'साहित्य संमेलन म्हणजे सरकारी खर्चाने उभारलेल्या तंबूत छापील कागद मांडून ते परत गुंडाळून ठेवणं'

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

यंदा 3 ते 5 डिसेंबर आमच्या नाशकात साहित्य संमेलन होतंय. आता होतंय बुवा एकदाचं अशी समस्त नाशिककरांची भावना आहे. ती का आहे हे वाचायचं असेल तर वाचा इथे.

यथावकाश कार्यक्रम पत्रिका हातात आली, त्यात सालाबादप्रमाणे यंदाही सगळे संवाद, परिसंवाद, चर्चा होत्या.

पण एका परिसंवादाच्या विषयाने लक्ष वेधलं... 'ऑनलाईन वाचन, वाङमय विकासाला तारक की मारक?'

शाळेत असताना निबंध लिहायचे, 'विज्ञान शाप की वरदान?' त्याची आठवण झाली. उन्हाळ्यात पेपर सुरू असताना वर फॅन सुरू असायचा, जाताना रिक्षाने जायचो आणि परिक्षेच्या नियमांची अनाउन्समेंट माईकवरून व्हायची, एक शोध, ज्याने लिखित गोष्टींचा इतिहास बदलला आणि अनेक वर्षं अब्जावधी डॉलर्सची इंडस्ट्री बनली अशा बॉलपेनाने पेपर लिहायचो आणि लिहायचो काय तर विज्ञान शाप की वरदान?

डिट्टो फिलिंग आली. म्हटलं जिथे तरुण टाळकी जमतात, बोलतात, भांडतात, रडतात, हसतात त्या सोशल मीडियाविषयी काही आहे का? त्याबदद्ल कोणी बोलतंय का? एक मीम एका लेखाएवढा मेसेज कसा कन्व्हे करतं याबद्दल कोणी चर्चा करतंय का? हे पाहू तर कार्यक्रमपत्रिकेत सोशल मीडिया औषधालाही नाही.

म्हटलं ठीके, तरीही सोशल मीडियावर भरपूर फॉलोअर्स असणाऱ्या आणि भरभरून लिहिणाऱ्या पोरांना विचारू आपण हे साहित्य संमेलन म्हणजे त्यांच्यासाठी काय?

पहिले गाठला जयसिंगपुरचा श्रेणिक नरदे. तरूण आहे, शेतकरी आहे आणि सोशल मीडियावर त्याला भरपूर फॉलोइंग आहे. त्याला म्हटलं बाबा सांग रे, तुझी साहित्याची व्याख्या काय?

तर म्हणतो माझी व्याख्या राहू द्या, पण साहित्य म्हणजे 'लिखाण किंवा पुस्तकं' असा अर्थ घेणारी लोकसंख्या किती? 5 टक्के? इतर 95 टक्के लोकांना साहित्य म्हणजे 'सामान' असंच वाटतं.

'सोशल मीडियावरचा लेखक जास्त धाडसी'

तो पुढे म्हणतो, "सोशल मीडियामुळे साहित्य संमेलनाला जाणारी लोक कमी झाली हे खरं जरी असलं तरी आधी कुठे गावागावातून ट्रक भरभरून लोक साहित्य संमेलनाला जात होती?"

"तुम्ही त्या परिसंवादाविषयी विचारलंत, 'ऑनलाईन वाचन, वाङमय विकासाला तारक की मारक?' ज्याला हा विषय सुचला तो माणूस कोणत्या जगात राहातो हे आधी मला सांगा. सकाळी झोपेतून उठल्यावर पहिली गोष्ट माणूस काय करतो तर मोबाईल हातात घेतो आणि रात्री झोपताना शेवटची गोष्ट कुठली करत असेल तर मोबाईल बाजूला ठेवणं. मग आपण ज्या जगात राहातोय, त्याचं भान नसतं का साहित्य संमेलनवाल्यांना?" तो म्हणतो.

एखादी गोष्ट तुमच्या जगाचा भाग आहे, रिएलिटी आहे, ती बदलणार नाहीये, तुम्ही उलट परत जाणार नाही आहात, मग ती गोष्ट चांगली की वाईट हा प्रश्नच राहात नाही, मुद्दा हा आहे की ती कशी वापरायची किंवा अजून कशी सुधारायची.

