World Cup T-20: IPL मुळे थकवा आल्याने टीम इंडिया विश्वचषकात मागे पडत आहे का?

    • Author, आदेश कुमार गुप्त
    • Role, बीबीसी

टी-20 विश्वचषकाचा रविवारचा (31 ऑक्टोबर) सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. न्यूझीलंडने 8 विकेट्स राखत भारताचा सपशेल पराभव केला.

न्यूझीलंडसमोर विजयासाठी 111 धावांचं लक्ष्य होतं. अवघ्या 14.3 ओव्हरमध्ये दोन विकेट गमावत त्यांनी धावा पूर्ण केल्या.

न्यूझीलंडचा डॅरेल मिशेल 48 आणि केन विल्यमसन 33 धावांवर नाबाद राहिले. भारताने टॉस हारला आणि प्रथम फलंदाजी करताना 20 मध्ये सात विकेट गमावत 110 धावा केल्या.

अशा महत्त्वाच्या सामन्यात केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्या तसेच ऋषभ पंत यांच्यासारखे फलंदाज असतानाही स्कोअरबोर्डवर इतक्या कमी धावा असतील तर गोलंदाज तरी हा सामना कसे वाचवणार होते.

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला.

भारत आणि न्यूझीलंडला पराभूत करून पाकिस्तानने वाहवा मिळवली आणि न्यूझीलंडनेही भारताचा पराभव करून सुटकेचा नि:श्वास टाकला असावा. भारताला मात्र आता उपांत्य फेरीत प्रवेश मिळवणं खूप कठीण झालं आहे.

भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकेल का?

क्रिकेट समीक्षक विजय लोकपल्ली म्हणाले," पाकिस्तान आणि आता न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल का हे आता जर-तर अशा परिस्थितीवर अवलंबून आहे.

"जर भारताने उर्वरित सर्व सामने जिंकले, अफगाणिस्तान जर न्यूझीलंडवर मात करू शकला आणि भारताची धावगती जास्त असेल तर उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची शक्यता आहे," असं लोकपल्ली म्हणतात.

भारत सध्या गटात पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे आणि अफगाणिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान प्रत्येकी तीन सामने खेळले असून, पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत आणि अफगाणिस्तानने दोन सामने जिंकले आहेत.

तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंड आहे, ज्यांनी एका सामन्यात विजय मिळवला आहे आणि एक सामना गमावला आहे.

रविवारचा सामना

रविवारच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य सिद्ध केला. कारण 10 ओव्हरनंतर भारताच्या धावा तीन विकेट बाद केवळ 48 होत्या.

भारताने पाकिस्ताविरोधातला सामना हारल्यानंतर दोन बदल केले. सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार यांच्याऐवजी इशान किशन आणि शार्दूल ठाकूर यांना संघात समाविष्ट केलं आहे.

भारताने केएल राहुल आणि ईशान किशन यांच्यासाथीने फलंदाजीला सुरुवात केली.

सोढी, साउदी आणि बोल्टची कामगिरी

न्यूझीलंडसाठी डावातील पहिली ओव्हर ट्रेंट बोल्टने केली आणि केवळ एक रन देऊन दाखवलं की न्यूझीलंडच्या आक्रमणाचा सामना करणं सोपं जाणार नाही. तिसऱ्या ओव्हरमध्येच ईशान किशनने चार धावा करत ट्रेंट बोल्टच्या बॉलवर डेरेल मिचेलला कॅच दिला. तेव्हा भारताच्या 11 धावा झाल्या होत्या.

रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला. पहिल्याच बॉलवर अॅडम मिल्नने जीवदान दिलं. त्याच्याकडून बॉल सुटला. मात्र त्यानंतरही रोहित मोठी खेळी करू शकला नाही. त्याने 14 धावा केल्या.

सलामीवीर के. एल. राहुल तीन चौकार मारुन 18 धावा करुन टिम साउदीच्या बॉलवर बाद झाला. तेव्हा भारताचा स्कोअर 25 होता.

त्यापुढे पाच धावा काढल्यानंतर रोहित शर्मा सोढीच्या बॉलवर मार्टिन गुप्टिलला कॅच देत आऊट झाला. 7.4 ओव्हरनंतर भारताची धावसंख्या तीन विकेट 40 एवढीच होती.

70 धावांपर्यंत अर्धी टीम बाद

या संकटाच्या वेळी कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांच्याकडून भारताला खूप आशा होत्या पण तेही अयाराम गयाराम सिद्ध झाले.

विराट कोहली आपला जम बसवण्यापूर्वीच सोढीच्या चेंडूवर बाद झाला. विराट कोहलीने 17 चेंडूत अवघ्या 9 धावा केल्या. कोहली बाद झाला तेव्हा भारताची चार बाद 48 धावसंख्या होती.

विराट कोहलीनंतर न्यूझीलंडने ऋषभ पंतलाही परतवले. ऋषभ पंतने 19 चेंडूत 12 धावा केल्या. ट्रेंट बोल्टने त्याला बोल्ड केले.

हार्दिक पंड्याही दबावाखाली विखुरला

टीका होत असूनही संघात प्रवेश मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या हार्दिक पंड्याने डाव सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी त्याला मुक्तपणे खेळण्याची संधी दिली नाही.

अखेर हार्दिक पंड्याने ट्रेंट बोल्टचा चेंडू सीमारेषेबाहेर पोहचवण्याच्या प्रयत्नात असताना मार्टिन गप्टिलला कॅच घेतला. त्याने 24 चेंडूत 23 धावा केल्या.

रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर 94 धावांत सहा विकेट गमावल्यानंतर मैदानात होते. शार्दुल ठाकूरचे तर खातेही उघडले नाही.

अखेर रवींद्र जडेजाने 19 चेंडूंत दोन चौकार आणि एक षटकार आणि मोहम्मद शमीच्या मदतीने 26 धावा करून नाबाद राहिले.

न्यूझीलंडची जोरदार गोलंदाजी

न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने 20 धावांत तीन विकेट घेतल्या, इश सोढीने चार ओव्हरमध्ये केवळ 17 धावांत दोन विकेट घेतल्या. याशिवाय टिम साऊदीने 26 धावांत आणखी एक विकेट घेतली आणि अॅडम मिलिनने चार ओव्हरमध्ये 30 धावांत एक विकेट घेतली.

स्पिनर मिचेल सँटनरने एकही विकेट घेतली नाही पण चार ओव्हरमध्ये त्यांने केवळ 15 धावा दिल्या. त्याच्या चेंडूसमोर भारतीय फलंदाज जणू मूर्तीसारखे स्तब्ध होते.

क्रिकेट समीक्षक विजय लोकपल्ली यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "केवळ न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात नव्हे तर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही योग्य संघ खेळला नाही. टीमच्या सलामी फलंदाजापासून टीमच्या पाचव्या गोलंदाजापर्यंत टीम अनिश्चित होती. हार्दिक पांड्याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार पूर्णपणे फीट झालेले नाही आणि ना ते फॉर्ममध्ये आहेत. भुवनेश्वर कुमारचा वेग मंदावला होता. हार्दिक पंड्याचे चेंडूने अत्यंत सामान्य होते."

लोकपल्ली पुढे सांगतात, हा संघ आंतरराष्ट्रीय स्तराचा दिसत नव्हता, पहिल्या सामन्यात संघावर आयपीएलचा थकवा स्पष्टपणे दिसून आला. काहीतरी चमत्कार होईल या आशेवर संघाला जिंकण्याची घाई झाली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)