You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
INDVSPAK: हार्दिक पंड्याच्या दुखापतीचं गौडबंगाल काय?
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या फिटनेसच्या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
हार्दिक पंड्या मध्यमगती गोलंदाज आहे आणि वेगवान खेळींसाठी प्रसिद्ध असा फलंदाज आहे. अतिशय चपळ क्षेत्ररक्षक अशी त्याची ओळख आहे. खेळाशी संबंधित तिन्ही आघाड्यांवर त्याने स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली आहे.
हार्दिक संघात असेल तर संघव्यवस्थापनाला संघात अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज खेळपट्टीच्या गरजेनुसार खेळवता येतो. कारण हार्दिक फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात योगदान देत असल्याने असं करता येऊ शकतं.
हार्दिकमुळे संघाला संतुलन मिळतं. म्हणून हार्दिकचं संघात असणं महत्त्वपूर्ण आहे. पण हार्दिक पूर्ण फिट नसल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
आयपीएलमध्ये काय घडलं?
पाठीचं दुखणं बळावल्यामुळे हार्दिक गोलंदाजी करत नाही. नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी खेळताना हार्दिक सुरुवातीची काही सामने खेळलाच नाही. नंतरच्या काही सामन्यात तो खेळला मात्र त्याने गोलंदाजी केली नाही.
19 सप्टेंबर रोजी चेन्नईविरुद्ध झालेल्या लढतीत हार्दिक खेळला नाही. त्याच्याऐवजी सौरभ तिवारी खेळवण्यात आलं.
23 सप्टेंबर रोजी कोलकाताविरुद्धही हार्दिक खेळू शकला नाही. सौरभ तिवारीला संघात कायम राखण्यात आलं.
26सप्टेंबर रोजी बेंगळुरुविरुद्धच्या लढतीत हार्दिकचा मुंबई संघात समावेश करण्यात आला. त्याने गोलंदाजी केली नाही. फलंदाजी करताना 6 चेंडूत 3 धावा करून बाद झाला.
28 सप्टेंबर रोजी पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या लढतीतही हार्दिकने गोलंदाजी केली नाही. फलंदाजी करताना 30 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 40 धावांची खेळी केली.
2 ऑक्टोबर रोजी झालेल्या लढतीत दिल्लीविरुद्ध झालेल्या लढतीत हार्दिकने 18 चेंडूत 17 धावांची खेळी केली. त्याने गोलंदाजी केली नाही.
5 ऑक्टोबर रोजी झालेल्या लढतीत राजस्थानविरुद्धच्या लढतीत हार्दिकने गोलंदाजी केली नाही. फलंदाजी करताना 6 चेंडूत 5 धावांची खेळी केली.
8 ऑक्टोबर रोजी झालेल्या लढतीत हार्दिकने 8 चेंडूत 10 धावांची खेळी केली. याही सामन्यात तो गोलंदाजी करू शकला नाही.
यादरम्यान ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. त्यामध्ये हार्दिकचं नाव होतं.
जो खेळाडू आयपीएल स्पर्धेत पूर्ण फिट नसल्याने गोलंदाजी करत नाही तो काही दिवसात सुरू होणार असलेल्या ट्वेन्टी20 विश्वचषकात कशी गोलंदाजी करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र बीसीसीआयने यासंदर्भात कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही.
गोलंदाजी करू शकत नसेल तर विशेषज्ञ फलंदाज म्हणून सहाव्या क्रमांकावर त्याला खेळवण्यापेक्षा त्याला संघाबाहेर ठेवावं अशी भूमिका भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने घेतली.
हार्दिकला गेल्या काही दिवसात लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. त्याच्या दुखापतीचं स्वरूप गंभीर असल्याने तो गोलंदाजीसाठी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत त्याच्या जागी अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज खेळवता येऊ शकते असं गंभीरने म्हटलं.
