You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुनव्वर फारूकी म्हणतो, "जेलमध्ये गेलो म्हणून, कॉमेडी थांबणार नाही"
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"जोपर्यंत देशात प्रेम, शांती आणि कॉमेडी आवडणारे समजूतदार लोग तुमच्या पाठीशी उभे आहेत, तुम्हाला सपोर्ट करतात. तोपर्यंत राग, द्वेष जास्त दिवस जिंकू शकत नाही," स्टॅन्डअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होता.
गेल्या दोन महिन्यात मुनव्वर फारूकीचे 12 पेक्षा जास्त कॉमेडी शो रद्द करण्यात आलेत. दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या भीतीने मुंबई आणि बंगळुरूमध्ये पोलिसांनी या कॉमेडी शो ला परवानगी नाकारली होती.
पण, मुनव्वर म्हणतात, "कधी पराभव पत्करावा लागेल, कधी जिंकू सुद्धा, पण थांबायचं अजिबात नाही."
मग, असं काय झालं, की लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा मुनव्वर म्हणतोय, "आता बस्स झालं." अन्याय आता सहन होत नाही...
याबाबत बीबीसी मराठीने मुनव्वर फारूकीशी बातचीत केली.
प्रश्न : तुम्ही कॉमेड सोडणार आहात का?
मुनव्वर फारूकी: गेल्या दोन महिन्यात 12 कॉमेडी शो देशातील विविध राज्यांत रद्द करण्यात आले आहेत.
ही पोस्ट करताना डोक्यात अनेक विचार सुरू होते. खूप दुख: झालं होतं. मला माझी बाजू मांडण्याचा, सांगण्याचा पर्याय मिळत नव्हता. माझ्यापासून कोणालाही धोका नाहीये. माझे शो पाहिल्याशिवाय, कोणी शो चुकीचा आहे असं कसं म्हणू शकतं? माझ्यावर अन्याय होत होता, आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला जागा मिळत नव्हती.
माझ्यावर खोटे आरोप सतत करण्यात येतात. हा मुद्दा राजकीय बनत चाललाय. त्यामुळे "आता बस्स झालं," असं मी सोशल मीडियावर लिहिलं.
पण, मला लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणायला आवडतं. मी कॉमेडी सोडू शकत नाही. ऑनलाईन शो मध्ये स्टेज-शो ची नशा नाही. हे लोकांवर अन्याय केल्यासारखं होईल. मी ऑनलाईन शो केला तर असं दिसून येईल की, काही चूक केल्यामुळे मी ऑनलाईनचा पर्याय निवडलाय.
मी माझं मैदान शोधण्याचा प्रयत्न करतोय. मैदान मिळालं तर, पुन्हा शो करेन.
एखाद्या व्यक्तीला त्याचं काम करण्यापासून रोखण्यात आलं तर खूप वाईट वाटतं. इथे आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न होतोय.
पूर्ण प्रकरण काय आहे?
मुनव्वर फारूकीला याच वर्षी मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली होती. तब्बत 37 दिवस मुनव्वर जेलमध्ये अटकेत होता.
मुनव्वरवर हिंदू देवी-देवतांबाबत टिप्पणी आणि अपमान केल्याचा आरोप आहे. सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून त्याची सुटका झालीये.
यावर तो म्हणतो, "माझ्या जोकचा चुकीचा अर्थ काढून इंटरनेटवर द्वेश पसरवण्यात आला. कोणालाही दुखावण्याची माझी इच्छा नव्हती. एका गाण्यावर बनवण्यात आलेला हा जोक होता. पण, मी हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याचं पसरवण्यात आलं."
माझी आई, बहीण आणि माझ्या धर्माला शिव्या देण्यात आल्या, तो पुढे सांगतो. प्रश्न : मुनव्वरने राजकीय टीका-टिप्पणी बंद केली?
मुनव्वर फारूकी: मी धर्मावर जोक बंद केलेत. आता राजकीय विषयांवर, परिस्थितीवर (पॉलिटीकल सटायर) मी जोक तयार करतो.
