अजित पवार देवेंद्र फडणवीसांसोबतच्या सरकारबद्दल 2 वर्षांनंतरही का बोलत नाहीत?

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस
    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार येऊन 28 नोव्हेंबरला दोन वर्षं होतील. पण त्या सरकारच्या जन्मामध्ये या दिवसाबरोबरच 23 नोव्हेंबर, म्हणजे आजची तारीखही जास्त महत्त्वाची आहे. आजपासून दोन वर्षांपूर्वी अजित पवारांनी बंड करत देवेंद्र फडणवीसांसोबत काही तासांचं सरकार स्थापन केलं होतं. दोन वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या राजकारणातलं या सरकारचं कवित्व काही संपत नाही.

ज्यांच्याशिवाय हे 23 नोव्हेंबरचं सरकार घडूच शकलं नसतं ते अजित पवार मात्र अद्यापही आपल्या या कृतीबद्दल एकही शब्द बोललेले नाही आहेत. 'योग्य वेळ आली की पत्रकार परिषद घेऊन सगळं सांगेन' असं ते अगदी सुरुवातीलाच म्हणालेत. पण आपली बाजू सांगण्याची अजित पवारांची वेळ काही अद्याप आली नाही आहे.

पण दोन वर्षं होऊनही अजित पवार अद्याप या बंडाबद्दल आणि त्या काळातल्या घटनांबद्दल मौन का बाळगून आहेत? जे उपमुख्यमंत्रीपद हवं होतं ते या सरकारमध्येही मिळालं म्हणून? किंवा ते जर बोलले तर स्वपक्षामध्ये आणि विरोधी पक्षामध्ये अधिक राजकीय शत्रू वाढू शकतात वा अधिकांना दुखावलं जाऊ शकतं म्हणून? की त्यांच्या राजकारणाला अनुकूल अशी योग्य वेळ पाहून ही गुपितं आपल्या पथ्यावर पाडून घेण्यासाठी ते अजूनही गप्प आहेत?

अजित पवार हे स्पष्टवक्ते आहेत. जे आहेत ते सरळ बोलतात, जरी कोणाला वाईट वाटलं तरीही. असं त्यांचं कायम वर्णन केलं जातं. शिवाय त्यांच्या मनात काही राहात नाही, ते फटकन बोलून मोकळे होतात, असंही त्यांच्याविषयी बोललं जातं. मग ज्या घटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी दिली आणि ज्याच्या केंद्रस्थानी ते स्वत: होते, त्याविषयी मात्र ते काहीच का बोलत नाहीत?

शरद पवार बोलले, देवेंद्र फडणवीस बोलले, पण अजितदादा गप्प

23 नोव्हेंबरला जे काही नाट्य घडलं, त्यात दोन्ही बाजूंनी खलनायक अजित पवारांनाच ठरवलं गेलं. कोणी अगदी स्पष्ट शब्दांत तसं बोललं नाही कारण अजित पवारांची आवश्यकता सगळ्यांना होती आणि सध्याच्या संख्याबळात ती कायम असणार आहे. पण जबाबदारी वा बोट त्यांच्याकडेच दाखवलं गेलं. बंड करुन पक्ष फोडला म्हणून राष्ट्रवादी वा महाविकास आघाडीच्या बाजूनंही आणि नंतर आवश्यक असलेले सगळे आमदार आणतो असं म्हणूनही ते न आणू न शकल्यानं भाजपाच्या बाजूनंही त्यांनाच जबाबदार धरलं गेलं.

अजित दादा शरद पवार

त्यावेळेस नेमकं काय घडलं, आत पडद्यामागे काय झालं याची सर्वात जास्त कल्पना काहीच निवडक लोकांना होती. त्यातले शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या सर्वात महत्वाच्या व्यक्ती. त्या दोघांनीही विविध मुलाखतींमध्ये नेमकं काय ठरलं, काय झालं, असं त्यांच्या जागेवरुन सांगितलं.

'राजकारणात संवाद आवश्यक असतो आणि अजित पवार फडणवीस काय म्हणाताहेत यासाठी त्यांच्याशी संवाद साधून आहेत हे मला माहित होतं. पण ते असा निर्णय घेऊन शपथविधीपर्यंत जातील असे मात्र वाटलं नव्हतं' असं शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले. 'अजित पवार फडणवीसांशी चर्चा करत असतांना आज लगेच शपथविधी करावा लागेल असं भाजपाकडून त्यांना सांगण्यात आलं म्हणून त्यांनी शपथ घेतली' असं पवार म्हणाले होते.

तर देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत अजित पवारच सरकार स्थापन करू म्हणून आमच्याकडे आले असं सांगत 'अजित पवार हे आमच्या फसलेल्या गनिमी काव्याचे नायक आहेत आणि मी सहनायक' असं म्हटलं. 'काही गोष्टी योग्य वेळेस समोर येतील' असंही फडणवीसांनी त्यांच्या मुलाखतींत वारंवार सांगितलं. या दोन्ही नेत्यांनी जे तपशील विस्तारानं सांगितले आणि जे टाळले त्या सगळ्यांतून चित्र हे तयार होतं की त्याची उत्तरं अजित पवारांकडे आहेत. पण अजित पवार अद्याप शांत आहेत.