ऑनलाईन लेखन जास्त विश्वासार्ह, चांगलं बनवण्यासाठी काय करावं हा प्रश्न हवा होता नाही का?

एखाद्या पुस्तकाच्या 10 हजार प्रती खपतात. सोशल मीडियावर हजारोने शेअर होणारे लेखही त्याच तोडीचे असतात असं श्रेणिक म्हणतो.

"पण मुद्दा इतकाच आहे की, पुस्तक लिहिणाऱ्याची समीक्षा होईलच, झाली तर ती वेळेत होईलच असं नाही. पण सोशल मीडियावर तुमचे वाचकच तुमचे समीक्षक असतात. ते तुमच्या लेखनाची चिरफाड किंवा वाहवा करून मोकळे होतात. अशा सगळ्या समीक्षांना तोंड देणारा लेखक जास्त धाडसी म्हणायला हवा. बाकी साहित्य संमेलनाचं म्हणाल तर तिथे पुस्तकांच्या स्टॉलपेक्षा खायच्या स्टॉलवर गर्दी असते हे सगळ्यांनाच माहिती असतं."

'संमेलनावाचून ना लिहायचं अडतंय ना वाचायचं'

कविता ननावरे कोल्हापूरची मुक्त पत्रकार आणि लेखक आहे. तिला विचारलं तू साहित्य संमेलनाकडे कोणत्या नजरेने पाहातेस?

"आजकालच्या साहित्य संमेलनाला 'हवश्या, नवश्या, गवश्यांची साहित्यिक जत्रा म्हणायला हवं," ती ठासून सांगते.

आजची पिढी सोशल मीडियाच्या अंगाखांद्यावर खेळते. तिला आधीच साहित्य संमेलनाचं अप्रुप नाही त्यात ऑनलाईन जगातल्या लिहित्या हातांना हे संमेलन खिजगणतीतही धरत नाही अशी तिची तक्रार आहे.

"सोशल मीडियावर लिहिणारे आता कागदावर लिहिणाऱ्यांना मागे टाकायला लागलेत. सोशल मीडियावरचं साहित्य (होय साहित्यच!) वाचून जर वाचकांची वाचनभूक उत्तमप्रकारे भागत असेल तर त्या लेखनाला साहित्याचा दर्जा का नसावा?"

"वाचकांना जे सोयीचं असेल ते वाचक घेणार, जे आवडतंय ते वाचणार. शेवटी साहित्य म्हणजे काय असतं? आपला भोवताल, भोवतालातल्या लोकांचं बरं-वाईट जगणं, भोवतालचं राजकारण-अर्थकारण-धर्मकारण- समाजकारण उघड्या डोळयांनी बघणं, त्यातले बारकावे टिपणं, ते निर्भीडपणे मांडणं, लिहिताना लेखकाला रीतं झाल्यासारखं आणि वाचकाला काहीतरी अनमोल गावसल्यासारखं वाटणं शिवाय त्यात समाजबदलाचं बीज असणं... माझ्या दृष्टीने चांगल्या साहित्याची ही लक्षणं आहेत. मग ही लक्षणं छापील पानांमध्ये असोत किंवा फेसबुकच्या भिंतीवर."

"आता तसंही माझ्या पिढीचं साहित्य संमेलनावाचून ना लिहायचं अडतंय, ना वाचायचं, ना प्रकाशित करायचं. तुमचं चालू द्या."

'तीच मोट, तेच बैलगाडीचं चाक अन् गाईम्हशी वगैरे'

आज ज्याला ढोबळ अर्थाने साहित्य समजलं जातं ती पुस्तकं दोन चारशे वर्षांपुर्वी नवीन माध्यमच होती. पंधराव्या शतकात छपाई यंत्राचा शोध लागण्याआधी साहित्य होतं. आज तुकारामांचे अभंग आणि ज्ञानेश्वरांच्या ओव्या आपण छापलेल्या कागदावर वाचत असलो तरी ते एकेकाळी मौखिक साहित्य होतं आणि काळाच्या ओघात टिकलंच.

म्हणजे कागदावर लिहिलं म्हणून साहित्य होत नसतं, मग सोशल मीडियावर लिहिलेलं साहित्य का नाही? हा प्रश्न सोमनाथ कन्नर विचारतो.

