रोहित शर्मा : IPL गाजवूनही टीम इंडियासाठी अनफिट का?

रोहित शर्माच्या दुखापतीबाबत पुरेशी स्पष्टता नाही, असं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे सीरिजच्या पूर्वसंध्येला सांगितल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

माहिती तंत्रज्ञान काळातही बीसीसीआय, मुंबई इंडियन्स, संघव्यस्थापन आणि खेळाडू यांच्यात पुरेसा समन्वय नसल्याचंही स्पष्ट झालं आहे.

त्याला नवं कारण ठरलं आहे ते विराट कोहलीनं घेतलेली ऑनलाईन पत्रकार परिषद. ज्यामध्ये विराटने केलेल्या वक्तव्यांमुळे वेगवगेळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

विराट उवाच

"दुबईत निवड समितीची बैठक झाली, त्याधी आम्हाला इमेल आला होता. रोहित निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं त्यात म्हटलं होतं. कारण आयपीएल मॅचदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्याला दोन आठवड्यांची विश्रांती सांगण्यात आली होती.

दुखापतीचं स्वरुप आणि परिणाम त्याला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तो उपलब्ध नव्हता. हे आम्हाला इमेलद्वारे सांगण्यात आलं. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानात तो असेल असं आम्हाला वाटलं होतं. पण तो नव्हता. तो आमच्याबरोबर ऑस्ट्रेलियाला का आला नाही यासंदर्भात आमच्याकडे कोणतीही माहिती नाही".

"त्यानंतरच्या इमेल संभाषणानुसार, रोहित आता बेंगळुरू एनसीएमध्ये आहे. त्याच्या दुखापतीचं परीक्षण वेळोवळी केलं जात आहे. 11 डिसेंबरला त्याच्या दुखापतीचं परीक्षण करण्यात येईल. ही आम्हाला मिळालेली शेवटची माहिती आहे".

"रोहितच्या दुखापतीसंदर्भात वेटिंग गेम सुरू आहे. हे योग्य नाही. हा सगळा प्रकार गोंधळात टाकणारा आहे. यासंदर्भात बऱ्याच गोष्टी पुरेशा स्पष्ट झालेल्या नाहीत. यामुळे सुस्पष्टता नाही," असं कोहलीने व्हर्च्यु्ल पत्रकार परिषदेत सांगितलं.

नेमकं काय घडलं आहे?

आयपीएल मॅचदरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली. दुखापत गंभीर असल्याने तो चार मॅच खेळला नाही. याच दुखापतीच्या कारणास्तव त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही.

बीसीसीआय अध्यक्ष, टीम इंडियाचे कोच यांनीही दुखापत गंभीर असल्याचं सांगितलं. मात्र त्याचवेळी मुंबई इंडियन्सने रोहित नेट्समध्ये सराव करत असल्याचा व्हीडिओ शेअर केला.

दुखापतीमुळे ज्या खेळाडूची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे तसंच ट्वेन्टी-20 मालिकेसाठी निवड झाली नाही तोच रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेत शेवटची लीग मॅच खेळला.

नॉकआऊट टप्प्यातील सगळ्या मॅच खेळला. फायनलमध्ये त्याने मुंबईसाठी निर्णायक अर्धशतकी खेळी करत संघाला पाचवे जेतेपद मिळवून दिलं.

रोहित शर्माने देश की क्लब यामध्ये क्लबला पसंती दिली असं यातून स्पष्ट होतं. मात्र त्याचवेळी बीसीसीआय आणि मुंबई इंडियन्स व्यवस्थापन परस्परविरोधी असल्याचंही स्पष्ट झालं होतं.

कोरोना काळात ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 न खेळून रोहितचं फारसं नुकसान होणार नाहीये.

टेस्ट मॅचेसमध्ये खेळायची संधी मिळाली असती तर तो बोनस ठरला असता. पण त्याआधी त्याने मुंबई इंडियन्सला पाचवं जेतेपद मिळवून दिलं. फायनलमध्ये मॅचविनिंग इनिंग्ज खेळला. सो त्याने जो धोका पत्करला तो यशस्वी ठरला.

मुंबई इंडियन्स आता अढळस्थानी गेलंय. रोहितची ऑस्ट्रेलियातली वनडे कामगिरी अफलातून अशीच आहे. कोरोना काळातल्या या मालिकेत न खेळल्याने त्याचं वैयक्तिक नुकसान होणार नाही, मात्र टीम इंडियाचं मोठं नुकसान होणार आहे.

