You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आशा आंबडे: पदर खोचून हरिहर गड सर करणाऱ्या व्हायरल आजी
हरिहर गड सर करतानाचे ट्रेकर्सचे व्हीडिओ किंवा गो - प्रो ने चित्रित केलेले हरिहर गडाच्या खड्या चढणीचे व्हीडिओ हे रोमांच उभे करणारे असतात. हाच हरिहर गड सर करणाऱ्या एका आजींचा व्हीडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. या आजींचं नाव आशाबाई आंबडे. वय 68 वर्षं. कसा होता त्यांचा ट्रेकिंगचा अनुभव, पाहूया.
हरिहर गडाच्या कातळ पायऱ्या चढून आशाबाई माथ्याजवळ पोहोचल्या आणि 'कमॉन आजी...' म्हणत वर असणाऱ्या ट्रेकर्सनी त्यांचा उत्साह वाढवला. पायऱ्या चढून गडमाथ्यावर आलेल्या आजींचं 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या ललकाऱ्यांमध्ये स्वागत करण्यात आलं.
व्हीडिओ पाहणाऱ्यांसाठी हा क्षण जितका थक्क करणारा होता, तितकीच ही चढाई आजींसाठीही चकित करणारी होती.
बीबीसी मराठीशी बोलताना आशाबाई अंबाडेंनी या चढाईचा अनुभव सांगितला.
आशाबाईंनी म्हटलं,"विचार पडतो...की आपण एवढे वर चढून गेलो...असं वाटलं की बघण्यासारखं काय असेल तिथे? किल्ला असेल? जवळ जाऊन पाहिलं. कठीण आहे चढायला. आम्ही तीन टप्प्यांत स्टेप बाय स्टेप चढलो."
नाशिकजवळचा हा हरिहर गड त्याच्या जवळपास 80 अंशांच्या खड्या चढाईसाठी आणि कातळ पायऱ्यांसाठी ओळखला जातो. हा गड चढणं जितकं अवघड आहे, तितकंच उतरणंही अवघड आहे. रोज न चुकता व्यायाम करणाऱ्या आशाबाईंनी अशी चढाई यापूर्वी कधीच केलेली नव्हती.
लॉकडाऊनच्या काळात व्यायामाचं महत्त्वं आणखी लक्षात आल्याचं त्या सांगतात.
वकील म्हणून नाशिकमध्ये काम करणारी त्यांची दोन्ही मुलं मित्रांसोबत ट्रेकिंगला जातात, पण आपण कधीच हे केलं नसल्याचं त्या सांगतात. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांचा मुलगा-सून आणि नातवासोबत हा गड सर केला.
त्या म्हणाल्या, "अचानकच ठरलं हे. मुलं नेहमी जातात माझी. पण त्यादिवशी सहज माझा लहान मुलगा म्हणाला, आई चलायचं का हरिहर गडला? मी म्हटलं, मी फोटो पाहिलेले आहेत, खूप उंच आहे. मी चढू नाही शकणार. पण तो म्हणाला 'तू चढशील आई.' त्याने मला विश्वास दिला, पण कसं चढणार असा विचार करता करता रात्र निघून गेली. मी नको, म्हटलं पण मुलांनी ऐकलं नाही. मग आम्ही गेलो."
या गडाच्या चढणीचं आव्हान ट्रेकर्सना खुणावतं, पण हीच चढण पाहता अनेकांनी आशाबाईंच्या मुलांना आईला न नेण्याचा सल्लाही दिला.
"काही मुलं, लोकं म्हणाली मुलांना की म्हातारं माणूस आहे. नेऊ नका रे बाबांनो, इथंच बसू द्या. पण मुलं म्हणाली की, आमची आई खूप स्ट्राँग आहे. चढेल आमच्याबरोबर. तो जो वक्राकार घुमट दाखवतात याच्या आतमध्ये आपल्याला जायचंय असं मुलांनी सांगितलं. पण सरळ रस्ता होता तो. एकच माणूस जाईल किंवा येईल. भीती वाटत होती.
"निसटल्यासारखं वाटत होतं. पण मुलाने सांगितलं की दोन्ही हात आणि पाय एकत्र धरले तर तुला चढता येणार नाही. हात-पाय मागेपुढे कर. शिकून गेले मग मी चढायला. जिथे जिथे टप्पा संपत होता तिथेतिथे लोकं खूप टाळ्या वाजवायचे, आनंद व्यक्त करायचे. मला पण खूप आनंद वाटायचा की समोरची सगळी युवा मुलं आपल्यासाठी टाळ्या वाजवतात. आपल्यासाठी आनंद व्यक्त करतात. पण ते मला अनुभवायला मिळालं.
"पहिलं काहीच वाटलं नव्हतं की मी चढेन आणि एवढे लोकं माझ्यासाठी टाळ्या वाजवतील. पण मग मी पण त्यांना नमस्कार केला की, खरंच चढून आले....तुमच्यामुळे चढले मी पोरांनो."
पदर खोचून हरिहर गड सर करणाऱ्या या आजींना भास्करगड आणि कळुसबाईचं शिखर खुणावत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)