या दोन महत्वाच्या नेत्यांशिवाय आघाडीतल्या काही नेत्यांनी, भाजपाच्या नेत्यांनी अधेमधे त्याविषयी काही सांगितलं. अमित शाहांनी पण एका मुलाखतीत महाराष्ट्रातल्या सरकारवर भाष्यं केलं. पण अजित पवार बोलले नाहीत. 26 नोव्हेंबर 2019 ला राजीनामा दिल्यानंतर स्वगृही परतलेल्या अजित पवारांनी 27 नोव्हेंबरला 'बीबीसी मराठी'ला दिलेला एका छोटेखानी मुलाखतीत जेव्हा त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी 'मी आत्ता या विषयावर काहीही बोलणार नाही आणि योग्य वेळेस पत्रकार परिषद घेऊन सगळं सांगेन' असं उत्तर दिलं. पण ती वेळ अजूनही आली नाही आहे.

'उपमुख्यमंत्री' अजित पवार

23 नोव्हेंबरचं बंड आणि 26 नोव्हेंबरची घरवापसी झाल्यानंतर अजित पवार बराच काळ कोषात होते. ते महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये सामील झाले, पण तिथेही फारसे बोलत नसत. पहिल्या अधिवेशनात अद्याप ते मंत्रिमंडळात नव्हते, पण सभागृहात ते शांतच होते. नंतर कालांतरानं ते उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये आले, पण अनेकांनी नोंदवलं की कायम कामाचा प्रचंड झपाटा आणि उरक असलेले अजित पवार नेहमीसारखे नव्हते.

त्याचं विश्लेषण ब-याचदा जे बंडाचं प्रकरण झालं होतं त्यामुळे ते बॅकफूटवर आहेत असंच केलं गेलं. पण ते या प्रकरणाबद्दल जेव्हा जेव्हा विचारलं गेलं तेव्हा तेव्हा काहीच बोलले नाहीत. कोरोनाकाळात पहिले काही महिने गेल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या भूमिकेत येऊ लागले. पुण्यात सातत्यानं बैठका घेऊ लागले. पत्रकार परिषदा होऊ लागल्या.

अजित पवार, शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

आघाडी सरकारच्या पहिल्या वर्षात हेही निरिक्षण नोंदवल गेलं की अजित पवार भाजपावर टीका करत नाहीत आणि भाजपा महाविकास आघाडीवर टीका करते, पण उपमुख्यमंत्री अजित पवारांवर मात्र नाही. अजित पवारही राजकीय कमी बोलायचे, सरकारी भाषेत उत्तर अधिक द्यायचे. अधिवेशनातही आणि बाहेरही. त्याचे राजकीय अर्थही काढले गेले.

पण वर्षभरानंतर परिस्थिती बदलली. अजित पवार आक्रमक झाले. सरकारची, प्रशासनाची सगळी सूत्र त्यांनी ताब्यात घेतली असं चित्र तयार झालं. प्रशासनाचे सगळे कोपरे चोख माहित असल्यानं उद्धव ठाकरेंची भिस्तही अजित पवारांवर अधिक वाढली. भाजपावरही नेहमीच्या शैलीत टीका करु लागले. मग भाजपा विरुद्ध अजित पवार असा कलगीतुरा महाराष्ट्रात रंगला. त्यातही चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांचं वाग्युद्ध.

असं होऊनही अजित पवार त्यांच्या आणि फडणवीसांच्या सरकारबद्दल मात्र बोलले नाहीत. भाजपा आणि त्यांचं काय बिनसलं यावर राज्यभर चर्चा झाल्या. मंगळवेढ्याच्या निवडणुकीत अजित पवार आणि भाजपानं एकमेकांवर तोंडसुख घेतलं. किरिट सोमय्यांनी आरोप केल्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तरादाखल मोठी पत्रकार परिषद घेतली, भाजपाच्या हेतूवर आरोप केले. पण हा एकच विषय कधीही बोलण्यात आला नाही.

अजित पवार का बोलत नसावेत?

अनेक नेत्यांच्या मुलाखती झाल्या, पुस्तकं लिहिली गेली, दावे केले गेले, पण अजित पवार काहीच का बोलत नसावेत. याबद्दल अनेक कयास लावले जातात. त्यातला एक असा आहे की अजित पवारांसाठी हे प्रकरण इतिहासजमा झालं असावं. ते त्यातून स्वत: बाहेर पडले असावेत. हा पर्याय अजित पवारांसाठी नवा नाही.

यापूर्वी त्यांनी अनेकदा टोकाचे राजकीय निर्णय घेतले आहेत. आरोप झाल्यावर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत वादातून तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यातून कितीही वादंग झाले तरी फारसं स्पष्टिकरण न देता ते पुन्हा मुख्य प्रवाहात कामाला लागले आहेत. त्यामुळे अशा निर्णय वा घटनांविषयी न बोलता त्या विस्मृतीत जाण्याची वाट पाहणं हा अजित पवारांसमोरचा राजकीय पर्याय असू शकतो.

