World Cup T20: 'विराट- या माणसांमध्ये द्वेष भरला आहे, त्यांना माफ कर;' राहुल गांधींचा सल्ला

ट्वेन्टी-20 विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर जोरदार टीका होताना दिसते आहे.

भारताची सर्वसाधारण कामगिरी हे यामागचं कारण आहे. खेळात हारजीत होत असते, मात्र पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं.

चाहते, टीकाकार तसंच ट्रोलर्सच्या निशाण्यावर अनेक खेळाडू आहेत. विराट कोहली कर्णधार असल्याने त्याला सर्वाधिक टीकेला सामोरं जावं लागत आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला धर्माच्या मुद्यावरून ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.

पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर हसत हसत पाकिस्तानच्या खेळाडूंचं अभिनंदन करणं अनेकांना पसंत पडलेलं नाही.

पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर मोहम्मद शमीला लक्ष्य करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी कोहलीने शमीच्या समर्थनार्थ बोलणंही अनेकांना रुचलेलं नाही.

कोहली म्हणाला होता, "कोणावरही धर्मावरून टीका करणं एक माणूस म्हणून अतिशय चुकीचं आहे. यानंतर विराट कोहलीला चाहते आणि टीकाकारांच्या रडारवर आहे."

राहुल गांधी यांचा विराटला पाठिंबा

राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "प्रिय विराट. या माणसांमध्ये द्वेषभावना ठासून भरली आहे. या माणसांवर कोणी प्रेम करत नाही. त्यांना माफ कर. संघाची काळजी घे".

राहुलच्या ट्वीटनंतर कोहलीसंदर्भात चर्चेला सुरुवात झाली आहे.

संजुक्ता लिहितात की, "कोहली शमीच्या समर्थनार्थ बोलल्याने या लोकांनी ..गमावलं आहे. आता राहुल गांधी यांनीही कोहलीला पाठिंबा दिला आहे. आपण एकमेकांना साथ द्यायला हवी. आपण एकत्र वाट चाललो तरच द्वेषाची भावना संपुष्टात येईल".

अनु सईद म्हणतात, "ही माणसं कोहलीचा द्वेष करत नाहीत. विराट मुसलमानांचा द्वेष करत नाही याचा ते द्वेष करतात".

कोहलीला ट्रोल करणारी माणसं आक्षेपार्ह भाषेचा वापर करत आहेत. कोहलीच्या मुलीला उद्देशून अश्लाघ्य भाषेत लिहिलेला स्क्रीनशॉट शेअर होतो आहे.

कोहलीच्या खराब प्रदर्शनासाठी याआधीही त्याची पत्नी अनुष्का शर्माला दोषी ठरवण्यात आलं आहे. यावेळी तो अपवाद नाही.

ट्वीटर युजर प्रवीण यांनी तर लिहिलं की 'कर्णधार पाकिस्तानचा गुलाम असेल तर हा सामना अफगाणिस्तान जिंकेल.'

स्वप्नील पाटील म्हणतात की कोहलीची कर्णधार होण्याची पात्रता नाही.

ट्वेन्टी-20 प्रकारात कोहलीची कामगिरी

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत विराटने 57 धावांची खेळी केली होती.

न्यूझीलंडविरुद्ध कोहलीला 9 धावाच करता आल्या. दोन्ही सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं.

आतापर्यंत विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने 47 पैकी 27 सामन्यात विजय मिळवला आहे. फलंदाज म्हणून या प्रकारात कोहलीने 92 सामन्यात 3225 धावा केल्या आहेत.

ट्वेन्टी-20 प्रकारात नेतृत्व करताना कोहलीने 47 सामन्यात 1568 धावा केल्या आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)