रोहितची ऑस्ट्रेलियातील आकडेवारी

वनडे

मॅच-30

रन्स-1328

सरासरी-53.12

शतकं-5

अर्धशतकं-4

ट्वेन्टी-20

मॅच-9

रन्स-181

अर्धशतकं-2

स्ट्राईकरेट-131.15

टेस्ट

मॅच-5

रन्स-279

सरासरी-31.00

शतकं-0

अर्धशतकं-2

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा शुक्रवारपासून सुरू होत आहे. भारतीय संघ या दौऱ्यात तीन वनडे, तीन ट्वेन्टी-20, चार टेस्ट खेळणार आहे. यातली पहिली कसोटी दिवसरात्र असणार आहे.

टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार असलेल्या विराट कोहलीला 13 हंगामांनंतरही रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला एकही जेतेपद मिळवून देता आलेलं नाही.

दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशी पाच जेतेपदं पटकावली आहेत.

आयपीएल स्पर्धेतील सर्वोत्तम कर्णधार म्हणून रोहितचं नाव घेतलं जातं. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्स संघाने जेतेपद पटकावलं त्यावेळी रोहित संघाचा भाग होता.

टीम इंडियाच्या वनडे आणि ट्वेन्टी-20 संघाचं नेतृत्व रोहितकडे सोपवावं अशी आग्रही मागणी क्रिकेटरसिकांनी आयपीएलनंतर केली होती.

रोहित शर्मा दुखापत टाईमलाईन

18 ऑक्टोबर

मुंबई इंडियन्सच्या पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये दुखापतग्रस्त. हॅमस्ट्रिंग अर्थात मांडीच्या स्नायूंना दुखापत. ही मॅच टाय झाली, सुपर ओव्हरही टाय झाली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने मुंबईला नमवलं.

23 ऑक्टोबर

रोहितच्या दुखापतीचं परीक्षण सुरू असून, यासंदर्भात बीसीसीआयशी समन्वय राखण्यात आल्याचं मुंबई इंडियन्सचं पत्रक

26 ऑक्टोबर

भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (3 वनडे, 3 ट्वेन्टी-20, 4 टेस्ट) रोहित शर्माची कोणत्याही संघात निवड नाही.

26 ऑक्टोबर

संघ जाहीर झाल्यानंतर काही तासातच मुंबई इंडियन्सकडून ट्वीट- ज्यामध्ये रोहित नेट्समध्ये बॅटिंग करताना दिसतो.

1 नोव्हेंबर

रोहितने खेळायची घाई केली तर त्याची दुखापत बळावू शकते, असं टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांचं वक्तव्य.

3 नोव्हेंबर

रोहितची दुखापत गंभीर आणि त्याला बरं व्हायला वेळ लागू शकतो, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचं वक्तव्य.

3 नोव्हेंबर

रोहितने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत टॉससाठी मैदानात उतरला. मुंबईने प्लेऑफमध्ये स्थान पटकावलेलं असल्याने या मॅचच्या निर्णयाने मुंबईला फरक पडला नसता.

9 नोव्हेंबर

ऑस्ट्रेलियासाठी वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिकेसाठी विश्रांती, कसोटी मालिकेसाठी संघात निवड.

11 नोव्हेंबर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेले खेळाडू विशेष विमानाने ऑस्ट्रेलियाला रवाना, रोहित मात्र मायदेशी रवाना.

13 नोव्हेंबर

रोहित 70 टक्के फिट असल्याचं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचं वक्तव्य.

19 नोव्हेंबर

बेंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीत रोहितचं आगमन.

21 नोव्हेंबर

हॅमस्ट्रिंग बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे, मात्र अजून गोष्टी सुरळीत यायला थोडा वेळ लागेल, असं रोहितचं वक्तव्य.

22 नोव्हेंबर

पुढच्या तीन-चार दिवसात रोहित आणि इशांतने ऑस्ट्रेलियासाठी विमान पकडलं नाही तर कसोटी मालिकेत खेळणं अवघड.

24 नोव्हेंबर

पहिल्या दोन टेस्टसाठी रोहित आणि इशांत फिट नसल्याचे वृत्त.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)