You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Omicron : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दल नेमकी कोणती माहिती समोर आली आहे?
जगभरातली कोव्हिड रुग्णसंख्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे वाढण्याचा मोठा धोका असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय.
काही भागांमध्ये या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे गंभीर संकट निर्माण होण्याची भीती WHO ने व्यक्त केलीय. हे लक्षात घेता गरीब देशांतल्या लसीकरणासाठी जगभरातून पुढाकार घेण्यात यावा, असं आवाहन WHO चे प्रमुख डॉ. टेड्रोस घिब्रायसुस यांनी केलंय.
कोव्हिड 19 अजून संपुष्टात आलेला नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या 'ओमिक्रॉन' या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबद्दल जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. भारतासह अनेक देशांनी खबरदारीच्या दृष्टीने पावलं उचलण्यासही सुरुवात केलीय.
जागतिक आरोग्य संघटनेनं तर या नव्या व्हेरियंटला 'Variant of Concern' म्हणजेच 'काळजी करण्याजोगा व्हेरियंट' म्हटलंय.
ओमिक्रॉन व्हेरियंटबद्दल मुलभूत माहिती आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
ओमिक्रॉन नाव कुणी दिलं?
टेक्निकल एडव्हायझी ग्रुप ऑन SARS-CoV-2 व्हायरस इव्हॉल्युशन दर 15 दिवसांनी विषाणूचा अभ्यास करते. त्यांनी या नव्या व्हेरियंटला 'Variant of Concern' (VoC) म्हणून संबोधले.
त्यानंतर WHO नं कोरोनाच्या या नव्या B.1.1.529 व्हेरियंटला 'ओमिक्रॉन' असं दिलं.
इतर व्हेरियंटना देण्यात आलेल्या अल्फा, डेल्टा इत्यादी ग्रीक नावांप्रमाणे या व्हेरियंटला 'Omicron - ओमिक्रॉन' नाव देण्यात आलंय.
WHO ने या व्हेरियंटविषयी म्हटलंय, "ओमिक्रॉनवर अभूतपूर्वप्रमाणात स्पाईक म्युटेशन्स आढळली आहेत. यातल्या काहींचा या रोगाच्या साथीवर परिणाम होण्याची क्षमता पाहता ही काळजीची गोष्ट आहे." जगभरातले शास्त्रत्र या व्हेरियंटची संसर्गक्षमता आणि त्याच्या धोक्यांविषयी अभ्यास करत आहेत.
आजवर या व्हेरियंटमुळे कोणताही मृत्यू झाला नसल्याचं WHO ने म्हटलंय.
सर्वात पहिल्यांदा ओमिक्रॉनचा रूग्ण कुठे आढळला?
दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण आढळला. 9 नोव्हेंबर 2021 रोजी या रूग्णाचे नमुने घेण्यात आले होते. या रूग्णाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं 24 नोव्हेंबर 2021 रोजी सिद्ध झालं.
तसंच, दक्षिण आफ्रिकेच्या गौतेंग प्रांतामध्ये या नव्या विषाणूची लागण झाल्याची 77 प्रकरणं समोर आली आहे. त्याशिवाय बोस्तवानामध्ये चार आणि हाँगकाँगमध्ये एक (सर्वांची दक्षिण आफ्रिकेतील प्रवासाची नोंद) रुग्ण आढळला आहे.
कॅनडा, युके, पोर्तुगाल, बेल्जियम आणि नेदरलँड्समध्येही या ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळलेले आहेत.
ओमिक्रॉनबद्दल WHO नं काय म्हटलंय?
कोरोनाच्या या नव्या विषाणूमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर बदल (Mutations) झाल्याचं आढळलं आहे. WHO च्या म्हणण्यानुसार, यातील काही म्युटेशन्स 'चिंताजनक' आहेत.
लागण होण्याची भीती सुद्धा या व्हेरियंटमध्ये जास्त असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असल्याचं WHO नं म्हटलंय.
या नव्या विषाणूत एकूण 50 म्युटेशन - ऑलिव्हिरा
दक्षिण आफ्रिकेतील सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पॉन्स अँड इनोव्हेशनचे संचालक तुलिओ डि ऑलिव्हिरा यांच्या माहितीनुसार, "विषाणूच्या बदलामध्ये अत्यंत असामान्य असे काही घटक आढळून आले आहेत. त्यामुळं इतर व्हेरीएंटच्या तुलनेत हा प्रकार अत्यंत वेगळा आहे."
"या नव्या प्रकारच्या विषाणूनं आम्हाला आश्चर्यचकित केलं. बदलांचा विचार करता यानं मोठी उडी घेतली आहे. आम्हाला अपेक्षा होती, त्यापेक्षा अधिक म्युटेशन झालं आहे," असं ते म्हणाले.
याबाबत माध्यमांना माहिती देताना ऑलिव्हिरा यांनी म्हटलंय की, या नव्या विषाणूत एकूण 50 म्युटेशन आढळलेत. त्यापैकी 30 पेक्षा अधिक स्पाईक प्रोटीनवर आढळलेत. बहुतांश लसींद्वारे या स्पाईक प्रोटिनला लक्ष्य करण्यात आलं आहे. कोरोनाचा विषाणू याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो.
भारतानं आतापर्यंत काय पावलं उचलली आहेत?
कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत खबरदारी बाळगावी अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना केली आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांमार्फत देशात दाखल होणाऱ्या प्रवाशांवर विशेष नजर ठेवावी, असं मोदी म्हणाले.
धोक्याची सूचना असलेल्या देशांवर लक्ष केंद्रीत करावं, या देशांमध्यून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी घेण्यात यावी. पण त्याचवेळी आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान अडचणी येऊ नयेत, याचीही काळजी घ्यावी, असं मोदी म्हणाले.
तसंच या संदर्भात कार्यरत अधिकाऱ्यांनी राज्य सरकारांसोबत मिळून एकत्रितपणे काम करावे. जिल्हे तसंच राज्यांमध्ये या नव्या व्हेरियंटबाबत योग्य ती माहिती आणि जागरुकता निर्माण होईल, याची सर्वांनी खात्री करावी, अशी सूचना मोदी यांनी केली.
महाराष्ट्र सरकारनंही नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जाहीर केलीय. त्यानुसार, परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला केंद्र सरकारनं घालून दिलेल्या नियमांचा पालन करावं लागेल, तर इतर राज्यातून येणारा प्रवासी दोन्ही लशी घेतलेला असावा किंवा 72 तासांपूर्वी RT-PCR चाचणी केलेला असावा.
महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतुकीसाठीही लशीच्या दोन्ही डोसची अट ठेवण्यात आलीय. कार्यक्रम, सभागृह, मॉल्स यांमध्ये प्रवेशासही हा नियम लागू करण्यात आलाय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)