You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोहित शर्मा टी-20साठी कर्णधार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 विश्वचषकानंतर टी-20 संघाचं कर्णधारपद विराट कोहली सोडणार होता.
या निर्णयामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार असेल. पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहितसाठी ही पहिलीच मालिका असणार आहे. लोकेश राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.
विराट कोहलीसह जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. विश्वचषक ही भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफसाठी शेवटची मालिका होती.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसह माजी खेळाडू राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार आहेत.
विश्वचषकापूर्वी झालेल्या आयपीएलच्या 14व्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली आहे. ऋतुराजने यंदाच्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी पदार्पण केलं होतं.
कोलकातासाठी दमदार प्रदर्शन करणाऱ्या वेंकटेश अय्यरला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळालं आहे. मध्य प्रदेशसाठी खेळणाऱ्या वेंकटेशने आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघातर्फे खेळताना सलामीवीर फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली होती.
या दोघांव्यतिरिक्त श्रेयस अय्यर संघात परतला आहे. विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्ये असलेले श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर संघात परतले आहेत. विश्वचषकासाठीच्या संघात स्थान न मिळालेला युझवेंद्र चहलचं पुनरागमन झालं आहे. अनुभवी भुवनेश्वर कुमार संघात असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघासाठी चांगली कामगिरी केलेल्या अवेश खानला संधी देण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या हर्षल पटेलसह मोहम्मद सिराजला संघात समाविष्ट करण्यात आलं आहे.
ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठीच्या संघापैकी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला वगळण्यात आलं आहे. हार्दिकच्या दुखापतीवरून संभ्रमावस्था पाहायला मिळाली होती. पाठीच्या दुखण्यामुळे हार्दिक गोलंदाजी करू शकला नव्हता. विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये हार्दिकला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती.
विश्वचषकासाठी निवडण्यात आलेले सात खेळाडू या संघातही कायम आहेत. शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश करण्यात आलेला नाही.
या मालिकेतला पहिला सामना 17 नोव्हेंबरला जयपूरला, दुसरा 19 नोव्हेंबरला रांची इथे तर तिसरा सामना 21 नोव्हेंबरला कोलकाता इथे होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), इशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, अवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
या मालिकेच्या बरोबरीने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय अ संघाचीही घोषणा करण्यात आली. प्रियांक पांचाळ भारतीय अ संघाचा कर्णधार असेल. भारतीय अ संघ या दौऱ्यात चारदिवसीय तीन सामने खेळणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)