'डुग डुग' : राजस्थानातील 'बुलेट' देवावरच्या चित्रपटाबद्दल तुम्ही ऐकलंय?

'बुलेट बाबा'चं मंदिर

फोटो स्रोत, MINT VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, 'बुलेट बाबा'चं मंदिर
    • Author, फैझल खान
    • Role, बीबीसीसाठी

भारतात 'बुलेट' देवाच्या मंदिराबाबत एका विचित्र कथेवर आधारित एक चित्रपट सध्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये धुमाकूळ घालत आहे.

आपल्या सर्वांनाच बुलेट बाईकचा खास असा 'डुग डुग डुग' आवाज परिचयाचा असेल. याच साऊंडट्रॅकवर आधारित 'डुग डुग' चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे.

जवळपास एका शतकापूर्वी इंग्लंडच्या रेडिचमध्ये सर्वप्रथम निर्मिती झालेल्या 'रॉयल एनफिल्ड' मोटारसायकलच्या घुमणाऱ्या आवाजावर आधारित या चित्रपटाचं कथानक एखाद्या परिकथेसारखं आहे.

मद्यधुंद मोटरसायकलस्वार हायवेवर एका ट्रकला धडकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या व्यक्तीची मोटरसायकल पोलिसांच्या ताब्यातून गायब होते आणि गूढ पद्धतीनं ज्याठिकाणी मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला होता, त्याठिकाणी पोहोचते.

पोलिस ती मोटरसायकल पुन्हा पोलिस ठाण्यात आणतात. पण नंतर प्रत्येक वेळी ती आपोआप त्याठिकाणी पोहोचते.

'बुलेट बाबा'चे मंदिर

त्यानंतर अफवांचा बाजार उठला. आख्यायिका आणि अंधश्रद्धा पुढं येऊ लागल्या. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीला काही दिवसांतच 'साधू' आणि 'महात्मा' म्हटलं जाऊ लागलं.

त्याच्या मोटरसायकलला राजस्थानच्या पाली शहरात 'देवाचा' दर्जा देण्यात आला.

हिंदीमध्ये तयार करण्यात आलेला हा चित्रपट विचित्र परंपरा आणि धर्माच्या बाजारीकरणावर भाष्य करणारा आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास ड्रामा आणि सस्पेन्स याचं मिश्रण यात आहे. लोकांना विचित्र पद्धतीचे विचार आणि अंधश्रद्धा यांच्यावर कायम विश्वास ठेवायचा असतो, अशी ही कथा आहे.

रॉयल एन्फिल्ड

फोटो स्रोत, Getty Images

"एखाद्या गोष्टीवर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला, तर ती तुम्हाला योग्य वाटू लागते," असं राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये जन्म झालेले 'डुग डुग' चे दिग्दर्शक ऋत्विक पारीक म्हणाले.

107 मिनिटांच्या या चित्रपटाचा प्रिमियर गेल्या महिन्यात 46व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला होता. हा चित्रपट जोधपूरपासून जवळपास 75 किलोमीटर अंतरावर असलेलं राजस्थानातील विदेशी पर्यटकांचं आवडतं ठिकाण, पालीमधील एका मंदिराच्या कथेवर आधारित आहे.

भारतातील रस्ते अपघात

रस्त्याच्या कडेला असलेल्या या मंदिरातील देव आहे, एक जुनी रॉयल एनफील्ड बुलेट मोटरसायकल.

ही मोटरसायकल स्थानिक रहिवासी ओम सिंह राठोड यांची होती. 30 वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी जोधपूर-जयपूर हायवेवर एका दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता.

मंदिराला लोक 'बुलेट बाबा' नावानेच ओळखतात. हे मंदिर लांब पल्ल्याच्या ट्रक चालवणाऱ्या ड्रायव्हरचं आवडतं ठिकाण आहे. कठीण मार्गांवर सुरक्षेसाठी ते याठिकाणी पूजा करतात.

रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार जगभरात सर्वाधिक रस्ते अपघात हे भारतातच होतात.

'बुलेट बाबा'चं मंदिर

फोटो स्रोत, MINT VIA GETTY IMAGES

रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांच्या जागतिक आकडेवारीमध्ये 11 टक्के भारताचे आहेत. ताज्या आकड्यांनुसार 2019 मध्ये देशात रस्ते अपघातांत 1 लाख 51 हजार 113 लोकांचा मृत्यू झाला होता.

'डुग डुग' मागचा विचार

ऋत्विक पारीक यांनी पूर्ण वेळ चित्रपट निर्मिती शिकण्यासाठी सहा वर्षांपूर्वी मुंबईत अॅड फिल्ममधली आर्ट डायरेक्टरची नोकरी सोडली होती.

"भारतात आपल्याकडे खूप सारी मंदिरं आहेत. त्यापैकी प्रत्येक मंदिर हे दुसऱ्या मंदिराच्या तुलनेत मोठ्या आश्चर्यासारखं वाटतं," असं ते सांगतात.

