तुलसी गौडा - हजारो वृक्ष लावणाऱ्या 'एनसायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट'

पर्यावरण संवर्धनाचं काम करणाऱ्या तुलसी गौडा यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

तुलसी गौडा यांनी आजवर 40 हजारांपेक्षा जास्त झाडं लावून त्यांचं संगोपन केलंय. गेली सहा दशकं त्या पर्यावरण संवर्धनासाठी काम करतायत.

पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतर तुलसी गौडा यांचं नाव जगभरात पोहोचलं होतं.

कोण आहेत तुलसी गौडा?

पर्यावरण, झाडे आणि रोपांचे प्रचंड ज्ञान असल्यामुळे तुलसी गौडा यांना 'एनसायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट' असं म्हटलं जातं. त्यांनी आजपर्यंत 40 हजारांहून जास्त झाडं लावली आणि त्यांचं संगोपनही केलं आहे. काही जणांच्या मते हा आकडा एक लाखाहूनही जास्त आहे.

एका रोपाचं वृक्षात रूपांतर होईपर्यंत आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे त्या त्याची देखभाल करतात.

तुम्ही कर्नाटकात दंडेली, सिरसी किंवा कारवार परिसरातील जंगलात गेलात का कधी? तुलसी गौडा यांनी लावलेली हजारो झाडं याच परिसरात आहेत. विशेषतः सागवान, खैर आणि नंदी यांसारख्या झाडांची रोपं तयार करण, त्यांचं संगोपन करणे, कोणत्या झाडाला कशा प्रकारे वाढवावं, याविषयी तुलसी यांना खूप मोठं ज्ञान आहे.

परिसरातील अनेक पर्यावरण तज्ज्ञ, विद्यार्थी तुलसी यांच्याकडून झाडांविषयीची माहिती घेण्यासाठी त्यांना भेटायला येतात. वृक्षसंवर्धनाबाबत त्या लोकजागृतीही करतात.

गरिबीशी लढाई

तुलसी गौडा कर्नाटकच्या किनारी भागात असलेल्या उत्तर कन्नड जिल्ह्याच्या अंकोला तालुक्यातल होन्नाळी गावातल्या. आर्थिकरीत्या मागास अशा हालाक्की आदीवासी कुटुंबात त्या जन्मल्या, वाढल्या.

डेक्कन हेराल्ड वृत्तपत्राच्या माहितीनुसार, तुलसी दोन वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी शाळेत प्रवेशच घेतला नाही. लहानपणापासूनच त्या आईसोबत शेतात मजुरीसाठी जायच्या.

पुढे कमी वयातच त्यांचं लग्न झालं. पण पती गोविंद यांचंसुद्धा काही वर्षांतच निधन झालं.

पण अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी पर्यावरणाविषयीचं आपलं प्रेम जरासुद्धा कमी होऊ दिलं नाही. उलट पर्यावरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याने संपूर्ण देशासमोर एक उदाहरण ठेवलं आहे.

वनविभागात नोकरी

गेल्या साठ वर्षांपासून तुलसी गौडा वृक्षसंगोपनाचं काम करत आहेत. वयाची सत्तरी पार केल्यानंतरही त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. 'न्यूज कर्नाटक' वेबसाईटवरील एका लेखानुसार, तुलसी वनविभागाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमात नेहमी सहभाग घेतात.

पुढे कंत्राट पद्धतीने त्या वनविभागासाठी काम करू लागल्या. इथल्या अधिकाऱ्यांनी पर्यावरणाविषयीचं ज्ञान आणि वृक्षाबाबतची आस्था पाहिली. पुढे त्यांना वनविभागात कायमस्वरूपी नोकरी देण्यात आली.

कर्नाटक वनविभागात तुलसी 14 वर्षं नोकरीला होत्या. यादरम्यान त्यांनी वृक्षसंवर्धनासाठी खूप काम केलं. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं होतं. आज त्यांचा उदरनिर्वाह निवृत्तीनंतरच्या पेन्शनमधूनच होतोय.

नातवाकडे दिली जबाबदारी

कर्नाटकच्या पब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या सांगतात, "मला वृक्षांचं संगोपन करायला लहानपणापासूनच आवडतं. वयाच्या बाराव्या वर्षापासून मी हे करत आली आहे. झाडांमुळेच आपलं जीवन आहे. आपण पर्यावरणाविषयी जागरूक असलं पाहिजे. झाडांना जगवणं ही आपली सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे."

तुलसी गौडा यांचा नातू शेखरसुद्धा या कामात त्यांना मदत करत आहे. वाढत्या वयामुळे तुलसी यांना जास्त फिरणं जमत नाही. त्यामुळे त्यांनी शेखर यांना याबाबत प्रशिक्षण दिलं आहे. तसंच वृक्षसंवर्धनासाठी कार्य करत राहण्यास त्यांनी शेखर यांना सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)