You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजस्थानात नवं मंत्रिमंडळ, किती पायलट समर्थकांना संधी?
राजस्थानमध्ये शनिवारी सगळ्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन मंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री अशोल गहलोत यांनी 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्र्यांची नावं जाहीर केली. या मंत्र्यांचा शपथविधीही नुकताच पार पडला. नवीन मंत्रिमंडळात जातीय समीकरणं लक्षात घेण्यात आली आहेत.
तीन राज्यमंत्र्यांनी बढत देत त्यांची कॅबिनेट मंत्र्यांमध्ये समावेश केला आहे. सचिन पायलट यांच्या गटातील 2 जणांना मंत्रिपद दिलं आहे आणि 2 आमदारांना राज्यमंत्री पद दिलं आहे.
बसपामधून काँग्रेसमध्ये आलेल्या एका आमदाराला मंत्रिपद देण्यात आलं आहे. यासोबतच आदिवासी भागातील आमदारांनाही मंत्रिपद देण्यात आलं आहे.
'आमचं समाधान झालंय'
सचिन पायलट यांनी रविवारी शपथविधी सोहळ्यापूर्वी मीडियाशी बोलताना म्हटलं, "कॅबिनेटमधील महिलांचा सहभाग एकवरून तीनवर आला आहे. हा प्रियंका गांधीचा प्रभाव आहे."
मंत्रिमंडळातील फेरबदलावर पायलट समाधानी असल्याचं दिसत आहे. ते पुढे म्हणाले, "आम्ही जे मुद्दे मांडले होते, त्याचं समाधान करण्यात आलं आहे. एखाद्या विभागात काही कमतरता असल्याल त्यात सुधारणा करण्यासाठी आम्ही मिळून प्रयत्न करू."
सचिन पायलट यांच्या गटातील विश्वेंद्र सिंग आणि रमेश मीना यांची पुन्हा कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. बंडखोरी केल्यामुळे त्यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलं होतं, तर पायलट यांचे समर्थक आमदार बृजेंद्र ओला आणि मुरारी मीना यांना राज्यमंत्री पद देण्यात आलं आहे.
मंत्रिमंडळात 4 दलित मंत्री
अशोक गहलोत यांच्या नव्या मंत्रिमंडळात ममता भूपेश, भजन लाल जाटव, टीकाराम जूली या 3 दलित चेहऱ्यांना राज्यमंत्री पदावरून कॅबिनेटवर बढती देण्यात आली आहे.
गोविंदग मेघवाल यांचीही कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे गहलोत यांच्या सरकारमध्ये 4 दलित मंत्री असतील.
रघु शर्मा यांच्याऐवजी ब्राह्मण चेहरा असलेलेल मगेश जोशी यांनी कॅबिनेटमध्ये संधी मिळाली आहे.
तर गोविंद सिंह डोटासरा यांच्याऐवजी राम लाल जाट या जाट समुदायातील नेत्याला कॅबिनेटमध्ये संधी दिली आहे.
बसपामधून काँग्रेसमध्ये आलेल्या 6 आमदारांपैकी एक राजेंद्र गुढा यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. अपक्ष 13 आमदारांपैकी अद्याप एकालाही मंत्रिपद देण्यात आलेलं नाहीय.
अल्पसंख्याक नेत्या जाहिद खान यांनाही मंत्रिपद मिळालं आहे.
राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीला शांत करण्यासाठी अशोक गहलोत यांच्या नव्या मंत्रिमंडळात सगळ्या समीकरणांना लक्षात घेतलं आहे.
असं असलं तरी मंत्रिपदाची आशा असलेल्या अनेक आमदारांची निराशा झाली आहे. त्यामुळे मग ज्या अंतर्गत कलहाला शांत करण्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले, तेसुद्धा वादात सापडण्याची शक्यता आहे.अजून काही मंत्रिपदं रिक्त आहेत, ज्याची लवकरच घोषणा केली जाईल.
कॅबिनेट मंत्री:
हेमाराम चौधरी, महेंद्रजित सिंग मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, विश्वेंद्र सिंह, रमेश मीना, ममता भूपेश, भजन लाल जाटव, टीकाराम जूली, गोविंद राम मेघवाल आणि शकुंतला रावत.
राज्यमंत्री:
जाहिदा खान, बृजेंद्र सिंह ओला, राजेंद्र गुढा आणि मुरारी लाल मीना.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)