मुंबईत राहण्याऐवजी ऋत्विक जयपूरला घरी परत आले.

रॉयल एन्फिल्ड

फोटो स्रोत, Getty Images

एक दिवस ते 2006 मध्ये प्रकाशित झालेलं ब्रिटनमधील जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांचं 'द गॉड डिल्यूजन' पुस्तक वाचत होते.

हे पुस्तक वैयक्तिक मान्यतांवर प्रश्न उपस्थित करतं. त्याचवेळी ऋत्विक यांना जोधपूरमधील 'बुलेट बाबा'ची आठवण आली.

"त्याचवेळी सर्वात प्रथम 'डुग डुग' बाबत मनात विचार आला," असं ते सांगतात.

जोधपूरच्या मंदिराची कथा

हे गाव जयपूरपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचठिकाणी चित्रपटाचं शूटिंगही झालं.

चित्रपटात 'ठाकूर लाल' च्या भूमिकेसाठी निवडलेल्या एका स्थानिकानं ओम सिंह राठोड यांचा आदर करत असल्याचं सांगत, चित्रपट सोडला होता.

चित्रपटात ओम सिंह राठोड यांच्या बुलेट ऐवजी एक जुनी लुना (मोपेडचं एक जुनं मॉडेल) वापरण्यात आली आहे.

ऋत्विक पारीक यांची बहीण प्रेरणा या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.

"ही जोधपूर मंदिराच्या कथेची आमची आवृत्ती आहे," असं पहिल्या चित्रपटाबाबत त्या सांगतात.

"भारतात जवळपास प्रत्येकाच्या बालपणाची काहीतरी कथा असते. त्यात काहीतरी चमत्कारही असतो."

रॉयल एन्फिल्ड

फोटो स्रोत, Getty Images

म्युझिक ग्रुप 'साल्व्हेज ऑडियो कलेक्टिव' शी संलग्न असलेल्या रोहन राजाध्यक्ष यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे.

"हा चित्रपट कुणाची खिल्ली उडवण्याबाबत नाही, तर विश्वासाच्या शक्तीच्या बाबत आहे," असं ते सांगतात.

चित्रपट आणि निर्माते आता आंतरराष्ट्रीय महोत्सवांच्या आणखी एका सर्किटवर स्क्रीनिंगची वाट पाहत आहेत.

"प्रत्येक संस्कृतीमध्ये असे काही पैलू असतात, जे इतरांना विचित्र वाटतात," असं टोरंटो फिल्म फेस्टिव्हलचे प्रोग्रामर पीटर कप्लोस्की म्हणाले.

टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी जगभरातील उत्तमोत्तम आणि वैविध्यपूर्ण चित्रपट सादर केले जातात.

महोत्सवाच्या डिस्कवरी सेक्शनमध्ये 'डुग डुग' ची निवड करण्यात आली आहे.

रॉयल एनफिल्डचा इतिहास

1893 - सुरुवातीला ही कंपनी सायकल तयार करायची. 'रॉयल एनफील्ड' नाव 'रॉयल स्मॉल आर्म्स फॅक्टरी, एनफील्डसाठी सुटे भाग तयार करण्यासाठी वापरण्यात आलं.

1901 - कंपनीने ब्रिटनमध्ये पहिली मोटरसायकल तयार केली.

1914-18 - पहिल्या महायुद्धाच्या काळात रेडिचच्या या कंपनीने ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, अमेरिका आणि रशियाच्या सैन्याला मोटरसायकल पुरवल्या.

1932 - कंपनीने स्लोपर इंजिनसह इतिहासात अमर झालेली प्रसिद्ध अशी 'बुलेट' मोटरसाइकल तयार केली.

1939-45 - दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कंपनीनं लष्करी मोटरसायकलसह सायकली, जनरेटर आणि अँटी एअरक्राफ्ट गनची निर्मिती केली. त्यात सर्वात प्रसिद्ध होती 'फ्लाइंग फ्ली'. त्याचा वापर पॅराशूट आणि ग्लायडर सैनिक करायचे.

1960 चे दशक - क्लासिक मोटरसाइकलचा विकास झाला. पण त्याकाळात रॉयल एनफिल्डसह अनेक ब्रँड संघर्ष करत होते.

1970 - ब्रिटनमध्ये याची निर्मिती बंद झाली. एका भारतीय सहाय्यक कंपनीने निर्मितीची जबाबदारी घेतली.

1994 - भारताच्या आयशर मोटर्सनं एनफिल्ड इंडिया विकत घेतली आणि त्याचं नाव बदलून रॉयल एनफिल्ड मोटर्स लिमिटेड केलं.

2020 - ब्रिटनमध्ये अजूनही कंपनीसाठी मोठी बाजारपेठ आहे. कंपनीची 650 सीसी इंजीनची इंटरसेप्टर मोटरसायकल मिडलवेट कॅटेगरीत सर्वाधिक विक्री होणारी आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)