सोमनाथ जालना जिल्ह्यातल्या, जाफराबाद तालुक्यातल्या आडा या गावात राहतो, शेती करतो. हे सांगायचा उद्देश असा की ग्रामीण भागातून मुलं लिहिती होताहेत, वाचत आहेत आणि त्यांना फॉलो करणारा एक तरूण वर्ग आहेच.

"फक्त देवनागरी लिपीतील कागदावर छापील मजकुराला मराठीत साहित्य असा दर्जा आहे. सरकारी खर्चाने उभारलेल्या तंबूत वरील साहित्य मांडून ते परत गुंडाळून ठेवण्याला साहित्य संमेलन असं म्हणतात," सोमनाथ म्हणतो.

तो म्हणतो, "वाचन या प्रकाराला ऑनलाइन वा ऑफलाईन असल्या निकषात न ठेवलेलं बरं. लिखित साहित्य प्रकाराला पर्याय म्हणून सोशल मीडियावरील ब्लॉग, फेसबुक, युट्युब, ओटीटी प्लॅटफॉर्म्स आदी उभे राहत राहातात आणि ते झपाट्याने लोकप्रिय होतात त्यामुळे त्यांच्याबाबत साहित्यिक लेखकराव मंडळींना आकस वाटणं साहजिकच आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील कुठल्याही कंटेंटला त्यांनी साहित्यसंमेलनात स्थान दिले नाही यात आश्चर्य वाटण्यासारखंही काही नाही."

मानवी मेंदूला किमान शून्य सेकंद ते कमाल अपरिमीत कालावधीसाठी प्रभावित करणाऱ्या भौतिक खाणाखुणा म्हणजे साहित्य. मग ते ताम्रपटावर कोरलेले असो, कागदावर छापलेले, अंगावर गोंदलेले, भिंतीवर, कॅनव्हासवर चितारलेले, पडद्यावर चित्रीकरण किंवा माध्यमांवरील मिम्स असो, या सर्वांचा साहित्य प्रकारात समावेश होतो. पण साहित्याची व्याख्या ठरवणाऱ्यांना जर ते मान्य नसेल तर मराठी साहित्यासाठी तो आत्मघातकी निर्णय आहे, असंही त्याला वाटतं.

"प्रस्थापित वाङ्मय प्रकाराला डावलून सोशल मीडिया साहित्यप्रकार पुढे निघून जाईल तेव्हा संमेलन संमेलन खेळत बसणाऱ्यांना हात चोळत बसावं लागेल. अर्थात तसंही आपण दर्जाच्या बाबतीत दाक्षिणात्य, बंगाली आणि हिंदी साहित्याच्या तुलनेत कुठे आहोत याचं आत्मपरीक्षण करणं सोयीस्कर टाळतोच म्हणा. याची अनेक मराठी साहित्यिकांनी जाहीर कबुली दिली आहेच."

सध्याचं ग्रामीण जीवन साहित्यात दिसत नाही अशीही सोमनाथची तक्रार आहे.

मराठी साहित्य नेहमी नॉस्टॅल्जिक वातावरणात रमलेलं आहे. वर्तमानातील घडामोडींचं प्रतिबिंब त्यात दिसत नाही, मुरवण्यावर जास्त भर दिला जातो. ग्रामीण साहित्य तर अजूनही ऐंशीच्या दशकाच्या पुढे मजल मारताना दिसत नाही असं त्याला वाटतं.

"तीच मोट, तेच बैलगाडीचं चाक अन् गाईम्हशी वगैरे, आधी खेडूत नंतर निमशहरी आणि नंतर शहरी झालेल्या जनतेला ऑर्गझम देणाऱ्या रंजनवादी साहित्याशिवाय काहीच नवीन नाही यात. खेडी बदललेली नाहीत का? 2014 नंतरच्या यांत्रिकीकरण आणि सोशल मीडिया पोहोचलेल्या ग्रामीण भागाची प्रतिमा मांडताना कुणीही दिसत नाही. ते सोशल मीडियावर दिसतं पण त्याला संमेलनात स्थान नाही."

