पाकिस्तानची तिजोरी इम्रान खान यांच्या कार्यकाळात रिकामी का होतेय?

इमरान खान

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इम्रान खान
    • Author, तन्वीर मलिक
    • Role, पत्रकार, कराची

पाकिस्तानच्या सांख्यिकी विभागानं जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये विदेशी व्यापार विभागाला 100 टक्के व्यापारी तोट्याचा सामना करावा लागला आहे.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकारनं व्यापारी तोटा आणि देशातील चालू खात्यांचा तोटा कमी करण्यासाठी, देशात आयात घटवण्याची घोषणा केली होती.

पाकिस्तान सरकारला गेल्या आर्थिक वर्षामध्ये हा तोटा कमी करण्यात काही प्रमाणात यशही मिळालं, मात्र चालू, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आयात प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं व्यापारी तूट वाढत चालली आहे.

तज्ज्ञांच्या मते, वाढती व्यापारी तूट राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक संकेत आहेत. त्याचं कारण म्हणजे हा तोटा चालू खात्यांचा तोटा वाढवून विनिमय दरावर नकारात्मक प्रभाव टाकतो. त्यामुळं डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यावर थेट नकारात्मक परिणाम होतो.

देशांतर्गत चलनावर सध्या डॉलरच्या तुलनेत प्रचंड दबाव आहे. त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे, आयातीच्या शुल्कात वाढ झाल्यानं डॉलरच्या मागणीतही वाढ होणं हे आहे. तर त्याचवेळी देशात निर्यातीमध्ये अत्यंत कमी वाढ पाहायला मिळाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात आयातीमध्ये झालेली प्रचंड वाढ आणि त्यामुळं वाढणारा व्यापारी तोटा अत्यंत धोकादायक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा 'रेड झोन' असल्याचं ते म्हणाले.

विदेशी व्यापार विभागाची कामिगिरी

सरकारी आकड्यांनुसार, गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये असलेला 5.8 अब्ज डॉलरचा व्यापारी तोटा यावर्षी वाढून 11.6 अब्ज डॉलर झाला आहे.

टमाटे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टोमॅटो

या वर्षाच्या पहिल्या तिमाही दरम्यान जुलै ते सप्टेंबरपर्यंत 18.63 अब्ज डॉलरची आयात झाली आहे. गेल्या वर्षी याच काळातील आकडा 11.2 अब्ज डॉलर होता. म्हणजे 65 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

दुसरीकडं देशाच्या निर्यातीतही वाढ झाली.मात्र, ही वाढ 27 टक्के आहे. गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये 5.47 अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. ती यावर्षीच्या तिमाहीमध्ये 6.9 अब्ज डॉलर आहे.

पाकिस्तानातील यापूर्वीच्या सरकारच्या सत्तेतील अखेरच्या आर्थिक वर्षात व्यापारी तोटा विक्रमी पातळीवर पोहोचला होता. त्यावेळी हा 37 अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाला होता.

इम्रान खान

फोटो स्रोत, Getty Images

पीटीआय सरकारनं हळूहळू तो कमी करायला सुरुवात केली होती. या सरकारच्या पहिल्या आर्थिक वर्षात हा तोटा 31 अब्ज डॉलर आणि दुसऱ्या आर्थिक वर्षात 23 अब्ज डॉलर राहिला होता.

मात्र, तिसऱ्या वर्षी तोटा कमी ठेवण्यात सरकारला यश आलेलं नाही. त्यामुळं विद्यमान सरकारच्या 30 जून, 2021 ला संपणाऱ्या तिसऱ्या आर्थिक वर्षात तोटा पुन्हा 30 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. तसंच त्यात सातत्यानं वाढच होत आहे.

पाकिस्तान काय आयात करत आहे?

पाकिस्तान आयात करत असलेल्या गोष्टींवर नजर टाकली असता, त्यात खाद्यपदार्थ, तेल उत्पादनं, वाहनं आणि यंत्रसामुग्रीच्या आयातीत प्रचंड वाढ झाली आहे.