दुसरीकडे पाकिस्तानविरुद्धच्या लढतीआधी कर्णधार कोहलीने हार्दिक गोलंदाजी करत नसल्याने काळजी नसल्याचं म्हटलं आहे. सहाव्या क्रमांकावर फिनिशर म्हणून तो जे करतो आहे ते महत्त्वाचं आहे असं कोहली म्हणाला.
हार्दिक गोलंदाजी करू शकत नसल्याने भारतीय संघासमोरचे सहावा गोलंदाज म्हणून पर्याय कमी झाले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती हे पाच गोलंदाज होते.
यापैकी एखाद्या गोलंदाजांच्या गोलंदाजीवर मोठ्या प्रमाणावर धावा वसूल होत असतील तर सहावा गोलंदाज वापरला जातो. परंतु हार्दिक गोलंदाजी करत नसल्याने सहावा गोलंदाज म्हणून संघासमोर विराट कोहली किंवा रोहित शर्माला गोलंदाजी करावी लागली असती.
हे दोघेही नियमित गोलंदाजी करत नाही. खांद्याच्या दुखापतींमुळे रोहित गोलंदाजी करत नाही. मुख्य फलंदाज आणि कर्णधार अशी दुहेरी जबाबदारी असल्याने विराट गोलंदाजी करत नाही.
पाकिस्तानविरुद्ध खेळताना दुखापतग्रस्त?
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत फलंदाजी करताना हार्दिकच्या खांद्यावर चेंडू आदळला. दुखापती किती गंभीर आहे हे समजून घेण्यासाठी हार्दिक स्कॅनकरता हॉस्पिटलला रवाना झाला.
दुसऱ्या डावात हार्दिकऐवजी इशान किशनने क्षेत्ररक्ष केलं. हार्दिक पुढच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार का? यासंदर्भात बीसीसीआयने अद्याप तरी माहिती दिलेली नाही. हार्दिक खेळू शकला नाही तर शार्दूल ठाकूरला संधी मिळू शकते. मात्र फलंदाज हार्दिकची उणीव भारतीय संघाला भासेल.
पाठीवर झाली आहे शस्त्रक्रिया
2019 मध्ये हार्दिक पंड्याच्या पाठीच्या दुखापतीसंदर्भात शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेमुळे हार्दिकला पाच महिने खेळता आलं नाही. पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही खेळू शकला नाही.
2018मध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या आशिया चषकादरम्यान पाठीचं दुखणं निघालं. या दुखापतीतून सावरत तो आयपीएल 2018 आणि विश्वचषकात खेळला.
कॉफी आणि बरंच काही
कॉफी विथ करण कार्यक्रमात महिलांसंदर्भात आक्षेपार्ह उद्गारांप्रकरणी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल या दोघांवर बंदी घालण्यात आली.
बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला तेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळत होता. बंदीच्या निर्णयामुळे हार्दिकला मायदेशी पाठवण्यात आलं.
या कालावधीत हार्दिकने आपल्या उद्गारांसाठी चाहत्यांची माफी मागितली. "कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, कार्यक्रम हलक्याफुलक्या स्वरूपाचा होता. भावनेच्या भरात मी बोलून गेलो," असं हार्दिकने सांगितलं.
बंदी उठवली मात्र कारवाई बाकी
बीसीसीआयच्या COA अर्थात प्रशासकीय समितीने या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी ओमबड्समनची नियुक्ती झालेली नसल्याने हर्दिक आणि के एल राहुल या दोघांवरील बंदी उठवली.
अमायकस क्युरी अर्थात न्यायालयाचे मित्र पी. व्ही. नरसिंहा यांच्याशी सल्लामसलत करून प्रशासकीय समितीने बंदी हटवण्याचा निर्णय घेतला.
मात्र ओमबड्समनच्या नियुक्तीनंतर याप्रकरणाची सुनावणी होईल आणि कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. बंदी उठवण्यात आल्याने लोकेश राहुलची भारतीय अ संघात निवड करण्यात आली तर हार्दिक न्यूझीलंडला रवाना झाला.
राहुल तिरुवनंतपुरममध्ये भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात खेळला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)