द्वारकानाथ कोटणीस: मराठी डॉक्टरने युद्धात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी चीन गाठलं तेव्हा...

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

डॉ. द्वारकानाथ कोटणीस म्हणजे चिनी लोकांसाठी एकदम हळवा कोपरा. जितकं प्रेम आणि आदर कोटणीस यांना चीनने दिलं आहे कदाचितच ते या एखाद्या आधुनिक भारतीयाच्या वाट्याला आलं असेल.

एखाद्या रॉकस्टार प्रमाणे ते चिनी लोकांच्या गळ्यातील ताईत बनले.

डॉ. कोटणीस हे रॉकस्टार नव्हते, धर्मोपदेशक नव्हते किंवा राजकीय नेते ही नव्हते पण असा एकही चिनी राजदूत किंवा नेता नसेल ज्याने भारत चीन संबंधांवर बोलताना डॉ. कोटणीस यांचा उल्लेख केला नसेल.

कधी त्यांच्या नावाने मेडिकल कॉलेज सुरू केलं जातं, कधी त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती दिली जाते तर कधी त्यांच्या स्मारकामध्ये एखादा उपक्रम राबवला जातो. चीनचे प्रमुख नेते जेव्हा भारत भेटीवर येतात तेव्हा ते हमखास कोटणीस कुटुंबीयांची भेट घेतातच.

तसं पाहायाला गेलं तर कोटणीस हे चीनमध्ये फक्त चारच वर्षं राहिले असतील, पण गेल्या 80 वर्षांत त्यांची आठवण हजारो वेळा चीनमध्ये काढली गेली असेल. असं काय होतं त्यांच्या व्यक्तिमत्त्वात की चीनला ते इतके महत्त्वाचे वाटतात.

1910 साली सोलापूर येथे जन्मलेले डॉ. द्वारकानाथ कोटणीस केवळ 32 वर्षं जगले. त्यातली शेवटची चार वर्षं ते चीनमध्ये होते. त्या चार वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी हजारो लोकांचं मन जिंकून घेतलं.

1938 मध्ये पं. जवाहरलाल नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय डॉक्टरांना आवाहन केले की, आपलं शेजारी राष्ट्र म्हणजेच चीन हे संकटात आहे.

जपान आणि चीनमध्ये युद्ध पेटलेलं आहे. रोज हजारो लोक जखमी होत आहेत तेव्हा तिथे जाऊन त्यांची सेवा करा. ही केवळ त्यांचीच सेवा होणार नाही तर भारताची देखील सेवा ठरेल आणि एक राष्ट्र आपले मित्र होईल, असे आवाहन त्या वेळच्या या दोन मोठ्या काँग्रेस नेत्यांनी केले होते.

त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत डॉ. कोटणीस यांनी चीनला जाण्याचा निर्णय घेतला. एकूण पाच डॉक्टरांची टीम काँग्रेसच्या या मेडिकल मिशनचा भाग होती.

त्यावेळचे काँग्रेसचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांनी जनतेला या कार्यासाठी देगणी देण्याचे आवाहन केले होते. 22,000 रुपयांचा निधी जमा झाल्यावर पाच डॉक्टरांची रवानगी या मिशनवर करण्यात आली होती.

लखनौचे डॉ. अटल, नागपूरचे डॉ. चोलकर, कलकत्ता येथील डॉ. बसू आणि मुखर्जी या इतर चार डॉक्टरांसहित ते वुहानच्या हानकोऊ बंदरावर उतरले. तिथून ते युनान प्रांतात गेले. त्यांचे स्वागत माओ झेदांग, झे डे सारख्या बड्या नेत्यांनी केले.

युद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर उपचार करण्याचे काम ते करू लागले. जपानविरोधात लढताना सैनिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत. त्यात ते गंभीररीत्या जखमी होत असत.

त्यांच्यावर उपचार करताना वैद्यकीय साधनांचा आणि औषधांचा तुटवडा पडत असे अशा परिस्थितीतही त्यांनी आपले काम नेटाने सुरू ठेवले. कोटणीस यांनी सलग 72 तास ऑपरेशन्स केली होती. या कालावधीत त्यांनी 800 हून अधिक लोकांवर उपचार केले होते.

ली लोंग ची हे बेथून मेडिकल कॉलेजमध्ये राजकीय आयुक्त पदावर कार्यरत होते. कोटणीस यांच्या त्यावेळच्या सहकाऱ्यांना भेटून आणि तसेच तत्कालीन कागदपत्रांचा वापर करून त्यांनी डॉ. कोटणीसांचे चरित्र लिहिले आहे.