पण, या लोकांना राजकीय विषय आणि नेत्यांवर करण्यात आलेल्या टीकेचा त्रास होतो. धर्माच्या आडून लोकांना भडकवण्याचं काम करत आहेत.
पण, सोशल मीडियावर कॉमेडी करणाऱ्यांनी जोक करावेत, पण राजकीय विषयांवर भाष्य का करतात? असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. यावर मुनव्वर म्हणाला, "कॉमेडी करणाऱ्यांनी फक्त कॉमेडी करावी, राजकीय जोक्स नाहीत, असं म्हणणारे योग्य आहेत. पण, मलाही राजकीय विषयांवर जोक करण्याचा हक्क आहे."
कायद्याच्या ज्या पुस्तकाने तुम्हाला माझ्यावर टीका करण्याचा अधिकार दिला. त्याच पुस्तकाने मलाही राजकीय विषयांवर जोक करण्याचा अधिकार दिलाय.
प्रश्न : एक राजकीय पक्ष, विचारधारा यावर जोक्स का केले जातात?
मुनव्वर फारूकी: ही राजकीय विचारधारा इतकी प्रसिद्ध आहे तर मी काय करू?
राहुल गांधी यांच्यावरही जोक्स तयार करण्यात येतात. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांपेक्षा जास्त जोक राहुल गांधी यांच्यावर बनवण्यात आलेत. पण, मला त्यांनी जेलमध्ये टाकलं नाही. कॉमेडी शो रद्द करण्यात आले नाहीत.
जोक केल्याचा त्रास फक्त यांना होतो. यांच्यावर जोक बनवण्यात आला तर. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीच याचा त्रास होत नाही. पण, ते ज्यांना ओळखतही नाहीत त्यांना मात्र खूप त्रास होतो.
प्रश्न : तुम्हाला विरोध का करण्यात येतो?
मुनव्वर फारूकी: राजकीय पक्षांचं काम समाजात द्वेष पसरवण्याचं आहे. अनेक गोष्टींवरून गेल्या काही वर्षात लोकांमध्ये द्वेश पसरवण्यात आलाय. माझ्या पाठीशी कोणीच नव्हतं, त्यामुळे मी त्यांना सहज एक शिकार म्हणून सापडलो.
मी कोणत्याही एकाच पक्षावर जोक करत नाही. यांना हे जोक आवडत नाहीत म्हणून ते याचा विरोध करतात.
हे लोक नेहमी म्हणतात कॉमेडी करणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतात. मग, हे लोक दंगामस्ती, तोडफोड करतात, धमकी देतात ते कसं चालतं?
समाजात द्वेष पसरवतात. इंटरनेटवर लोकांवर हल्ले करतात. त्यांना कोणाच्याच आदेशांची गरज नाही. त्यांना माहितेय, त्यांना पाठीशी घालणारे सर्व सांभाळून घेतील.
प्रश्न : तुम्हाला अटक झाली. शो रद्द होतायत. अशा परिस्थितीत नवीन कॉमेडियन तयार होतील?
मुनव्वर फारूकी: मी फक्त लाइव्ह शो करू शकत नाहीये. इतर विविध पर्यायांनी लोकांसमोर जातोय.
लोकांना कॉमेडी आवडते. त्यामुळे लोकं एक शो रद्द झाला म्हणून दुसऱ्या शो ला जाणार नाहीत, असं अजिबात नाही. लोकांना तुम्ही रोखू शकत नाही.
भारतात कॉमेडी आणि कॉमेडियन नक्की वाढत जातील.
एक मुनव्वर फारूकीला जेलमध्ये जावं लागलं म्हणून कॉमेडी थांबणार नाही. पॉलिटिकल सटायरमुळे ज्यांना त्रास होतो, त्यांचा त्रास वाढत जाईल.
कॉमेडी थांबणार नाही. ही कोणती अवैध गोष्ट नाही. कॉमेडी एक कला आहे. गेल्या वर्षभरात कॉमेडी करणाऱ्यांची संख्या चौपट वाढलीये.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)