'साहित्य वितरणाची एक समांतर व्यवस्था'

इंटरनेट आणि सोशल मीडियातून अभिव्यक्तीच्या अनेक शक्यता निर्माण झाल्या. मराठी साहित्य म्हणता येईल असं खूप काही सकसपणे पुढे आलं असं पुण्यात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करणाऱ्या आणि अर्थातच सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या अंगद तौरला वाटतं.

तो म्हणतो, "कुठल्या तरी खुद्रुक बुद्रुक गाव खेड्यात कॉलेजला जाणारे पोरंपोरी मोबाईलात पॉडकास्ट अन ऑडियोबुक्स ऐकायलेत. फेसबुकला तिचा कवितासंग्रह अपर्ण करणारी योजना यादव. अस्सल उदगिरी बोलीभाषेत 'बगळा' आणि 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' लिहणारे प्रसाद कुमठेकर. 'दोन शतकाच्या सांध्यावरच्या नोंदी' लिहणारे बालाजी सुतार. ही काही प्रातिनिधीक नावं. मागच्या वीसेक वर्षात एसएमएसपासून ते आजच्या स्मार्टफोनमय सोशल मीडीयातल्या ग्लोबल जगण्याचे असे कितीतरी कंगोरे मराठी साहित्यात ताकदीने आले आहेत. यावर आपण कधी बोलत नाही."

याशिवाय पारंपारिक पुस्तक प्रकाशनाच्या पुढे जाऊन पोरापोरींनी सोशलमीडिया वापरून साहित्य वितरणाची एक समांतर व्यवस्था उभी केली आहे असंही त्याला वाटतं.

"हारुकी मुराकामी, एटगर केरेट, ओऱ्हान पामुक, काल्व्हिनो या कधीही इंग्रजीत न लिहणाऱ्या लेखकांना पचवणारी मराठी पिढी आपल्या मराठी साहित्याकडे कसं बघते, हे त्यांना एकदा तरी विचारुन पहा. कोरियन वेबनॉव्हेलपासून ते ओटीटीवर येणाऱ्या रुपांतरीत साहित्याच्या मूळ पुस्तकांचे खंड पोरंपोरी वाचताहेत. जागतिक साहित्यात माध्यमांतराचे असे प्रयोग होताहेत त्यावर आपण बोलत नाही आणि हे सगळं वगळून आपली आपली 'विश्व मराठी साहित्य संमेलनं' चालूच आहेत."

'साहित्य संमेलन आणि सोशल मीडिया पुर्णतः वेगळे मंच'

सोशल मीडियावर लिहिणाऱ्या प्रत्येकालाच साहित्य संमेलनाविषयी आक्षेप आहे असंही नाही. व्यवसायाने इंजिनियर असणाऱ्या तन्वीर सिद्दीकीने अनेक पुस्तकं लिहिली आहेत. तो सोशल मीडियावरही लिहितो आणि दोन्हीकडच्या त्याच्या लेखनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

तो म्हणतो, "सोशल मीडिया आणि साहित्य संमेलन यांच्यात तोलून मापून पाहण्यासारखं काहीच नाही कारण हे दोन्ही पूर्णतः वेगवेगळे मंच आहेत. मला सोशल मीडिया जास्त मनमोकळा मंच वाटतो जिथे एखादी साहित्यिक किंवा साहित्यात न मिळणारी गोष्ट सुद्धा निर्भिडपणे मांडली जाऊ शकते."

नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानात सोशल मीडियावर लिहिणाऱ्या लेखकांना स्थान नाही, याबद्दल विचारल्यावर तन्वीर म्हणतो,

"फक्त साहित्य संमेलनाचे आमंत्रण किंवा त्यातील सहभागच तुम्ही लेखक, कवी आणि साहित्यिक असल्याची ग्वाही देतं असं नाही. त्यामुळे आमंत्रण नसलं तरी मला त्याबद्दल काही आक्षेप नाही. बाकी निव्वळ सोशल मीडियावर लिहून हजारो हजारो पुस्तकांच्या प्रती विकले जाणारे कवी आणि लेखक मी पाहिले आहेत. माझ्या स्वतःच्या सगळ्या पुस्तकांच्या 30 ते 40 हजार प्रती विकल्या गेलेल्या आहेत."

साहित्य संमेलन म्हणजे फक्त एक गेट टुगेदर असतं ज्यात सगळ्या लेखकांना किंवा कवींना भेटता येतं असंही तो म्हणतो.