चालू आर्थिक वर्षामध्ये आयात करण्यात आलेल्या बाबींवर नजर टाकली असता, केवळ ऑगस्ट महिन्यातच 66 हजार मेट्रिक टन साखर आयात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केवळ 917 मेट्रिक टन साखर आयात करण्यात आली होती.

मजूर

फोटो स्रोत, Getty Images

त्याचप्रमाणे गव्हाच्या आयातीमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त वृद्धी झाली आहे. तर पामतेलाच्या आयातीमध्ये 120 टक्क्यांची वाढ झाली आहे.

पाकिस्तानात डाळींच्या आयातीमध्ये 84 टक्के आणि चहाच्या आयातीत 24 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

त्याचवेळी तेल उत्पादनात जवळपास 128 टक्के तर वाहनांच्या आयातीमध्ये तब्बल 200 टक्क्यांची वृद्धी पाहायला मिळाली आहे. त्याचप्रमाणे मशिनरीची आयातही वाढली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कोरोनाच्या लशीमुळंही आयात वाढली आहे.

आयातीमध्ये एवढी वाढ होण्याचं कारण काय?

ही वृद्धी खाद्य आणि तेल उत्पादनांबरोबर खाद्य पदार्थ, मशिनरी आणि वाहनांच्या अधिक विक्रीमुळं झाल्याचं अर्थतज्ज्ञ खुर्रम शहजाद यांनी आयातीत झालेल्या वृद्धीबाबत बोलताना म्हटलं.

व्यापार

फोटो स्रोत, Getty Images

"स्थानिक पातळीवर सुविधा आणि उत्पादनं ही या वस्तुंची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशा नाहीत, त्यामुळं पाकिस्तानला आयात करावी लागते," असं त्यांचं म्हणणं आहे.

याचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे, आयातीतून होणारा व्यापारी तोटा कमी करण्यासाठी आवश्यक तेवढी निर्यातवाढ झाली नाही, हेही त्यामागचं एक कारण असल्याचं खुर्रम शहजाद म्हणाले.

"अधिक विक्रीचं आणखी एक कारण म्हणजे, उत्पन्नाची साधने वाढली की विक्रीमध्येही वाढ होते."

मजूर

फोटो स्रोत, Getty Images

विक्रीत वाढ होणं चांगलं असल्याचं ते म्हणाले. पण त्याची पूर्तता आयात केलेल्या वस्तुंच्या माध्यमातून होत असेल तर त्यामुळं व्यापारी तोट्याच्या माध्यमातून देशाचं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले.

आयात शुल्कात वाढीमुळं खाद्य पदार्थांबरोबरच मशिनरी, वाहनं आणि तेल उत्पादनं यातही वाढ झाली आहे. तसंच पाकिस्तानी नागरिकांचं उत्पन्न वाढलेलं नाही, तर त्यांचा खर्च वाढला आहे, असं अर्थतज्ज्ञ डॉक्टर फारुख सलीम यांनी बीबीसी उर्दूशी बोलताना सांगितलं.

2018 पासून आतापर्यंत पाकिस्तानी नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात घट झालेली आहे. त्यावेळच्या 1482 डॉलरवरून ते आता 1190 डॉलरवर आलं आहे.

डॉक्टर फारुख यांच्या मते, निर्यातीत वाढ न होणं हे व्यापारी तोट्याचं प्रमुखं कारण आहे. सरकारनं गेल्या आर्थिक वर्षामध्ये 31 अब्ज डॉलरच्या निर्यातीचा उत्सव साजरा केला होता. पण 2013-14 मध्येदेखील एवढीच निर्यात झाली होती. त्यानंतर ती हळू हळू कमी होत गेली.

"डॉलरच्या त्या काळच्या आणि आजच्या काळातील दराचा विचार केला असता, पाकिस्तानच्या निर्यातीत काहीही वाढ झाली नसल्याचं, पाहायला मिळालं आहे," असं ते म्हणाले.