चीनच्या टीव्हीसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात की "जेव्हा डॉ. कोटणीस चीनमध्ये पोहोचले तेव्हा जपानच्या हल्ल्यात अनेक गावं बेचिराख झाल्याचं त्यांनी पाहिले.

"अनेक लोक जखमी अवस्थेत होते आणि काही ठिकाणी ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्याचं काम सुरू होतं असं डॉ. कोटणीसांनी पाहिलं होतं.

ली लोंग ची सांगतात, "युनानमध्ये जिथं त्यांनी काम सुरू केलं ते तर रुग्णालय पण नव्हतं केवळ गुहेसारख्या ठिकाणी बेड टाकण्यात आले होते. या सर्व गोष्टींमुळे ते थोडे नाराज झाले पण या लोकांसाठी काही करावं या उद्देशाने ते पेटून उठले."

प्रेम आणि लग्न

डॉ. कोटणीस हे अस्खलितपणे मंदारिन (चीनची भाषा) बोलू शकत. त्यांची मैत्री त्यांच्यासोबत काम करणाऱ्या नर्स क्यो क्विंगलन यांच्याशी झाली.

मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी यिनहुआ ठेवलं. चिनी भाषेत यिन म्हणजे चीन आणि हुआ म्हणजे भारत. दोन्ही देशांच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून त्याचं नाव त्यांनी यिनहुआ असं ठेवलं होते.

क्यो या कोटणीस यांच्या टीमचा भाग होत्या आणि त्यांची टीम रोज अंदाजे 50 सैनिकांवर उपचार करत असे.

प्लेगचा सामना

एकीकडे चीनचा सामना जपानच्या आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या सैन्याशी सुरू होता. यात जखमी होत असलेल्या चिनी सैनिकांची संख्या बरीच असायची. या संकटाशी तोंड देणं हे जिकरीचं काम होत असतानाच प्लेगची साथ आली.

प्लेगची लागण झालेल्या सैनिकांची सेवा करण्यास ते मागे पुढे पाहत नसत. ते त्यांच्या कामाप्रती समर्पित होते ही बाब तर सर्वांना ठाऊकच होती पण त्यांच्या धाडसी वृत्तीचा परिचय एका घटनेतून झाला.

ते म्हणजे प्लेगची नवीन लस आली होती. तिचा वापर केल्यास काय होईल याचा काहीच अंदाज कुणाला नव्हता. पण ती लस त्यांनी घेतली. स्वतःवर प्रयोग करून त्यांनी इतरांवर उपचार केले.

सातत्याचे काम, दगदग यामुळे इतर लष्करी तळावरचे डॉक्टरदेखील आजारी पडू लागले होते. डॉ. कोटणीस यांना देखील अपस्माराचे झटके आले होते. पहिला झटका सौम्य होता पण दुसऱ्या झटक्यामुळे त्यांचे 9 डिसेंबर 1942 रोजी निधन झाले.

चीनमधील नानकान गावात शहीदांच्या भूमीतच त्यांचे दफन करण्यात आले.

"सैन्यानं एक चांगला सहकारी आणि देशानं एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांची आठवण सदैव आपल्या मनात तेवत ठेवूया," असे उद्गार चीनचे तत्कालीन सर्वोच्च नेते माओ झेदांग यांनी कोटणीसांना आदरांजली वाहताना काढले होते.

त्यांच्या स्मरणार्थ चीनने हेबेई प्रांतातील शिजियाझुआंग शहरात स्मारक बांधले आहे. चीनमध्ये किंगमिंग फेस्टिवलवेळी आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहतात.

2005 मध्ये त्यांच्या समाधीवर चिनी लोकांना फुलं वाहून त्यांच्या प्रती असलेली प्रेमभाव दाखवला. जणू डॉ. कोटणीस हे आपल्या पूर्वजांपैकीच एक आहेत असे त्यांनी आपल्या कृतीतून सांगितले.

डॉ. कोटणीस यांच्या निधनानंतर क्यो या भारतात बऱ्याच वेळा येऊन गेल्या आणि त्या कोटणीस यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात कायम राहिल्या.

1946 साली व्ही. शांताराम यांनी त्यांच्या आयुष्यावर 'डॉ. कोटणीस की अमर कहानी' हा चित्रपट काढला होता. या चित्रपटात डॉ. कोटणीस यांची भूमिका त्यांनी स्वतः साकारली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)