अजित पवार

फोटो स्रोत, facebook

दुसरी शक्यता अशी आहे की अजित पवार हे या प्रकरणात 'मॅन हू न्यू टू मच' आहेत. ते बोलले तर दोन्ही बाजूकडच्या लोकांना काही गोष्टी आवडणार, काही आवडणार नाहीत. त्यामुळे सध्या त्याचं सरकारमध्ये बस्तान बसलेलं असतांना, नवी राजकीय रचना राज्यात तयार होत असतांना कोणालाही का दुखवा असा त्यांचा विचार असू शकतो.

त्यात सध्या भाजपा आणि केंद्रीय यंत्रणा यांच्या नजरेत अजित पवार आहेत. नुकत्याच त्यांच्या जवळच्या व्यक्तींवर प्राप्तिकर खात्याच्या झालेल्या धाडी असोत वा जरंडेश्वर कारखान्याच्या व्यवहाराची चालेलेली चौकशी असो अजित पवार अशा कारणांमुळे चर्चेत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या रोज नव्या बातम्या येत आहेत. त्यामुळे फडणवीसांसोबतच्या सरकारबद्दल बोलून भाजपासोबतच्या संघर्षामध्ये अजून एक मुद्दा का आणावा असाही विचार असू शकतो.

राजकारणामध्ये 'टायमिंग'ला महत्व असतं. माहित असलेल्या गोष्टी कोणत्या वेळेस किती आणि कशा समोर आणायच्या यावर बरीच गणितं ठरतात आणि बदलतात. त्यामुळे दोन वर्षांनंतर अजूनही 23 नोव्हेंबरच्या सरकारबद्दल मौन बाळगून अजित पवार अशा कोणत्या 'टायमिंग'ची वाट पाहताहेत का?

'हे अजित पवारांसाठी अवघड जागेचं दुखणं'

राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशींनी 2019 मध्ये जे राजकीय नाट्य महाराष्ट्रात घडलं त्यावर 'चेकमेट' नावं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकासाठी आणि नंतरही त्यांनी अजित पवारांना जेव्हा याबद्दल विचारायचा प्रयत्न केला तेव्हाही अजित पवार काहीही बोलले नाहीत.

"मी सुद्धा अजित पवारांना अनेकदा भेटून त्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला, पण असं दिसतं की त्यांना तेव्हा जे काही घडलं त्याबद्दल 'झाकली मूठ सव्वा लाखाची' असंच ठेवायचं आहे. अनेक गुपितं त्यात दडलेली असणार आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे किंवा इतर पवार कुटुंबातले पण लोक असतील, तेही यावर फार बोलत नाहीत. तो सगळ्यांसाठीच एक कटू अनुभव होता आणि तो ते मागे टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच अजित पवारही त्यावर बोलत नाहीत," सूर्यवंशी म्हणतात.

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

"अजित पवारांनी बोलायचं जरी म्हटलं तरी काय बोलावं हाही त्यांच्यासमोर प्रश्न असणार आहे. म्हणजे 'मी शरद पवारांना सांगून गेलो होतो' किंवा 'मी शरद पवारांना न सांगता गेलो होतो' हे सांगून कुठंतरी या गोष्टी तुम्हाला क्लिअर कराव्या लागतील ना? पवारांना न सांगता गेलो असं म्हटलं तर अजित पवारांची चूक होती हे सिद्ध होतं. सांगून गेलो असं म्हटलं शरद पवार स्वत: या घडामोडीत सहभागी होते असं सिद्ध होईल. या सगळ्यामुळे हे प्रकरण अजित पवारांसाठी अवघड जागेचं दुखणं बनलेलं आहे. ते तुम्हाला सांगता येत नाही आणि व्यक्तही होता येत नाही. ते मनात कायम दाबून ठेवावं लागतं," सूर्यवंशी पुढे म्हणतात.

सूर्यवंशींच्या मते, जेव्हा हे सगळं प्रकरण संदर्भहीन होऊन जाईल किंवा भविष्यात त्याला काहीही महत्व उरणार नाही तेव्हा अजित पवार कदाचित त्यावर बोलतील.

शरद पवार आणि अजित पवारांचं राजकारण जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या मते या प्रकरणावर अजित पवारांनी बोलण्याची 'योग्य' वेळ नजिकच्या काळात कधीही येणार नाही.

"अजित पवार ज्या राजकीय गोष्टी आहेत त्या बोलतात, पण ज्या वैयक्तिक मनातल्या गोष्टी आहेत त्या कधी बोलत नाहीत. आपण जर एकूण त्यांचा स्वभाव पाहिला तर ते पर्सनल गोष्टींवर व्यक्त होत नाहीत. कुठं कोणापाशी बोलल्यावर मन जसं मोकळं होतं तसं अजित पवार कुठं मन मोकळं करतांना दिसत नाहीत. ते म्हणतात की योग्य वेळ आल्यावर मी बोलेन वगैरे, पण मला असं वाटत नाही ती योग्य वेळ नजीकच्या काळात कधी येईल. ही गोष्ट राजकीय असली तरी अजित पवारांसाठी खूप पर्सनल पण आहे," चोरमारे म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)