व्यापार

फोटो स्रोत, Getty Images

"आपण केवळ पामतेल, गहू आणि साखर एवढीच आयात केली तरीही, व्यापारी तोटा वाढणार हे स्पष्ट आहे. त्याचबरोबर वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक यंत्रसामुग्री आयात केली जात आहे. ठराविक वर्षांनंतर ते केलंच जातं. पण यामुळं तात्पुरत्या स्वरुपात काही फायदा होतो. मात्र, हा कायमस्वरुपी तोडगा नाही, असं त्यांनी म्हटलं.

पाकिस्तानात आयात होणाऱ्या खाद्यपदार्थांमधील एक मोठा भाग तस्करीद्वारे अफगाणिस्तानला पाठवला जात असून, त्यामुळं आयात वाढली असल्याची शक्यताही त्यांनी फेटाळला. तस्करी केलेल्या महागड्या वस्तू खरेदी करण्याइतपत अफगाणिस्तानच्या लोकांची क्रयशक्ती नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

सध्या पाकिस्तानला रेमिटन्स (बाहेरून येणारे पैसे) मुळे फायदा होत आहे. अन्यथा सध्या ज्या गतीनं व्यापारी तोटा वाढत आहे, त्यामुळं चालू खात्यांच्या तोट्यावरही प्रचंड परिणाम होऊ शकतो.

पाकिस्तान स्टेट बँकेनं आयात होणाऱ्या बहुतांश उत्पादनांवर शंभर टक्के रोख मार्जिन आकारलं आहे. पण किंमत जास्त असली तरी आवश्यक वस्तुंची विक्री होतच राहणार असल्यानं, आयातीवर त्याचा परिणाम झाला नाही.

आयात वाढल्यामुळं वाढलेल्या व्यापारी तोट्याबाबत, मत जाणून घेण्यासाठी आम्ही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे व्यापार विषयक सल्लागार रझ्झाक दाऊद यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनी आयात हा गुंतागुंतीचा मुद्दा आहे. सध्या मिटिंगमध्ये असून, मी स्वतः नंतर संपर्क साधतो असं म्हटलं. मात्र त्यांनी संपर्क केला नाही.

वाढता व्यापारी तोटा किती धोकादायक?

डॉक्टर फारूख सलीम यांनी देशातील वाढता व्यापारी तोटा हा रेड झोन असल्याचं म्हटलं आहे. व्यापारी तोटा वाढल्यानं चालू खात्याचा तोटा वाढतो, त्यामुळं विनिमय दर आणि चलनाचे दर घसरतात. परिणामी देशात उत्पन्न कमी झाल्यानं गरीबी वाढते, आणि या संपूर्ण दुष्टचक्रात देश अडकतो, असं त्यांनी म्हटलं.

व्यापार

फोटो स्रोत, Getty Images

"व्यापारी तोटा कमी करण्यासठी पीटीआय सरकारचे सर्व दावे केवळ सोशल मीडियावर आहेत. ही त्यांची इच्छा असू शकते, मात्र, व्यावहारिक दृष्ट्या त्यांच्याकडे ठोस धोरण नाही. सरकारला कोणत्या पातळीवर किती यश मिळालं आहे, याचा अंदाज परिणाम पाहूनच लावता येऊ शकतो . तसंच व्यापारी तोटा कमी करण्यासाठी सरकारचं काहीही धोरण नसल्याचं, यावरून स्पष्ट होत आहे," असं ते म्हणाले.

त्यांनी म्हटलं की, जर केवळ तीन महिन्यांमध्ये व्यापारी तोटा जवळपास 12 अब्ज डॉलरचा असेल तर वर्षाच्या अखेरीस तो किती असेल, याचा अंदाज करता येऊ शकतो.

व्यापारी तोटा जीडीपीच्या तुलनेत तीन टक्के असेल तर त्यात चिंता करण्यासारखं काही नाही. कारण अर्थव्यवस्थेमध्ये विकास आणि विक्रीसाठी आयातही करावी लागते. पण ते चार टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्यास, देशाची अर्थव्यवस्था धोक्यात असल्याचे ते संकेत असतात, असं खुर्रम शहजाद यांनी म्हटलं.

अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा आणि स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी देशात कठोर आर्थिक सुधारणा लागू न केल्यानं, आयातीमुळं व्यापारी तोटा वाढत आहे, असंही ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)