरील चाचणीचे निष्कर्ष समोर आले असून ते सकारात्मक आहे. त्यानुसार 2 ते 18 वयोगटातील मुलांची रोग प्रतिकारशक्ती वाढल्याचं समोर आल्याचं भारत बायोटेकनं म्हटलं आहे.
भारत सरकारनं लसीकरणाला मान्यता दिल्यास लवकरच दोन वर्षांवरील मुलांचंही लसीकरण सुरु होईल. त्यामुळं भारतातील लसीकरणाला आणखी वेग मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं तयारी केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








