शरद पवार : 'कितीही चौकशा लावा, घाबरत नाही, पुढील सरकारही महाआघाडीचेच' - #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Twitter
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. कितीही चौकशा लावा, घाबरत नाही - शरद पवार
ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही, त्या ठिकाणी ईडी, सीबीआय अशा वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून चौकशा लावण्याचे प्रकार केंद्र सरकार करत असते. सत्तेचा दुरुपयोग करून स्थानिक सरकारचा उपमर्द करण्याचे काम ते नेहमी करतात; पण त्यांना किती चौकशा लावायच्या त्या लावू देत. त्यामुळे अशा चौकशांना आम्ही घाबरत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.
लोकमतनं ही बातमी दिली आहे.
महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरासाठी आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, "सरकार हे आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि सर्वजण एकत्रित लढले, तर पुढील सरकारही महाआघाडीचेच येईल.
"सरकार स्थापन झाल्यानंतर दोन दिवसात, मग दोन महिन्यांत, नंतर एक वर्षात पडणार, असं भविष्य अनेक जण वर्तवित होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही अधूनमधून भविष्य वर्तवित असतात. ते ज्योतिष पाहण्याच्या क्षेत्रात गेले तर चांगले होईल," असा टोला पवार यांनी हाणला आहे.
2. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 48 पैकी 45 जागा जिंकेल - राऊत
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 48 पैकी 45 जागा जिंकेल, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

2024च्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचच मॉडेल दिसेल यात मला काही अडचण वाटत नाही. काँग्रेससह महाविकास आघाडी होईल, यातही मला काही अडचण येईल, असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.
"चंद्रकांत पाटील यांना समजले पाहिजे की, केंद्रीय बळाचा, सत्तेचा वापर करुन सरकार पाडण्याची वेळ निघून गेली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात फरक आहे. आमच्याकडे तिन्ही पक्षात कोणीही ज्योतिरादित्य शिंदे नाही, त्यामुळे सरकार टिकणार", असंही राऊत म्हणाले.
3. आता विभाजित भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत
आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लाखो देशभक्तांनी बलिदान दिलं आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर आपण विभाजनाचं दुःख झेललं आहे. आपल्याला खंडित भारत मिळाला आहे. आता आपल्याला अखंडित भारत बनवायला हवा, हे आपलं राष्ट्रीय तसंच धार्मिक कर्तव्य आहे. या कर्तव्य मार्गावर चालल्यास आपला विजय असेल, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
राजधानी नवी दिल्लीमधील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सकाळनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, RSS
भागवत म्हणाले, "देशाचं विभाजन न मिटणारी वेदना आहे. ही वेदना तेव्हाच मिटेल जेव्हा विभाजन रद्द होईल. भारत एक जमिनीचा तुकडा नाही, आपली मातृभूमी आहे. संपूर्ण जगाला काही देण्यालायक आपण तेव्हाच बनू जेव्हा विभाजन रद्द होईल.
"हे राजकारण नाही आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. यामुळे कोणीही सुखी झालेलं नाही. भारताची प्रवृत्ती वैविध्य स्वीकारण्याची आहे. विभाजनवादी तत्वांच्या शक्तींमुळं देशाचं विभाजन झालं आहे. आम्ही विभाजनाचा दुःखदायक इतिहास पुन्हा होऊ देणार नाही," असंही ते म्हणाले आहेत.
4. नोएडा विमानतळ दिल्लीतील विमानतळापेक्षा भव्य असेल - शिंदे
उत्तर प्रदेशातल्या नोएडामधलं विमानतळ हे दिल्लीतल्या इंदिरा गांधी विमानतळापेक्षा मोठं असेल, असं वक्तव्य केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
नोएडा विमानळतळाच्या भूमिपूजनचा सोहळा शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.
या विमानतळामुळे 60 हजार कोटींची गुंतवणूक येईल, 1 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असंही शिंदे म्हणाले. या विमानतळाचं पहिल्या टप्प्यातील काम 2024 मध्ये पूर्ण होणार आहे.
5. अण्णा हजारेंची प्रकृती ठणठणीत
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्या हृदयात छोटे ब्लॉकेज आढळल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, अण्णांची तब्येत ठणठणीत असून काळजीचं कोणतंही कारण नाही, असं अण्णांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

अण्णा हजारे गुरुवारी दिवसभर कार्यकर्त्यांच्या शिबिरात होते. त्यांचं दैनंदिन कामकाज सुरू आहे. गेला दीड वर्ष कोरोना स्थितीमुळे अण्णांचं रूटीन चेकअप करण्यात आलेलं नव्हतं.
गुरुवारी (25 नोव्हेंबर) डॉक्टरांनी प्राथमिक तपासण्या केल्यानंतर पुढील तपासण्या पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये करण्याची सूचना केली. त्यानुसार अण्णांना पुण्यातील रुबी हॉल इथं आणण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