"यात माझा साहित्य संमेलन आणि त्यात माझा, किंवा सोशल मीडियातील कुठल्याही नामवंत लेखकाचा उल्लेख किंवा सहभाग नसल्याचा, असल्याचा रोष किंवा आक्षेप नाही. ज्याला जशी साहित्य सेवा करता येईल, ज्याला जसे साहित्य आस्वादता येईल तसे त्यांनी करावे. जो जे वांछील तो ते लाहो!"

'साहित्य संमेलन अजूनही 90 वर्षं जुनं वाटतं'

काही अपवाद वगळता साहित्य संमेलनाविषयी जितक्या तरूणांशी बोलले, प्रत्येकाचा हाच सुर होता की ते बोरिंग वाटतं. मी हेही शोधायचा प्रयत्न केला की या मुलांना ते बोरिंग का वाटतं?

पुण्याच्याच पुजा ढेरिंगेने मला या प्रश्नाचं उत्तर दिलं.

"नव्वद वर्षं पूर्ण केलेलं साहित्य संमेलन आजही त्याच काळातलं वाटतं. म्हणजे मान्य आहे की जुनं ते सोनं, पण या सोन्याला उजळवण्यासाठी अधून-मधून नव्याची पॉलिश मारत जा की. 2021 मध्ये संमेलन, त्यातले कार्यक्रम बदललेले नाहीत. त्यांनी काळानुसार थोडे बदल केलेही असतील, नाही असं नाही पण प्रेक्षक जुने, विषय जुने आणि सादरीकरणही जुनंच."

सोशल मीडियाशिवाय तरूण राहू शकत नाहीत आणि साहित्य संमेलनात त्याच्याच विरोधात परिसंवाद भरवले जातात, पोरं येतील कसे तिथे, पूजा विचारते.

"आजकाल प्रत्येक दिवस जरा जास्तच जोरात पुढे सरकतो, रोज नवे विषय तयार होतात, कारण रोज नवी चॅलेंजेस समोर येतात. तंत्रज्ञान प्रगती करतंय, प्रत्येकजण वेगवेगळं स्ट्रगल करतो, प्रत्येकाचं दुःख जितकं सारखं तितकं ते एक्स्प्रेस करण्याची पद्धत वेगळी! पण हे बदल संमेलनात दिसतच नाहीत."

क्रिएटिव्ह लेखन, ताजे विषय, दिशादर्शक दृष्टिकोन, इंस्पायरिंग - अडवेंचरस स्टोरीज आणि विषयाचा नेमका मेसेज पोहोचवण्याची सोपी पद्धत म्हणजे माझ्या पिढीसाठी साहित्य.

याउलट पूर्वीचे साहित्य, त्याचा अभ्यास करावा पण त्यातले अवघड शब्द, अनेक आढेवेढे घेऊन केलेली वाक्यरचना, आशयापेक्षा मांडणी आणि व्याकरणाला दिलेलं असाधारण महत्त्व याचा कंटाळा येतो. भूतकाळातला आणि आजचा वाचक आणि लेखक खूप वेगळा आहे. त्या दोघांमधील तफावत दूर करायची असेल तर या दोन व्याख्यांना सोबत घेऊन चालावे लागेल."

तात्पर्य काय?

सहा वेगवेगळ्या ठिकाणी राहाणाऱ्या, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याऱ्या, पण सोशल मीडियावर नियमित लिहिणाऱ्या, एक फॉलोइंग असणाऱ्या तरुणांचं हे मत. सगळ्यांत एकच समान मुद्दा दिसतो - आम्हाला वगळलं तरी आम्ही आहोत, लिहितो, लिहिणार.

साहित्य संमेलनाच्या आधी नाशकात एक कार्यक्रम झाला, त्यात जेष्ठ कवी अशोक नायगावकर म्हणाले होते की, "संमेलनात प्रेक्षक कोण असतात तर 55 च्या पुढचे. इथे तरूण दिसले नाहीत तर संमेलनं शेवटची ठरतील."

आणि कुठे आहेत ही तरुण मुलं? 'तुम हमारा संमेलन में इंतजार कर रहे हो, और हम रील्स बना रहे हैं" असं तर म्हणत नाहीयेत ना?

हेही वाचलं का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)