You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Munawar Faruqi: कार्यक्रमांना परवानगीच मिळेना, 'द्वेषाचा विजय' म्हणत कॉमेडी सोडण्याचा विचार
- Author, इम्रान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी, बंगळुरूहून
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या कार्यक्रमाला बंगळुरू पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
मुनव्वरचा आज (28 नोव्हेंबर) बंगळुरूमध्ये शो आयोजित करण्यात आला होता. पण पोलिसांनी यावर आक्षेप घेत शो रद्द केला आहे.
पोलिसांनी शांततेचा भंग आणि सांप्रदायिक तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत मुनव्वरचा शो रद्द केला आहे.
आयोजकांचे प्रवक्ते सिद्धार्थ दास यांनी सांगितलं की, "डोंगरी टू नो-व्हेयर या शोच्या आयोजक समूहाला नोटीस मिळाली होती आणि ते नोटिशीचं पालन करतील. आम्ही कायद्याचं पालन करणारे नागरिक आहोत आणि पोलिसांच्या नोटिशीचं पालन करू."
फारूकीची ट्विटरवर भावनिक पोस्ट
मुनव्वर फारुकीने सोशल मीडिया अकाऊंटवरून आपली व्यथा मांडली.
तो लिहितो, "कार्यक्रम स्थळाचं नुकसान करण्याच्या धमकीमुळे आजचा बंगळुरूमधला शो रद्द झाला. आम्ही 600 च्या वर तिकीटं विकली होती.
गेल्या महिन्यात पुनीत राजकुमार यांचं निधन झालं होतं. त्यांच्या स्वयंसेवी संस्थेला मदत मिळवून देण्यासाठी आम्ही या शोचं आयोजन केलं होतं.
नंतर संस्थेच्या सांगण्यानुसार, त्यांच्या नावे हा शो चालवायचा नाही, हे आम्ही मान्य केलं होतं.
मी कधीही न केलेल्या विनोदांवरून मला तुरुंगात डांबण्यात आलं. काहीही आक्षेपार्ह नसलेले माझे शो रद्द करण्यात येत आहेत. हे चुकीचं आहे.
या शोला देशातील सर्वधर्मीय नागरिकांकडून प्रेम मिळालं होतं.
आमच्याकडे शोसंदर्भात सेन्सॉर सर्टिफिकेटही आहे. यामध्ये आक्षेपार्ह असं काहीच नाही.
कार्यक्रम स्थळाचं नुकसान करण्याच्या धमकीमुळे गेल्या दोन महिन्यात आमचे 12 शो रद्द झाले.
मुनव्वरने एका कवितेच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तो पुढे लिहितो,
इनकी नफ़रत का बहाना बन गया हूं
हंसा कर कितनों का सहारा बन गया हूं
टूटने पर इनकी ख़्वाहिश होगी पूरी
सही कहते हैं, मैं सितारा बन गया हूं
हा कदाचित शेवट आहे,
माझं नाव मुनव्वर फारूकी आहे. माझा प्रवास इथपर्यंतच होता.
तुम्ही सर्व जण खूप चांगले प्रेक्षक होता...गुड बाय आय एम डन.
शांतता भंग होण्याची शक्यता - बंगळुरू पोलीस
एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं की, "शांतता भंग व्हायची शक्यता असल्यामुळे कार्यक्रम आयोजित करता येऊ शकत नाही, असं आयोजकांना स्पष्ट शब्दांमध्ये सांगण्यात आलं आहे."
आयोजकांना तोंडी आणि लिखित दोन्ही पद्धतीनं ही माहिती दिल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं.
मुनव्वर फारुकी यांना जानेवारी महिन्यात मध्य प्रदेशच्या इंदौर शहरातून अटक करण्यात आली होती. आपल्या कार्यक्रमात ते आपत्तीजनक चुटकुले (मानहानीकारक विनोद) ऐकवतील, या शंकेमुळे त्यांना अटक करण्यात आली होती.
आयोजकांना देण्यात आलेल्या नोटिशीत पोलिसांनी लिहिलं आहे की, "मुनव्वर फारुकी वादग्रस्त व्यक्ती असल्याची सूचना आम्हाला मिळाली आहे. ते दुसऱ्या धर्माच्या देवी-देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्यं करतात. अनेक राज्यांमध्ये त्यांच्या कॉमेडी शोवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय इंदौरमधील तुकोगंज ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तसंच इतर राज्यांतही त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत."
या पत्रात पुढे म्हटलंय, "अनेक संघटनांनी मुन्नवर यांच्या कार्यक्रमाला विरोध केल्याची माहिती पोलिसांनी मिळालीय. अशात त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी दिल्यास यामुळे अराजकता पसरू शकते. सार्वजनिक शांततेचा भंग होऊ शकतो. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे 28 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजता होणारा मुन्नवर फारुकी यांचा कार्यक्रम रद्द करण्यात यावा."
पोलिसांनी ऑडिटोरियमच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत सूचना दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन
वकील आणि सामाजिक कार्यकर्ते विनय श्रीनिवास यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "हा शो रद्द करून पोलीस सर्वोच्च न्यायालयाच्या 2019च्या निकालाचं उल्लंघन करत आहेत. हा निकाल देताना कोर्टानं पोलिसांना पश्चिम बंगालमध्ये एका शोचं सुरक्षित आयोजन करण्याचे निर्देश दिले होते."
हा आदेश 'भोबिश्योतेर भूत चित्रपटाच्या निदर्शनासंबंधित होता.
याविषयी ट्विट करत श्रीनिवास यांनी म्हटलं, "बंगळुरूचे पोलीस आयुक्त हे आयोजक आणि मुनव्वर फारुकी यांच्यावर कार्यक्रम रद्द करण्यासाठी दबाव टाकत होते. ते मुनव्वर यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि बंगळुरू वासीयांच्या माहिती प्राप्त करण्याच्या अधिकाराचं उल्लंघन करत आहेत. हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं उल्लंघन आहे."
इंदौरमध्ये अटक
मूळचे गुजरातचे असलेले मुनव्वर फारुकी यांना यावर्षीच्या सुरुवातीला इंदौर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर जवळपास 1 महिना ते तुरुंगात होते.
मुनव्वर यांच्याशिवाय इतर 4 जणांना इंदौर पोलिसांनी 1 जानेवारीला अटक केली होती. या सगळ्यांवर हिंदू देवी-देवतांविषयी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अयोग्य टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता.
मुनव्वर इंदौरच्या मुनरो कॅफेत आपला कार्यक्रम करण्यासाठी आले होते. त्याच दरम्यान हिंदू संघटनांच्या नेत्यांनी तिथं पोहोचत गोंधळ घातला होता.
"अशा लोकांना सोडायला नाही पाहिजे," असं मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठानं फारुकी यांची जामीन याचिका फेटाळताना मह्टलं होतं.
कनिष्ठ न्यायालयातून जामीन याचिका फेटाळल्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयातून अंतरिम जामीन मिळाला होता.
फारुकी यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातही गुन्हा दाखला झाला आहे.
19 एप्रिल 2020 रोजी वकील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आशुतोष मिश्रा यांनी मुनव्वर फारुकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
यात त्यांच्यावर धार्मिक भावना भडकावण्याचा आरोप करण्यात आला होता. सोशल मीडियावरील त्यांच्या एका व्हीडिओमुळे हिंदू देवी-देवता आणि गोध्रा हत्याकांडात बळी पडलेल्यांची मजाक उडवण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)