You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
T20 World Cup : टीम इंडियाला सेमी फायनलला जाईल, पण हे जुगाड जुळून आले तर...
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
विश्वचषकापूर्वी जेतेपदाचा दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिलं जात होतं. मात्र पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेल्या दारुण पराभवामुळे भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये प्रवेश करणंही अवघड झालं आहे.
भारतीय संघाचे तीन सामने बाकी आहेत. भारताला आता स्कॉटलंड, नामिबिया आणि अफगाणिस्तानचा सामना करायचा आहे. सेमी फायनलमध्ये प्रवेशासाठी भारतीय संघाला आता विविध समीकरणांवर अवलंबून राहावं लागणार आहे.
पाकिस्तान, न्यूझीलंड, भारत या तिन्ही संघांनी स्कॉटलंड आणि नामिबियाला हरवलं असं आपण गृहित धरूया. तसं झालं तर पाकिस्तानचे 10 गुण होतील आणि गटात अव्वल स्थान राखत ते सेमी फायनलसाठी पात्र ठरतील.
पाकिस्तानने याआधीच तीन सामन्यात तीन विजय मिळवत दमदार सुरुवात केली आहे. त्यांचा नेट रनरेट उत्तम आहे. त्यामुळे त्यांचं सेमी फायनलमधलं स्थान ही औपचारिकता आहे.
यामुळे गटातून दुसरा कोणता संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार यासाठी भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस असेल.
भारताला अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं तर भारतीय संघाचा सेमी फायनलचा मार्ग बंद होईल. भारताचा पराभव झाला तर मग न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामन्यातील विजेता संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरेल.
भारताने अफगाणिस्तानसह स्कॉटलंड आणि नामिबियाला हरवलं तर त्यांचे 6 गुण होतील. अशा परिस्थितीत, भारताचा सेमी फायनल मार्ग सुकर होण्यासाठी अफगाणिस्तानला सेमी फायनल प्रवेशासाठी न्यूझीलंडला नमवावं लागेल.
अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवलं आणि भारताने अफगाणिस्तानला हरवलं तर भारत-न्यूझीलंड-अफगाणिस्तान या तीन संघांचे प्रत्येकी 6 गुण होतील. अशा परिस्थितीत नेट रनरेट चांगला असणारा संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरेल. यासाठी भारताला नामिबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध प्रचंड फरकाने जिंकावं लागेल.
पण अफगाणिस्तानने स्कॉटलंडला 130 धावांनी नमवत दणदणीत विजय मिळवला होता. त्यांनी नामिबियावरही 62 धावांनी मात केल्यामुळे त्यांचा रनरेट चांगला आहे.
पाकिस्तानविरुद्धची लढतही अफगाणिस्तानने शेवटच्या षटकापर्यंत नेली होती. त्यामुळे सेमी फायनल प्रवेशासाठी अफगाणिस्तानचं पारडं जड आहे.
सध्याच्या परिस्थितीत नामिबियाही भारताच्या पुढे आहे. स्कॉटलंड आणि नामिबियाने उर्वरित लढतीत मोठ्या संघावर विजय मिळवला तर उलथापालथ होऊ शकते. उर्वरित लढतीत त्यांनी चांगला खेळ केला तर त्यांना नेट रनरेट आणखी चांगला होऊ शकतो. तसं झालं तर भारतीय संघासाठी सेमी फायनलचे दरवाजे बंद होऊ शकतात.
भारतीय संघाचे 2 सामन्यात 0 गुण आहेत आणि त्यांचा रनरेट -1.609 असा आहे. भारताचे उर्वरित सामने तुलनेने सोपे असू शकतात मात्र ट्वेन्टी20 हा अतिशय अस्थिर असा प्रकार आहे. कोणताही नवखा संघही मोठ्या संघाला चीतपट करू शकतो.
भारतीय संघाला नुसतं जिंकून चालणार नाही तर दमदार रनरेटसह जिंकावं लागेल. उर्वरित तिन्ही सामने चुरशीचे झाले तर भारतीय संघ रनरेटच्या मुद्यावर मागे पडू शकतो.
विश्वचषकाचा इतिहास पाहिला तर भारताने अफगाणिस्तानविरुद्ध 2 लढती खेळल्या आहेत आणि दोन्ही जिंकल्या आहेत. पहिला सामना 2010 मध्ये तर दुसरा 2012 विश्वचषकात झाला होता. 9 वर्षांनंतर अफगाणिस्तान-भारत ट्वेन्टी20 विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत.
भारत आणि स्कॉटलंड 2007 विश्वचषकात समोरासमोर आले होते. मात्र मुसळधार पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता. भारत-नामिबिया यांच्यात ट्वेन्टी20 विश्वचषकात लढतच झालेली नाही.
पहिल्या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि बांगलादेश असल्याने तो 'ग्रुप ऑफ डेथ' असं वर्णन केलं जात होतं.
मात्र भारतीय संघाने दोन सामने मोठ्या फरकाने गमावल्याने आणि पाकिस्तान संघाच्या दमदार फॉर्ममुळे या गटातही प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.
भारतीय संघाने 2007मध्ये पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 विश्वचषकात जेतेपदाची कमाई केली आहे. पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंकेने प्रत्येकी एकदा ट्वेन्टी20 विश्वचषक जिंकला आहे. वेस्ट इंडिजने दोनवेळा विश्वविजेते होण्याचा मान पटकावला आहे.
न्यूझीलंडने काही महिन्यांपूर्वी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतावर विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरलं होतं. पण वनडे आणि ट्वेन्टी20 प्रकारात जेतेपद पटकावण्यासाठी किवी आतूर आहेत.
दुसरीकडे अफगाणिस्तान राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळे वेगळ्याच स्थितीत आहे. स्पर्धा सुरू होईपर्यंत अफगाणिस्तान खेळणार का याविषयी संभ्रमावस्था होती. तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर हजारो नागरिकांनी देश सोडला.
तालिबान सरकारने अफगाणिस्तान क्रिकेटला पाठिंबा दिला आहे. मात्र रशीद खानने नेतृत्व सोडलं. यानंतर मोहम्मद नबीकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं.
विश्वचषकादरम्यान अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार अशगर अफगाणने निवृत्ती स्वीकारली आहे. मायदेशात घडामोडी घडत असल्या तरी खेळावरचं आमचं लक्ष कमी झालेलं नाही हे दाखवण्यासाठी अफगाणिस्तानचा संघ आतूर आहे.
यासाठी त्यांना उर्वरित लढतींमध्ये दमदार खेळ करावा लागेल. अफगाणिस्तानसमोर भारत आणि न्यूझीलंड या दोन मोठ्या संघांचं आव्हान आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)