मिनाती पटनाईक: रिक्षावाल्याच्या नावावर आपली संपत्ती करणाऱ्या आजींनी सांगितली त्यामागची गोष्ट

ओडिशातल्या 65 वर्षांच्या एका आजींनी तब्बल 1 कोटींची संपत्ती रिक्षावाल्याच्या नावावर केली आहे.

या आजींचं नाव मिनाती पटनाईक असं आहे आणि त्या ओडिशातल्या कटकमध्ये राहातात. ज्या रिक्षावाल्याच्या नावावर त्यांनी आपली एक कोटीची संपत्ती केली त्यांचं नाव बुद्ध समल असं आहे.

मिनाती पटनाईक या ओडिशामधील कट्टक येथे राहतात. तर बुद्ध समल असं या रिक्षावाल्या काकांचं नाव आहे. ते गेल्या 25 वर्षांपासून पटनाईक कुटुंबीयांची कामे करत होते. पती आणि मुलीच्या मृत्यूनंतर बुद्ध यांनी माझी काळजी घेतल्याने आपण हे संपत्ती त्यांना देत असल्याचं मिनाती सांगतात.

"माझे पती तर गेले. समल तर अनेक वर्षांपासून आमच्यासोबत आहेत. माझ्या मुलीला शाळेत नेणं-आणणं, कॉलेजला सोडणं अशी कामं त्यांनीच केली. त्यांच्याशिवाय आमचं पान हलायचं नाही. माझ्या पतींनाही ते कायम सोबत लागायचे, मलाही लागतात," असं मिनाती म्हणतात.

मिनातींचे पती वारल्यानंतर त्यांची मुलगीच त्यांचा आधार होती. पण त्यांच्या मुलीचाही अचानक मृत्यू झाला. मिनाती आजींसाठी हा मोठा आघात होता.

त्यांची काळजी घेणारं, त्यांना आधार देणारं आता कोणीच शिल्लक राहिलं नव्हतं.

"मी पूर्णपणे खचले होते. आतून मोडून पडले होते. मी जेवणखाण सगळं सोडून दिलं. मला कोणी नातेवाईकांनी येऊन विचारलं नाही तू कशी आहे, तू काही खाल्लं का? कोणीही माझ्याकडे लक्ष दिलं नाही."

अशा परिस्थिती रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या बुद्ध समल यांनी मिनाती यांची देखभाल केली.

"मी काय त्याला दगड, माती, विटांनी भरलेलं घर दिलं. पण त्याने जी सेवा केली, जी काळजी घेतली, जे प्रेम दाखवलं त्याची परतफेड तर मी करू शकणार नाही. त्याला राहायला घर नव्हतं. त्याच्या डोक्यावर छप्पर नव्हतं. मी म्हटलं हे माझं घर आजपासून तुझं," मिनाती सांगतात.

मिनाती आजींनी ठरवून टाकलं होतं की आपलं घर समल यांच्या नावावर करायचं.

आपण असं का केलं याबद्दल बोलताना त्या म्हणतात, "माझे भाऊ-बहीण सगळ्यांकडे स्वतःचं घर आहे, प्रॉपर्टी खूप आहे. ज्यांच्याकडे आधीच इतकी प्रॉपर्टी आहे त्यांना अजून प्रॉपर्टी देऊन काय करू मी? याला दिली तर हा सुखाने राहील."

बुद्ध समल गेल्या 25 वर्षांपासून पटनाईक कुटुंबाची लहानमोठी कामं करत आहेत.

मिनाती यांनी आपलं राहातं घर, घरातलं सगळं सामान आणि थोडाफार पैसाअडका, जेवढी संपत्ती त्यांच्याकडे होती सगळी समल यांच्यानावे केली. समल यांच्या मुलीच्या लग्नात त्या आपले दागिने मुलीच्या अंगावर घालणार असल्याचंही म्हणाल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)